संघर्षकथा 1 : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील रेश्माला व्हायचंय जिल्हाधिकारी

व्हीडिओ कॅप्शन, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील रेश्माला व्हायचं आहे जिल्हाधिकारी
    • Author, निरंजन छानवाल/ कैलास चौधरी
    • Role, बीबीसी मराठी

"मला शेती करायची नाही. मला शेतीचं काम आवडत नाही. मी मोठी झाल्यावर शेतकरी होणार नाही," हे म्हणणं आहे रेश्मा गव्हाणेचं. तिच्या शेतकरी वडलांनी गेल्या वर्षी आत्महत्या केली.

रेश्मा गोरोबा गव्हाणे ही बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्याच्या वरपगावात राहते. गेल्या वर्षी जुलै महिन्यात तिच्या वडिलांनी आत्महत्या केली.

जवळच्याच लोखंडी सावरगावमधल्या जय भवानी विद्यालयात ती आठवीत शिकते. तिला शाळेत दररोज चालत जावं लागतं.

वडिलांची आठवण येते

बीबीसीशी बोलतांना रेश्मा म्हणाली, "आमच्याकडे सव्वा एकर शेती आहे. शेतात काही पिकलं नव्हतं म्हणून वडिलांनी गेल्यावर्षी आत्महत्या केली. तेव्हा मी सातवीत शिकत होते."

"त्या दिवशी शनिवार होता. सुटीच्या दिवशी मी घरचांच्या मदतीसाठी शेतात कामाला जात असे. दुपारी मी शेतात गेले असता कळलं की वडिलांनी आत्महत्या केली."

"आम्ही तीन भावंडं आहोत. आई शेतमजुरी करते. आमच्या शेतातली कामं आईच बघते. आईच सगळी कामं करते. शेतात काम करून आई आमच्या शाळेचा खर्च भागवते. यावर्षी एका समाजसेवी संस्थेनं शाळेचं साहित्य घेऊन दिलं."

रेश्मा गव्हाणे
फोटो कॅप्शन, रेश्मा दररोज पायी चालत शाळेत जाते

वडिलांच्या आठवणीविषयी रेश्मा सांगते, "आई जेव्हा शेतात ओझं उचलते तेव्हा मला वाटतं की वडील असते तर आईनं हे ओझं उचललं नसतं. तेव्हा वडिलांची आठवण येते. आई कधी मारायला लागली तर ते मारू देत नव्हते. मला तेव्हा त्यांची आठवण येते."

"आता पैशाची अडचण येते. शाळेत परीक्षा आली की फी भरावी लागते. तेव्हा आईपाशी पैसे नसतात. तेव्हा मग वडील असते तर वडिलांनी शेतात काम करून आणून दिले असते."

मला शेती नाही करायची

रेश्मा गव्हाणे

"मला मोठं होऊन शेतकरी व्हायचं नाही. कारण शेतातल्या अडचणी वेगळ्याच असतात. माझ्या आईसारखंच माझं पण झालं तर?" असा प्रश्न रेश्मा उपस्थित करते.

"शेतकरी मुलाशी मला लग्न करायचं नाही. कारण, मला शेतात काम करायला आवडत नाही. शेतातल्या समस्या वेगळ्याच असतात." असं ती म्हणते.

रेश्माला जिल्हाधिकारी व्हायचं आहे. "वडील असते तर माझं हे स्वप्न शक्य झालं असतं. त्यांची इच्छा होती मी जिल्हाधिकारी व्हावं." असं रेश्मा सांगते.

रेश्मा गव्हाणे
फोटो कॅप्शन, रेश्मा गव्हाणे

"आमच्याकडं अत्यल्प शेती आहे. त्यात फार थोडं उगवतं. जे उगवतं त्यातून लोकांकडून घेतलेली उसनवारी फेडते." असं रेश्माची आई सत्वशीला गव्हाणे सांगतात.

उसनवारी फेडण्यातच जातं शेतीचं उत्पन्न

घरखर्च आणि मुलांच्या शाळेचा खर्च भागविण्यासाठी त्यांना इतरांच्या शेतात मजुरी करावी लागते.

"आर्थिक अडचणी तर आहेतच. माझ्या मुलीला शिकण्याची खूप इच्छा आहे. पण माझ्याकडून ते शक्य होईल की नाही माहिती नाही." अशी भीती त्या व्यक्त करतात.

'7 वर्षात 113 शेतकरी आत्महत्या'

"2010 ते 2017 या काळात अंबाजोगाई तालुक्यातल्या 113 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातील 60 कुटुंबातील मुलांचं सध्या शिक्षण सुरू आहे." असं अॅड. संतोष पवार सांगतात.

रेश्मा गव्हाणे

अॅड. संतोष पवार हे 'आधार माणुसकीचा' या संस्थेचे सदस्य आहेत. ही संस्था अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी काम करते.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)