इंदापूर : मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा या मतदारसंघात किती महत्त्वाचा ठरणार?

- Author, प्रियंका जगताप
- Role, बीबीसी मराठीसाठी
'भाजपमध्ये गेल्यापासून मला शांत झोप लागतीये,' म्हणणारे हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात गेले आणि आता ते निवडणूक लढवणार आहेत.
त्यामुळे पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केल्यानंतर तालुक्याची राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.
आता इंदापूर मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, भाजपमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमधे असलेले परंतु अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले प्रवीण माने असा सामना रंगणार आहे.
लोकसभेला सुप्रिया सुळेंच्या बाजूने कल देणारी इंदापूरची जनता विधानसभेला कोणाच्या बाजूने उभी राहणार? राज्यात सुरू असलेल्या मराठा, धनगर, ओबीसी आरक्षण आंदोलनाचा मुद्दा इंदापूर मतदारसंघात महत्त्वाचा ठरणार का? हे मुद्दे या निवडणुकीत कळीचे मानले जात आहेत.
इंदापूर तालुक्यात जातीच्या राजकारणाचा अनेकदा प्रभाव दिसून आल्याचं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे यावेळी जातीच्या राजकारणाचा फायदा आणि तोटा कोणाला होणार यावर चर्चा होत आहे.
यंदाच्या निवडणुकीत मराठा समाज हा हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने यांच्यात विखुरला जाण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे. याचा फायदा दत्तात्रय भरणेंना होईल का?
याहून महत्त्वाचं म्हणजे भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या सामन्यात अजित पवार आणि शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तेव्हा विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?
हे प्रश्न आपण या लेखातून समजून घेऊ.
हर्षवर्धन पाटील शरद पवारांसोबत गेल्यानंतर इंदापूरमध्ये बऱ्याच राजकीय हालचाली झाल्या.
पुणे जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे हे शरद पवार गटात होते पण ते आता अजित पवारांकडे जाणार आहेत आणि त्यांनी अजित पवार गटाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने हे शरद पवारांसोबत होते पण हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी मिळाल्यानंतर ते नाराज झाले. आता ते अपक्ष उभे आहेत.
'परिवर्तन विकास आघाडी'च्या माध्यमातून प्रवीण माने यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. स्थानिक नेते भरत शहा हे देखील शरद पवारांसोबत होते पण आता ते बाहेर पडले आहेत.
इंदापुरात कोणाचं पारडं जड ?
राज्यातल्या इतर अनेक मतदारसंघाप्रमाणेच या ठिकाणी देखील निवडणुकीत जातीचा प्रभाव असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
दोन प्रमुख मराठा उमेदवार आणि एक प्रमुख धनगर उमेदवार असल्यामुळे हे चित्र नेमकं कसं असेल याची अनेकांना उत्सुकता आहे.
या तिरंगी लढतीसंदर्भात बीबीसी मराठीशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर रायते म्हणाले की, "1995 नंतर इंदापूरमध्ये पहिल्यांदाच तिरंगी लढत होत आहे. यामध्ये दोन मराठा नेते आहेत तर एक धनगर नेता आहे."
"इंदापुरात जातीय समीकरणं कधी प्रभावी ठरतात तर कधी नाही. अजून असं वातावरण तयार झालेलं नाही की जनतेचा कल कोणाकडे आहे हे कळेल, परंतु सध्याच्या स्थितीत दत्तात्रय भरणे यांचं पारडं जड आहे."
आरक्षण आंदोलनांचा या निवडणुकीवर काय परिणाम होईल आणि जातीच्या राजकारणाचा कोणाला फायदा कोणाला तोटा होईल यावर बोलताना रायते म्हणाले की, "मला वाटतं यावेळेस जरांगे फॅक्टर आणि धनगर आरक्षणाच्या मुद्यावर ही निवडणूक लढवली जाईल. हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे या दोघांकडेही त्यांची स्वतःची व्होटबँक आहे आणि ती कायम ठेवून इतर लोकांची मतं कशी मिळतील या प्रयत्नात ते आहेत."

फोटो स्रोत, Facebook/Dattatray Bharane
रायते ही जातीय समीकरणं समजावून सांगतात, "या निवडणुकीत दत्तात्रय भरणेंचं पारडं जड असण्याचं कारण म्हणजे, धनगर समाज त्यांच्या बाजूने ठामपणे उभा असल्याचे म्हटले जाते तसेच माळी समाजाचासुद्धा त्यांच्याच बाजूने कल असल्याचं सांगितलं जातं. शिवाय अजित पवारांमुळे काही प्रमाणात मराठा समाज देखील त्यांच्याकडे आहे."
"जरांगे फॅक्टरचा फायदा हर्षवर्धन पाटलांना होऊ शकतो अशी शक्यता आहे. शरद पवारांमुळे मुस्लीम समाजाचेही एकगठ्ठा मतदान हर्षवर्धन पाटलांना होईल. मागासवर्गीय समाजाचेही बऱ्यापैकी मतदान होईल, परंतु वंजारी समाजाची काही गावं आहेत लाकडी, निंबोडी,अकोले, लाखेवाडी ही मोठ्या संख्येने ओबीसी फॅक्टर म्हणून दत्तात्रय भरणे यांच्याकडे जातील.
"त्यात दोन मराठा उमेदवारांमुळे मराठी समाज विखुरला जाणार, याचा फायदा दत्तात्रय भरणे यांनाच होणार. असे असले तरीही शेवटच्या क्षणाला, हर्षवर्धन पाटलांचं पारडं जड होण्याची शक्यता नाकारता येत नाही," असं रायते सांगतात.
प्रवीण मानेंसोबत कोण आहे?
इंदापुरातील राजकारणातील आणि सहकार क्षेत्रातील प्रभावशाली नेते दशरथ माने यांचे प्रवीण हे चिरंजीव आहेत. सोनाई उद्योग समूहाच्या माध्यमातून माने कुटुंबाचा या भागात प्रभाव आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर प्रवीण माने हे शरद पवारांसोबत होते. लोकसभा निवडणुकीवेळी ते शरद पवारांसोबत होते आणि त्यांनी सुप्रिया सुळेंचा प्रचार देखील केला पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर ते अजित पवारांसोबत गेले.
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ते परत शरद पवारांकडे आले.
'मला बळजबरी तिकडे नेण्यात आलं होतं,' असं म्हणत ते शरद पवारांकडे आले. ते देखील 'तुतारी' निशाणावर निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण ऐनवेळी शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

फोटो स्रोत, facebook/Pravin Mane
प्रवीण माने यांना हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू आणि इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूर पाटील यांनी पाठिंबा दिला आहे.
त्यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सचिन देवकर यांनी देखील प्रवीण मानेंच्या 'परिवर्तन विकास आघाडी'ला पाठिंबा दिला आहे.


ही निवडणूक धनगर आणि मराठा ध्रुवीकरणावर आधारित आहे, असं ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहतांना वाटतं.
"धनगर मतं निर्णायक ठरल्यामुळे लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. आता हर्षवर्धन पाटलांची भिस्त शरद पवारांवर आहे. त्यांना वाटतं की आपण शरद पवारांमुळे निवडून येऊ शकतो," अशी प्रतिक्रिया मेहता यांनी बीबीसी मराठीला दिली आहे.
हे मुद्दे इंदापुरातल्या जनतेसाठी महत्त्वाचे
इंदापुरातल्या जनतेच्या समस्या काय आहेत, त्यांच्यासाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत? नक्की कोणत्या फॅक्टरवर इंदापूरातलं मतदान होईल यावर भाष्य करताना रायते म्हणाले की, "पाण्याचा प्रश्न या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे. लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेहून भरणे-पाटील यांच्यात वाद-प्रतिवाद आहेत."
"इंदारातील रस्त्याची कामे सुद्धा नीट झालेली नाही असं अनेक लोक म्हणतात, त्यावरुन देखील नाराजी आहे," असं रायते सांगतात.
पाण्यासोबतच कारखाना आणि उसाच्या भावाचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता सांगतात.
"इंदापूरच्या जनतेचा मुख्य प्रश्न पाण्याचा आहे, कारण उन्हाळ्यात इंदापूर कोरडं पडतं. दुसरा प्रश्न कारखान्यांचा आहे, कारण तिथल्या शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव मिळत नाही. तो सगळा साखरपट्टा असल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांच्या मनात हर्षवर्धन पाटलांविषयी नाराजीचा सूर जाणवतो," असं मेहता सांगतात.


'हर्षवर्धन पाटलांचे राजकीय अस्तित्व ठरवणार'
बारामतीप्रमाणेच इंदापुरातही दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तसेच मागच्या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यामुळे यावेळी हर्षवर्धन पाटलांचे राजकीय अस्तित्व पणाला लागले आहे.
यावर भाष्य करताना ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता म्हणाले की,"यावेळी हर्षवर्धन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे कारण त्यांचा जर यावेळी पराभव झाला तर त्यांच्या पराभवाची हॅट्रिक होईल. लागोपाठ तिसऱ्या पराभवामुळे त्यांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल."
"एकतर या निवडणुकीला शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीही एक किनार आहे. लोकसभेला हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे, संजय जगताप हे सगळे नावाला अजित पवारांसोबत गेले होते पण त्यांनी सुप्रिया सुळेंचेंच काम केले. त्यामुळे सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. लोकसभेचा तो वचपा अजित पवारांना आता काढायचा आहे," असं मेहता सांगतात.

फोटो स्रोत, Facebook/Harshvarrdhan Patil
हर्षवर्धन पाटलांसमोरील आव्हानांविषयी बोलताना मेहता म्हणाले की, "हर्षवर्धन पाटलांसमोर दोन मोठी आव्हानं आहेत. पहिलं आव्हान पक्षनिष्ठतेचं. कारण त्यांचा प्रवास अपक्ष ते काँग्रेस नंतर भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असा असल्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्या निष्ठेबाबत प्रश्न आहे, त्यात त्यांचा जनसंपर्कसुद्धा कमी झालेला आहे. परंतु दत्तात्रय भरणेंचं तसं नाही कारण धनगर समाज त्यांच्या मागे आहे आणि अजित पवारांना मानणारा मतदार वर्गही त्यांच्यासोबत आहे."
"नात्याने मामा असणारे अप्पासाहेब जगदाळे हर्षवर्धन पाटलांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेले. प्रवीण माने यांच्या बंडखोरीमुळे हर्षवर्धन पाटलांसाठी ही निवडणूक अजिबात सोपी राहिलेली नाही.
"कारण प्रवीण मानेंमुळे मराठा मतं विभागली जाणार ज्याचा फायदा दत्तात्रय भरणेंनाच होणार आहे. परंतु इंदापूरच्या जनतेच्या मनात काय आहे हे शेवटपर्यंत कोणाला सांगता येणार नाही," असेही पुढे मेहता म्हणाले.
येणाऱ्या काळात राजकारणात वीस वर्षांची कारकीर्द असलेले हर्षवर्धन पाटील, दहा वर्षांची कारकीर्द असलेले दत्तात्रय भरणे आणि कोरी पाटी असलेले प्रवीण माने यांच्यात कोण बाजी मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











