धावत्या बसला भगदाड, 7 वर्षांच्या अनन्याचा कसा झाला अंत? वडील म्हणाले, 'तक्रार करूनही शाळेचे दुर्लक्ष'

फोटो स्रोत, Ravi
- Author, सय्यद मोझिज इमाम
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 4 मिनिटे
(या बातमीतील तपशील तुम्हाला विचलित करू शकतो)
उत्तर प्रदेश मधील अलीगडमध्ये राहणारे रवी यादव सध्या प्रचंड धक्क्यात आहे. शनिवारी त्यांच्या 7 वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा शाळेच्या बसमधून खाली पडल्यानं मृत्यू झाला.
रवी सांगतात की, "शाळा व्यवस्थापनानं माझ्या तक्रारीकडं लक्ष दिलं असतं आणि सतर्कता दाखवली असली तर कदाचित माझ्या मुलीबरोबर हा अपघात झाला नसता आणि ती जीवंत असती."
रवी यांची मुलगी अनन्या रोजप्रमाणे तयार होऊन भावाबरोबर स्कूल बसमधून अलीगडच्या 'माउंट देव इंटरनॅशनल स्कूल'ला गेली होती.
पोलिसांच्या एफआयआरनुसार, "शाळेतून घरी परतत असताना, बसच्या खालचा भाग तुटला आणि त्यातून ती खाली पडून चिरडली गेली आणि त्यात तिचा मृत्यू झाला."
या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे परिवहन मंत्री दया शंकर सिंह यांनी निष्काळजीपणाच्या आरोपात परिवहन विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना 28 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशच्या कासगंज जिल्ह्यात घडली. अनन्या यांचे वडील रवी यादव यांचा छोटासा व्यवसाय आहे.
त्यांनी बीबीसी न्यूज हिंदीशी बोलताना सांगितलं की, त्यांची मुलं रोज बसने शाळेत जायचे.
युकेजीमध्ये शिकणारी अनन्या दररोजप्रमाणे भावासोबत शाळेतून बसने घरी परतत होती. बसच्या मागील टायरच्या वर असलेल्या सीटवर ती बसली होती.
"बस सुरू असताना अचानक तिचा खालचा फरशीसारखा असणारा भाग तुटला आणि अनन्या खाली पडली."
त्यानंतर
त्यानंतर बसमध्ये असलेल्या इतर मुलांनी आरडा-ओरडाही केला. अनन्याच्या वडिलांनी केलेल्या दाव्यानुसार मुलं ओरडूनही चालकानं बस थांबवली नाही आणि काही अंतरापर्यंत बस चालत होती.
त्यानंतर एका रिक्षावाल्यानं पुढं जात बस थांबवली, आणि चालकाला याबाबत माहिती दिली असाही दावा त्यांनी केला.
त्यानंतर चालकानं बस पुन्हा घटना घडली त्याठिकाणी नेली. त्यानंतर त्यांनी मुलीला तिथून उचचलं आणि बस घरी घेऊन आला.

फोटो स्रोत, Ravi
रवी यादव म्हणाले की,"ड्रायव्हरनं मुलीला घरी आणलं आणि जखमी झाल्याचं सांगितलं. आम्ही बसमध्ये जाऊन पाहिलं तर, तिच्या शरिराची हालचाल होत नव्हती. थेट रुग्णालयात नेलं असतं तर कदाचित माझी मुलगी वाचली असती."
अनन्याचे काका संतोष यादव यांनी बीबीसी न्यूज हिंदीशी बोलताना म्हटलं की,"बस ड्रायव्हर बस घराबाहेरच सोडून पळून देला. नातेवाईकांनी अनन्याला रुग्णालयात नेलं. त्याठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं."
बसची अत्यंत दूरवस्था झालेली होती आणि त्याची तक्रारही शाळेकडे करण्यात आलेली होती. पण काहीही कारवाई झाली नाही, असंही अनन्याचे काका म्हणाले.
शाळेने काय म्हटलं आहे?
मात्र, शाळा व्यवस्थापनाने बस खराब स्थितीत असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.
पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी शाळेचे व्यवस्थापक अरविंद यादव यांनी माध्यमांना सांगितलं की, जानेवारीमध्ये बसची देखभाल करण्यात आली होती आणि सर्व बिघाड दुरुस्त करण्यात आले होते.
त्यांनी सांगितले की वेल्डिंगचा काही भाग सैल झाला असावा.
ते म्हणाले, "आम्हाला संशय आहे की जमिनीच्या काही भागावरील वेल्डिंग सैल झाले असावे, कदाचित मुलांनी गाडीच्या आत उद्या मारल्यामुळे, बसचा पत्रा वाकला असेल आणि त्यातूनच ही मुलगी घसरून खाली पडली असण्याची शक्यता आहे."

फोटो स्रोत, Ravi
त्यांनी असंही सांगितलं की, शाळेने बस चालविण्यासाठी ३२ वर्षीय चंद्र प्रकाश यांना कामावर ठेवले होते.
मात्र, पालकांनी शाळेच्या नंबरवर कॉल केल्यानंतर त्यांना त्यांनी लावलेल्या आरोपांबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
अलिगढ पोलिस सर्कल ऑफिसर संजीव कुमार यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं की, "या प्रकरणात पोलिसांनी चालक चंद्र प्रकाश आणि व्यवस्थापक अरविंद यादव यांना अटक केली आहे."
प्रशासनाने काय म्हटलं?
ही घटना घडून 24 तासांहून अधिक काळ उलटल्यानंतर, पोलिसांनी शाळेचे व्यवस्थापक अरविंद यादव आणि बस चालक चंद्र प्रकाश यांच्याविरुद्ध गंगिरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी एका प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, हेतू नसताना केलेल्या हत्येच्या कलमांतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये हेतुपुरस्सर हत्येची कलमं लावण्यात आलेली नाहीत.
पोलिसांनी जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, "स्कूल बस चालक चंद्र प्रकाश यांच्या निष्काळजीपणामुळे, शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या या बसच्या छिद्रामधून पाडून सात वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे."
बसची अवस्था कशी होती?
या बसचा व्हीडिओ पाहता तिची अवस्था फारच जीर्ण होती असं दिसून येतं. उत्तरप्रदेश परिवहन आयुक्त किंजल सिंह याबाबत बोलताना म्हणाले की, "बसच्या परवान्याची मुदत संपली होती."
तर, अलीगढचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रवेश कुमार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "शाळा व्यवस्थापन आणि बस चालक दोघांविरोधात कारवाई करण्यात येईल तसेच अपघातासंदर्भात स्वतंत्र गुन्हा नोंद केला जाईल."
ही बस अतिशय वाईट स्थितीत होती, असा दावा स्थानिकांनीही केला आहे.
अनेक पालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटलं की, प्राथमिक शाळेच्या बैठकीत शालेय वाहतुकीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. पण शाळेने वेळेत त्याची दखल घेतली नाही.
पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, बसचा तुटलेला हा भाग टायरच्या अगदी वर होता.

फोटो स्रोत, Ravi
अलीगढचे पोलीस सर्कल अधिकारी संजीव कुमार म्हणाले, "सध्या तपास सुरू आहे. स्कूल बसबाबत स्वतंत्र मोहीम राबवली जात आहे."
उत्तर प्रदेश परिवहन आयुक्त किंजल सिंह यांनी माध्यमांना जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, या प्रकरणात निष्काळजीपणा केल्यामुळे अलीगढच्या आरटीओ वंदना सिंह तसेच यापूर्वी कार्यरत असलेले अधिकारी चंपालाल यांना निलंबित करण्यात आलं आहे.
किंजल सिंह यांच्या मते, "तपासात असं दिसून आलं की, ही बस अलीगढ दादो येथील माउंट देव इंटरनॅशनल स्कूलमध्ये चालवली जात होती आणि वाहनाचा विमा व परवाना कालबाह्य होता."
याप्रकरणी विभागाने उपपरिवहन आयुक्त (परिक्षेत्र) आग्रा यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांकडून तीन दिवसांत स्पष्टीकरण मागितले आहे.
तसेच शाळा व्यवस्थापनाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यासाठी तक्रारही देण्यात आली आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











