डोळ्याजवळ टोकदार शस्त्र घुसवून केलेली मेंदूची लोबॉटमी ही शस्त्रक्रिया का लोकप्रिय झाली होती?

फोटो स्रोत, Getty Images
एके काळी गंभीर मानसिक आजार असलेल्या लोकांना मेंदूतील काही जोडण्या कापण्याच्या शस्रक्रियेला सामोरं जावं लागत असे. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेला 'लोबॉटमी' (पूर्वललाटखंड विच्छेदन) असं म्हणतात.
लोबॉटमी ही विसाव्या शतकातील एक सर्वाधिक कुख्यात शस्त्रक्रिया म्हणून ओळखली गेली, असं क्लेअरे प्रेन्टिस लिहितात. पण या शस्त्रक्रियेचं सुधारित रूप एकदा उपयोगात आणून पाहिलेले चेताशल्यविशारद हेन्री मार्श म्हणतात की, डॉक्टरांची विभागणी नायक व खलनायक अशी करणं चुकीचं आहे.
आज हे अविश्वसनीय वाटतं, पण एकेकाळी लोबॉटमीला चमत्कारसदृश स्थान प्राप्त झालं होतं. डॉक्टर व प्रसारमाध्यमं या शस्त्रक्रियेचं वर्णन 'दातदुखीवरील उपचारापेक्षा सोपी' असं करत असत.
1940 च्या आरंभापासून 1970 च्या अखेरपर्यंत युनायटेड किंगडममध्ये 20 हजारांहून अधिक लोबॉटमी शस्त्रक्रिया पार पडल्या. विशेषतः छिन्नमनस्कता, गंभीर नैराश्य व ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर (ओसीडी) यांच्या रुग्णांवर ही शस्त्रक्रिया पार पाडली जात असे. पण काही वेळा शिक्षणात अडचणी येणाऱ्या किंवा आक्रमकता नियंत्रणात ठेवण्यात अडचणी येणाऱ्या लोकांवरदेखील ही शस्त्रक्रिया केली जात असे.
लोबॉटमीनंतर थोड्याच लोकांच्या मानसिक लक्षणांमध्ये सुधारणा होत असे, काहींची मती गुंग होऊन जात असे, त्यांना संवाद साधणं शक्य व्हायचं नाही, स्वतःहून चालणं अथवा खाणंही शक्य व्हायचं नाही. या शस्त्रक्रियेचे नकारात्मक परिणाम तिच्या लाभदायकतेपेक्षा खूप जास्त आहे, हे कित्येक वर्षांनी वैद्यकीय क्षेत्राच्या लक्षात आलं. 1950च्या दशकात विकसित झालेली या संबंधीची औषधं अधिक परिणामकारक व अधिक सुरक्षित होती.

फोटो स्रोत, Getty Images
लोबॉटमी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांची पात्रं रंगवताना लेखकांनी व चित्रपटदिग्दर्शकांनी गडद छटांचाच वापर केलेला आहे. 'वन फ्ल्यू ओव्हर द कुकूज् नेस्ट', नेटफ्लिक्सची 'रॅचेड' ते 'सडनली लास्ट समर' इथपर्यंतच्या विविध कलाकृतींमध्ये असे डॉक्टर परपीडेमध्ये आनंद घेणारे आणि असुरक्षित घटकांमधील रुग्णांचा बळी घेणारे व लोकांना संवेदनाहीन करून सोडणारे दाखवले आहेत.
पण सत्य याहून गुंतागुंतीचं आहे. लोबॉटमी करणारे डॉक्टर बहुतेकदा प्रगतिशील सुधारकांपैकी होते. आपल्या रुग्णांचं जीवन सुधारण्याची त्यांची इच्छा होती.

फोटो स्रोत, Getty Images
गंभीर मानसिक आजाराने ग्रासलेल्या लोकांसाठी 1940 च्या दशकात परिणामकारक उपचार नव्हते. डॉक्टरांनी इन्सुलीन शॉक थेरपी व इलेक्ट्रो-कॉन्व्हल्सिव्ह थेरपी यांचे प्रयोग करून पाहिले, पण त्यांना मर्यादितच यश मिळालं. मनोरुग्णालयं रुग्णांनी भरू लागली, बॉम्बस्फोटांचा धक्का बसलेले सैनिकही यात असायचे- आजारातून बरं होण्याची, परत आपल्या घरी जाण्याची कोणतीही आशा या लोकांसमोर नसायची.
या पार्श्वभूमीवर पोर्तुगीज मज्जातज्ज्ञ एकास मोनिझ यांनी लोबॉटमी (किंवा त्यांनी म्हटल्याप्रमाणे ल्यूकॉटमी') ही शस्त्रक्रिया 1935 मध्ये विकसित केली. या शस्त्रक्रियेदरम्यान मस्तकामध्ये दोन भोकं पाडली जात, मग मेंदूच्या तंतूत एक धारदार उपकरण घातलं जात असे. मग अग्रखंड व उर्वरित मेंदू यांच्यातील जोडण्या ते बाजूने कापून टाकत.

फोटो स्रोत, Getty Images
"मेंदूविषयीच्या अत्यंत कच्च्या व सुलभीकरण केलेल्या दृष्टिकोनावर ही शस्त्रक्रिया आधारलेली होती. मेंदूची यंत्रणा एकदम साधी असते आणि त्यात काही गोष्टी चिकटवून टाकता येतात, असा विचार त्यामागे होता. आपल्या डोक्यात विचार गोल-गोल फिरत असतात आणि त्यांचं चक्र थांबवलं की व्यथित करणारे किंवा पछाडून टाकणारे विचारही थांबवता येतील, अशी ही कल्पना होती," असं मज्जाशल्यविशारद व लेखक हेन्री मॅश लिहितात
"वास्तविक मेंदू अतिशय गुंतागुंतीचा असतो आणि त्यातील आंतरजोडणीची समज अजूनही आपल्याला धडपणे आलेली नाही."

फोटो स्रोत, WELLCOME COLLECTION
आपल्या पहिल्या 20 रुग्णांमध्ये नाट्यमय सुधारणा झाल्याचा दावा मोनिझ यांनी केला. तरुण अमेरिकी मज्जातज्ज्ञ वॉल्टर फ्रीमन यांच्यावर याचा खूप प्रभाव पडला. त्यांनी त्यांचे सहकारी जेम्स वॉट्स यांच्यासह 1936 साली अमेरिकेत पहिली लोबॉटमी शस्त्रक्रिया केली. त्यानंतरच्या वर्षी न्यूयॉर्क टाइम्सने या शस्त्रक्रियेचं वर्णन 'द न्यू 'सर्जरी ऑफ द सोल'' असं केलं होतं. पण मुळात ही प्रक्रिया गुंतागुंतीची व वेळखाऊ होती.
अमेरिकेतील सर्वांत मोठं मनोरुग्णालय असलेल्या वॉशिंग्टन डीसी येथील सेन्ट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये काम करताना फ्रीमन यांना तिथे 'वाया जात असलेलं मनुष्यबळ' पाहून व्यथित व्हायला झालं. रुग्णांना हॉस्पिटलमधून बाहेर पडण्यासाठी मदत करायची त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी लोबॉटमीची शस्त्रक्रिया अधिक वेगवान व स्वस्त करण्याचं ध्येय स्वतःसमोर ठेवलं.

फोटो स्रोत, Getty Images
1946 साली त्यांनी 'ट्रान्सऑर्बिटल लोबॉटमी' शस्त्रक्रिया विकसित केली. डोळ्यांच्या खाचांच्या मागच्या बाजूला ठिसूळ हाडं असतात, तिथून मेंदूवर बर्फ उचलायच्या चिमट्यासारख्या दोन छोट्या पोलादी उपकरणांनी ठोकलं जात असे. यातून शस्त्रक्रियेचा कालावधी एकदमच कमी झाला आणि रुग्णांना भूल देण्याचीही गरज उरली नाही- सहज हलवता येईल अशा 'इलेक्ट्रो-शॉक' यंत्राद्वारे ही शस्त्रक्रिया केली जात असे.
उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्ट्यांच्या काळात फ्रीमन अमेरिकेत सर्वत्र प्रवास करून 'बर्फ उचलायच्या चिमट्यांद्वारे लोबॉटमी' शस्त्रक्रिया पार पाडत असत. काही वेळा ते स्वतःच्या मुलांनाही या प्रवासाला सोबत नेत.
सर्व उपचार थकले असतील अशा वेळी मनोरुग्णांसाठी शेवटचा आसरा म्हणून लोबॉटमी शस्त्रक्रियेचं नाव सुरुवातीला घेतलं जात होतं. पण फ्रीमन यांनी गंभीर मानसिक आजारांपासून प्रसवोत्तर नैराश्य, गंभीर डोकेदुखी, सततच्या वेदना, अपचन, झोप न येणं व वर्तनविषयक अडचणी अशा सर्वांवरील उपचार म्हणून लोबॉटमीचा प्रचार सुरू केला.
अनेक रुग्ण व त्यांचे कुटुंबीय फ्रीमन यांचं ऋण व्यक्त करायचे. त्यांना कित्येक खोके भरभरून आभार मानणारी पत्रं व नाताळची कार्डं यायची. पण इतर अनेक रुग्णांच्या बाबतीत या शस्त्रक्रियेची निष्पत्ती विध्वंसक झालेली होती.
अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनडी यांची बहीण रोझमेरी केनडीदेखील फ्रीमन यांनी उपचार केलेल्या रुग्णांपैकी एक होती. तिच्यावर वयाच्या 23 व्या वर्षी लोबॉटमी शस्त्रक्रिया करण्यात आल्यावर ती असंयमी झाली व तिला स्पष्टपणे बोलता येत नसे.

फोटो स्रोत, Alamy
फ्रीमन यांनी त्यांच्या कारकीर्दीत 3500 रुग्णांवर ही शस्त्रक्रिया केली, त्यात 19 लहान मुलं होती- अगदी सर्वांत कमी वयाचं मूल चार वर्षांचं होतं.
युनायटेड किंगडममधील मज्जाशल्यविशारद सर वायली मॅककिसॉक यांनी सुमारे 3000 रुग्णांवर निराळ्या तऱ्हेने लोबॉटमी शस्त्रक्रिया केली.

फोटो स्रोत, Science Photo Library
"ही शस्त्रक्रिया वेळखाऊ नाही. कोणत्याही सुसंघटित मनोरुग्णालयातील एखादा सक्षम चमू दोन ते अडीच तासांत अशा चार शस्त्रक्रिया करू शकतो," अशी बढाई ते मारत असत. "योग्य प्रशिक्षण मिळालेले मज्जाशल्यविशारद असतील तर दुतर्फी अग्रखंडी ल्यूकॉटमीची शस्त्रक्रिया सहा मिनिटांत करता येते, अगदी क्वचित त्यासाठी दहापेक्षा जास्त मिनिटं लागतात."
मुख्यत्वे मॅककिसॉक यांच्यामुळे युनायटेड किंगडममध्ये अमेरिकेपेक्षा जास्त दरडोई लोबॉटमी शस्त्रक्रिया पार पडल्या.
1970 च्या दशकात वैद्यकीय विद्यार्थी असलेल्या हेन्री मार्श यांनी एका मनोरुग्णालयातील शुश्रुषा केंद्रात नोकरी स्वीकारली. 'हा अगदी शेवटच्या टप्प्यातील रुग्णांसाठीचा वॉर्ड होता. मरायला टेकलेले रुग्ण तिथे आणून ठेवले जात.' तिथे त्यांनी लोबॉटमीचे विध्वंसक परिणाम स्वतः पाहिले. "या रुग्णांच्या तब्येतीचा योग्य पाठपुरावा केलाच गेला नव्हता, ही व्यथित करणारी बाब तिथे मला स्पष्टपणे लक्षात आली," असं ते सांगतात. "लोबॉटमीची शस्त्रक्रिया ज्यांच्यावर करण्यात आली होती असे रुग्ण सर्वांत वाईट, भयंकर व उद्ध्वस्थ पातळीला गेलेले असत."

फोटो स्रोत, Getty Images
मॅककिसॉक व त्यांच्या सहकाऱ्यांनीच या सर्वांवर शस्त्रक्रिया केलेली होती.
नंतर मार्श यांना मज्जाशल्यविशारद म्हणून पदवी मिळाली, त्यादरम्यान लोबॉटमीचं सुधारीत रूप म्हणावी अशी लिम्पिक ल्यूकॉटमीची शस्त्रक्रिया वापरात होती. "आधी अनेक वर्षं लोक ज्या तऱ्हेची लोबॉटमीची शस्त्रक्रिया करत होते, त्याचं अधिक सूक्ष्मदर्शी, अधिक सुधारित रूप ल्यूकॉटमीद्वारे वापरात आलं," असं मार्श म्हणतात.
त्यांनी स्वतः गंभीर ओसीडी असलेल्या डझनभर रुग्णांवर अशी शस्त्रक्रिया केली होती. अगदी 1990 सालापर्यंत त्यांनी हे उपचार केले होते.
"ते सगळे रुग्ण मरणशय्येवरच होते, इतर सर्व उपचार अपयशी ठरले होते, त्यामुळे अशा वेळी तितका क्लेश होत नाही, पण मी प्राधान्याने त्या शस्त्रक्रिया केल्या नाहीत," असं ते सांगतात.
"त्या रुग्णांना मी नंतर कधीही भेटलो नाही, निव्वळ तंत्रज्ञासारखं काम पार पाडलं. संबंधित सायकिआट्रिस्टांनी या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं मला सांगितलं."
या शस्त्रक्रियांबद्दल आता कसं वाटतं, असं मी मार्श यांना विचारलं. ते म्हणाले, "मला या शस्त्रक्रिया करणं आवडत नसे, मी तुलनेने लगेचच आनंदाने प्रॅक्टिस सोडली आणि कन्सल्टन्ट म्हणून काम करू लागलो."
1960च्या दशकारंभी युनायटेड किंगडममध्ये दर वर्षी सुमारे 500 लोबॉटमी शस्त्रक्रिया केल्या जात असत. एका वर्षी सर्वाधिक- 1500 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 1970च्या दशकात ही संख्या वर्षाकाठी सुमारे 100-150 पर्यंत खाली आली. शिवाय, बहुतेकदा अगदी बारीक भाग कापून अचूक लक्ष्यस्थानी जोडणी तोडली जाऊ लागली.
1983 साली मानसिक आरोग्य अधिनियम लागू झाल्यावर अधिक नियंत्रणं व देखरेखीची यंत्रणा प्रस्थापित झाली. आज मानसिक आजारांसंदर्भात शस्त्रक्रिया क्वचितच केल्या जातात.
हॉवर्ड डुली 12 वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्यावर वॉल्टर फ्रीमन यांनी शस्त्रक्रिया केली होती. 'ती शस्त्रक्रिया झाली नसती, तर आपलं आयुष्य वेगळं राहिलं असतं का, असा विचार टाळायचा प्रयत्न मी करतो, कारण कदाचित अशा विचाराने मी आतून क्षुब्ध होत राहीन, अशी भीती वाटते,' असं डुली सांगतात.
"मी हळूहळू माझं जगणं एकसंध करायचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी बराच काळ जावा लागला," असं ते म्हणतात. "तरुणपणी मला खूप अडचणींना सामोरं जावं लागलं- अंमली पदार्थ, दारू, गुन्हेगारी कृत्यं, पैसे चोरून जगणं, अशामध्ये मी अडकलो. यातून बाहेर पडणं अवघड होतं."
सावत्रआईशी पटत नव्हतं म्हणून डुली यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याची गडद छाया त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक बाजूवर पडलेली आहे, असं त्यांना वाटतं.
"माझ्यावर लोबॉटमीची शस्त्रक्रिया झालेय, असं मी स्वतःहून लोकांना सांगत नाही. कारण तसं सांगितलं तर ते माझ्या आसपासही येणार नाहीत," असं ते म्हणतात.

त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली त्याला साठ वर्षं उलटून गेली असली, तरी त्यांना त्या वेळचा प्रत्येक तपशील आठवतो आहे.
"त्यांनी डोळ्याचा भाग वर उचलला, कोपऱ्याच्या बाजूला ठोके दिले आणि अंडं फोडण्यासाठी वापरतात तशा साधनाने तिथे आजूबाजूला फिरवलं," असं ते सांगतात.
"मला हे अनाकलनीय वाटतं. मेंदूच्या बाबतीत काहीच अचूकता न ठेवता हे असं करणं, म्हणजे काय!"
लोबॉटमीवर सुरुवातीपासूनच टीका करणारे लोक होते, आणि त्याचे परिणाम वाईट होतात हे अधिकाधिक स्पष्ट होऊ लागल्यावर विरोधाचा सूरही वाढत गेला.
सुरुवातीला 85 टक्के यशाचा दर असल्याचं सांगणारे वॉल्टर फ्रीमन ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करत होते त्यापैकी 15 टक्के लोक मरण पावल्याचंही समोर आलं. त्यांच्या रुग्णांवरील दीर्घकालीन परिणामांचा तपास डॉक्टरांनी केला, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की, एक तृतीयांश रुग्णांमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली, तर एक तृतीयांश लोकांची परिस्थिती बरीच खालावली.
अमेरिकेतील लोबॉटमीचे एक माजी समर्थक म्हणतात: "डोक्यावर बंदुकीची गोळी मारण्याइतकीच जोखीम लोबॉटमीमध्ये होती."
एगास मोनिझ यांना लोबॉटमीची शस्त्रक्रिया विकसित केल्याबद्दल 1949 साली नोबेल पारितोषिक मिळालं होतं. हे पारितोषिक परत घ्यावं, यासाठी काही डॉक्टर, लोबॉटमीपीडित व त्यांचे कुटुंबीय यांनी 15 वर्षांपूर्वी एक अभियान चालवलं होतं. परंतु, पारितोषिक परत घेऊ नये, असं नोबेल फाउन्डेशनच्या सनदेमध्ये नमूद केलेलं असल्यामुळे ही मागणी त्यांनी मान्य केली नाही.

फोटो स्रोत, Getty Images
ही सर्वाधिक वादग्रस्त वैद्यकीय प्रक्रिया पार पाडणाऱ्या लोकांकडे आपण मागे वळून कसं पाहावं?
"नायक व खलनायक अशी डॉक्टरांची विभागणी करणं चुकीचं आहे. आपल्या सगळ्यांमध्ये दोन्हींचं मिश्रण झालेलं असतं. आपण आपल्या काळाची, संस्कृतीची व प्रशिक्षणाची उपज असतो," असं हेन्री मार्श म्हणतात.
"मला शिकवलेल्या सर्जन्सच्या पिढीकडे अगदी देवासमान नसले तरी प्रचंड अधिकार होते, कोणीही त्यांना प्रश्न विचारत नसे किंवा शंका विचारत नसे, आणि मला शिकवणारे काही लोक तसे मुळात चांगले होते, पण या अधिकाराने ते बिघडले आणि काहीसे राक्षसी झाले."

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








