जुळ्या भावांची कमाल; एक अनोखी भाषा जी फक्त ते दोघेच बोलतात

फोटो स्रोत, Matthew and Michael Youlden/ Superpolyglotbros
- Author, कृपा पाढ़ी
- Role, बीबीसी न्यूज़
जुळी मुलं, त्यांचं संगोपन, त्यांचा एकमेकांशी आणि पालकांशी असलेलं नातं, त्यांचा आपसातील संवाद ही एक जगावेगळी बाब असते. या विषयावर सातत्यानं संशोधन सुरू आहे. मात्र आजही दोन जुळ्या भावांचा लहानपणी एकमेकांशी संवाद कसा होतो, ते एकमेकांशी कसे जोडले जातात याबद्दल बरंच काही कळायचं बाकी आहे. योल्डेन कुटुंबातील दोन जुळ्या भावांनी तर लहानपणी एक भाषाच विकसित केली आहे, जी फक्त ते दोघेच बोलतात. योल्डेन बंधू, त्यांची अनोखी भाषा आणि त्याच्याशी निगडीत आश्चर्यकारक मुद्द्यांविषयी सांगणारा हा लेख...
जुळ्या मुलांच्या बाबतीत एक विशेष गोष्ट असते. ती म्हणजे 50 टक्क्यापर्यंत जुळी मुलं एकमेकांशी बोलण्यासाठी स्वत:ची एक पद्धत विकसित करून घेतात. यामध्ये बहुतांश जुळी मुलं काळाच्या ओघात ती पद्धत किंवा भाषा विसरतात.
मात्र योल्डेन जुळ्या भावांसाठी संवादाची ही नेहमीची पद्धत झाली आहे. मॅथ्यू आणि मायकल योल्डेन हे दोघे जुळे भाऊ 25 भाषा बोलतात.
ते बोलत असलेली 26 वी भाषा म्हणजे उमेरी. अर्थात या भाषेचा समावेश ते त्यांच्या यादीत करत नाहीत. तुम्ही उमेरीबद्दल ऐकलं नसण्याचीच शक्यता आहे. त्यामागे एक कारण देखील आहे.
ते कारण म्हणजे मायकल योल्डेन आणि मॅथ्यू योल्डेन हे फक्त दोघेच ती भाषा बोलतात, वाचतात आणि लिहितात. कारण या भाषेचा विकास या दोन्ही भावांनीच त्यांच्या लहानपणी केला होता.
अर्थात हे दोघे भाऊ सांगतात की त्यांनी मुद्दामहून उमेरी ही या भाषेचं स्वरुप गुप्त ठेवलेलं नाही.
एका ईमेलमध्ये ते सांगतात की, "गोष्टी गुप्त किंवा खासगी स्वरुपाच्या ठेवण्यासाठी उमेरी भाषेचा वापर केला जात नाही."
ते म्हणतात, "आमच्यासाठी ही भाषा भावनात्मकदृष्ट्या नक्कीच महत्त्वाची आहे. कारण या भाषेच्या माध्यमातून आम्हा दोन्ही भावांमध्ये असलेलं घट्ट नातं प्रकट होतं."
एका अंदाजानुसार, 30 ते 50 टक्के जुळी मुलं आपसात बोलण्यासाठी त्यांची स्वत:ची भाषा विकसित करतात किंवा संवादाची अशी पद्धत तयार करतात जी फक्त त्या दोघांनाच कळते. याला क्रिप्टोफेसिया म्हणतात. यामध्ये शब्दांना ग्रीक मधून थेट गुप्त भाषेत भाषांतरीत केलं जातं.
तज्ज्ञ काय म्हणतात?
नॅन्सी सीगल कॅलिफोर्निया स्टेट विद्यापीठाच्या ट्विन स्टडीज सेंटरच्या संचालक आहेत. त्यांना वाटतं की आता या प्रकारच्या संवादासाठी आणखी शब्द देखील आले आहेत, ज्यांचा वापर गुप्त संवादासाठी केला जातो.
त्यांनी ट्विन मिथकंसेप्शन्स हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की जुळी मुलं अनेकदा आपसातील संवाद आणि आकलनासाठी या पद्धतींचा वापर करतात.
त्यांनी लिहिलं आहे की, "सध्या उपलब्ध असलेल्या अभ्यासाच्या आधारे, 40 टक्के जुळी मुलं फक्त त्या दोघांनाच कळणारा या प्रकारचा संवाद करतात, असं म्हणणं योग्य ठरेल."
त्या लिहितात, "मात्र या आकडेवारीतून हे लक्षात येत नाही की जुळ्या मुलांमध्ये या प्रकारची भाषा विकसित होण्याची प्रक्रिया किती गुंतागुंतीची असते."
उदाहरणार्थ नेदरलॅंड्समध्ये राहणारे रॉय योहन्निक यांची मेर्ली आणि स्टीन ही जुळी मुलं आता किशोरवयीन झाली आहेत.

फोटो स्रोत, Matthew and Michael Youlden/ Superpolyglotbros
13 वर्षांपूर्वी योहन्निक यांनी या दोन्ही जुळ्या मुलांचा एक व्हीडिओ बनवला होता.
या व्हीडिओत ही दोन्ही मुलं एकमेकांशी बडबड करताना दिसतात. योहन्निक यांनी हा व्हीडिओ यूट्यूबवर शेअर केल्यावर त्याला 3 कोटी व्ह्यूज मिळाले होते.
खरंतर तेव्हा पहिल्यांदाच या जुळ्या मुलांनी एकमेकांशी बोलण्यास सुरूवात केली होती. त्यावेळेस योगायोगानं योहन्निक यांच्या हातात त्यांचा कॅमेरा होता.
योहन्निक म्हणाले, "त्या दोघांनी एकमेकांना पाहिल्यामुळे मला आश्चर्य वाटलं होतं. त्या दोघांना वाटलं की अरे वा! या क्षणी मी एकटाच नाही. माझ्यासारखं आणखीही कुणीतरी आहे. आम्ही दोघेही जगात आले आहोत."
या गोष्टीला विस्तारानं समजावताना सीगल म्हणतात की मेर्ली आणि स्टीन ही दोन्ही मुलं जेव्हा डच भाषा शिकले, तेव्हा ते लहानपणी संवादासाठी वापरलेली स्वत:ची भाषा विसरले होते.
बहुतांश जुळी मुलं संवादासाठी वापरलेल्या त्यांची गुप्त भाषा विसरत जातात. कारण घराबाहेर त्यांचा संबंध अनेक प्रकारच्या लोकांशी आणि गोष्टींशी येतो.
मात्र योल्डेन जुळ्या भावांसाठी असं नव्हतं. त्यांनी स्वत:च्या भाषेचं विस्मरण होऊ दिलं नाही, त्याच्या उलट दोघांनी अनेक वर्षे त्यांच्या भाषेला अधिक परिपूर्ण आणि समृद्ध बनवलं.
उमेरीची सुरूवात कधी झाली?
योल्डेन जुळ्या भावांचं संगोपन युकेमधील मँचेस्टरमधील विविध संस्कृती आणि जाती असल्या परिसरात झालं. याच काळात त्यांच्या मनात भाषेबद्दलचं प्रेम निर्माण झालं होतं.
अर्थात त्या दोघांमध्ये उमेरी भाषा कधी सुरू झाली? हे मात्र त्या दोघांना नीट आठवत नाही.
मात्र त्यांना इतकं आठवतं की जेव्हा ते दोघे भाऊ एकमेकांना उमेरी भाषेत एखादा विनोद सांगायचे, तेव्हा त्यांच्या आजोबांच्या ही गोष्ट लक्षात यायची नाही आणि ते गोंधळात पडायचे.
यानंतर हे दोघे भाऊ त्यांच्या पहिल्या परदेश प्रवासासाठी स्पेनला गेले होते. तेव्हा ते दोघे आठ वर्षांचे होते. त्यावेळेस त्या दोघांनी स्पॅनिश शिकायचं ठरवलं.
कारण त्या दोघांना वाटत होतं की जर ते स्पॅनिश शिकले नाहीत तर त्यांना साध्या आईसक्रीमची ऑर्डर देण्यासाठी देखील संघर्ष करावा लागेल.
मग त्यांनी एक शब्दकोष घेतला आणि त्यातून भाषेची थोडी समज विकसित केली. एखाद्या भाषेचं व्याकरण कशा प्रकारे वापरलं जातं हे समजून घेतलं.
यानंतर त्या दोघांनी वाक्यांमधील शब्दाच्या आधारे इंग्रजीतून स्पॅनिश भाषेत भाषांतर करण्यास सुरूवात केली. मग दोघे इटालियन भाषा शिकले आणि नंतर स्कँडिनेव्हियन भाषेवर लक्ष केंद्रित केलं.
एकापेक्षा अधिक भाषांचं व्याकरण शिकल्यावर- समजून घेतल्यावर त्या दोघांना वाटलं की याप्रकारे उमेरी ही भाषा देखील एक परिपूर्ण भाषा होऊ शकते.
हा घटनाक्रम सीगल यांच्या वक्तव्यांशी मेळ घालणारा आहे.
त्यांच्यानुसार, सर्वसामान्यपणे जुळी मुलं कोणत्याही नवीन भाषेचा शोध लावत नाहीत. तर ते ज्या भाषेच्या संपर्कात येतात, त्या भाषेतूनच संवादाच्या काही पद्धती विकसित करतात.
इतरांना कदाचित ती पद्धत किंवा तो संवाद समजत नाही. मात्र तरीदेखील ते एकमेकांशी या पद्धतीच्या आधारे संवाद साधत राहतात.
याच प्रकारे योल्डेन जुळ्या भावांनी उमेरीला भाषा म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न सुरू केला. एका टप्प्यावर या दोघांनी उमेरीची वर्णाक्षरं बनवण्याचा देखील प्रयत्न केला.
मात्र या दोघांच्या लक्षात आलं की (जेव्हा त्या दोघांना त्यांचा पहिला कॉम्प्युटर मिळाला होता, तेव्हा त्यात उमेरी भाषा नव्हती) त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये उमेरी फॉन्ट नाही. त्यामुळे या भाषेचा वापर मर्यादित स्वरुपात करता येईल.
आता उमेरी भाषा लॅटिन वर्णाक्षरांचा वापर करून लिहिली जाते. मात्र काही मोजकेच लोकं बोलत असलेली भाषा सांभाळण्यासाठी, त्या भाषेचं जतन करण्यासाठी काही वेगळ्या प्रकारची आव्हानं असतात.
सामायिक भाषा
भाषेच्या संदर्भातील आव्हानांबाबत मॅथ्यू म्हणतात, "जुळ्या मुलांची ही सामायिक भाषा असते. मात्र एक वेळ अशी येते की ते या भाषेचा वापर करणं बंद करतात. कारण या भाषेचा वापर करण्याचा त्यांना संकोच वाटतो किंवा लाज वाटते. जुळ्या मुलांच्या भाषेबाबत होणारी ही काही वेगळी गोष्ट नाही."
ते म्हणतात, "जास्त लोकांद्वारे न बोलल्या जाणाऱ्या भाषेचा वापर जर एखाद्या व्यक्तीनं संभाषणासाठी केला, तर अशा स्थितीत ती भाषा बोलणाऱ्यांची संख्या आणखी कमी असू शकते."
मॅथ्यू म्हणतात, "विशेषकरून, जर तुमचं संगोपन अशाच एखाद्या भाषेत झालं असेल तर शाळेतदेखील तुमची टिंगल केली जाऊ शकते. तुम्हाला वेगळं पाडलं जाऊ शकतं. मात्र आम्ही सुदैवी होतो की आमच्याबाबतीत असं कधीही झालं नाही."
ते सांगतात की, याच्याउलट आमच्या घरात आम्हा भावांमध्ये उमेरी भाषेचा वापर वाढण्याच्या मुद्द्याकडे आमच्या आई-वडिलांनी नकारात्मकपणे पाहिलं नाही.
भाषेचा विकास
केरन थॉर्प या युनिव्हर्सिर्टी ऑफ क्वीन्सलॅंड मध्ये क्वीन्सलँड ब्रेन इन्स्टिट्यूटमध्ये चाईल्ड डेव्हलपमेंट, एज्युकेशन अॅंड केअर रिसर्चच्या तज्ज्ञ आहेत. जुळ्या मुलांमध्ये होणाऱ्या भाषेच्या विकासावर त्यांनी सखोल अभ्यास केला आहे.
त्या म्हणतात, "जे लोक आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीशी एखाद्या वैयक्तिक स्वरुपाच्या भाषेचा वापर करतात, त्यांच्यासाठी ही अतिशय सुंदर गोष्ट असते. याप्रकारे भाषेचा वापर करण्यास काहीतरी विचित्र किंवा बिनकामाची गोष्ट मानण्याऐवजी माझ्यासाठी ते अत्यंत जवळच्या नात्यासारखंच आहे."
त्या पुढे म्हणतात की, "मात्र ही गोष्ट फक्त जुळ्यांपुरतीच मर्यादित आहे का? मला असं वाटत नाही. मला वाटतं की हे प्रत्येक विशेष आणि जवळच्या नात्याबाबत होतं." त्या याला सामान्य विकसित लक्षण देखील मानतात.
2010 मध्ये सादर केलेल्या शोधनिबंधात त्यांनी लिहिलं होतं की, "गोष्ट एवढीच आहे की नुकतच बोलण्यास सुरूवात केलेली लहान मुलं, आपले आई-वडील किंवा इतर कोणत्याही वयस्क व्यक्तीपेक्षा एकमेकांना अधिक चांगलं जाणतात."
योल्डेन भावांसाठी त्यांची भाषा जवळीक आणि बौद्धिक कुतुहल यांचा संगम आहे. मात्र थॉर्प म्हणतात की वैयक्तिक स्वरुपाच्या भाषेचा या प्रकारचा विकास तुलनेनं दुर्मिळ आहे.
मर्यादित केस स्टडीज
क्रिप्टोफेसिया किंवा जुळ्या मुलांच्या भाषेवर मर्यादित केस स्टडीज उपलब्ध आहेत. त्यामध्ये जे सर्वाधिक चर्चेत आहेत, ते मानसोपचाराचा भाग आहेत.
जून आणि जेनिफर गिबन्स यांचं उदाहरण असंच आहे. या दोन जुळ्या बहिणींचा जन्म 1970 मध्ये बाजनमध्ये झाला होता. दोघी वेल्समध्ये वाढल्या.
त्यातील एका बहिणीनं बीबीसीला सांगितलं की त्यांना बोलताना अडचण यायची आणि त्यामुळे शाळेत त्यांची टिंगल केली जायची.
त्याचा परिणाम असा झाला की या दोघांनी इतरांशी बोलणंच बंद केलं होतं. त्या दोघी फक्त एकमेकांशीच बोलायच्या.
इतरांबरोबरच त्यांच्या आई-वडिलांना देखील त्यांचं बोलणं लक्षात यायचं नाही.
19 वर्षाच्या असताना त्यांना जाळपोळ आणि चोरीसारख्या गुन्ह्यांसाठी अटक करून इंग्लंडमधील अती सुरक्षा असणाऱ्या ब्रॉडमूर या मनोरुग्णासाठीच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. तिथे या दोघी सर्वात कमी वयाच्या रुग्ण होत्या.
जून यांनी बीबीसीच्या पॉडकास्टमध्ये त्यांच्या आयुष्याबद्दल सांगितलं की, "आम्ही खूप निराश झालो होते. आमचं जुळं असणं आणि आमची भाषा यात आम्ही अडकलो होतो. यातून बाहेर पडण्याचे सर्व प्रयत्न आम्ही केले होते."
आता काय करतात हे जुळे भाऊ?
बहुतांश जुळ्या मुलांनी लहानपणी संवादासाठी ज्या भाषेचा वापर केलेला असतो ती भाषा ते विसरतात.
यासंदर्भात थॉर्प म्हणतात की मात्र काही जुळं मुलं काही शब्द आणि काही इशाऱ्यांना लक्षात ठेवतात. तिथे संवादाऐवजी इशाऱ्यानंच काम भागून जातं.
ते म्हणतात, "असं होऊ शकतं की ज्याला आपण काहीतरी विशेष समजू असं त्यांच्याकडे काहीही नसेल. मात्र त्यांच्याकडे काहीतरी असं नक्कीच आहे, जे विशेष आहे."
मात्र त्यांच्या असं करण्यामुळे ही गोष्ट समोर येते की जुळ्या मुलांमध्ये भाषा शिकण्यास विलंब होण्याचा धोका असतो. त्यांची वैयक्तिक भाषा यामध्ये कोणतंही योगदान देत नाही.
तसं पाहता, जुळ्या मुलांना भाषा शिकण्यास विलंब होण्यामागचं कारण वयस्कांकडून जुळ्या मुलांवर कमी लक्ष दिलं जाणं हे असतं. वेळेआधीच जन्म होणं, गर्भावस्थेत आणि जन्माच्या वेळेस आलेल्या विविध अडचणी या देखील यामागचं कारण असू शकतात.
सीगल म्हणतात, "मी आई-वडिलांना एक गोष्ट सांगते ती म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलांशी बोलत राहिलं पाहिजे, जेणेकरून जुळ्या मुलांना भाषेचा परिचय होईल."
त्या म्हणतात, "सर्वसाधारणपणे असं होतं की पालक जुळ्या मुलांना एकटं सोडतात. त्यांना वाटतं की ती जुळी मुलं एकमेकांचं मनोरंजन करतील, एकमेकांशी खेळतील. मात्र अशा स्थितीत दोन्ही मुलांचा वयस्कांच्या भाषेशी परिचय होत नाही."
योल्डेन जुळ्या भावांसाठी उमेरी भाषा तयार होणं हा एक सकारात्मक अनुभव आहे आणि त्या व्यतिरिक्त आणखी काही नाही. मात्र त्यांची भाषा विकसित होते आहे. कारण दोन्ही भाऊ आधुनिक जीवनाशी निगडीत गोष्टींसाठी नवनवीन शब्दांबद्दल विचार करत असतात.
याबाबतीत मॅथ्यू म्हणतात, "आयपॅड असो की लाईटनिंग केबल असो, हे सर्व शब्द आजपासून 20-30 वर्षांपूर्वी अस्तित्वात नव्हते."
आता योल्डेन जुळ्या भाऊ स्वत:ची लॅंग्वेज कोचिंग कंपनी चालवतात. ही कंपनी व्यक्ती, शिक्षण संस्था आणि खासगी कंपन्यांना भाषा शिकण्यास मदत करते.
मायकल ग्रॅन कॅनरियामध्ये राहतात आणि मॅथ्यू बास्क देशात राहतात. ते दोघे अजूनही एकमेकांशी उमेरी भाषेतच बोलतात.
ही भाषा एखाद्या मुलाला शिकवण्याची त्यांची इच्छा नाही. ही भाषा इतर कोणाला शिकवणं त्यांना खूपच विचित्र वाटतं.
मायकल म्हणतात, "दोन जणांमध्ये बोलली जाणारी ही एक अनोखी भाषा आहे. मात्र काही गोष्टींचा शेवट होणार असतो. ही भाषादेखील अशाच गोष्टींपैकी आहे."











