'मोंजारो' : वजन कमी करण्यासाठी वापरलं जाणारं हे इंजेक्शन आहे तरी काय? त्याचे दुष्परिणाम कोणते?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, गौतमी खान
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 5 मिनिटे
मोंजारो नावाच्या इंजेक्शनची सध्या देशभरात चर्चा होत आहे. सुरुवातीला शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रित करण्यासाठी किंवा टाईप -2 डायबिटीसच्या रुग्णांचं वजन नियंत्रित करण्यासाठी या इंजेक्शनचा वापर केला जात होता.
मात्र सध्या वजन कमी करण्याचा रामबाण उपाय म्हणून या इंजेक्शनची चर्चा होत आहे.
अलीकडे ऐश्वर्या मोहनराज नावाच्या स्टॅन्डअप कॉमेडियनने या इंजेक्शनचा उल्लेख केला होता. ती म्हणाली होती की, लग्नानंतर तिचं वजन खूप वाढलं होतं आणि पीसीओडी, हायपर थायरॉइडचा त्रास सुरू झाला होता.
इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हीडिओमध्ये ती म्हणाली, "मी वजन कमी करण्यासाठी डाएट सुरू केला, व्यायाम केला पण कशाचाही फायदा झाला नाही. सतत वाढणारं वजन आणि डबल चीनमुळे मी तणावग्रस्त राहत होते. मग मी मोंजारो नावाचं हे इंजेक्शन घेण्याचा निर्णय घेतला."
ऐश्वर्या पुढे म्हणाली, "पहिल्याच महिन्यात माझं 4 किलो वजन कमी झालं. पुढचे सहा महिने मी आठवड्याला एक इंजेक्शन घेत होते. सहा महिन्यात माझं वजन 74 किलोवरून 52 किलोपर्यंत कमी झालं.
माझं वजन खूप लवकर कमी झालं पण काही दुष्परिणाम देखील झाले. पहिल्या महिन्यात मला खूप मळमळ (तंद्री, चक्कर) होत होतं. माझे केस खूप गळू लागले होते आणि या प्रत्येक इंजेक्शनचा खर्च 4000 रुपये होता."

फोटो स्रोत, Facebook/AishwaryaMohanraj
सोहा अली खानने देखील ऐश्वर्या मोहनराजने पोस्ट केलेल्या या व्हीडिओ बाबत तिचं कौतुक केलं.
सोहाने लिहिलं की, "ऐश्वर्याने या मोंजारो इंजेक्शनबाबत बोलण्याचं धाडस केलं आहे. या इंजेक्शनमुळे वजन कमी होतं हे जरी खरं असलं तरी याचे अनेक दुष्परिणाम देखील आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे इंजेक्शन घेतलं पाहिजे."
मोंजारो एवढं लोकप्रिय का आहे?
मोंजारो इंजेक्शनमध्ये टिर्झेपाटाइड नावाचा सक्रिय घटक असतो.
हे इंजेक्शन टाइप-2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरलं जातं. अशा रुग्णाचं वजन कमी करण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी याचा वापर होतो.
यूकेच्या इलेक्ट्रॉनिक मेडिसीन्स कॉम्पेंडियम (ईएमसी - परवानाधारक मेडिसीन्स डेटाबेस व्यवस्थापित करणारी संस्था) ने म्हटले आहे की हे मोंजारो इंजेक्शन घेतल्याने सुरुवातीला भूकेवर परिणाम होतो, ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक कमी होते.
त्यात असं म्हटलं आहे की हे इंजेक्शन अन्नाची तीव्र इच्छा (विशिष्ट पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा) कमी करण्यास मदत करतं.

फोटो स्रोत, Getty Images
याबाबत झालेलं संशोधन काय सांगतं?
मोंजारो वजन कमी करण्यास मदत करतं की नाही हे ठरवण्यासाठी एक अभ्यास करण्यात आला. यामध्ये ज्यांचं वजन वाढलेलं आहे अशा 2500 लोकांवर चाचण्या घेण्यात आल्या.
या 72 आठवड्यांच्या अभ्यासात, ज्या लोकांनी मोंजारो इंजेक्शन घेऊन निरोगी आहार आणि व्यायामाचं पालन केलं त्यांचं 15 टक्के वजन कमी झाल्याचं दिसून आलं.

फोटो स्रोत, Getty Images
युरोपियन मेडिसिन एजन्सी (EMA) ने म्हटलं आहे की मोंजारो घेतलेल्यांपैकी 85 टक्क्यांहून अधिक लोकांनी त्यांचे किमान 5 टक्के वजन कमी केलं.
सीडीएससीओची मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत?
हे इंजेक्शन आता भारतातही उपलब्ध आहे. अमेरिकेत औषध बनवणाऱ्या एली लिली अँड कंपनीने सांगितलं की सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने जून 2025 मध्ये मोंजारो इंजेक्शन बाजारात आणण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे.
सीडीएससीने अशी माहिती दिलीय की यामुळे टाइप-2 मधुमेह असलेल्या लोकांना त्यांच्या साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि वजन राखण्यास मदत होऊ शकते.
'वजन वाढलेल्यांसाठी हा उपाय, पण...'
हैदराबाद येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विरिन्ची विरविंती म्हणतात की जास्त वजन असणे हा एक चयापचयाचा विकार आहे.
डॉ. विरिन्ची विरविंती म्हणाले, "डॉक्टर म्हणतात की चांगल्या खाण्याच्या सवयी आणि व्यायाम वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. पण काही प्रकरणांमध्येच. म्हणजे पीसीओडी सारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये, वजन नियंत्रित करणं किंवा कमी करणं कधीकधी अवघड होऊन बसतं. अशा समस्यांशी झुंजणाऱ्यांसाठी, सर्व पर्यायांचा विचार केल्यानंतरच हे मोंजारो इंजेक्शन सुचवलं जातं."
चयापचयाचे विकार कमी करण्यासाठी हा एक नवीन वैद्यकीय मार्ग आहे आणि आतापर्यंत त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.
डॉ. विरिन्ची विरविंती म्हणाले की या मोंजारो औषधाचा वापर अलीकडेच वाढला असल्याने, त्याचे दीर्घकालीन परिणाम काय असतील हे सांगणं कठीण आहे. पण हे हे इंजेक्शन घेणं बंद केल्यानंतर पुन्हा वजन वाढू शकतं का? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं आहे.
ते म्हणाले, "जेव्हा आपण काही वर्षे चांगल्या खाण्याच्या सवयी आणि व्यायामाचं पालन करतो तेव्हा आपलं वजन नैसर्गिकरित्या नियंत्रणात राहतं. जेव्हा आपण हे करणं थांबवतो तेव्हा वजन आपोआप वाढणं स्वाभाविक आहे. हे अगदी तसंच आहे, औषध घेत असताना आपण ज्या निरोगी सवयी पाळल्या होत्या त्या चालू ठेवणं कधीही सोयीस्कर ठरू शकतं."

फोटो स्रोत, Getty Images
वैद्यकीय तज्ज्ञांचा असा सल्ला आहे की ज्यांना तरुण दिसायचं आहे त्यांनी इंजेक्शन घेण्याऐवजी निरोगी जीवनशैली स्वीकारावी.
डॉ. विरिन्ची वजन कमी करण्यासाठी म्हणून या गोळ्यांचा सर्रास वापर करण्याचा सल्ला मात्र देत नाहीत. जोपर्यंत डॉक्टर चयापचय विकार आणि जास्त वजनाच्या समस्या असलेल्या लोकांसाठी हे औषध वापरण्यास सांगत नाहीत तोपर्यंत ते वापरू नये असं ते म्हणतात.
यूकेच्या इलेक्ट्रॉनिक मेडिसीन्स कॉम्पेंडियम (ईएमसी)ने म्हटलं आहे की, ज्यांना हे इंजेक्शन घ्यायचं आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलं पाहिजे.
मोंजारो इंजेक्शन घेण्यापूर्वी तुम्ही इतर काही औषधं किंवा इंजेक्शन घेत असाल तर डॉक्टरांना त्याची माहिती दिली पाहिजे. गरोदर असताना हे इंजेक्शन घेऊ नये.
तुम्ही मूल जन्माला घालण्याबाबत विचार करत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे इंजेक्शन घेऊ नये.
तुम्हाला स्वादुपिंडाचा दाह, तीव्र पोटदुखी, पोटाच्या समस्या किंवा पचनसंस्थेच्या समस्या असतील तर याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.
बाळंतपणानंतर महिलांचं वजन वाढणं स्वाभाविक आहे. जर तुम्हाला मोंजारो वजन कमी करण्यासाठी वापरयाचं असेल, तर तुम्ही त्या वेळी स्तनपान करत आहात का? त्यामुळे बाळाला काही धोका निर्माण होऊ शकतो का? याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करावी.
दुष्परिणाम आहेत का?
ईएमसीने म्हटलं आहे की या इंजेक्शनचे काही दुष्परिणाम होऊ शकतात.
या इंजेक्शनमुळे अपचन, चक्कर येणे, उलट्या होणे, अतिसार, पोटदुखी, सुस्ती आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
मात्र, औषध घेण्यास सुरुवात केल्यावर जरी ही लक्षणे दिसली तरी ती हळूहळू कमी होऊ शकतात. असंही म्हटलं जातं की ही लक्षणं प्रत्येकामध्ये दिसून येत नाहीत आणि दहापैकी फक्त एका व्यक्तीला या समस्या उद्भवू शकतात.
अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने म्हटलं आहे की हे इंजेक्शन फक्त 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी तेही डॉक्टरांच्या देखरेखीखालीच घेतलं पाहिजे.

फोटो स्रोत, Getty Images
दिल्लीतील न्यूरोलॉजिस्ट आणि एका हेल्थटेक कंपनीचे संस्थापक डॉ. राहुल चावला म्हणतात की, मोंजारो मेंदूवर काम करतं आणि भूक कमी करतं.
राहुल चावला म्हणाले, "या इंजेक्शनमुळे आपण जे अन्न खातो ते पचायलाही जास्त वेळ लागतो. यामुळे आपोआपच अन्नाचं प्रमाण कमी होतं. यामुळे आपण खात असलेल्या कॅलरीज आपोआप कमी होतात."
या औषधाच्या चाचण्यांमधून हेही दिसून आलं आहे की मोंजारो सुरू केल्यानंतर एका वर्षाच्या आत लोक त्यांचे वजन 15 टक्क्यांपर्यंत कमी करू शकतात. मात्र, प्रत्येकाने ते वापरू नये. या औषधामुळे वजन तर कमी होतंच, पण स्नायूंचंही नुकसान होतं.
राहुल म्हणाले, "आपण फक्त मोंजारो घेत राहिलो आणि आपल्या दैनंदिन सवयींमध्ये कोणताही बदल केला नाही आणि दररोज व्यायाम करणं हे तुमच्या सवयीचं नसेल तर हे इंजेक्शन बंद केल्यानंतर लगेच वजन वाढू देखील शकतं."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











