चीनमध्ये Appleने कुराणाचं अॅप का हटवलं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जेम्स क्लेटोन
- Role, टेक्नॉलॉजी रिपोर्टर, उत्तर अमेरिका
जगातील सर्वात लोकप्रिय अॅपपैकी एक म्हणून कुराण अॅपची ओळख आहे. पण अॅपल या तंत्रज्ञान कंपनीने चीनमध्ये हे अॅप आपल्या डिव्हाईसमधून हटवलं आहे.
चीन प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या विनंतीवरूनच हे अॅप हटवण्यात आलं, अशी माहिती अॅपल कंपनीने बीबीसीशी बोलताना दिली.
कुरान मजीद हे अॅप स्टोअरवर जगभरात सर्वत्र उपलब्ध आहे. तिथं या अॅपचे तब्बल दीड लाख रिव्ह्यू देण्यात आलेले आहेत.
या अॅपमध्ये बेकायदेशीर धार्मिक मजकुराचा समावेश असल्यामुळे हे अॅप हटवण्यात यावं, अशी विनंती चीनमधील अधिकाऱ्यांनी अॅपलकडे केली होती. त्यानंतर चीनमध्ये हे अॅप हटवण्यात आलं. मात्र चीन प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याप्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
हे अॅप बनवणाऱ्या PDMS कंपनीने यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं.
"अॅपलने बेकायदेशीर धार्मिक मजकूर ठेवल्याप्रकरणी आमचं कुराण मजीद हे अॅप चीनच्या अॅप स्टोअरमधून हटवलं. आम्ही चीनच्या सायबर स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन आणि संबंधित चीनी अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत."
हे अॅप चीनमधून डिलीट करण्यात आल्याची नोंद सर्वप्रथम अॅपल सेन्सॉरशीप नामक वेबसाईटने घेतली होती. ही वेबसाईट अॅपल स्टोअरवरील अॅपवर लक्ष ठेवण्याचं काम करते.
मुस्लिमांप्रती चीनची भूमिका
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने देशात इस्लामला अधिकृत धर्म म्हणून मान्यता दिली आहे.
चीनमधील झिनझियांग प्रांतात बहुतांश मुस्लीम आहेत. पण तिथं त्यांच्याविरुद्ध मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याचे आरोप चीनवर लावले जातात. इतकंच नव्हे तर त्याठिकाणी नरसंहार होत असल्याचेही आरोप होतात.
या वर्षाच्या सुरुवातीला बीबीसीने झिनझियांग प्रांतातील परिस्थितीसंदर्भात एक बातमी केली होती. चीनकडून वीगर इमाम यांना लक्ष्य बनवण्यात येत असल्याचं त्यामध्ये आढळून आलं होतं.
दरम्यान, आता हे प्रकरण समोर आलं आहे.

फोटो स्रोत, quranmajeed
अॅपलने या घडामोडींवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. पण बीबीसीशी बोलताना त्यांनी आपल्या मानवाधिकार धोरणांचा उल्लेख केला.
या धोरणानुसार स्थानिक कायद्यांचं पालन करण्याची आपल्याला गरज आहे. अनेकवेळा अशा प्रकारची गुंतागुंतीची प्रकरणे समोर येतात. यामध्ये आपण सरकारसोबत अहमत असू शकतो."
परंतु, कुराण मजीद अॅपने चीनचा कोणता नियम मोडला, ही बाब स्पष्ट नाही. हे अॅप बनवणाऱ्या कंपनीच्या मते, जगभरातील साडेतीन कोटी मुस्लिमांचा त्यांच्यावर विश्वास आहे.
अॅपलवर आरोप
गेल्या महिन्यात अॅपल आणि गूगल या दोन्ही कंपन्यांनी तुरुंगात बंदी असलेले रशियाचे विरोधी पक्ष नेते अॅलेक्सी नवालनी यांच्यासाठी बनवण्यात आलेलं टॅक्टिकल व्होटिंग अॅप प्ले स्टोअरवरून हटवलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
रशियन अधिकाऱ्यांनी या दोन्ही कंपन्यांना धमकी दिली होती. हे अॅप न हटवल्यास दंड ठोठावण्यात येईल, असं त्यांनी म्हटलं.
या अॅपमध्ये रशियात सत्ताधारी पक्षाला कसं आणि कोण हटवलं जाऊ शकतं, हे सांगितलं जात होतं.
अॅपलसाठी चीन जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. इतकंच नव्हे तर कंपनीच्या उत्पादनांचा पुरवठा प्रामुख्याने चीनच्या उत्पादनक्षमतेवरच अवलंबून आहे.
अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी अमेरिकेतील नेत्यांवर दुटप्पीपणा केल्याचा आरोप लावला आहे.
हे नेते अमेरिकेतील राजकारणासंदर्भात बोलतात, पण चीनशी संबंधित प्रकरणांवर ते मौन बाळगतात, असं कुक म्हणाले.
याआधी, 2017 मध्ये टिम कुक यांनी डोनाल्ड ट्रंप यांच्या सरकारवर जगभरातील 7 मुस्लीम देशांच्या प्रवासावर निर्बंध घातल्याच्या मुद्द्यावरून जोरदार निशाणा साधला होता.
पण आता चीन सरकारच्या सेन्सॉरशीपचं पालन करणं आणि तिथल्या मुस्लीम अल्पसंख्याकांविरुद्ध चीनच्या वागणुकीवर सार्वजनिक स्वरुपात टीका न करणं असे आरोप अॅपलवरच लावले जात आहेत.
दबाव
यावर्षीच्या सुरुवातीला आलेल्या न्यूयॉर्क टाईम्समधील एका बातमीनुसार, चीन सरकारने बंदी घातल्यानंतर अॅपल ते अॅप प्ले स्टोअरवरून हटवत असतं.
शिवाय, अॅप्स चीनमध्ये तियाननमेन चौकातील घटना, चीनमधील फालुन गोंग हा अध्यात्मिक संप्रदाय, दलाई लामा आणि तिबेट तसंच तैवानचं स्वातंत्र्य याविषयी चकार शब्द उच्चारू शकत नाहीत.

फोटो स्रोत, AFP
याच आठवड्यात चीनमध्ये बायबल हे दुसरं एक लोकप्रिय धार्मिक अॅप प्ले स्टोअरवरून हटवण्यात आलं होतं.
पण अॅपलने हे अॅप स्वतःहून हटवलं नव्हतं, असं कंपनीने सांगितलं.
हे अॅप बनवणाऱ्या ऑलिव्ह ट्री कंपनीनेही या विषयावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
अॅपल सेन्सॉरशीप वेबसाईटचे संचालक बेंजामिन इस्माईल यांनी म्हटलं, "सध्या अॅपलचं रुपांतर बिजिंगच्या सेन्सॉरशीप ब्युरोमध्ये झाल्याप्रमाणे वाटत आहे. तसं न करता अॅपलने ठाम भूमिका घेणं गरजेचं आहे. त्यांनी चीन सरकारच्या कोणत्याही प्रतिक्रियेचा सामना करण्याची तयारी ठेवली पाहिजे.
गुरुवारी (14 ऑक्टोबर) मायक्रोसॉफ्ट कंपनीने चीनमध्ये लिंक्ड इन बंद करत असल्याचं म्हटलं होतं.
चीन सरकारच्या नियमांचं पालन करणं आव्हानात्मक बनत आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं होतं.
लिंक्ड इनवर अनेक पत्रकारांचे प्रोफाईल ब्लॉक केले जात असल्याने कंपनीला प्रश्न विचारले जात होते. त्यानंतर लिंक्डइनने चीनमधलं कामच थांबवण्याचा निर्णय घेतला होता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








