कोल्हापूर दक्षिण : ऋतुराज पाटील विरुद्ध अमल महाडिक लढतीत कुणाचं 'ठरलंय' अन् कुणाचं 'वारं फिरलंय'?

- Author, विनायक होगाडे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
'आमचं ठरलंय', 'वारं फिरलंय', 'कंडका पाडायचाय', 'कुटं बी हुडिक, मुन्ना महाडिक' या आणि अशा प्रकारच्या 'क्रिएटीव्ह' घोषवाक्यांनी ज्या जिल्ह्यातील राजकारण अक्षरश: ढवळून निघतं, तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा होय!
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या चंदगड, राधानगरी, कागल, करवीर, कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण या सहा मतदारसंघापैकी सर्वाधिक चुरशीची आणि इर्ष्येची निवडणूक असते ती 'कोल्हापूर दक्षिण'चीच!
गेल्या कित्येक वर्षांपासून इथलं राजकारण 'बंटी विरुद्ध मुन्ना' अर्थात सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक या दोन कुटुंबांभोवतीच फिरताना दिसतं.
यंदाची विधानसभा निवडणूकही अशीच चुरशीची होणार आहे, हे स्पष्ट आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतूराज पाटील आणि भाजप उमेदवार अमल महाडिक यांच्यातच पुन्हा एकदा 'दक्षिण'चा सामना रंगणार आहे.
कोल्हापूर दक्षिणचं राजकारण नेमकं काय आहे? ही निवडणूक इतकी चुरशीची का होते? 'पाटील' आणि 'महाडिक' या दोन्हीही कुटुंबासाठी ही निवडणूक किती महत्त्वाची आहे? ते जाणून घेऊयात.
कसा आहे हा मतदारसंघ?
कोल्हापूर शहराचा दक्षिण-पूर्व भाग आणि लगतचा ग्रामीण भाग कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात येतो.
लोकमतचे संपादक वसंत भोसले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना या मतदारसंघाची रचना उलगडून सांगितली. ते म्हणाले, "ग्रामीण भागातले लोकांचे हितसंबंध सहकार क्षेत्राशी निगडीत आहेत तर शहरी भागातले लोक हे गेल्या 20-25 वर्षांत स्थलांतरित झालेले असल्याने त्यांचे मुद्दे शहरी विकासापुरते मर्यादीत आहेत. 2009 साली मतदारसंघाची पुनर्रचना होण्यापूर्वी यातील बराचसा भाग करवीर मतदारसंघात होता."
सध्या काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतूराज पाटील हे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचे चुलत बंधू अमल महाडिक यांचं आव्हान असणार आहे.
अमल महाडिक हे या भागातील दिग्गज नेते महादेवराव महाडिकांचे पुत्र आहेत.
ऋतूराज पाटील आणि अमल महाडिक एकमेकांसमोर उभे ठाकले असले तरीही प्रत्यक्षात ही लढाई नेहमीप्रमाणे 'सतेज पाटील विरुद्ध धनजंय महाडिक' अशीच दोघांच्याही प्रतिष्ठेची असणार आहे, असं लोकसत्ताचे पत्रकार दयानंद लिपारे सांगतात.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले की, "काँग्रेस आणि भाजपने तेच जुने चेहरे पुन्हा मैदानात उतरवले आहेत. या लढतीतील चेहरे हे असले तरीही खरी लढत ही 'सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक' अशीच आहे. या दोघांमधल्या प्रतिष्ठेची लढत म्हणूनच या लढतीकडं पहावं लागणार आहे."
मात्र, या दोघांमधील ही लढत इतकी प्रतिष्ठेची कशी बनत गेली आहे, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी या मतदारसंघाचा गेल्या 15 वर्षांमधला इतिहास चाळावा लागतो.
2009 साली या मतदारसंघातून स्वत: सतेज पाटील विधानसभेवर निवडून गेले होते. तेव्हा अपक्ष उभे असलेल्या धनंजय महाडिकांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती.
2014 सालच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर सतेज पाटील यांना काँग्रेसकडून विधानपरिषदेवर घेण्यात आलं.
2019 च्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील यांनी अमल महाडिक यांच्याविरोधात आपला पुतण्या ऋतूराज पाटील यांना मैदानात उतरवलं.
'मोदी लाटे'चा जोर असतानाही ही निवडणूक जवळपास 40 हजार मताधिक्याने जिंकण्यात ऋतुराज पाटील आणि पर्यायाने सतेज पाटील यांना यश आलं. गमावलेला गड पुन्हा त्यांच्या ताब्यात आला.
सध्या म्हणजेच 2024 च्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा याच दोन उमेदवारांमध्ये निवडणूक रंगणार आहे. ही लढत दुरंगी असल्याने 'आमचं ठरलंय - पार्ट 2' पहायला मिळतोय की, दक्षिणचा गढ पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यात महाडिकांना यश मिळतंय, याचीच चर्चा सध्या या मतदारसंघात रंगली आहे.
काय आहेत दोघांसमोरची आव्हाने?
ऋतुराज पाटील यांची ही दुसरी निवडणूक आहे. 2019 साली 'मोदी लाट' असतानाही कोल्हापुरात मात्र अमल महाडिकांसारख्या मातब्बर नेत्याचा पराभव करण्यात त्यांना यश आलं होतं.
हा पराभव साधासुधा नव्हता; तर तब्बल 43 हजार मताधिक्याने ऋतूराज पाटील यांनी विजय मिळवला होता. ते कोल्हापूरच्या राजकारणातील एक नवा तरुण चेहरा होते. त्यामुळे, मागील कामांबाबतचं उत्तरदायीत्व अमल महाडिक यांच्याकडे होतं. आता उलट चित्र आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये केलेल्या कामांबद्दल ऋतूराज पाटील उत्तरदायी आहेत; तर अमल महाडिक विकासाच्या मुद्द्यावरुन प्रश्नकर्त्याच्या भूमिकेत आहेत.
"याबाबत दोघांसमोरची आव्हाने स्पष्ट करताना सकाळचे निवासी संपादक निखिल पंडितराव बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, "ऋतुराज पाटील विकासकामे केली म्हणून सांगतात. मात्र, ही विकासकामे दिसायला हवीत वा ती लोकांना दाखवायला हवीत, हेच त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान आहे.
"त्यांच्याकडून गेल्या पाच वर्षांमध्ये थोडाफार जाहीर संपर्काचा अभाव दिसतो. दुसऱ्या बाजूला अमल महाडिक त्यांच्या कारकिर्दीत विकासकामे केल्याचा दावा करतात.
खरंतर विकासाच्या पातळीवर दोघांकडेही कमतरता दिसते. ज्या पद्धतीचा पायाभूत विकास आवश्यक आहे, तो दोघांनाही आपल्या कारकिर्दीत करता आलेला नाहीये. मात्र, तो पटवून देण्याचं आव्हानच दोघांसमोर आहे."

हाच मुद्दा पुढे नेत दयानंद लिपारे यांनी म्हटलं की, "सत्तेत असो वा विरोधात असो, मतदारसंघामध्ये भरपूर विकासकामे केल्याचा दावा दोघांचाही आहे.
ऋतुराज पाटील यांचं म्हणणं आहे की, जवळपास 800 कोटींची विकासकामे केलेली आहेत तर अमल महाडिक म्हणतात की, मी सत्तेत नसलो तरीही 200 कोटी रुपयांची काम केली आहेत. सत्तेत नसतानाही कामे करण्याची माझ्यात क्षमता आहे, असा त्यांचा दावा आहे.
उद्या आमची सत्ता आली तर ही गती आणखी वाढेल आणि या मतदारसंघातील प्रश्न गतीने मार्गी लागतील, असे ते म्हणतात; तर आम्ही आधीच विकास करुन दाखवला आहे, असं ऋतुराज पाटील यांचं म्हणणं आहे."
यावरुनचं दोन्ही गटांमध्ये 'पोस्टर वॉर'ही पहायला मिळालं. ऋतुराज पाटील यांनी आपण केलेल्या कामाचे पोस्टर्स शहरात लावल्यानंतर त्यांच्याच बाजूला महाडिक गटाकडून प्रत्युत्तर देणारे, प्रश्न विचारणारे आणि केलेल्या कामांच्या दाव्यांमध्ये फोलपणा असल्याचे पोस्टर्स लावण्यात आले.
यंदा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून उभ्या असलेल्या शाहू छत्रपती यांनी शिवसेनेच्या संजय मंडलिक यांचा पराभव केला. मात्र, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला मिळालेलं मताधिक्य कमी आहे.


ऋतूराज पाटील यांच्यासाठी हीदेखील धोक्याची घंटा आहे.
इथं जात, धर्म आणि इतर मुद्द्यांपेक्षा गटाचंच राजकारण अधिक प्रभावी ठरलं आहे. त्यात दोन्हीही उमेदवार मराठा जातीचे असल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा निष्प्रभ ठरतो, त्यामुळे, ही लढत अत्यंत अटीतटीची होईल, असं वसंत भोसले यांना वाटतं.
ते म्हणतात की, "2019 साली, अमल महाडिकांच्या तुलनेत ऋतुराज पाटील हा फारच तरुण चेहरा असल्याने तरुण वर्गाला आकर्षित करणारा होता. त्यावेळी सोशल मीडियाचाही प्रभावी वापर करण्यात आला.
आमदारकीच्या शेवटच्या अडीच वर्षामध्ये सरकार बदलल्यामुळे त्यांना फारसं काम करता आलं नाही. मात्र, उमेदवार म्हणून विचार करता, सध्या दोघेही तितकेच तुल्यबळ ठरताना दिसतात."
सख्खे मित्र कसे झाले कट्टर राजकीय वैरी?
एकेकाळी मित्र असणारे 'बंटी' आणि 'मुन्ना' आता मात्र कोल्हापुरातील राजकारणावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी झाले आहेत.
त्यांच्यातील हे कट्टर वैर गेल्या काही वर्षांमध्ये कमी होण्याऐवजी वाढतच गेल्याने या दोन्हीही गटांसाठी प्रत्येक निवडणूक ही प्रतिष्ठेचीच असते.
त्यांच्यातील हे वैर कसं वाढत गेलं, याबाबत सांगताना दयानंद लिपारे म्हणतात की, "हे दोघेही महादेवराव महाडिकांच्या तालमीमध्येच तयार झालेले पठ्ठे आहेत. तेव्हापासून विद्यापीठाचे राजकारण, युवक काँग्रेसचे राजकारण यामधून दोघेही पुढे आले.
2009 साली कोल्हापूर दक्षिणमध्ये हे दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे राहिले, तिथूनच खऱ्या अर्थाने वाद सुरु झाला.

पुढे 2014 मध्ये दोघांमध्ये पुन्हा दिलजमाई झाली. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय महाडिकांना लोकसभेची उमेदवारी दिली. तेव्हाच्या आघाडीमध्ये सतेज पाटील यांनी या उमेदवारीला विरोध केला होता; मात्र, वरिष्ठ नेत्यांनी तडजोड केल्यानंतर त्यांनी उमेदवारीला सहमती दर्शवली, पाठिंबा दिला आणि प्रचारही केला. पण विजयी झाल्यानंतर आणि विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर महाडिकांनी आपली भूमिका बदलली.
त्यांना आपल्या चुलत भावाला म्हणजेच अमल महाडिकांना उभं करायचं होतं. सतेज पाटील यांनी आमचा प्रचारच केला नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे, दोघांमध्ये परत वितुष्ट आलं. तेव्हापासून आलेलं वितुष्ट अद्यापही कायम आहे."
ही लढत एवढी प्रतिष्ठेची का होते?
कोल्हापुरातील सहकार क्षेत्राचा राजकारणावर तर राजकारणाचा सहकार क्षेत्रावर असलेला प्रभाव आजही मोठ्या प्रमाणावर आहे.
कोल्हापुरातील गोकुळसारखा दुधसंघ असो, छत्रपती राजाराम साखर कारखाना असो वा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असो, लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक जितक्या चुरशीने होते, तितक्याच चुरशीने सहकार क्षेत्रातील या निवडणुकाही होतात.
अर्थात, इथेही 'मुन्ना विरुद्ध बंटी' असाच सामना रंगताना दिसतो. त्यातील विजय-पराजयाचे परिणाम विधानसभेवरही होताना दिसतात.
कोल्हापुरातील महानगरपालिका असो वा सहकार क्षेत्रातील गट-तट असो, त्यामधील नेत्यांचीही विभागणीही या दोन गटांमध्ये होते. जो आपल्या बाजूने अधिकाधिक गटा-तटांना खेचण्यात यशस्वी ठरतो, त्याचे राजकीय गणित अधिक वरचढ चढताना दिसते.
याबाबत निखिल पंडितराव सांगतात की, "एकमेकांकडे असलेल्या गटा-तटांना तसेच चार-पाच गावांवर प्रभाव टाकू शकणाऱ्या छोट्या नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून केला जातो. या प्रकारास आताही सुरुवात झाली आहे. ज्याला ही राजकीय गणिते चांगली जुळवता येतील, त्याचं पारडं या निवडणुकीत अधिक जड ठरेल."
थोडक्यात, इथे 'भाजप विरुद्ध काँग्रेस' वा आता 'महायुती विरुद्ध महाविकास आघाडी' अशा पक्षीय राजकारणापेक्षा 'मुन्ना विरुद्ध बंटी' हाच मुद्दा राजकारणाच्या मध्यवर्ती असलेला दिसून येतो. इथं पक्षीय राजकारण दुय्यम असल्याचा मुद्दा वसंत भोसले मांडतात.

फोटो स्रोत, Facebook/Amal Mahadik Kolhapur
याबाबत निखिल पंडितराव विस्ताराने सांगतात. ते म्हणतात की, "गेल्या अनेक वर्षांपासूनच्या इथल्या निवडणुका 'पाटील विरुद्ध महाडिक' अशाच पद्धतीने होत असल्या तरीही या विधानसभा निवडणुकीमध्ये हे स्वरुप कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न सध्यातरी दिसत आहे.
या निवडणुकीला 'काँग्रेस विरुद्ध भाजप' अशा पद्धतीची पक्षीय पातळीवरची निवडणूक केली जाईल, असाच प्रयत्न दोन्ही गटांकडून चालू असल्याचं दिसतंय.
व्यक्तिगत हेवेदावे, राजकीय वैर, इर्षा यापलीकडे जाण्याचा प्रयत्न दोन्हीकडून होत आहे. मात्र, निवडणूक जवळ येईल तसतसे प्रचाराचा रोख पुन्हा वैयक्तिक इर्षेवरच नेला जातो की पक्षीय पातळीवरच ठेवला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल."


दोन गटांमधील राजकारण इतकं विकोपाचं आहे की, त्यासाठी प्रसंगी विरोधी पक्ष आणि समविचारी पक्ष हा भेदही बाजूला ठेवून परस्परविरोधी कुरघोड्यांसाठी राजकीय डाव टाकले जातात.
2019 ची लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक याचं उत्तम उदाहरण होती. तेव्हा धनंजय महाडिक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि त्यांच्यासमोर लोकसभेसाठी आव्हान होतं ते शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचे!
या निवडणुकीत काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी मित्रपक्षाकडून उभे असलेल्या धनजंय महाडिकांना मदत करण्याऐवजी 'आमचं ठरलंय' म्हणत तेव्हाच्या आघाडीच्या विरोधातील आणि एकसंध शिवसेनेतील संजय मंडलिकांना पाठिंबा देऊ केला.
त्याची परतफेड विधानसभेला मंडलिकांकडून करण्यात आली, असं जाणकार सांगतात.

फोटो स्रोत, Facebook/Ruturaj Patil
कोल्हापूर दक्षिणमध्ये तरुण मतदार मोठ्या प्रमाणावर असल्याचा मुद्दा निखिल पंडितराव अधोरेखित करतात. "कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये 18 ते 29 वयोगटातला सर्वाधिक म्हणजे 82 हजार 238 युवक मतदार आहे.
मतदानासाठी हाच तरुण गट महत्त्वाचा ठरणार आहे. तो कुणाच्या बाजूने झुकतो, यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील. हिंदूत्वाचा मुद्दा प्रभावशाली असला तरीही तो कितपत प्रभावी ठरेल, हे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातच लक्षात येईल.
मात्र, सध्या पहायला गेलं तर दोन्हीही गटाची ताकद एकसारखीच आहे. आर्थिक ताकद, प्रचार यंत्रणा, जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचं जाळं याबाबतीत दोन्हीही गट तेवढ्याच ताकदीचे आहेत."
2019 साली लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्हीही निवडणुकांमध्ये महाडिक गटाची पिछेहाट झाल्याचं दिसून आलं.
या दोन्ही पराभवाचे वचपे काढून महाडिक गटाकडून पुन्हा आपला 'अमल' पुन्हा प्रस्थापित केला जातो की, पाटील गटाकडून आपला ऋतू'राज' कायम ठेवला जातो, हे पाहणं निर्णायक ठरेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











