काटोल : अनिल देशमुखांनी मुलगा सलीलला का उतरवले विधानसभेच्या रिंगणात? भाजपच्या चरणसिंग ठाकूरांशी सामना

फोटो स्रोत, Facebook/SalilDeshmukhNCP
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Reporting from, नागूपर
महाविकास आघाडीतील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप त्यानंतर त्यांना झालेली अटक यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली होती. या प्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते.
त्यानंतर त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि मोठा काळ तुरुंगात रहावं लागलं. ते महाविकास आघाडीचं सरकार कोसळून महायुतीचं सरकार आल्यानंतरच तुरुंगातून बाहेर आले.
आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख सुरुवातीला विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले. पक्षानं त्यांना उमेदवारीही जाहीर केली. पण, अचानक अर्ज भरण्याच्या दिवशी अनिल देशमुखांनी माघार घेतली आणि मुलगा सलील देशमुखनं उमेदवारी अर्ज दाखल केला.
भाजपनं इथून चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं सलील देशमुख विरुद्ध चरणसिंग ठाकूर अशी लढत पाहायला मिळणार आहे.
या पार्श्वभूमीवर देशमुखांनी निवडणुकीतून माघार का घेतली? मुलगा सलील देशमुख भाजपच्या उमेदवाराला टक्कर देऊ शकेल का? राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप ही लढत कशी असेल? काटोल विधानसभा मतदारसंघाचं गणित नेमकं काय सांगतं? हे समजून घेऊयात.
त्याआधी या मतदरसंघाची रचना, जातीय समीकरण आणि इतिहासावर एक नजर टाकूयात.
मतदारसंघाची रचना आणि जातीय समीकरणं
काटोल विधानसभा मतदारसंघ हा रामटेक लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड तालुका आणि नागपूर ग्रामीणमधल्या नागपूर-अमरावती महामार्गावरील वाडीपासून शिवा, बाजारगावपर्यंतच्या गावांचा समावेश होतो.
काटोल तालुक्यात संत्र्यांचं उत्पादन जास्त होतं. यासोबतच कापूस, सोयाबीनचंही उत्पादन घेतलं जातं.
मतदारसंघात कुणबी आणि तेली समाजाचे प्राबल्य आहे. त्यानंतर बौद्ध आणि मागासवर्गीय मतंही आहेत. याच मतांचा अनिल देशमुखांना फायदा होत आल्याचं राजकीय अभ्यासकांचं मत आहे.
मतदारसंघाचा इतिहास
काटोल विधानसभा मतदारसंघ हा आधीपासूनच काँग्रेसचा गड होता. इथून काँग्रेसकडून त्या काळचे सर्वात तरुण आमदार श्रीकांत जिचकार 1980 पासून निवडून गेले होते. त्यानंतर काँग्रेसच्या सुनील शिंदेंनी हा गड राखला.
पण, 1995 मध्ये अनिल देशमुख अपक्ष उभे राहिले आणि ते निवडूनही आले. त्यांनी त्यावेळच्या भाजप-शिवसेना महायुतीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम केलं होतं. त्यानंतर 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली आणि अनिल देशमुख पवारांसोबत राष्ट्रवादीत गेले.
पुढे त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक मंत्रिपदावर काम केलं. देशमुख 1999, 2004, 2009 असे सलग चारवेळा विजयी झाले. पण, 2014 ला त्यांचेच पुतणे असलेल्या आशिष देशमुख यांनी अनिल देशमुखांची ही विजयी घोडदौड थांबवली.
आशिष देशमुख यांनी पहिल्यांदाच या मतदारसंघात भाजपला यश मिळवून दिलं. पण, 2019 च्या निवडणुकीत अनिल देशमुखांनी हा बालेकिल्ला पुन्हा खेचून आणला.
यानंतर शरद पवारांनी त्यांच्यावर गृहमंत्रिपदाची जबाबदारी दिली. पण, या पदावर ते जास्त दिवस राहू शकले नाहीत.
त्यांच्यावर 100 कोटी वसुलीचे आरोप झाले. ईडी, सीबीआयची चौकशी मागे लागली आणि देशमुखांना गृहमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं.

आता 2024 च्या निवडणुकीतही अनिल देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिली. त्यांचं उमेदवार यादीत अधिकृत नावही घोषित झालं. पण उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी त्यांनी मुलगा सलील देशमुख अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलं.
काटोलमध्ये मोठं शक्तिप्रदर्शन करत सलील देशमुख उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले. पण, त्यांना पाच मिनिट उशिर झाल्यानं त्यांचा नामांकन अर्ज दाखल होऊ शकला नाही. तोपर्यंत राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार यादीवर अनिल देशमुखांचं नाव होतं.
पण, सलील देशमुख यांना अर्ज भरायला उशिर झाला आणि त्यानंतर काही वेळातच पवार गटाकडून दुसरी यादी आली. यामध्ये काटोल विधानसभा मतदारसंघातून सलील देशमुख यांना उमेदवारी दिली.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सलील देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीकडं भाजपनं या मतदारसंघातून त्यांचे नेहमीचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांना उतरवलं आहे.
सलील देशमुख विरुद्ध चरणसिंग ठाकूर यांची लढत कशी होणार? याआधी आपण अनिल देशमुखांनी निवडणुकीतून माघार का घेतली? हे पाहूयात.


अनिल देशमुखांनी निवडणुकीतून माघार का घेतली?
सलील देशमुख जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रिय होते. अनिल देशमुख तुरुंगात गेले, तेव्हा सलील देशमुख मतदारसंघातला कारभार बघत होते. त्यामुळे त्यांची यंदाची विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती.
देशमुखांनीही मुलासाठी तिकीट मागितलं होतं अशी माहिती आहे. पण, पक्षानं अनिल देशमुखांनाच उमेदवारी जाहीर केली होती.
घरात उमेदवारीवरून वाद झाला आणि त्यानंतर पुत्रप्रेमापोटी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची चर्चा होती. पण, यावर देशमुखांनी स्पष्टीकरणही दिलंय.
मी उमेदवारी अर्ज भरला असता तर सत्ताधाऱ्यांनी काहीही करून माझा अर्ज रद्द केला असता. त्यासाठी त्यांनी तसं नियोजन आखलं होतं. रश्मी बर्वे यांच्यासोबत झालं तेच माझ्यासोबत करण्याचा डाव होता. त्यासाठी मोठे वकीलसुद्धा आणून ठेवले, असा आरोप अनिल देशमुखांनी केला.
मी निवडणुकीत उभा असतो तर पुन्हा नवीन केस लावल्या असत्या, असे आरोप करत त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची कारणं सांगितली.
सोबतच सलील आमदार झाला, की शरद पवार मला विधान परिषदेवर घेऊन मंत्रीपद देतील, असंही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना केलेल्या शक्तिप्रदर्शनावेळी जाहीर करून टाकलं.
सलील देशमुख विरुद्ध चरणसिंग ठाकूर लढत कशी होईल?
या मतदारसंघात भाजप आशिष देशमुख किंवा चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी देईल, अशी चर्चा होती.
इथून आपणच लढणार अशी भूमिका घेत आशिष देशमुखांनी प्रचारदेखील सुरू केला होता. पण भाजपनं त्यांना ऐनवेळी सावनेरला पाठवलं आणि काटोलमधून चरणसिंग ठाकूर यांना पुन्हा एकदा संधी दिली.
चरणसिंग ठाकूर यांनी 2019 ला अनिल देशमुखांना चांगली टक्कर दिली होती. आता अनिल देशमुखांनी मैदानातून माघार घेतली. त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा सलील देशमुख निवडणूक लढवत आहे.
या पार्श्वभूमीवर सलील देशमुख विरुद्ध भाजपचे चरणसिंग ठाकूर ही लढत नेमकी कशी होईल?
याबद्दल पत्रकार गणेश खवसे सांगतात, “अनिल देशमुखांचा जनसंपर्क दांडगा आहेच. पण, कोविड काळापासून सलील देशमुख विधानसभेच्या दृष्टीनं तयारी करत होते. त्यांनी कोविड काळात काम केलं. अनिल देशमुख तुरुंगात होते; त्यावेळी त्यांनी मतदारसंघ सांभाळला."
"शिवाय जिल्हा परिषदेच्या राजकारणाच्या माध्यमातून सलील यांचं नेटवर्क आहे. त्यामुळे ही लढाई त्यांच्यासाठी इतकी अवघड असेल असं वाटत नाही.
पण, त्यांच्यासमोर चरणसिंग ठाकूर यांचं आव्हान असणार आहे. कारण, त्यांनीही 2019 मध्ये पराभव झाल्यानंतर मतदारसंघ नव्यानं बांधायला सुरुवात केली. त्यामुळे ही लढत चुरशीची होऊ शकते,” असं गणेश खवसे यांनी नमूद केलं.

फोटो स्रोत, Facebook/Charansing.Thakur
पुढे खवसे सांगतात, “अनिल देशमुखांचा गेल्या पाच वर्षांमध्ये मतदारसंघातील संपर्क कमी झाला. गेली 25 वर्षे जनतेनं तुम्हाला निवडून दिलं, पण तुम्ही मतदारसंघासाठी काय केलं? असा प्रश्नही जनता विचारतेय. त्यामुळे अनिल देशमुख लढले असते, तर अँटी इन्कम्बन्सीचा फटका त्यांना बसला असता."
"याउलट सलील देशमुख लोकांच्या संपर्कात होते. मतदारसंघात 24 तास उपलब्ध राहणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे अनिल देशमुख प्रत्यक्ष निवडणुकीत नसल्याचा काही परिणाम होईल, असं वाटत नाही,” असं मत खवसे यांनी व्यक्त केलं.
काटोल मतदारसंघात सर्वाधिक शेतकरी आहेत. इथं संत्र्यांचं उत्पादन अधिक असून शेतकरी प्रगत आहे. याशिवाय सोयाबीन आणि कापसाचंही उत्पादन घेतलं जातं.
पण, गेल्या काही वर्षांपासून सोयाबीनला भावच नाही. कापसाचे दरही जेमतेम असल्याची शेतकऱ्यांची तक्रार असते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.
शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका कोणाला बसू शकतो का? याबद्दल खवसे सांगतात, "शेतकऱ्यांची नाराजी ही सत्ताधारी पक्षावर आहे. कारण, सोयाबीन, कापसाचे भाव वाढवणं त्यांच्या हातात आहे. शिवाय इथला भाजपचा उमेदवार चरणसिंग ठाकूर हे बाजार समितीत आहेत. त्यांच्याच बाजार समितीत शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. त्यामुळे या नाराजीचा फटका त्यांना बसू शकतो.”
दोन्ही उमेदवारांसमोरची आव्हानं काय आहेत?
एकीकडे अनिल देशमुख यांना अँटी-इन्कम्बसीचा तोटा बसू शकतो, असं म्हटलं जात असलं तरीही तुरुंगवास झाला त्यावेळी त्यांच्या मतदारसंघात सहानुभूतीचं वातावरण होतं. त्या सहानुभूतीच्या वातावरणाचा सलील देशमुख यांना काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे.
गेल्या 25 वर्षांत मंत्रिपदाच्या कारकिर्दीत देशमुखांनी एमआयडीसी आणि रोजगार का उपलब्ध करून दिला नाही? मतदारसंघाचा धोरणात्मक विकास झाला नाही, त्यामुळे अनिल देशमुखांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात जो रोजगार येऊ शकला नाही त्यासाठी आपण काय करणार आहोत हे मतदारांना पटवून देणं हे सलील देशमुख यांच्यासमोरचं आव्हान असणार आहे.
याशिवाय या मतदारसंघात गेल्या काही वर्षांत भाजपची ताकद वाढलेली आहे. त्यामुळे या ताकदीचा सामना कसा करायचा? हेही आव्हान सलील देशमुख यांच्यासमोर असणार आहे.
इतकंच नाही, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदारसंघात अनिल शंकरराव देशमुख नावाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. हा उमेदवार कायम राहिल्यास या उमेदवाराचं चिन्ह घड्याळ असेल. त्यामुळे होणाऱ्या मतविभाजानाचा फटकाही सलील देशमुख यांना बसू शकतो.
चरणसिंग ठाकूर यांच्यासमोर आशिष देशमुख यांच्याशी जुळवून घेत त्यांचा मतदार आपल्या बाजूनं वळवण्याचं आव्हान असेल. कारण, आशिष देशमुख आणि चरणसिंग ठाकूर यांच्यात सुप्त संघर्ष आहे.
तसेच आशिष देशमुख यांचं या मतदारसंघात शाळा आणि अरविंद सहकारी बँकेच्या माध्यमातून नेटवर्क आहे. त्यांचा स्वतःचा मतदारवर्ग इथं आहे. त्याच भरवशावर त्यांनी 2014 अनिल देशमुखांचा पराभव केला होता.
त्यामुळे त्यांचा वैयक्तिक मतदार आपल्या बाजूनं कसा वळवता येईल हे चरणसिंग ठाकूर याच्यासमोरचं मोठं आव्हान असणार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











