लेगॉस, नायजेरियाः 'या' देशात तरंगतं शहर का तयार केलं जात आहे?

नकाशा

फोटो स्रोत, Getty Images

आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं हे शहर वाढत्या समुद्र पातळीने व पुरांमुळे सर्वाधिक असुरक्षितही बनलं आहे. अशा परिस्थितीत तरंगत राहत तग धरून राहण्यासाठी या शहराला वास्तुरचनांपासून वाहतुकीपर्यंत अनेक गोष्टी बदलाव्या लागण्याची शक्यता आहे.

नायजेरियातील लेगॉसच्या गिचमिड्या रस्त्यांवरून वाट काढणं अनेकदा आव्हानात्मक असतं. पण पावसाळ्यामध्ये तर शहरातील रस्त्यांवरून जाणं जवळपास अशक्यच होऊन जातं.

दोन कोटी 40 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेलं लेगॉस हे शहर नायजेरियाचं आर्थिक शक्तिस्थान आहे. नवीन संधींच्या शोधात लोक इथे येतात. पण ही वेगाने होणारी वाढ रस्त्यांवरचा व पर्यावरणावरचा ताण वाढवणारी ठरते.

तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला निवडण्यासाठी CLICK HERE

या शहरात रोज सुमारे सहा हजार ते दहा हजार टन कचरा निर्माण होतो आणि त्याची विल्हेवाट लावणारी सक्षम नसल्यामुळे रस्त्यांवर पाणी तुंबण्याला हातभार लागतो. पाऊस पडल्यावर हा कचरा खुल्या गटारांमधून ढिगाने वर येतो आणि रस्त्यांवरून चालणं अवघड होऊन जातं.

"पाऊस पडतो, विशेषतः मोठा पाऊस पडतो, तेव्हा मला चिंता वाटते," असं लागोसमधील एक रहिवासी स्टेफनी एरिघा सांगतात. "अस्वस्थ व्हायला होतं."

एकदा शहरातील तुंबण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भागातून टॅक्सीने जात असताना मागच्या सीटवर पाणी येत होतं, ती आठवण त्या सांगतात.

हवामानबदलामुळे लागोसमध्ये एकंदरित कमी पाऊस पडण्याची शक्यता असली, तरी पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे तिथे पुरांचा धोका वाढणार आहे. दरम्यान, वाढत्या समुद्रपातळीमुळेही या सखल भागातील शहराच्या असुरक्षितावस्थेत वाढ होणार आहे.

जागतिक तापमानवाढ दोन अंश सेल्सियसच्या पुढे गेली, तर 2100 सालापर्यंत या शहराला समुद्रपातळीतील 90 सेंटीमीटर वाढीला सामोरं जावं लागेल, असं युनायटेड किंगडममधील नॅशनल ऑशनोग्राफी सेंटरमधील समुद्री भौतिकशास्त्रज्ञ स्वेतला जेवरेजेवा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनातून समोर आलं आहे.

पुराचा धोका, तुंबलेले रस्ते आणि वाढती समुद्रपातळी या संकटाला सामोरं जाताना आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्ये असलेलं हे शहर कशा रितीने परिस्थितीशी जुळवून घेतं आहे?

तरंगती वास्तुरचना

लागोसचा एक भाग तुंबलेल्या पाण्याला तोंड देण्यात बराच अनुभवी झालेला आहे. बहुतांश मकोको वसाहत जमिनीवर उभारलेलीच नाही, तर पाण्याच्या पातळीवर राहणाऱ्या खांबांवर ही बांधकामं झालेली आहेत.

आफ्रिकेतील व्हेनिस म्हणून ओळखला जाणारा मकोको हा भाग खांबांवर बांधलेल्या झोपडपट्ट्यांचा एक भुलभुलय्या आहे. त्यात प्रवास करण्यासाठी तराफ्यांचा वापर करावा लागतो. या झोपडपट्टीत वीज वा स्वच्छता सेवांची फारशी उपलब्धता नाही.

तरंगतं शहर

फोटो स्रोत, NLE

इथे मकोको तरंगत्या शाळेसारखे काही अभिनव प्रयोगही पाहायला मिळतात- हलकेपणासाठी प्लास्टिकच्या रिकाम्या पिंपांवर या शाळेचं बांधकाम तोलून धरलेलं आहे. शाळेच्या पिरॅमिडसारख्या आकारामुळे त्याचं गुरुत्वाकर्षण केंद्र खाली आलं आहे, आणि स्थिरता वाढली आहे. शिवाय, जोराचा पाऊस झाला तर त्यापासून बचावासाठी खास छपराचा आकारही त्याला मिळाला आहे.

परंतु, 2016 सालच्या वादळामध्ये नुकसान झाल्यावर हा बांधकामाचा नमुना फारसा टिकू शकला नाही. पण यातून तरंगत्या रचनेचा एक पायंडा पडला आणि या बांधकामाचे वास्तुरचनाकार कुन्ले अदेयेमी यांनी इतर किनाऱ्यांवरील शहरांमध्ये या कल्पनेचा वापर केला. या तरंगत्या रचनेची पुनरावृत्ती व्हेनिस व ब्रजेस या ठिकाणीही झाली आहे.

अगदी अलीकडे केप वेर्देमधील साओ व्हिसेन्ट या बेटावरील मिन्देलो या शहरामध्ये अशाच प्रकारची एक रचना बांधण्यात आली. "हे तरंगतं संगीत केंद्र आहे," असं एनएलई या नागरी रचना व विकास यासंबंधी सल्ला देणाऱ्या संस्थेचे संस्थापक अदेयेमी सांगतात.

"यात आम्ही अटलान्टिक महासागरामधील एका उपसागरात हे बांधतो आहोत." हे बांधकाम लाकडपासून झालेलं आहे आणि त्यात तीन तरंगती जहाजं असून एक बहुउद्देशीय प्रत्यक्ष सादरीकरणासाठीचं सभागृह आहे, एक अत्याधुनिक रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे आणि पाहुण्यांसाठी एक मंच आहे.

तरंगत्या रचना बांधण्यासाठी लाकूड ही आदर्श टिकाऊ सामग्री आहे, असं अदेयेमी म्हणतात. "पाण्यावर बांधकाम करण्यासंदर्भातील विविध पर्यायांचा खर्च-लाभ असा तक्ता तयार केला, तर त्यात लाकूड सर्वांत वरच्या स्थानावर येईल," असे ते म्हणतात.

तरंगतं संगीत केंद्र एनएलईच्या आफ्रिकी जलशहरं प्रकल्पाचा भाग आहे. पाण्याजवळ असलेल्या समुदायांना वाढत्या समुद्रपातळीसह जगण्यासाठी नवीन मार्ग शोधणारा हा प्रकल्प आहे. पाण्याशी झगडण्याऐवजी त्याच्या सोबत कसं जगायचं हे शिकायची आमची इच्छा आहे, असं अदेयेमी म्हणतात.

पाण्यामुळे वाहतूककोंडी

लागोसच्या एक रहिवासी ओलाजुमोके ओयेलेसी यांना तराफ्यांवरून एकदा प्रवास केल्यावर त्या यावर 'भाळल्या'. लेगॉसच्या रस्त्यांवर कुंठीत वाहतुकीमध्ये त्यांना जितका वेळ घालावा लागत होता, त्या तुलनेत हे खूपच वेगाने होऊ लागलं.

तरंगतं शहर

फोटो स्रोत, NLE

लेगॉस राज्य जलमार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक ओलुवादमिलोला इमॅन्युएल म्हणतात की, शहरातील जलमार्ग वाहतुकीची व्याप्ती बरीच मोठी आहे. आता तीन जिल्ह्यांमध्ये मिळून 42 हून अधिक फेरी मार्ग असून 30 व्यावसायिक जेट्टी व स्थानकं आहेत, असं इमॅन्युएल सांगतात.

शहरा प्रशासनाव्यतिरिक्त अधिकाधिक कंपन्या जलमार्ग वाहतुकीच्या व्यवसायात उतरत आहेत. 2019 साली उबरने प्रायोगिक तत्त्वावर उबेर बोट सर्व्हिस सुरू केली. शहरातील रस्त्यांवरची कुख्यात वाहतूककोंडी कमी करणं, हे यातील उद्दिष्ट आहे.

"लेगॉसमध्ये रस्त्यावरील वाहतूककोंडीने दररोज किती मनुष्य-तास व उत्पादकता वाया जाते, याची आम्हाला जाणीव आहे," असं कंपनीचे प्रवक्ते लॉरेन उंडुरू म्हणाले. "शहरातील व्यावसायिक केंद्रांमध्ये ये-जा करण्यासाठी सोपा व किफायतशीर मार्ग पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे."

उबेर बोट सर्व्हिसचा प्रयोग दोन आठवडे सुरू होता. त्यात प्रवाशांना अॅपचा वापर करून आपली जागा नोंदवावी लागत होती. एका बोटीत किमान 35 लोक बसत होते. दिवसाकाठी कमाल चार फेऱ्यांमधून या लोकांना आपापल्या इच्छित स्थळी सोडलं जात होतं. लेगॉसवासीयांना बोटीचा पर्याय खरोखरच दीर्घकालीन उपाय पुरवू शकतो का, याबद्दल उबेर बोट सर्व्हिस अजूनही मूल्यमापन करते आहे.

लागोसमधील प्रचंड वाहतूककोंडीवर जलमार्गे वाहतूक हे एक उत्तर असण्याची शक्यता आहे, पण रस्त्यावरून प्रवस करण्यापेक्षा बोटीने किंवा फेरीने प्रवास करणं अधिक शाश्वत स्वरूपाचं आहे का?

लागोसमधील या प्रवासी पर्यायांची तुलना करणारी अत्यल्प आकडेवारी उपलब्ध आहे. युनायटेड किंगडमच्या व्यवसाय, ऊर्जा व औद्योगिक व्यूहरचना खात्याने बांधलेल्या अंदाजानुसार, पायी प्रवाशांना नेणाऱ्या फेरीमधून होणारं दरडोई कार्बन उत्सर्जन बस, कोच किंवा टॅक्सी यांमधील प्रवाशांपेक्षा कमी असतं.

शहरात सर्वत्र जेट्टी उभ्या राहत असल्या, तरी रस्त्यावर अवलंबून असलेल्या प्रवाशांच्या प्रचंड संख्येवर अजून जलवाहतुकीचा प्रभाव पडलेला नाही. विशेषतः फेरी-बोटींवरील प्रवाशांची संख्या कोव्हिड साथीदरम्यान कमी झाली होती. ही सेवा उपलब्ध असते, तेव्हा सामाजिक अंतराच्या निर्बंधांमुळे प्रत्येक फेरीतील प्रवाशांची संख्या अर्धी करावी लागते.

पण ओयेलेसीसारखे लेगॉसवासीय बदलण्यासाठी उत्सुक आहेत आणि सध्याच्या फेरी-बोट सेवा शहराच्या उर्वरित वाहतुकीच्या जाळ्यात सामावली जावी असं त्यांना वाटतं.

"वाहनं, सामान आणि प्रवासी असं सगळं वाहून नेणारा फेरी-बोटीसारखा पर्याय असायला हवा," असं त्या म्हणतात. "मला वाटतं ही एक गोष्ट कमी आहे."

किनाऱ्यावरील वेढा

वाढत्या समुद्रपातळीपासून एक मोठा बचाव म्हणजे 'ग्रेट वॉल ऑफ लागोस'- प्रत्येक पाच टनांच्या एक लाख कॉन्क्रिट-ब्लॉकने हा बांध घालण्यात आलेला आहे. साठ फूट उंचीच्या या बांधामुळे लागोसच्या एको अटलान्टिक किनारपट्टीला संरक्षण लाभतं. समुद्रात भर घालून तयार झालेल्या जमिनीवर हे बांधकाम होत असून अंतिमतः ही भिंत 8.4 किलोमीटर इतकी लांब असेल.

फेरीबोट

फोटो स्रोत, Getty Images

अटलांटिक महासागराच्या दक्षिण भागातून येणाऱ्या वादळामुळे मोठमोठ्या लाटा उसळतात. त्यापासून नवीन विकासप्रकल्पांना संरक्षण पुरवण्याच्या उद्देशाने ही भिंत उभारण्यात आली आहे. पण काही प्रदेशांमधील किनारपट्टीचं संरक्षण करताना इतर ठिकाणी झीज वाढवण्याचं काम ही भिंत करते आहे, अशी चिंताही टीकाकारांनी व्यक्त केली आहे.

समुद्राचं संरक्षण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या इतर रचनांमध्ये एको अटलान्टिकच्या किनाऱ्यावरील 18 ग्रोयनचा समावेश आहे. वाळू थोपवून समुद्रात वाहून जाऊ नये यासाठी बांधलेल्या रचनेला ग्रोयन म्हणतात. एको अटलान्टिकमध्ये बांधण्यात आलेल्या या रचना एकमेकांपासून प्रत्येकी 1300 फूट लांब आहेत आणि सुमारे 7.2 किलोमीटरांच्या अंतरावर पसरलेल्या आहेत. राज्याच्या किनारपट्टीचा पुढील 60 किलोमीटरच्या भागातलीह ग्रोयनचं बांधकाम प्रस्तावित आहे, त्यासाठी एक अब्ज डॉलर इतका खर्च अपेक्षित आहे, असं न्यूज एजन्सी ऑफ नायजेरियाने दिलेल्या बातमीत म्हटलं होतं.

पुराचं पूर्वानुमान

पूर थोपवण्यासाठी अशी किनाऱ्यावरील बांधकामं हा मोठा दृश्यात्मक हस्तक्षेप असला तरी कमी दृश्यमान असलेले हस्तक्षेपही शहराच्या चिवटपणासाठी तितकेच महत्त्वाचे असू शकतात.

समुद्र किनारा

फोटो स्रोत, Getty Images

लेगॉससारख्या पाण्याने वेढलेल्या शहरांना स्वसंरक्षणासाठी पुरेशी तयारी करण्याकरिता वेळ मिळावा, याकरिता पुराचं पूर्वानुमान सांगणारं अॅप नायजेरियातील प्रशासनाने तयार केलं आहे. हे अॅप ऑनलाइन उपलब्ध आहे आणि विशिष्ट भागातील त्या वेळची पूर पूर्वानुमानाची माहिती त्यावर दिली जाते. त्यासाठी नायजेरिया जलविज्ञान सेवा संस्थेने (नायजेरिया हायड्रोलॉजिकल सर्व्हिस एजन्सी: एनआयएचएसए) संकलित केलेली आकडेवारी वापरली जाते.

आधीच्या वेट-इन अॅपपेक्षा या नवीन अॅपची व्याप्ती खूप मोठी आहे. आधीचं अॅप नायजेरियाच्या कृषी मंत्रालयाने तयार केलेलं होतं. वेट-इन अॅपमध्ये केवळ तीन पूरग्रस्त राज्यांमधील शेतकऱ्यांना लक्ष्यस्थानी ठेवलेलं होतं आणि अपेक्षित आपत्तीच्या चार दिवस आधी धोक्याचा इशारा दिला जात असे. त्या आधी प्रशासनाला पुराचा अंदाज बांधण्यासाठी नियतकालिकं, नभोवाणी व दूरचित्रवाणी यांसारख्या माध्यमांवर विसंबून राहावं लागत असे.

नवीन फ्लड मोबाइल अॅप लोकांना नायजेरियातील कुठल्या भागातील पुराच्या धोक्यावर लक्ष ठेवायला मदत करेल, असा विश्वास एनआयएचएसएने व्यक्त केला. प्रचंड पावसाने व्यावसायिक व निवासी भागांमध्ये रस्ते तुंबण्याची शक्यता असल्यामुळे लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देणारे सुरुवातीचे संकेत दिले जात आहेत. तरुण लोक वगळता इतरांमध्ये अशा आधुनिक तंत्राधारित सेवा वापरण्याचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे ग्रामीण भागांमधील संभाव्य वापरकर्ते आणि मोबाइल फोन नसलेले लोक यांना यातून वगळलं जातं.

हे व असे इतर बदल केले नाहीत, तर वाढत्या समुद्रपातळीमुळे या शतकात लेगॉसमधील लाखो लोकांना विस्थापित व्हावं लागेल. सखल भागातील मकोकोसारखे प्रदेश सर्वाधिक असुरक्षित आहेत. पण समुद्राजवळ कसं राहावं हे शिकून, जलमार्गांचा वापर करून, शहराच्या किनारपट्टीचं संरक्षण करून आणि पूर येण्याची शक्यता आधी लक्षात घेऊन आफ्रिकेतील हे सर्वांत मोठं शहर तरंगत तरंगत तग धरण्याचा प्रयत्न करतं आहे.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)