सडपातळ होण्यासाठीचं इंजेक्शन थांबवल्यास वजन चारपट अधिक वेगानं वाढण्याची शक्यता?

वजन कमी करण्याच्या इंजेक्शनला 'स्किनी जॅब्स' ही म्हटलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वजन कमी करण्याच्या इंजेक्शनला 'स्किनी जॅब्स' ही म्हटलं जातं.
    • Author, मिशेल रॉबर्ट्स
    • Role, डिजिटल हेल्थ एडिटर

सध्या झपाट्याने वजन कमी करण्यासाठी 'वेट लॉस इंजेक्शन्स'ची क्रेझ जगभरात वाढतेय. त्यांना 'स्किनी जॅब्स' म्हटले जात आहे, तर सर्वसामान्यांच्या भाषेत त्यांना 'सडपातळ होण्याचे इंजेक्शन' असेही म्हणतात.

पण तुम्हीही या शॉर्टकटचा विचार करत असाल, तर सावधान!

एका नव्या संशोधनानुसार, ही इंजेक्शन्स सोडल्यानंतर वजन कमी होण्याऐवजी ते सामान्य वेगापेक्षा चारपट अधिक वेगाने पुन्हा वाढू शकते.

मंजारो किंवा विगोवीसारखी ही वजनावर नियंत्रण मिळवणारी इंजेक्शन्स भूक कमी करतात आणि वजन वेगाने घटवतात.

मात्र, एका नवीन संशोधनात असा इशारा देण्यात आला आहे की, "वजन कमी करण्याचे हे इंजेक्शन बंद केल्यास वजन सामान्य वेगाच्या तुलनेत चारपट वेगाने पुन्हा वाढू शकते."

ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, वजन कमी करण्याच्या इंजेक्शनमुळे मर्यादेपेक्षा अधिक वजन असलेल्या व्यक्तींचे वजन लक्षणीयरीत्या घटते.

या इंजेक्शनच्या साहाय्याने त्यांचे वजन 20 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. मात्र, जसे त्यांनी हे इंजेक्शन घेणे बंद केले, तसे त्यांचे वजन दरमहा सरासरी 800 ग्रॅम या वेगाने पुन्हा वाढू लागते.

वजन कमी करणाऱ्या इंजेक्शनमुळेच वजन वाढण्याचा धोका

एकंदरीत या पद्धतीनुसार अशी इंजेक्शन्स वापरणाऱ्यांचे वजन दीड वर्षात पुन्हा पूर्वीइतकेच वाढते.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधक डॉक्टर सुझन जेब म्हणतात की, 'हे इंजेक्शन खरेदी करणाऱ्या लोकांना हे माहित असायला हवे की, उपचार बंद केल्यावर वजन अत्यंत वेगाने पुन्हा वाढण्याचा धोका असतो.'

त्यांनी या गोष्टीवर भर दिला की हे निष्कर्ष मेडिकल ट्रायलमधून समोर आले आहेत. त्यांच्या मते, वजन कमी करणाऱ्या इंजेक्शनच्या परिणामांवर अजून संशोधनाची गरज आहे."

वजन कमी करणाऱ्या लोकप्रिय इंजेक्शनची तुलना डाएट किंवा इतर औषधांशी करण्यासाठी संशोधकांनी 9 हजारांहून अधिक रुग्णांचा समावेश असलेल्या 37 अभ्यासांची तपासणी केली.

संशोधकांचे असे म्हणणे आहे की, जे लोक डाएट करतात, अशा लोकांचे वजन इंजेक्शन घेणाऱ्यांच्या तुलनेत जरी कमी घटत असले, तरी नंतर त्यांचे वजन हळूहळू वाढते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संशोधकांचे असे म्हणणे आहे की, जे लोक डाएट करतात, अशा लोकांचे वजन इंजेक्शन घेणाऱ्यांच्या तुलनेत जरी कमी घटत असले, तरी नंतर त्यांचे वजन हळूहळू वाढते.

यांपैकी केवळ आठ अभ्यासांमध्ये विगोवी आणि मंजारो सारख्या औषधांच्या उपचारांचे मूल्यांकन करण्यात आले होते. तसेच, या अभ्यासांमध्ये औषध बंद केल्यानंतरचा जास्तीत जास्त 'फॉलो-अप' कालावधी केवळ एक वर्षापर्यंतचा होता, त्यामुळे ही आकडेवारी फक्त एक अंदाज आहे.

संशोधकांचे म्हणणे आहे की, जे लोक डाएट करतात, अशा लोकांचे वजन इंजेक्शन घेणाऱ्यांच्या तुलनेत कमी घटते, परंतु नंतर त्यांचे वजन हळूहळू वाढते. अंदाजानुसार, अशा लोकांचे वजन दरमहा सरासरी 100 ग्रॅम वाढते. अर्थात, प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत हे प्रमाण वेगळे असू शकते.

दुसरीकडे, इंजेक्शनद्वारे वजन कमी करणारे लोक जेव्हा इंजेक्शन घेणे बंद करतात, तेव्हा त्यांचे वजन दरमहा सरासरी 800 ग्रॅमने वाढते.

याची नेमकी कारणं काय आहेत ?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ज्या लोकांनी ठराविक कालावधीसाठी ही इंजेक्शन्स घेतली, त्यांना असे जाणवले की, ती बंद करताच तीव्र भूक लागण्यास सुरुवात होते.

एका महिलेने सांगितले, 'असे वाटले जणू मेंदूतील एखादा स्विच ऑन झाला आहे आणि आता सांगितले जात आहे की सर्व काही खा, तू इतके दिवस काहीही खाल्ले नाहीस तर आता खा.' "

ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ सरे येथील न्यूट्रिशन एक्सपर्ट डॉ. ॲडम कोलिन्स यांचे म्हणणे आहे की, ज्या पद्धतीने ही इंजेक्शन्स मेंदू आणि शरीरात काम करतात, त्यावरून हे समजू शकते की ती घेणे बंद केल्यानंतर वजन पुन्हा का वाढते.

ही इंजेक्शन्स भूक नियंत्रित करणाऱ्या जीएलपी-1 (GLP-1) या हार्मोनसारखी काम करतात.

डॉक्टर ॲडम कोलिन्स म्हणतात, "दीर्घकाळापर्यंत शरीरात कृत्रिम पद्धतीने सामान्यपेक्षा कित्येक पटीने जास्त जीएलपी-1 दिल्याने, तुमचे शरीर स्वतःचे नैसर्गिक जीएलपी-1 कमी तयार करू शकते आणि तुमच्यावर त्याचा परिणाम देखील कमी होऊ शकतो."

ते म्हणतात की जोपर्यंत तुम्ही इंजेक्शन घेत असता, तोपर्यंत कोणतीही समस्या येत नाही, परंतु जसे तुम्ही ते बंद करता, भूक नियंत्रणात राहत नाही आणि जास्त खाण्याची शक्यता खूप वाढते.

वेटलॉस इंजेक्शन घेणे बंद केल्यावर तीव्र भूक लागू लागते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वेटलॉस इंजेक्शन घेणे बंद केल्यावर तीव्र भूक लागू लागते.

ते असं ही सांगतात की, जे लोक फक्त इंजेक्शन किंवा औषधावरच अवलंबून राहतात आणि खाण्यापिण्याच्या किंवा इतर सवयींमध्ये कोणताही बदल करत नाहीत त्यांच्यासाठी ही समस्या अधिक गंभीर बनते."

ग्लासगो युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर नवीद सत्तार यांचे मत मात्र वेगळे आहे. ते म्हणतात की, ही इंजेक्शन्स वेगाने वजन कमी करून आरोग्याला इतरही अनेक फायदे मिळवून देऊ शकतात.

प्रोफ़ेसर नवीद सत्तार म्हणतात, "असे शक्य आहे की कमी काळासाठी इंजेक्शनचा वापर केल्यामुळे सांधे, हृदय आणि किडनीचे होणारे नुकसान कमी करण्यास मदत मिळू शकते. मात्र, खात्रीशीरपणे काही सांगण्यासाठी मोठ्या स्तरावर आणि दीर्घकाळ चालणाऱ्या वैद्यकीय चाचण्यांची गरज आहे.

खास बाब ही आहे की, जर या औषधांचा तीन ते चार वर्षे सलग वापर केला, तर लोक सामान्यपेक्षा बरेच कमी वजन टिकवून ठेवू शकतात. असा फायदा केवळ जीवनशैली बदलल्याने मिळत नाही.

ब्रिटनमध्ये अनेकांनी घेतले इंजेक्शन्स

ब्रिटनच्या 'नॅशनल हेल्थ सर्व्हिस'चा असा सल्ला आहे की, ही इंजेक्शन्स फक्त अशाच लोकांनी घ्यावीत जे लठ्ठपणामुळे उद्भवणाऱ्या आरोग्य धोक्यांमुळे 'ओव्हरवेट' आहेत. जे लोक फक्त थोडे बारीक होण्यासाठी याचा वापर करू इच्छितात, त्यांनी हे टाळले पाहिजे.

तसेच, डॉक्टरांनी रुग्णांना जीवनशैलीत बदल करण्याचे सुचवले पाहिजे, ज्यामध्ये सकस आहार आणि पुरेशा व्यायामाचा समावेश असावा, जेणेकरून लोक आपले कमी झालेले वजन टिकवून ठेवू शकतील.

एनएचएस नुसार 'मंजारो'च्या वापरासाठी कोणतीही कालमर्यादा नाही, परंतु 'विगोवी' हे इंजेक्शन जास्तीत जास्त दोन वर्षांपर्यंतच दिले जाऊ शकते."

वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञ सकस आहार आणि पुरेसा व्यायाम करण्याचा सल्ला देतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञ सकस आहार आणि पुरेसा व्यायाम करण्याचा सल्ला देतात.

ताज्या अंदाजानुसार, गेल्या एका वर्षात ब्रिटनमधील मोठ्या लोकसंख्येने अशी इंजेक्शन्स घेतली आहेत. सुमारे 16 लाख प्रौढांनी वजन कमी करणाऱ्या इंजेक्शनचा वापर केला आहे. बहुतांश लोकांनी ही इंजेक्शन्स एनएचएस ऐवजी खाजगी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खरेदी केली आहेत.

याशिवाय 33 लाख लोकांचे म्हणणे आहे की त्यांना एका वर्षात वजन कमी करण्याची अशी इंजेक्शन्स घ्यायची आहेत. याचा अर्थ असा की, दर 10 पैकी एक प्रौढ व्यक्ती एकतर हे इंजेक्शन घेत आहे किंवा घेऊ इच्छिते. 'कॅन्सर रिसर्च यूके'ने 2025 च्या पहिल्या तिमाहीत केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे ही आकडेवारी दिली आहे.

पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया या इंजेक्शनचा वापर अधिक करत आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या जवळपास दुप्पट आहे. यामध्येही 40 ते 50 वर्षे वयोगटातील लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

औषध कंपन्यांनी काय म्हटले?

'मंजारो' बनवणाऱ्या 'एली लिली' या फार्मास्युटिकल कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, वजन कमी करणाऱ्या औषधांच्या वापरासोबतच आरोग्यदायी आहार, व्यायाम आणि डॉक्टरांची देखरेख देखील आवश्यक आहे.

जेव्हा उपचार बंद केले जातात, तेव्हा वजन पुन्हा वाढू शकते, जे जैविक परिस्थितीमुळे घडते.

विगोवी बनवणाऱ्या 'नोवो नॉर्डिस्क' या कंपनीने म्हटले आहे की, 'हे निष्कर्ष दर्शवतात की लठ्ठपणा हा दीर्घकाळ टिकणारा आजार आहे. तसेच, वजन आणि आरोग्य चांगले राखण्यासाठी सातत्याने उपचारांची गरज असते. अगदी तशीच, जशी मधुमेह किंवा उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांमध्ये उपचारांची गरज भासते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)