संस्कृत भाषेतील 2500 वर्षं जुनं कोडं भारतीय तरुणानं असं सोडवलं...

ऋषी राजपोपट

फोटो स्रोत, PA Media

फोटो कॅप्शन, ऋषी राजपोपट

इसवीसनपूर्व पाचव्या शतकामध्ये लिहिलेल्या संस्कृत भाषेतील भाषाग्रंथातील व्याकरणाची समस्या केंब्रिज विद्यापीठात पीएचडी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने सोडवलीय.

अमेरिकेमधील केंब्रिज विद्यापीठात पीएचडीचं शिक्षण घेणाऱ्या 27 वर्षांच्या ऋषी राजपोपट यांनी सुमारे 2,500 वर्षांपूर्वी संस्कृत व्याकरणकार पाणिनी यांनी लिहिलेल्या ग्रंथातील व्याकरणासंदर्भातील चूक सुधारली आहे.

सध्या जगात फक्त 25 हजार लोकांना अस्खलित संस्कृत बोलता येतं असं विद्यापीठाने म्हटलंय.

डॉ. राजपोपट सांगतात की, नऊ महिने एकांतवासात घालवल्यानंतर केंब्रिजमध्ये अचानक लागलेला हा शोध होता.

"कामातून महिनाभरासाठी ब्रेक घेत मी पुस्तकांना रामराम केला. या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी पोहणे, सायकल चालवणे, स्वयंपाक करणे, ध्यान करणे एवढ्या गोष्टी केल्या."

पुढं मी कामावर परतलो, माझी पुस्तकं उघडली आणि क्षणात मला गोष्टी सुटत असल्याचं जाणवलं."

राजपोपट सांगतात की, "यासाठी लायब्ररीमध्ये तासनतास घालवले तरी हे कोडं उलगडण्यासाठी आणखीन अडीच वर्ष काम करावं लागेल असं जाणवलं."

जगातली सर्वात शास्त्रोक्त भाषा म्हणून प्रसिद्ध असणारी संस्कृत मोठ्या प्रमाणावर बोलली जात नाही. मात्र हिंदू धर्मात या भाषेला पवित्र मानण्यात आलंय. भारतातील विज्ञान, तत्त्वज्ञान, कविता साहित्य लिहिण्यासाठी याचा शतकांपासून वापर केला जातोय.

संस्कृत भाषेचं व्याकरण पाणिनीनं लिहिलेल्या नियमांच्या 'अष्टाध्यायी' या ग्रंथानुसार चालतं. या ग्रंथामधील माहितीच्या आधारे एखादा शब्द कसा तयार करावा किंवा संस्कृतमधील वाक्य कसं तयार करावं याचं मार्गदर्शन केलं जातं.

पण बऱ्याचदा व्हायचं असं की, पाणिनीचे दोनहून अधिक नियम एकाचवेळी वापरले जायचे आणि त्यामधून संभ्रम निर्माण व्हायचा.

तज्ज्ञांच्या गोंधळ उडू नये म्हणून पाणिनीने 'मेटा रुल' म्हणजेच नियमांचा नियम लिहून ठेवलाय. पारंपारिक पद्धतीमध्ये हा नियम सांगतो की, दोन समान दर्जाचे नियम वापरताना संभ्रम निर्माण झाल्यास जो नियम अष्टाध्यायीमध्ये लिहिण्यात आलाय त्याला प्राधान्य द्यावं.

पण 'मेटा रुल' नेहमीच चुकीच्या अर्थाने समजून घेण्यात आलाय.

संस्कृत

फोटो स्रोत, PA Media

'मेटा रुल'चा जो पारंपरिक अर्थ लावला जातो तो अर्थ राजपोपट नाकारतात.

ते युक्तिवाद करताना म्हणतात की, हा नियम शब्दाच्या डावीकडे वापरावा की उजवीकडे वापरावा याबद्दल पाणिनीला सांगायचं होतं. उजवीकडील शब्दानुसार नियम वापरावा असा या 'मेटा रुल'चा अर्थ आहे.

हा नियम अशापद्धतीने वापरला की यामधून अचूक संस्कृत शब्द आणि वाक्य निर्माण झाल्याचं राजपोपट यांना जाणवलं.

राजपोपट म्हणतात की, "या शोधामुळे भारतातील विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि अभिमान वाटेल. आपण कोणत्याही अवघड गोष्टी साध्य करू शकतो यासाठी ते प्रेरित होतील."

केंब्रिज मधील ऋषी राजपोपाट यांचे पर्यवेक्षक, संस्कृतचे प्राध्यापक विन्सेन्झो व्हर्जियानी सांगतात, "शतकानुशतके विद्वानांनाही गोंधळात टाकणाऱ्या या समस्येवर राजपोपट यांनी अचूक उपाय शोधलाय."

"या भाषेसंदर्भात कुतूहल असणाऱ्यांची आणि शिकणाऱ्यांची संख्या वाढत असताना, लागलेला हा शोध संस्कृतच्या अभ्यासात क्रांती घडवून आणेल."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)