संघर्षकथा 4 : शेतकरी वडिलांनी आत्महत्या केली आणि रुपालीचं विश्वच बदललं
- Author, श्रीकांत बंगाळे/प्रविण ठाकरे
- Role, बीबीसी मराठी
पाचवीत शिकतानाचं वय खरं तर स्वप्नं पाहण्याचं असतं. स्वतःच्या विश्वात रमण्याचं असतं, पण याच वयात रुपालीला घर सोडून आश्रमशाळेत जावं लागलं आहे.
कारण तिच्या शेतकरी वडिलांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली.
आता तिचं कुटुंब उघड्यावर आलं आहे. कुटुंब जगवण्यासाठी तिच्या आईला यातना भोगाव्या लागत आहेत.
वडिलांना झालेला त्रास आणि आता घरची ही परिस्थिती पाहून रुपाली म्हणते, की शेती नको आणि शेतकरी नवराही नको.
नाशिकच्या कळवण तालुक्यातल्या निवाणे गावात आहेर कुटुंबाचं शेत आहे. रुपालीची आई सुरेखा, वडील कैलास, तिची मोठी बहीण हर्षाली आणि छोटा भाऊ प्रथमेश असं पाच जणांचं हे कुटुंब.
...आणि अचानक सर्वकाही बदललं
वडील असताना तिघंही भावंडं एकत्र गावातल्या शाळेत जायचे. आईची लाडकी रुपाली शेतात रमतगमत काम करायची. भावंडांचा शेतातला बहुतेक वेळ दंगामस्ती करण्यातच जायचा.
नोव्हेंबर २०१५ मध्ये कैलास आहेर यांनी आत्महत्या केली आणि त्यांचं कुटुंब उघड्यावर पडलं.

"पप्पा खूप चिडचिड करायचे. त्यामुळे मला त्यांची भीती वाटायची. शेतात पीक येतं, पण त्यातून पुरेसा पैसा मिळत नाही, म्हणून ते नेहमी चिंतेत असायचे," वडिलांबद्दल ती सांगते.
त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली, याबद्दल ती पूर्णपणे अनभिज्ञ आहे. कारण आत्महत्या म्हणजे काय, हे समजण्याचं तिचं वय नाही.
वडिलांनी आत्महत्या केली तेव्हा ती जेमतेम 8-9 वर्षांची असावी.

वडील गेले आणि खेळणा-बागडणाऱ्या या लेकीचं आयुष्य रातोरात बदललं. तिला गावातली शाळा सोडावी लागली.
आता ती नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमामध्ये राहते. सकाळी पाचला उठते, सगळं स्वत: आवरते आणि शाळेला जाते.
जवळच्याच तळवाडेत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ती पाचवीत शिकते.
शेतकऱ्याशी लग्न नको
तिचा लहान भाऊसुद्धा आज घराच्या मायेला पारखा झाला आहे. तोही तिच्यासोबत याच आश्रमात राहून शिक्षण घेत आहे.

बालपणातच ओढावलेल्या या स्थितीचा रुपालीच्या मनावर फार खोलवर परिणाम झाला आहे.
तिला शेती करायची नाही किंवा कुठल्याही शेतकऱ्याशी लग्न करायचं नाही. पण डॉक्टर बनून शेतकऱ्यांची सेवा करण्याची तिची इच्छा आहे.
"वडील जिवंत असते तर मला घरी राहून शिक्षण घेता आलं असतं, खूप शिकता आलं असतं," असं रुपाली सांगते.
'मह्यासारख्या बाईला तर आत्महत्या करावं वाटते'
पदरी असलेल्या तीन मुलांसाठी रुपालीची आईच आता त्यांची अडीच एकराची शेती स्वतः कसते. रुपालीची मोठी बहीण त्यात त्यांना मदत करते.

नवऱ्याच्या आत्महत्येनंतर आयुष्य कसं बदललं, याबद्दल रुपालीच्या आई सुरेखा आहेर सांगतात, "पोरांना वडिलांची कमतरता जाणवते. पण कोणावरच भरवसा ठेवायचं काम नाही राहिलं आता."
"मह्यासारख्या बाईला तर आत्महत्या करावं वाटते... गरज पडल्यास कोणाशी बोलावं लागलं तर लोक संशयाच्या नजरेनं पाहतात. खूप वाईट परिस्थिती असते आमच्यासारख्या बायांची!..." सुरेखा सांगतात.
पण रुपालीच्या आईने मुलांना आश्रमात का पाठवलं?
"मुलांनी शाळा शिकावी, त्यांच्या पायावर उभं राहावं. माणूस शिकलेला नसला की खूप ठेच लागते," मुलांना आश्रमात पाठवण्यामागे रुपालीच्या आईची ही भूमिका आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









