मनोज जरांगे यांच्या निवडणुकीतील 'माघारी'चा राजकीय अर्थ काय?

फोटो स्रोत, ANI
- Author, प्रियंका जगताप
- Role, बीबीसी मराठीसाठी
मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. कालपर्यंत मनोज जरांगे निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची तयारी करत होते, काही मतदारांघांची नावे देखील त्यांनी जाहीर केली होती, पण आता अखेर त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
सोमवारी (4 नोव्हेंबर) रोजी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे.
यावेळी जमलेल्या लोकांना संबोधित करताना ते म्हणाले की, "कुठल्याही अपक्षाला आमचा पाठिंबा नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला आमचा पाठिंबा नाही. माझी इच्छा नाही याला पाड आणि त्याला पाड म्हणायची.
"आपल्यासाठी आंदोलन महत्त्वाचं आहे, महाराष्ट्रातील सगळ्या बांधवांनी नाराज न होता काम नये. कुठल्याही अपक्षाला आमचा पाठिंबा नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला आमचा पाठिंबा नाही."
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, "महाविकास आघाडी किंवा महायुतीचा माझ्यावर दबाव नाही. मला कुणाचा फोन आला नाही. निवडणुकीत जे '400 पार' म्हणत होते त्यांचे काय झाले. राजकारणाची प्रक्रिया वेगळी असते. मी समाजाला भेटणार.
"लोक ज्याला पाडायचं ते त्याला बरोबर पाडतात. गेल्यावेळी मी असेच म्हटलो होतो. फक्त एवढंच सांगेन की, मराठ्यांनी गुपचूप मतदानाला जायचं, बटण दाबायचं आणि गुपचूप पाडायचं. मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना पाडणार."
मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने या निर्णयाचा काय परिणाम होईल? मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रात जरांगे समर्थकांची भूमिका काय असेल याची चर्चा सुरू झाली आहे.
मनोज जरांगे यांनी दसरा मेळावा घेऊन राज्यातील काही निवडक मतदारसंघांत उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली होती.
परंतु, 'ही माघार नसून गनिमी कावा' असल्याचं पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
मात्र, त्यांच्या या निर्णयाचा येत्या विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार, महायुती आणि महाविकास आघाडीत कोणाला याचा फटका बसू शकेल का? याची चर्चा आता सुरू आहे.
जरांगे यांच्या माघारीचा राजकीय अर्थ काय हे आपण आता समजून घेऊ.
मनोज जरांगेंनी माघार का घेतली असावी?
मनोज जरांगे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष असण्याचे महत्त्वाचे कारण होते ते म्हणजे लोकसभा निवडणुकीत जालना आणि बीड या मतदारसंघात त्यांच्या शक्तीचा थेट परिणाम पाहायला मिळाला. त्याचबरोबर इतर ठिकाणी देखील हा परिणाम पाहायला मिळाला. जरांगेंच्या आंदोलनाचा फटका सत्ताधारी भाजपाला बसला होता.
मनोज जरांगे यांच्या निवडणुकीतील 'माघारी'चा राजकीय अर्थ काय असेल, यावर बीबीसी मराठीशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांनी म्हटले आहे की, "कुठल्याही आंदोलनाची इतिश्री ही निवडणुकीच्या राजकारणातून होते. अनेक शेतकरी संघटनेचं आंदोलन घ्या किंवा कामगार आंदोलन अनेक आंदोलनांचं तसं झालेलं आहे."
"तसे या आंदोलनाला जो भरघोस प्रतिसाद मिळाला, लोकांनी जो अतिप्रचंड विश्वास त्यांच्यावर ठेवला त्यामुळे सर्वसामान्य माणूस निवडणुकीच्या राजकारणात आल्यानंतर त्याचं जे काही नेहमीप्रमाणे होतं ते जरांगेंचंही झालं असतं आणि त्यांचीच माणसं दुखावली गेली असती," असं उन्हाळे यांना वाटतं.

फोटो स्रोत, ANI
उन्हाळे पुढे सांगतात, "या निर्णयाने आता त्यांची माणसं दुखावली जाणार नाही ही जमेची बाजू आहे. राजकारण हे मराठा समाजाच्या डीएनएमध्ये आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करा सांगितलं की लगेच दहा-दहा, पंधरा-पंधरा वीस वीस अर्ज दाखल करायला ते लोक गेले, परंतु आज माघार घ्यायची म्हणलं तर त्यांच्यामधलं कोणी बोलायला तयार नाही. त्यामुळे मनोज जरांगेंनी माघार घेतली हे आंदोलनाच्या दृष्टीने चांगलं झालं."
'त्यांना ही गोष्ट वेळीच कळली'
जरांगेनी माघार घेतल्याने महायुती आणि महाविकास आघाडीत कोणाला फायदा होईल, यावर बोलताना संजीव उन्हाळे म्हणाले की, "महायुतीमध्ये काही ठिकाणी भाजपला याचा फायदा होणार नाही, परंतु शिंदे गटाला याचा फायदा पहिल्यापासूनच झालेला आहे आणि आताही होईल.
"महाविकास आघाडीला काही ठिकाणी याचा फायदा होईल, कारण लोकसभेला मराठवाड्यात सगळ्याच जागा केवळ जरांगेच्या पाठिंब्यावर निवडून आल्या. जरांगे पाडण्याचं राजकारण यशस्वी करतील परंतु निवडणूक लढवण्याचं राजकारण त्यांना जमत नाही हे त्यांना वेळीच कळलं हे खूप बरं झालं," असं उन्हाळे सांगतात.
जरांगेंच्या अचानक निवडणुकीतून माघार घ्यायच्या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जरांगे समर्थकांमधे संभ्रम निर्माण झाला आहे. यावर बोलताना संजीव उन्हाळे म्हणाले की, "जरांगे समर्थकांमध्ये कभी खुशी कभी गम अशा पद्धतीचं वातावरण असेल. ज्यांच्या राजकारणाच्या आशा कधीच पल्लवीत होण्याची शक्यता नाही असा सर्वसामान्य आणि सुशिक्षित बेकार राहिलेला मराठा आमदारकीची स्वप्नं केवळ जरांगेंमुळे पाहत होता त्याचा स्वप्नभंग झालेला आहे. त्याचवेळी बाकी मराठा समाज बरं झालं नको निवडणुकीत पडायला असं म्हणत असेल. आताही ज्यांनी अर्ज भरलेत ते सर्व उमेदवार अर्ज मागे घेतील असे वाटत नाही."
'बऱ्याच गोष्टींवरचा एकच इलाज'
मनोज जरांगे यांच्या निर्णयामुळे काही जण अल्पकाळासाठी नाराज होतील मात्र त्यांच्या पाठीशी उभी असलेली जनता ही नाराज होणार नाही. उलट त्यांना या निर्णयामुळे समाधान वाटले असावे असा अंदाज ज्येष्ठ पत्रकार संजय वरकड यांनी व्यक्त केला आहे.

फोटो स्रोत, ANI
बीबीसी मराठीला प्रतिक्रिया देताना वरकड यांनी म्हटलं, "सर्वांना खुश करता येत नाही. काहींना खुश केलं आणि काहींना नाराज केलं, यापेक्षा सगळ्यांना नाराज केलेलं कधीही चांगलं असतं. राजकारणामुळे अनेक स्वार्थी लोक मनोज जरांगेंच्या आसपास जमा झालेले होते, त्यामुळे या निर्णयाने त्यांनी बऱ्याच गोष्टींवर एका झटक्यात इलाज करून टाकला."
"या निर्णयामुळे सिलेक्टेड लोकांची नाराजी काही काळ राहील, परंतु जनतेमध्ये अशा प्रकारची नाराजी जात नाही. आज मोठ्याप्रमाणावर जनता त्यांच्यामागे आहे, गरीब लोक त्यांच्या मागे आहे. उदाहरणार्थ एखाद्या मतदार संघांत साडेतीन ते चार लाख मतदान आहे. त्यातील जास्तीत जास्त अडीच ते तीन लाख लोक मतदान करतात आणि त्यांच्या मतातही विभागणी होते.
"त्यामुळे राजकीय हेतूने सोबत आलेल्या त्या 70 ते 75 हजार लोकांच्या हितासाठी आरक्षणासाठी त्यांच्यामागे उभे राहिलेल्या कोट्यवधी लोकांना नाराज करायचं का, याचा विचार होणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी निवडक लोकांना नाराज केलं आणि कोट्यवधी जनतेला खुश केलं आहे," असं वरकड यांना वाटतं.


निवडणुकीच्या राजकारणापासून दूर असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न?
निवडणुकीच्या राजकारणापासून आपण दूर आहोत, हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे का?
या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना संजीव उन्हाळे म्हणाले की, "मनोज जरांगे निवडणुकीच्या राजकारणापासून दूर झाले नाहीत तर निवडणूक लढवण्याच्या इराद्यापासून दूर झालेले आहेत. पाडापाडीच्या राजकारणापासून ते अजून दूर झालेले नाहीत."
मनोज जरांगे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की माझी इच्छा याला पाड, त्याला पाड असं म्हणण्याची नाही.
पण उमेदवार पाहून हा निर्णय घेतला जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त करताना उन्हाळे म्हणाले की "मतदारसंघानुसार कोण मित्र कोण शत्रू हे पाहून ते पाडापाडीचं राजकारण ठरवतील आणि यामध्ये किमान मराठवाड्यात तरी ते यशस्वी होतील."
जरांगेंचा रोख पुन्हा फडणवीसांवर आहे का?
मनोज जरांगेंनी त्यांची निवडणूकीतून माघार ही गनिमी कावा असल्याचं म्हटलं आहे.
यावर संजय वरकड यांनी म्हटले आहे की, "मनोज जरांगेंच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयाबाबत मराठा समाजात दोन प्रकारचे मत प्रवाह होते. त्यांनी निवडणूक लढवू नये असंही अनेकांचं मत होतं. विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याच्या निर्णयाला ते गनिमी कावा म्हणत असले तरी ते गनिमी काव्याने कधी गेले नाहीत, ते कायम सरळच मार्गाने गेले आहेच."

फोटो स्रोत, ANI
"गमिनी कावा करणारे कधीच सांगत नाहीत ते गनिमी कावा करणार आहेत. त्यामुळे मी गनिमी कावा करणार आहे असं सांगणं हा फार मोठा विनोद आहे. त्यांनी नेहमीच सरळ सरळ देवेंद्र फडणवीस आणि भाजपला टार्गेट केलेलं आहे. भाजपला सत्तेवरून खाली खेचावं हा त्यांचा सरळ सरळ हेतू आहे. त्यामुळे यात गनिमी कावा काहीच नाही," असं वरकड यांना वाटतं.
"जरांगेंना भाजपला पाडायचं आहे. महाराष्ट्रामध्ये भाजप नकोय हा मेसेज आता सगळ्या लोकांपर्यंत गेलेला आहे. एकवेळेस एकनाथ शिंदे, अजित पवार किंवा शरद पवार यांच्या जागा आलेल्या चालतील पण भाजपच्या जागा कमी करायच्या हे त्यांचं टार्गेट आताही असेल," असेही पुढे ते म्हणाले.
इतर समाजातील लोकांवर जो अनावश्यक दबाव वाढला असता तो त्यांनी टाळल्याचे वरकड सांगतात.
"त्यांनी दलितांना, मुस्लीम लोकांना सोबत घेतलं, मायक्रो ओबीसींना सोबत घ्यायची गोष्ट करत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचा दबाव येणारच ना," असेही पुढे ते म्हणाले.


जरांगेंच्या पाठीशी मराठा समाज का उभा राहिला?
जरांगे यांनी आज घेतलेला निर्णय समजून घेताना हे पाहणे महत्त्वाचे आहे की त्यांच्या पाठीशी मराठा समाज का उभा आहे आणि मराठा समाजाची राजकीय ताकद कशी आहे?
याबद्दल बोलताना, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक प्रकाश पवार यांनी बीबीसी मराठीला सांगितले होते की "भारताच्या राजकारणात जातींचा प्रभाव आहे. 1960 पर्यंत या सत्तेचे केंद्र राज्यात मराठा हेच होते पण 1978 पासून त्यांचा प्रभाव हळूहळू कमी होत गेल्याचं पाहायला मिळालं. हाच मराठा समाज पुन्हा मराठा क्रांती मोर्चा आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले," असं मत मत पवार नोंदवतात.

फोटो स्रोत, ANI
पुढे ते सांगतात, “भारतातल्या निवडणुकांवर जातींचा प्रभाव आहे. तो असायला पाहिजे का, हा चर्चेचा भाग आहे. भारताच्या राजकारणात सत्ता ही कायम डॉमिनंट जातीच्या हातात राहिली आहे. महाराष्ट्रात मराठा समाज 30 टक्के आहे. 1960 पासून त्यांच्याकडे सत्ता आहे असं चित्र दिसतं. मात्र 1978 नंतर मराठा समाजात फूट पडली. 1999 नंतरही मोठ्या प्रमाणावर बदल झाले. आत्ता सर्व राजकीय पक्षांमध्ये कमी अधिक प्रमाणात मराठा समाज पाहायला मिळतो."
"जो एकसंध मराठा होता तो आता विभागला गेला आहे. मध्यतंरी काही घराण्यांकडे सत्ता होती हे आपल्याला दिसतं. जरांगे पाटलांनी मराठ्यांना एकत्र केलंय. आरक्षणाची भूमिका माडंली आहे. जागतिकीकरणाने कल्याणकारी राज्य संपवलं आहे. अशात जे गरीब मराठा होते ते त्यांच्याकडे गेले आहेत. त्यामुळे एक मोठा समुदाय जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहे आणि तो त्यांना पाठिंबा देतोय,” असं निरीक्षण प्रकाश पवार नोंदवतात.
बीबीसी मराठीला ऑक्टोबर महिन्यात दिलेल्या मुलाखतीत प्रकाश पवार यांनी 'मराठा व्होट बँक जरांगे यांच्यामुळे फुटू शकते' असे म्हटले होते. आता जरांगे यांनी माघार घेऊन ही 'व्होट बँक' फुटण्याचा धोका टाळल्याचे दिसते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











