भारत-चीन सीमेवर तणाव असूनही दोन्ही देशांत व्यापार कसा वाढला?

भारत-चीन

फोटो स्रोत, YURCHELLO108

    • Author, जुबैर अहमद
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारत आणि चीन यांच्यात पूर्व लद्दाख सीमेवर झडलेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले. मात्र, तरीही 2020 या वर्षात भारताने सर्वाधिक व्यापार चीनबरोबर केला.

दुसरा क्रमांक अमेरिकेचा तर तिसरा संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) लागतो. भारताने चीनकडून 58.7 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची आयात केली. विशेष म्हणजे अमेरिका आणि यूएई यांच्याकडून जेवढी एकूण आयात झाली त्यापेक्षाही जास्त आयात एकट्या चीनकडून करण्यात आली. पण भारताने चीनला फक्त 19 अब्ज डॉलर्सची निर्यात केली.

तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला निवडण्यासाठी CLICK HERE

गेल्या वर्षी लद्दाखमधल्या गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत भारताच्या 20 जवानांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन्ही देशांमधले संबंध टोकाचे ताणले गेले होते. काही दिवसांपूर्वीच चीननेही आपल्याही 4 जवानांचा मृत्यू झाल्याचं मान्य केलं आहे. मात्र, चीन आकडेवारी कमी करून सांगत असल्याचं आणि 4 पेक्षा जास्त चिनी जवानांचा मृत्यू झाल्याचं भारताचं म्हणणं आहे.

दोन्ही देशांमधल्या व्यापाऱ्याला कोरोना साथीचा फटका बसला होता. त्यातच गलवानमध्ये झालेल्या घटनेमुळे व्यापारावर आणखी थोडा परिणाम झाला. मात्र, तरीही व्यापारात फारशी घट झालेली नव्हती.

केंद्र सरकारने चीनकडून होणाऱ्या सर्व प्रकारच्या गुंतवणुकीवर निर्बंध लादले. इतकंच नाही तर सुरक्षेचं कारण देत 200 हून अधिक चिनी अॅप्सही बंद केले. यात टिकटॉक, वुई-चॅट सारख्या लोकप्रिय अॅप्सचाही समावेश होता.

'आत्मनिर्भर' मोहीम परिणामकारक ठरली का?

गेल्या वर्षी मे महिन्यात केंद्र सरकारने 'आत्मनिर्भर भारत' मोहीम सुरू केली होती. आयात कमी करणं, निर्यात वाढवणं आणि देशांतर्गत उत्पादन वाढवणं, हा या मोहिमेचा मूळ उद्देश होता. मात्र, चीनवरचं अवलंबित्व कमी करणं, हाच यामागचा मूळ हेतू होता, असं काही जाणकारांचं म्हणणं आहे.

मात्र, ताज्या आकडेवारीवरून चीनवरचं अवलंबित्व कमी झालेलं नाही, हेच अधोरेखित होतंय. आकडेवारीनुसार गेल्यावर्षी भारत आणि चीन यांच्यातला द्विपक्षीय व्यापार 77.7 अब्ज डॉलर्सचा होता. वाणिज्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार त्याआधीच्या वर्षी या दोन्ही देशातला द्विपक्षीय व्यापार 85.5 अब्ज डॉलर्स इतका होता. म्हणजे 2019 च्या तुलनेत 2020 साली द्विपक्षीय व्यापारात थोडी घट दिसते.

मेक इन इंडिया

फोटो स्रोत, Getty Images

दुसरीकडे चिनी गुंतवणुकीला केंद्र सरकारने परवानगी दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, त्या चुकीच्या असल्याचं स्पष्टीकरणं सरकारकडून देण्यात आलं आहे. खरंतर चीनने कधीच भारतात मोठी गुंतवणूक केलेली नाही. चीनने 2013 ते 2020 या वर्षात भारतात एकूण 2174 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

भारतात होणाऱ्या परकीय गुंतवणुकीच्या तुलनेत ही रक्कम खूप कमी आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2020 साली एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान भारतात 58 अब्ज डॉलर्सहून जास्त परकीय गुंतवणूक आली होती.

दिल्लीतल्या फोर स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये चीन विषयाचे अभ्यासक डॉ. फैसल अहमद यांच्या मते आत्मनिर्भर होणं याचा अर्थ आयात पूर्णपणे बंद करावी किंवा परकीय गुंतवणूक घ्यायचीच नाही, असा नव्हे.

कोरोना

फोटो स्रोत, RASI BHADRAMANI

ते सांगतात, "येणाऱ्या काळात भारताचं चीनवरचं आयात अवलंबित्व अधिक असणार आहे. जागतिक व्यापार आपल्यासाठी फायदेशीर कसा बनवता येईल, याचा विचार आपण करायला हवा. यातून आपलं आर्थिक हित साधलं जाईल आणि त्यातून आत्मनिर्भरतेचं समर्थनच होणार आहे."

डॉ. फैसल पुढे सांगतात, "देश आत्मनिर्भर करायचा असेल तर त्यासाठी गरजेचं साधन म्हणून थेट परकीय गुंतवणुकीवर (FDI) लक्ष देणं गरजेचं आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात आपल्याला उत्पादन वाढवायचं आहे. आपले लघु आणि मध्यम उद्योग आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी त्यांना मदत करायला हवी. यातून ते ग्लोबल व्हॅल्यू साखळीचा भाग होतील. यासाठी एफडीआय गरजेचं आहे.

खरंतर एफडीआय चीनकडूनही आलं तरी ते आत्मनिर्भरतेविरोधात नाही. याचं कारण म्हणजे भारतही चीनला 11 टक्क्यांपर्यंत निर्यात वाढवण्यास सक्षम आहे. तसंच वेगवेगळ्या क्षेत्रात परकीय गुंतवणूक वाढल्यास भारताची निर्यातही वाढेल."

सध्या भारत चीनमध्ये तयार होणारी अवजड मशीनरी, दूरसंचार उपकरणं आणि देशांतर्गत उपकरणांसाठी मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. परिणामी 2020 साली चीनबरोबरच्या द्विपक्षीय व्यापारात 40 अब्ज डॉलर्सचा फरक होता. इतकं मोठं व्यापारी असमतोल इतर कुठल्याच देशासोबत नाही.

भारत-चीन

फोटो स्रोत, Getty Images

याशिवाय डॉ. फैसल अहमद यांच्या मते, "आजच्या नव्या उदयोन्मुख जागतिक अर्थव्यवस्थेत आपण याकडे आपल्या आर्थिक हिताच्या दृष्टीनेही बघितलं पाहिजे. जागतिक विषयक विशेषतः इंडो-पॅसिफिक प्रदेशात अमेरिकेची वाढती भूमिका बघता हे आपलं धोरण आणि या क्षेत्रात आर्थिक हित वेगाने सक्रीय करण्याची गरज आहे."

चीन थोडा सावध

चीनमधल्या सिच्युआन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे असोसिएट डीन प्रा. हुआंग यूनसॉन्ग भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय व्यापार आणि भारतात चीनी गुंतवणूक वाढवण्याचं समर्थन करतात. मात्र, हे करतानाच सावधगिरी बाळगायला हवी, असंही त्यांचं म्हणणं आहे.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "आम्ही याकडे द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करण्याचा शुभसंकेत म्हणून बघतो. मात्र, खूप सावधगिरी बाळगून."

गोडाऊन

फोटो स्रोत, VCG

येणाऱ्या दिवसात चिनी गुंतवणुकीविषयी बोलताना ते म्हणाले, "चिनी गुंतवणूकदारांना राजकारण अर्थव्यवस्थेला हादरवू शकतं, हा धडा मिळाला आहे. त्यामुळेच सध्या चिनी गुंतवणूकदार अधिक जोखीम उचलण्यास तयार नाहीत. ते अधिक सावधगिरी बाळगून आहेत. चीनी गुंतवणूकदार भारतीय बाजार नव्याने पडताळून बघत आहेत."

प्रा. हुआंग यूनसॉन्ग चिनी गुंतवणूक, द्विपक्षीय व्यापार आणि दोन्ही देशांमधले संबंध पुन्हा सामान्य करण्याविषयी बोलताना म्हणाले, "डिसइंगेजमेंट्सचे अनेक टप्पे अजून पूर्ण व्हायचे आहेत. तसंच पुढच्या जोखमींकडे दुर्लक्ष करणं घाईचं होईल."

चीन जगातली दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तर भारत कोव्हिडपूर्वी सहाव्या क्रमांकावर होता. दोन वर्षांपूर्वी या दोन देशांचा द्विपक्षीय व्यापार 90 अब्ज डॉलर्सच्याही वर गेला होता.

मात्र, 2019 साली यात घसरण झाली. सध्या चीनबरोबरचा व्यापारी असमतोल कमी करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर आहे. यासाठीच देश आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

'चीनपासून पाठ सोडवणं अशक्य'

सध्यातरी चीनपासून पाठ सोडवणं अशक्य आहे आणि येणारी बरीच वर्ष आपण चीनवर अवलंबून असणार आहोत, असं अनेक तज्ज्ञांना वाटतं. मात्र, हा मुद्दा एखाद्या कालमर्यादेत बांधून बघता कामा नये, असं डॉ. फैसल अहमद यांना वाटतं.

ते म्हणतात, "मला वाटत आत्मनिर्भरता एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यासाठी कालमर्यादा असू शकत नाही. याचं कारण असं की आपल्याला मोठा निर्यातदार व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला मोठा आयातदार देश व्हावं लागेल."

ते पुढे सांगतात, "अमेरिका आणि चीन दोघंही मोठे निर्यातदार आणि मोठे आयातदारही आहेत. याचं कारण निर्यात स्पर्धा खर्चावर जो फायदा मिळतो त्यावर अवलंबून असते. त्यामुळेच निर्यात वाढवायची असेल तर अनेक क्षेत्रात कच्चा माल आणि सुटे भाग आयात करावे लागतील आणि म्हणून आत्मनिर्भरतेला वेळेचं बंधन नसतं."

कोव्हिड-19 साथीतून चीन सर्वात मजबूतपणे बाहेर पडला आणि चिनी अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभी आहे. भारताची अर्थव्यवस्थाही या साथीतून हळू-हळू बाहेर पडतेय. तज्ज्ञांच्या मते या दोन्ही शेजारी राष्ट्रांमधल्या सहकार्याचा दोन्ही देशांना फायदाच होईल.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)