मधुरिमाराजेंची माघार, सतेज पाटलांचे अश्रू; कोल्हापुरातल्या माघारनाट्यामागची कहाणी

फोटो स्रोत, Facebook
- Author, विनायक होगाडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
'कोल्हापूर उत्तर' विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीनं इतकी वळणं घेतली आहेत की, आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मतदारसंघातील निवडणुकीकडे लागलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभेचे दोन तर विधानसभेचे दहा मतदारसंघ आहेत. त्यातही कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण या दोन मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जाते.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्यासमोरची आव्हाने, यांची चर्चा आपण याआधी एका विश्लेषणाच्या माध्यमातून सविस्तरपणे केली आहे. ते तुम्ही इथे वाचू शकता.
मात्र, यंदा 'कोल्हापूर दक्षिण'पेक्षाही 'कोल्हापूर उत्तर'ने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. त्याचं कारणही तसंच आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात उमेदवार देण्यामध्ये काँग्रेसकडून झालेले घोळ यामुळे ही निवडणूक प्रचंड रंगात आली आहे.
आधी काँग्रेसकडून राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर होणं, मग ऐनवेळी त्यांच्याऐवजी मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी देऊ करणं, राजेश लाटकर यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरणं आणि अगदी शेवटच्या क्षणी मधुरिमाराजे यांनी आपला अर्ज माघारी घेणं, या सगळ्या नाट्यमय वळणांमुळेच ही निवडणूक इतकी चुरशीची बनली आहे.
'अर्ज माघारनाट्या'मुळे काँग्रेसचे कोल्हापूरचे प्रमुख नेते सतेज पाटील यांनी आधी संतापून जाण्याचे आणि नंतर कार्यकर्त्यांसमोर अक्षरश: रडण्याचे व्हीडिओ व्हायरल झाल्याने या निवडणुकीला आता भावनिक किनारही प्राप्त झाली आहे.
सध्या या मतदारसंघातील प्रमुख दावेदार कोण आहेत? इतक्या ट्विस्टनंतर कुणासमोरचं आव्हान अधिक वाढलंय आणि या मतदारसंघात इतके ट्विस्ट का पाहायला मिळाले, याचा राजकीय विश्लेषकांच्या दृष्टिकोनातून आपण आढावा घेणार आहोत.
इथून झाली नाराजीनाट्याची सुरुवात
उत्तर कोल्हापूर मतदारसंघात कोल्हापूर शहराचा मुख्य भाग अथवा जुनं कोल्हापूर म्हणवला जाणारा भाग मोडतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं इतर मतदारसंघांशी तुलना करता हा मतदारसंघ लहान आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राजेश क्षीरसागर हे कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमेदवार आहेत.
राजेश क्षीरसागर हे 2009 आणि 2014 साली याच मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. मात्र, 2019 साली भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या चंद्रकांत जाधव यांनी राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला होता.
2022 साली चंद्रकांत जाधव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना निवडून आणण्यामध्ये सतेज पाटील यशस्वी ठरले.
आता 2024 सालच्या या निवडणुकीमध्ये अर्थातच जयश्री जाधव पुन्हा एकदा याच मतदारसंघातून उमेदवारीसाठ इच्छुक होत्या. मात्र, त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट होताच त्यांनी काँग्रेसची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्याच शिवसेनेत प्रवेश केला.
या मतदारसंघातून आधी 27 ऑक्टोबर रोजी काँग्रेसचे कार्यकर्ते राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, त्यांच्या उमेदवारीबाबत काही नगरसेवकांनी नाराजीचं पत्र दिल्यानंतर उमेदवारीसाठी त्यांचं नाव मागे घेत मधुरिमा राजे छत्रपती यांचं नाव जाहीर करण्यात आलं.
खरंतर इथंच या नाराजीनाट्याचा पहिला अंक सुरू झाला. आपल्याला विश्वासात न घेताच परस्पर उमेदवारी काढून घेतल्याचा दावा करत राजेश लाटकर यांनी अपक्ष उमेदवारी भरण्याचा निर्णय घेतला. ही आपली आत्मसन्मानाची लढाई असल्याचा त्यांचा दावा आहे.

फोटो स्रोत, Facebook/Malojiraje Chhatrapati
मधुरिमाराजे या कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते असलेल्या दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या आहेत. खानविलकर हे सहावेळा आमदार आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्रीही राहिले होते.
त्या सध्याचे कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांच्या सून, तर याच कोल्हापूर उत्तर मतदारसंघामधून 2004 साली आमदार राहिलेल्या मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी आहेत.
मालोजीराजे छत्रपती यांचा 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.
मधुरिमाराजे यांनी सोमवारी (4 नोंव्हेबर) मुदत संपण्याला अगदी काही मिनिटे शिल्लक असताना आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
हाच या मतदारसंघातल्या नाट्याचा दुसरा अंक ठरला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात घडलेलं नाट्य सध्या चर्चेला कारण ठरलं आहे.


काँग्रेसमधील घोळामागची कारणं काय?
अर्ज मागे घेण्याचा प्रकार घडल्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील हे आधी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संतापलेले दिसून आले.
"निवडणूक लढवण्यासाठी दम नव्हता तर मग मला कशाला तोंडघशी पाडलं?" असा सवालही करताना ते दिसून आले. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये ते भावनिकही झाले.
मधुरिमाराजेंनी अर्ज मागे का घेतला, याची आपल्याला काहीच कल्पना नव्हती, असं म्हणत मुलाबाळांची शपथ घेत त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला.
दुसऱ्या बाजूला शाहू छत्रपती यांनी एका पत्राद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सामान्य कार्यकर्त्याच्या सन्मानासाठी ही माघार घेतली असून त्याशिवाय अन्य कोणतेही कारण यामागे नसल्याचं या पत्रात म्हटलं आहे.
"एकाच कुटुंबात दोन पदे नको, ही आमची भूमिका ठरली होती. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आम्ही उमेदवारी स्वीकारली होती. मात्र, राजेश लाटकरांनी अर्ज मागे घेतला तरच ही निवडणूक लढवणार असल्याचा आमचा निर्णय होता," असंही या पत्रात म्हटलं आहे.
पुढे, "काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नसला तरीही राजेश लाटकर हे काँग्रेस विचारांचे पर्यायाने काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी सर्व ताकदिनीशी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सतेज पाटील यांनी व्यक्त केलेल्या संतापामुळे आमचा अपमान झाल्याचा कांगाव विरोधक करत असून प्रत्यक्षात तसे काहीही घडलेले नाही. तसेच, या प्रकारामुळे मी खासदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या अफवाही पसरवल्या जात आहेत, त्यामध्ये तथ्य नाही," असंही या पत्रात म्हटलं आहे.
या सगळ्या प्रकाराचे मतदारसंघातील निवडणुकीवर काय परिणाम होतील आणि हा प्रकार कशामुळे घडला, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी बीबीसी मराठीने 'लोकमत'चे संपादक वसंत भोसले यांच्याशी चर्चा केली.
आता काँग्रेसकडे आपल्या हक्काच्या जागेवर उमेदवार नसणं आणि अपक्षाला पाठिंबा द्यायला लागण्याची वेळ येणं, या प्रकारामुळे सतेज पाटील, शाहू महाराज आणि एकूण काँग्रेस पक्ष असे सगळेच 'तोंडघशी' पडले असल्याचं वसंत भोसले सांगतात.

फोटो स्रोत, Facebook/Satej Patil
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले की, "काँग्रेसमधील बंडखोरीमुळे आपण पराभूत होऊ, या भीतीपोटी असेल वा आपल्यावर टीका होऊन हा वादाचा विषय होऊ शकेल, त्यापेक्षा आपण निवडणुकीतून माघार घेतलेलं बरं, असा निर्णय शाहू महाराज आणि मालोजीराजे या दोघांनीही घेतला असावा."
हाच धागा पुढे नेत 'सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस यांनीही संभाव्य तीन कारणे उलगडून सांगितली.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले की, "राजेश लाटकर आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यायला तयार नसतील, तर आपली जिंकून येण्याची शक्यता कमी आहे, या समजातूनच मधुरिमाराजेंचा अर्ज मागे घेण्याचा प्रकार घडला असण्याची पहिली शक्यता आहे.
"दुसरं, राजेश लाटकर सतेज पाटील यांच्या विश्वासातील असतील, तर त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी तयार का करत नाहीयेत, अशी साशंकता त्यांना वाटली असावी.
"तिसरी शक्यता अशी की, छत्रपती घराण्यामध्ये शाहू छत्रपती आणि संभाजीराजे छत्रपती यांची भूमिका एकमेकांच्या विरोधी आहे. अशावेळी कुटुंबात कलह तयार होत आहे, त्यामुळे, आपण राजकारणातच नको, अशा भूमिकेतून हा अर्ज मागे घेतला गेला असावा."

फोटो स्रोत, Facebook/Malojiraje Chhatrapati
मात्र, या तिन्ही कारणांचा विचार करुनच छत्रपती घराण्याने या निवडणुकीच्या मैदानात उतरायला हवं होतं, असंही सम्राट पडणीस म्हणाले तर हे सगळं प्रकरण हाताळण्यात काँग्रेस अपयशी ठरली असल्याचं मत वसंत भोसले यांनी मांडलं.
ते म्हणाले की, "सर्वांनीच बसून स्पष्टपणे बोलून निर्णय न घेणं, हे यामागचं प्रमुख कारण आहे. काँग्रेस आणि पर्यायाने सतेज पाटील यांनी हे प्रकरण हाताळण्यामध्ये गफलत केली आहे. इच्छुक उमेदवारांच्या बैठकीमध्ये मधुरिमाराजेंनी उमेदवारीसाठी इच्छाही बोलून दाखवली नव्हती. ऐनवेळी त्यांनी उमेदवारीसाठी इच्छा दर्शवली आणि ऐनवेळी माघारीही घेतली.
दुसऱ्या बाजूला, 'माझं नाव जाहीर होईपर्यंत त्या इच्छुक नव्हत्या, मग माझं नाव जाहीर झाल्यानंतर त्यांनी लढवायचा निर्णय का घेतला', या राजेश लाटकरांच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर ना शाहू छत्रपतींकडे आहे ना सतेज पाटील यांच्याकडे. त्यामुळे, या प्रकरणाचे नीट व्यवस्थापन न झाल्याचा हा सगळा परिणाम आहे. दुसऱ्या बाजूला राजेश लाटकर यांनी ठाम भूमिका घेतल्यामुळेही काँग्रेसची अडचण झाल्याचं दिसून आलं."

फोटो स्रोत, facebook/Jayashree Jadhav
माघारनाट्याची अशी आहे 'इनसाईड स्टोरी'
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुनील मोदी यांनी 'अर्ज माघार' प्रकरणासंदर्भातील 'इनसाईड स्टोरी' सांगितली.
माध्यमांशी बोलताना सुनील मोदी म्हणाले की, "राजेश लाटकर यांची उमेदवारी काही अपरिहार्य कारणांमुळे बदलण्यात आली. त्यानंतर राजेश लाटकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. तो त्यांनी मागे घ्यावा, यासाठी स्वत: शाहू महाराज, मालोजीराजे आणि मधुरिमा राजे या 1 नोव्हेंबर रोजी त्यांच्या घरी भेटायला गेले होते, तेव्हा राजेश लाटकर यांचे वडील भरत लाटकर यांनी शाहू महाराजांना प्रश्न केला की, तुम्ही माझ्या मुलाला न्याय मिळवून द्याल का? कारण सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्याची शाहू महाराजांची ख्याती आहे.
"जर यावेळी तुम्ही न्याय दिला नाही, तर कोल्हापूरचा पुरोगामी विचार कुठेतरी दबला जात आहे. त्यावेळी शाहू महाराजांनी म्हटलं होतं की, माझ्या सुनेला अर्ज मागे घ्यायला लावून मी राजेश लाटकर यांना पाठिंबा देऊ शकतो. परंतु, तरीही राजेश लाटकर यांना आम्ही उमेवादीर अर्ज मागे घेण्याबाबत विनंती करत होतो. आम्हाला अशी खात्री होती की, पावणेतीन वाजता अर्ज मागे घेऊन राजेश लाटकर आम्हाला पाठिंबा देणार होते.
"परंतु, राजेश लाटकर यांच्या वडिलांनी म्हणजेच भरत लाटकरांनी दोन वाजता शाहू महाराजांना फोन करुन विचारलं की तुम्ही मला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? महाराजांनी एकही विचार न करता सांगितलं की, मी माझ्या सुनेला माघार घ्यायला लावतो आणि तुमच्या मुलाला पाठिंबा द्यायला लावतो. त्याला मी स्वत: साक्षीदार आहे. शाहू महाराजांनी आपल्या गादीची प्रतिष्ठा राखत कोल्हापूरचं पुरोगामित्व जपलेलं आहे. एका सामान्य कार्यकर्त्यासाठी हा अर्ज मागे घेतला आहे. एवढा मोठा निर्णय फक्त शाहू महाराजचं घेऊ शकतात, हे जनतेला कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे."

फोटो स्रोत, Facebook
सतेज पाटील यांना यासंदर्भात कोणतीच कल्पना नव्हती का, या प्रश्नावर ते म्हणाले की, "दोन वाजून पस्तीस मिनिटाला फोन करेपर्यंत सतेज पाटील यांना यासंदर्भात कोणतीही कल्पना नव्हती. पावणेतीन वाजता राजेश लाटकर स्वत: माघार घेणार, हीच न्यूज होती.
"आम्ही राजेश लाटकर यांच्या संपर्कात होतो. पावणेतीनला ते पोहोचणार होते. मात्र, दोन वाजून पस्तीस मिनिटांनंतर हे सगळे निर्णयातील बदल घडले आहेत. मधुरिमाराजेंनी माघार घेऊ नये, यासाठी त्यांना विनंती केली असताना शाहू राजांनी त्यास विरोध केला. लोकशाही टिकली पाहिजे, असं त्यांचं मत होतं. यातील एकही गोष्ट ठरवून घडलेली नाही.
"राजेश लाटकर यांच्या वडिलांचा फोन यामागे कारणीभूत असून त्यानंतर हा सगळा घटनाक्रम घडला आहे. मात्र, या निर्णयामुळे काँग्रेसचे चिन्ह नसणार, याची कल्पना शाहू राजेंनाही होती. मात्र, विचार महत्त्वाचा असल्याचा मुद्दा मांडत हा निर्णय घेण्यात आला. आता राजेश लाटकर यांच्या प्रचारासाठी ते स्वत:, मधुरिमाराजे, मालोजीराजे सगळे मैदानात उतरतील."
आता नेमकी लढत कशी होईल?
आता ही निवडणूक कशी होईल आणि काय असतील उमेदवारांमोरची आव्हाने, हा उत्सुकतेचा विषय झाला आहे. आपण काँग्रेसचेच कार्यकर्ते असून अपक्ष उभे राहण्याची वेळ नाईलाजाने आल्याची भूमिका अपक्ष उभे राहिलेल्या राजेश लाटकर यांनी घेतली आहे.
दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राजेश लाटकर यांना पाठिंबा देणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे, राजेश लाटकर यांना महाविकास आघाडीच्या पाठिंब्याचा फायदाच होणार असल्याचे चित्र आहे.
मात्र, तरीही त्यांच्यासमोर आणि एकूणच महाविकास आघाडीसमोर आता आव्हान काय असणार आहे, या प्रश्नावर वसंत भोसले म्हणाले की, "झालेल्या सगळ्या तोंडघशी पडण्याच्या प्रकारानंतर आता राजेश लाटकर यांनाच ताकद द्यावी लागणार आहे. तेच आपले उमेदवार आहेत, हे पुन्हा जनतेला पटवून देणं हेच महाविकास आघाडीसमोरचं आव्हान असणार आहे.
या निवडणुकीत काँग्रेसचाच 'हात' नसणं, यावरुन विरोधकांनी टीका करणं वा खिल्ली उडवणं या सगळ्याचा परिणाम आता जिल्ह्यातील उर्वरित मतदारसंघांवर होऊ न देणं, हे आव्हानही महाविकास आघाडीसमोर असणार आहे. दुसऱ्या बाजूला, मागील वेळेस झालेल्या चुका टाळत राजेश क्षीरसागर यांनीही चांगली तयारी केली आहे. त्यामुळे ते सतर्क आहेत."
मात्र, म्हणून ही निवडणूक महायुतीसाठी पूर्णपणे सोपी झाली आहे, असं मानण्याचे काहीच कारण नाही, असंही ते म्हणाले. "ही निवडणूक आपल्याच गोंधळांमुळे जशी महाविकास आघाडीसाठी सोपी राहिलेली नाही, तशी महायुतीसाठीही नाहीये. कारण, राजेश क्षीरसागर यांच्यात आणि भाजपमध्ये सगळंच आलबेल नव्हतं."

फोटो स्रोत, Facebook/Rajesh Latkar
विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश करणं आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये उमेदवारीवरुन सावळा गोंधळ होणं, यामुळे राजेश क्षीरसागर यांचं पारडं जड झालं आहे का, या प्रश्नावर सम्राट फडणीस म्हणाले की, "राजेश क्षीरसागर हे या मतदारसंघामधील खंबीर आणि तगडे उमेदवार आहेत. मधुरिमाराजे यांची उमेदवारी जरी कायम राहिली असती आणि त्या छत्रपती घराण्यातील असल्या तरीही त्यांना ही निवडणूक सोपी गेली असती, अशी परिस्थिती नव्हती.
"ज्या राजेश क्षीरसागर यांना ही निवडणूक जड गेली असती, त्यांच्यासाठी ही निवडणूक सहज करण्यापर्यंत हा प्रवास झाला आहे. महायुतीला आयता मुद्दा मिळाला आहे. त्यामुळे, ते या गोष्टीचं भांडवल निश्चितच करणार. एकूणच राज्यात गेल्या पंधरा वर्षामध्ये पहिल्यांदा काँग्रेससाठी थोडं चांगलं वातावरण निर्माण झालेलं असताना असा प्रकार घडण्याचे परिणाम निश्चितच इतर मतदारसंघांवरही होऊ शकतो."

फोटो स्रोत, Facebook/Rajesh Kshirsagar
पुढे सम्राट फडणीस म्हणाले की, "या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं वर्चस्व मोडीत काढून पुढे येण्यात काँग्रेसला आता कुठे यश मिळालं होतं. या पार्श्वभूमीवर ही जागा पुन्हा आपल्याकडे ठेवण्याची आणि तिथे आपली ताकद वाढवण्याची संधी असताना आता तिथे हात हे चिन्ह सुद्धा नसणार आहे. काँग्रेसच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्रातील ही मोठी हार आहे, असं मला वाटतं. मधुरिमाराजेंनी ज्याप्रकारे उमेदवारीची घाई केली, त्याचप्रमाणे अर्ज मागे घेण्याचीही घाई करायला नको होती. बसून आणि चर्चा करुन निर्णय घेतला असता तर काँग्रेसला काहीतरी आपलं म्हणणं नक्कीच राहिलं असतं.
इतकी वळणे प्राप्त झालेल्या या निवडणुकीत प्रचारादरम्यान कशी रंगत प्राप्त होईल आणि अपक्षाच्या धर्तीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील रस्सीखेच कशी होईल, हे पाहणं आता नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











