भारत - चीन सीमा वाद : गलवानमध्ये आपले सैनिक मारले गेल्याची चीनची पहिल्यांदाच कबुली

चिनी सैन्य

फोटो स्रोत, AFP

गलवानमध्ये भारतासोबत झालेल्या झटापटीत आपले सैनिक मारले गेल्याची कबुली चीनने पहिल्यांदाच दिली आहे.

2020च्या जूनमध्ये पूर्व लडाखमधल्या गलवान खोऱ्यात भारतीय लष्करासोबत झालेल्या झटपटीमध्ये आपले 5 अधिकारी आणि सैनिक मारले गेल्याचं चीनने पहिल्यांदाच मान्य केलंय.

चिनी सैन्याच्या पीएलए डेली (PLA Daily) या अधिकृत वर्तमानपत्राचा दाखला देत चीनमधलं सरकारी वर्तमानपत्र ग्लोबल टाईम्सने पहिल्यांदाच 'आपल्या सार्वभौमत्वाचं संरक्षण करताना प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली देण्यासाठी' त्यांची नावं आणि माहिती छापली आहे.

तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला निवडण्यासाठी CLICK HERE

काराकोरम पर्वतांमधल्या या 5 अधिकारी आणि सैनिकांची चीनच्या सेंट्रल मिलिट्री कमिशनने ओळख पटवली असून त्यांचा पदवी देऊन सन्मान करत असल्याचं PLA डेलीच्या शुक्रवारच्या वृत्तात म्हटलंय.

या अहवालामध्ये पहिल्यांदाच चिनी सैन्याने गलवानमधल्या झटापटीचा तपशील दिला आहे. 'कशाप्रकारे भारतीय लष्कराने तिथे मोठ्या प्रमाणात सैनिक पाठवून त्यांना लपवून ठेवलं आणि ते कशाप्रकारे ते चिनी सैन्याला माघार घ्यायला भाग पाडत होते' हे यामध्ये सांगण्यात आलंय.

'स्टीलचे दंडुके, खिळे लावलेले दंडुके आणि दगडांच्या हल्ल्यादरम्यान चीनच्या सैनिकांनी कशाप्रकारे देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण केलं,' हे देखील यामध्ये सांगण्यात आलंय.

PLA डेलीच्या वृत्तात म्हटलंय, "एप्रिल 2020नंतर परदेशी सैन्याने आधीच्या कराराचं उल्लंघन केलं. रस्ते आणि पूल तयार करण्यासाठी ते सीमा पर करू लागले आणि सीमेवरची परिस्थिती बदलत जाणीवपूर्वक चिथावणी देण्यात आली. बोलणी करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या चिनी सैनिकांवरही त्यांनी हल्ला केला."

चीनचे एक जवान चेन शियांगराँह यांचा उल्लेख करत या वर्तमानपत्राने लिहीलंय, "शत्रूंची संख्या खूप जास्त असली तरी आपण गुडघे टेकणार नाही, त्यांनी दगडांनी हल्ला करूनही आम्ही त्यांना पळवून लावलं, असं या सैनिकाने त्याच्या डायरीमध्ये लिहीलंय."

गलवानमधली झटापट

गेल्या वर्षीच्या 15 जूनला पूर्व लडाखमधल्या गलवान खोऱ्यात झालेली ही झटापट म्हणजे गेल्या चार दशकांमधला भारत - चीन सीमेवरचा सगळ्यात गंभीर संघर्ष असल्याचं म्हटलं गेलं.

यामध्ये 20 भारतीय सैनिक मरण पावले. आपले सैनिक मारले गेल्याचं भारताने त्याचवेळी जाहीर केलं होतं. पण चीनने आतापर्यंत कधीही आपले किती सैनिक मारले गेले, याविषयीची माहिती दिली नव्हती.

पण या झटापटीदरम्यान चीनचं मोठं नुकसान झाल्याचा दावा भारताने केला होता.

भारतीय सैनिक

फोटो स्रोत, Getty Images

या संघर्षामध्ये चीनचे 45 सैनिक मारले गेल्याचं वृत्त 'तास' या रशियन वृत्तसंस्थेने दिलं होतं.

भारताच्या तुलनेत चीनचं जास्त नुकसान झालं होतं या दाव्यांचं उत्तर देण्यासाठीच चीनने गलवान खोऱ्यात किती सैनिक मारले गेले याविषयीची माहिती दिली असल्याचं शिन्हुआ युनिव्हर्सिटीमधल्या नॅशनल स्ट्रॅटिजी इन्स्टिट्यूटचे संचालक चियान फेंग यांनी ग्लोबल टाईम्सला सांगितलं.

पँगाँग लेकच्या उत्तर आणि दक्षिण या दोन्ही भागांमधून दोन्ही देशांचं सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू असतानाच चिनी सैन्याने गलवान झटापटीत मारले गेलेल्या सैनिकांविषयीची माहिती दिली आहे.

गेल्या वर्षीच्या मे महिन्यात या दोन्ही देशांमधल्या तणावाला सुरुवात झाल्यापासून या जागेबद्दल सगळ्यांत जास्त वाद झाले आहेत.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)