रोहित पवारांसाठी कर्जत-जामखेडची निवडणूक किती सोपी-किती अवघड? राम शिंदे कमबॅक करणार का?

फोटो स्रोत, facebook
- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Reporting from, कर्जत-जामखेड (अहमदनगर)
रोहित पवारांनी 2019 साली जेव्हा निवडणुकीच्या राजकारणात पदार्पण करण्याचं ठरवलं, तेव्हा बारामतीला खेटून असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघाची त्यांनी निवड केली.
पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी असलेल्या रोहित पवारांनी अहमदनगर जिल्ह्यातील निवडलेल्या या कर्जत-जामखेडमध्ये भाजपच्या राम शिंदे यांचं वर्चस्व होतं. ते तेव्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गृहराज्य मंत्री होते.
राम शिंदेंना थेट रोहित पवार लढत देणार म्हणून या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष गेलं आणि लढतीची चुरस कमालीची वाढली.
2009 आणि 2014 अशा सलग दोनवेळा इथून आमदार आणि 2014 सालच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या राम शिंदेंचा तब्बल 43 हजार मतांनी पराभव करत, रोहित पवारांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरू केली.
2019 ला झालेला पराभव जिव्हारी लागलेल्या राम शिंदे यांनी त्यानंतरच्या पाच वर्षात गावोगावी फिरून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.
या पराभवाची सल एवढी होती की, अवघ्या काही महिन्यांपूर्वी विधानपरिषदेवर संधी मिळूनसुद्धा राम शिंदेंना विधानसभा लढवण्याची इच्छा होती. आता विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे आणि कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार रोहित पवार यांच्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय कुस्ती रंगणार आहे.
आता या कुस्तीत रोहित पवार पुन्हा एकदा प्राध्यापक राम शिंदेंना अस्मान दाखवतात की प्राध्यापकी करून राजकारणात आलेले राम शिंदे रोहित पवारांना धोबीपछाड देतात, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.


कर्जत जामखेड नेमका हा मतदारसंघ नेमका कसा आहे?
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कर्जत आणि जामखेड या दोन तालुक्यांच्या शहरांनी मिळून हा मतदारसंघ बनलेला आहे.
बीड रस्त्याने जामखेड शहरात प्रवेश करतानाच डाव्या हाताला एक मोठा बॅनर लावलेला दिसतो. आकाशी रंगाच्या या बॅनरवर ठळक अक्षरात वारकऱ्यांचा गंध आणि टिळा आणि त्यावर फक्त तीन शब्द 'राम कृष्ण हरी'. महाराष्ट्राच्या राजकारणाची आवड असलेल्या प्रत्येकाला 'राम कृष्ण हरी' या घोषणेचा पुढचा भाग नक्कीच माहिती असेल.
लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी जिथे जिथे उमेदवार उभे केले होते तिथे तिथे 'राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी' ही घोषणा कानावर पडत होती.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आचारसंहितेच्या नियमांचा भंग न करता प्रचारासाठी वापरलेली ही शक्कल त्यांची निवडणुकीची तयारी दाखवून देते.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचा प्रचार करणारे असे बॅनर संपूर्ण कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मोक्याच्या ठिकाणी लावलेले आहेत.

रोहित पवारांनी वापरलेल्या प्रचाराच्या क्लुप्त्या एकीकडे आणि त्यांच्या विरोधात उभे असलेले भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांचा 'डोअर टू डोअर' प्रचार दुसरीकडे.
'राम कृष्ण हरी'च्या बॅनरसमोरून 'भूमिपुत्र' असं लिहिलेल्या आणि राम शिंदेंचा फोटो लावलेल्या गाड्या हमखास धावताना दिसतात.
आता रोहित पवारांनी केलेले विकासाचे दावे पुन्हा एकदा कर्जत-जामखेडच्या मतदारांच्या पचनी पडतील का? मराठवाड्याला लागून असल्यामुळे 'मराठा विरुद्ध ओबीसी' राजकारणाचा परिणाम इथे जाणवेल का? महायुती सरकारच्या योजना इथे कितपत पोहोचल्या आहेत? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जत-जामखेडमधल्या मतदारांच्या मनात नेमकं काय चाललंय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तिथे प्रत्यक्ष जाऊन, मतदारांशी बोलून प्रयत्न केला.
'आमचा डोल वेळेवर मिळत नाही, विकास झाला नाही'
राम शिंदे आणि रोहित पवारांनी ज्या कर्जतमध्ये त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले.
तिथे रस्त्यावर बसलेल्या एका फळविक्रेत्याने कॅमेरा बंद ठेवण्याच्या अटीवर आम्हाला सांगितलं की, "साहेब कुणिबी निवडून आलं तरी इथे काही बदल होईल असं वाटत नाही. आज तुम्ही कर्जतमध्ये आहात, हे तालुक्याचं ठिकाण आहे. तुम्हाला, किंवा एखाद्या लेडीजला लघवीला जायला इथं जागा नाही. मी मुख्य रस्त्यावर बसून फळं विकतोय पण आजवर मी ज्या रस्त्यावर बसतो तो रस्ता कधीच नीट बांधला गेला नाही. आम्ही धूळ खातो, फळं विकतो, मतदान करतो आणि गप बसतो. आमचा 'डोल' कधी वेळेवर येत नाही. वर मोदी मस्त चांगला आहे पण खाली कुणी काम करत नाही. यावेळी पण तेच होणार लोक पैसे वाटणार आणि मत घेणार, आमचं कुणाला पडलेलं नाही."
कर्जतच्या फळविक्रेत्याने सांगितलेली ही हकीकत इथल्या अनेकांची होती.
एका बँकेसमोर पगार काढायला आलेले दोन लष्करातले जवान आम्हाला भेटले. ते म्हणाले की, "मोदी सरकारने अग्निवीर आणून वाटोळं केलंय. आमचं तरी बरं आहे आम्ही आधी लागलो म्हणून आम्हाला पुरेशी सुट्टी मिळते, योजना मिळतात पण या अग्निविरांना काहीही मिळत नाही. आम्ही सीमेवर लढतो, मरतो पण इथं ग्राऊंडला काहीच बदलत नाही. हे सगळं बघून मतदान करणार आम्ही यावेळी."
या जवानांनी आम्हाला त्यांची नावं आणि रेजिमेंट सांगितली नाहीत.

फोटो स्रोत, facebook/rohitpawar
कर्जतमधून आम्ही जामखेडकडे आलो. या मतदारसंघातलं हेदेखील एक तालुक्याचं ठिकाण. जामखेडमध्ये असणाऱ्या कलाकेंद्रांमुळे या शहरात संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या गाड्या दिसतात.
कलाकेंद्रांच्या व्यवसायामुळे या जामखेडला एक वेगळी ओळख मिळाली असली तरी या व्यवसायाला प्रतिष्ठा नाही. मात्र, हे शहर तसं वैशिष्ट्यपूर्ण आहे. या शहरात संविधान चौक आहे, ठिकठिकाणी महापुरुषांची मोठमोठी भित्तिचित्रे रंगवलेली आहेत.
मुख्य शहराच्या वस्तीपासून 2-4 किलोमीटर बाहेर गेलं की जामखेडच्या आजूबाजूला पारधी, डवरी गोसावी, मदारी या भटक्या विमुक्त समाजाची पालं दिसून येतात. अशाच एका पारधी वस्तीवर आम्ही गेलो.
काजेवाडी तलावाच्या पाळू(बांध)जवळ सरकारी जमिनीवर उभारलेली ही पारधी वस्ती. या वस्तीत राहणाऱ्या अनेकांकडे मतदार कार्ड आहे पण मतदारांना मिळणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा इथे कधीच पोहोचल्या नसल्याचं इथले लोक सांगतात.
या वस्तीवर सुमारे शंभरेक लहान मुलं होती पण त्यांना जायला शाळा नव्हती, महिला होत्या पण अनेकांकडे आधार कार्ड नव्हतं, घरं उभारली होती पण खायला अन्न नव्हतं आणि उशाशी भलामोठा तलाव ओसंडून वाहत होता पण प्यायला स्वच्छ पाणी नव्हतं.

इथे राहणाऱ्या नंदाबाई काळे सांगतात की, "साहेब कुणी आमदार खासदार आमच्याकडे येत नाही. मतदान आलं की गाडी पाठवतात आम्हाला मेंढरसारखं त्यात कोंबतात आणि बोटावर शाई लावून मतदान तेवढं करून घेतात. पुन्हा पाच वर्षं आमचं कुणीच ऐकत नाही. आमच्या मुलांना गुन्हेगार म्हणून बघितलं जातं, गावात काही गुन्हा घडला की त्यांना संशयित म्हणून उचलतात, मारहाण करतात आम्ही कशाला जगतो हा प्रश्न आम्हाला रोज पडतो."
संपूर्ण मतदारसंघात अशा सामान्य मतदारांच्या कैफियती कमीअधिक प्रमाणात सारख्याच आहेत.
जामखेडच्या हद्दीत राहणारे पारधी असोत किंवा मग याच मतदारसंघात असलेल्या खर्डा नावाच्या ऐतिहासिक गावाच्या मधोमध पाल ठोकून राहणारे मदारी असो, विकास आणि इतर गोष्टी आजवर कधीच त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत हे तिथे राहणारे लोक आवर्जून सांगतात.
यावेळी प्रचाराचे मुद्दे काय आहेत?
जामखेडमधील बहुसंख्य शेतकरी कोरडवाहू शेती करतात. मतदारसंघात उद्योगधंदे नाहीत.
एमआयडीसी आणण्यावरून रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. मविआचे सरकार गेल्यानंतर प्रत्येक अधिवेशनात रोहित पवार या मुद्द्यावरून आंदोलन करताना दिसतात.
कर्जत जामखेडच्या प्रचारात यंदा 'भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा', 'कर्जत जामखेडचा विकास,' अशा टॅगलाईन्स आणि यासोबतच वेगवेगळ्या जातीय समिकरणांची जुळवाजुळव पुन्हा एकदा केली जाते आहे.
एकीकडे रोहित पवारांनी त्यांच्या कार्यकाळात कर्जत-जामखेडसाठी हजारो कोटींचा निधी आणि वेगवेगळ्या योजना आणल्याचा दावा केलाय तर दुसरीकडे राम शिंदे यांनी महायुती सरकारची कामे, स्थानिक असल्याचा मुद्दा आणि 2019 आधी त्यांनी केलेल्या कामांचा दाखला देत प्रचाराला सुरुवात केली आहे.
याबाबत बोलताना रोहित पवार यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "माझ्या विकासकामांची यादी सांगायची झाली तर पाच ते सहा तास बोलावं लागेल. यासाठी आम्ही 210 पानांचं पुस्तक छापलेलं आहे. आम्ही विविध विभागांच्या मदतीने कर्जत जामखेडमध्ये 3800 कोटी रुपयांचा निधी आणला आहे. आम्ही इथे आरोग्यसेवा चांगली केली, शिक्षणाच्या सोयीसुविधा वाढवल्या, शेतीसाठी खूप मोठं काम केलं, रुग्णवाहिका सुरु केल्या. आम्ही खूप मनापासून काम केलं आहे."

भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, "भाजपने या समाजाला आजवर गृहीत धरलेलं होतं. आम्ही बहुतांश वस्त्यांवर कामे केली आहेत. आम्ही पारधी समाजाला देखील मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. विमुक्त आणि भटक्या समाजाला प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने चर्चा केली आहे."
दुसरीकडे भाजपचे उमेदवार राम शिंदे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "माझ्या विरोधकांनी लोकांची फसवणूक केलेली आहे आणि त्यांनी फक्त आश्वासनं दिली आहेत. भटक्या विमुक्त समाजाबाबत मी अनेक कामं केली आहेत. यासोबतच अनेक विकासकामे देखील मी केली आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की यंदा कर्जत जामखेडचे मतदार संधी देतील असा विश्वास आहे."
2019च्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांच्या नावसारखीच नावे असलेल्या उमेदवारांनी देखील बक्कळ मते घेतली होती, यंदा देखील असाच प्रयोग केला जातोय.
राम शिंदे नावाच्या एकूण 3 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर रोहित पवार नावाच्याही तीन जणांनी आमदारकीची निवडणूक लढवण्याचा निर्धार केलाय. त्यापैकी दोघांनी माघार घेतली असली तरी एक उमेदवार अजूनही रिंगणात आहे.
आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे रोहित पवार यांचे चिन्ह 'तुतारी' असले, तरी अपक्ष रोहित चंद्रकांत पवार यांना 'ट्रम्पीट' (पिपाणी) हे चिन्ह मिळाले आहे. याच चिन्हाने लोकसभा निवडणुकीत शरद पवार पक्षाची डोकेदुखी वाढवली होती.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तब्बत 44 हजार मते घेतली होती. त्यामुळे आमदार रोहित पवार यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.
कोणत्या पक्षाचे कोण उमेदवार?
उमेदवारी अर्ज परत घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर आता कर्जत जामखेडमध्ये प्रा. रामदास शंकर शिंदे (भाजप), रोहित राजेंद्र पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष), दत्तात्रय आत्माराम सोनवणे (बसपा), करण चव्हाण (आरपीआय), राम प्रभू शिंदे (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), सोमनाथ भैलुमे (वंचित), राम नारायण शिंदे (अपक्ष), रोहित चंद्रकांत पवार (अपक्ष), शहाजी उबाळे (अपक्ष), सतीश कोकरे (अपक्ष) आणि हनुमंत निगुडे (अपक्ष) हे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
मंत्री राधाकृष्ण विखे समर्थक असणारे अंबादास पिसाळ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वकील कैलास शेवाळे यांनी आपले उमेदवारी अर्ज अखेरच्या क्षणी माघारी घेतले.
यासह मनसेचे रवींद्र कोठारी, रासपचे स्वप्नील देसाई इतर आठ असे एकूण 12 जणांनी आपले विधानसभा उमेदवारी अर्ज माघारी घेतले. कर्जत-जामखेडसाठी 11 उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीकरीता मैदानात राहिले आहेत.
कर्जत जामखेड मतदारसंघाचा राजकीय इतिहास
कर्जत जामखेडचा राजकीय इतिहास पाहिला तर 1995 पर्यंत या विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिल्याचं दिसून येतं.
हा मतदारसंघ बनल्यानंतर 1962 ते 1978 पर्यंत काँग्रेसचे एकनाथ निंबाळकर हे इथून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून जायचे.
1978 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बाजीराव कांबळे यांनी इथे विजय मिळवला. त्यानंतर पुन्हा एकदा 1980 ते 1995 पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहिला.

फोटो स्रोत, facebook
1995 मध्ये भाजपकडून सदाशिव लोखंडे याठिकाणी आमदार झाले. 1995 नंतर 2004 पर्यंत सदाशिव लोखंडे हे सलग तीनवेळा कर्जत जामखेडचे आमदार राहिले.
2009 मध्ये लोखंडे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले आणि इथेच प्राध्यापक राम शिंदे यांची राजकारणात अधिकृत एन्ट्री झाली.
2009 साली राम शिंदे हे पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यानंतर 2014मध्ये देखील त्यांनी इथून विजय मिळवला. मात्र एकनाथ निंबाळकर आणि सदाशिव लोखंडे यांच्यासारखी हॅटट्रीक त्यांना करता आली नाही कारण 2019 च्या निवडणुकीत रोहित पवारांनी त्यांचा पराभव केला.
कर्जत-जामखेडमधली जातीय समीकरणं
कर्जत जामखेडमध्ये ओबीसी प्रवर्गातील मतदारांची संख्या मोठी आहे. इथे मराठा मतदार देखील मोठ्या प्रमाणात आहे.
याबाबत बोलताना दिव्य मराठीचे पत्रकार बंडू पवार म्हणाले की, "कर्जत जामखेड हा वेगवेगळ्या जातसमूहांनी नटलेला मतदारसंघ आहे. नेमकी टक्केवारी सांगायची झाली तर इथे मराठा समाज सुमारे 30 %, धनगर 15%, अनुसूचित जाती 20% ज्यामध्ये नवबौद्ध, मातंग, चर्मकार आणि होलार या जाती येतात, यासोबतच 10-15 % माळी, मुस्लिम समाज देखील इथे 10-15 % आहे आणि बाकीची लोकसंख्या ही वंजारी, पारधी, वडार आशा जातींची आहे. कर्जत जामखेडमध्ये भटक्या विमुक्त जमातींची संख्या देखील लक्षणीय आहे."
रोहित पवार यांनी मराठा मतदारांच्या एकीककरणाचं कार्ड वापरूनच 2019च्या निवडणुकीत विजय मिळवल्याचं बोललं जातं.
राम शिंदे पुनरागमन करणार?
मतदारसंघात सालकरी गड्याचा मुलगा ते मंत्री अशी ओळख मिळवलेल्या राम शिंदेंनी मंत्रिपद मिळाल्यानंतर सामान्य कार्यकर्त्यांशी संपर्क कमी केला होता, अशी तक्रार त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते करतात, मात्र मागच्या पाच वर्षांमध्ये त्यांनी पुन्हा एकदा कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद सुरू केल्याचं सांगायलाही हे कार्यकर्ते विसरत नाहीत.
युती सरकारच्या काळात अण्णा डांगे मंत्री असताना त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी (जामखेड) येथे चौंडी विकास प्रकल्प सुरू केला.
या प्रकल्पावर दैनंदिन लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी अहिल्यादेवींच्या माहेरकडील वंशज म्हणून राम शिंदे यांना प्रकल्पावर सदस्य म्हणून संधी दिली. तेथूनच राम शिंदे भाजपमध्ये सक्रिय झाले. पुढे अण्णा डांगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली व ते राष्ट्रवादीत गेले, मात्र राम शिंदे भाजपमध्येच राहिले.
मातब्बर स्थानिक नेत्यांची दलबदल
याआधी आमदारकीची निवडणूक लढवलेल्या मधुकर राळेभात यांनी दोन महिन्यांपूर्वी रोहित पवारांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
मधुकर राळेभात हे स्थानिक मराठा नेते आहेत. आणि आम्हाला या मतदारसंघात फिरताना असं जाणवलं की मराठा तरुणांमध्ये त्यांचं नाव आणि भूमिका चर्चेत असते. त्यामुळे मधुकर राळेभात यांची राम शिंदेंना मदत होऊ शकते.
दुसरीकडे राशीनच्या राजेंद्र देशमुख यांनी भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
राजेंद्र देशमुख यांचे आजोबा बापूसाहेब देशमुख हे 18 वर्षे तालुका पंचायत समितीचे सभापती होते. तसेच ते येथील जगदंबा साखर कारखान्याचे 21 वर्षं चेअरमन होते.
2009 मध्ये मतदार संघ खुला झाल्यानंतर त्यांना काँग्रेस पक्षाने विधानसभेची उमेदवारी दिली होती. त्यांचा अवघ्या दहा हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता.
त्यानंतर 2014मध्ये राजेंद्र देशमुख यांनी काँग्रेसने दिलेली उमेदवारी नाकारत भाजपशी घरोबा केला होता. आता ते राष्ट्रवादीमध्ये आल्याने रोहित पवारांना त्यांची नक्कीच मदत होणार आहे.
यासोबतच विधानपरिषदेचे भाजपचे आमदार अमित गोरखे, रवी सुरवसे, शरद कारले, लहू शिंदे, भगवान मुरूमकर, अंकुश ढवळे, अरुण चिंतामणी, डॉ. झेंडे, रवी गोलेकर, दत्ता वारे, सूर्यकांत मोरे, जामिर भाई पठाण, अशोक पठाडे, महादेव शिंदे, संपत बावडकर, काकासाहेब तापकीर, चंदू काळोखे, कैलास शेवाळे, संतोष निंबाळकर, पोपटराव खोसे, रघु आबा काळदाते, रामदास चौगुले, प्रकाश शिंदे, प्रवीण घुले, नामदेव राऊत, अशोक खेडकर, अक्षय शिंदे, सचिन पोटरे , दादा सोनमाळी यांसारख्या स्थानिक नेत्यांच्या राजकीय भूमिकेकडे अनेकांचं लक्ष असणार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











