आदित्य ठाकरेंनी 'वरळी' राखली, मिलिंद देवरा आणि संदीप देशपांडेंना पराभवाची धूळ चारली

फोटो स्रोत, Getty Images/Facebook
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
मुंबईतील वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे विजयी झाले आहेत.
मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. कारण या मतदारसंघात तिरंगी लढत होती.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून मिलिंद देवरा, तर मनसेकडून संदीप देशपांडे हे उमेदवार होते.
शेवटच्या फेरीपर्यंत आदित्य ठाकरे आणि मिलिंद देवरा यांच्यात चुरस पाहायला मिळाली. आदित्य ठाकरे आणि मिलिंद देवरा यांच्यातील मतांचा फारक फारसा नाहीय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली आणि दोन गटात रूपांतर झालं. या बंडाच्या घटनेनंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी 'शिवसेना विरुद्ध शिवसेना' अशी लढत झाली. या लढतीला मूळ शिवसेनेचा बालेकिल्ला असलेली मुंबई सुद्धा अपवाद नाहीय.
2019 साली याच मतदारसंघातून ते आमदार म्हणून पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले होते. आदित्य ठाकरेंसाठी यंदाची निवडणूक वरळीतलं आपलं वर्चस्व राखण्याची होती. तशी आव्हानंही त्यांच्यासमोर होतं.
2019 मध्ये आदित्य ठाकरे या मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, गेल्या पाच वर्षात राज्यातली समीकरणं बदलली, तशी वरळीतलीही बदलली होती.


तीन 'सेनां'मधली लढाई
महायुतीत वरळी विधानसभा मतदारसंघ शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडे आहे.
एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरे यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेसमधून नुकतेच शिवसेना शिंदे गटात गेलेले आणि राज्यसभेचे खासदार बनलेले मिलिंद देवरा यांना उतरवलं आहे.
शिवाय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरवले आहे. मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे वरळीतून निवडणूक लढवत आहे.
यामुळे वरळीत आदित्य ठाकरे (शिवसेना ठाकरे गट) विरुद्ध मिलिंद देवरा (शिवसेना शिंदे गट) विरुद्ध संदीप देशपांडे (मनसे) अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबई कायम शिवसेनेचा बालेकिल्ला मानला गेला. यातही दादर, लालबाग, वरळी, शिवडी या भागातच शिवसेना सुरुवातीच्या काळापासून रुजली आणि तिथून मग राज्यभर पक्षाचा विस्तार होत गेला. यामुळे शिवसेनेसाठी या मतदारसंघातील लढाई आतापर्यंत तशी सोपी होती.
पण शिवसेनेतच दोन गट झाल्यानंतर म्हणजे शिवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने शिवसैनिक आणि स्थानिक मतदार या कोणत्या शिवसेनेला कौल देतात, हे महत्त्वाचं ठरणार आहे.
या कारणामुळेही आदित्य ठाकरे यांच्यासाठी आपल्याच मतदारसंघाची लढाई प्रतिष्ठेची आणि तितकीच आव्हानात्मक बनली आहे.
वरळीमध्ये कुणाचं वर्चस्व
वरळी हा मराठी मतदार, कोळी बांधव, आणि उच्चभ्रूंची वस्ती असलेला विधानसभा मतदारसंघ आहे. जैन आणि गुजराती मतदारांची संख्याही लक्षणीय आहे.
वरळी मतदारसंघात 1962 ते 1980 पर्यंत काँग्रेसचं वर्चस्व होतं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं वर्चस्व निर्माण केलं होतं.
तर 1990 ते 2004 पर्यंत सलग तीन कार्यकाळ या मतदारसंघातून शिवसेनेचे दत्ताजी नलावडे निवडून आले. यानंतर 2009 ते 2014 आता शिवसेना ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार असलेले सचिन अहीर त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आले होते.
2014 आणि 2019 या दोन्ही वेळेस शिवसेनेचाच उमेदवार वरळीतून निवडून आला. परंतु 2019 मध्ये ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदा आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि ते या मतदारसंघातून निवडूनही आले.
आता 2024 विधानसभा निवडणुकीतही आदित्य ठाकरे वरळीतूनच निवडणूक लढवत आहेत. पण त्यांच्यासमोर यापूर्वी कधीही नसलेलं आव्हान असणार आहे.

फोटो स्रोत, Facebook
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वरळी विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाअंतर्गत होता. या लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत निवडून आले असले, तरी वरळी विधानसभा मतदारसंघातून त्यांना अपेक्षित आघाडी मिळाली नाही.
लोकसभेला सावंत यांना वरळीतून 6715 मतं मिळाली होती. यामुळे यावेळेसच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे त्यांच्यासमोरील आव्हानं वाढली आहेत.

फोटो स्रोत, Facebook
दुसरीकडे संदीप देशपांडे दादर भागात नगरसेवक राहिलेले आहेत. तसंच, गेल्या दीड वर्षांपासून त्यांनी पक्षासाठी वरळीत मोर्चेबांधणी सुरू केली होती. परंतु, 2019 मध्ये पुतण्याविरोधात म्हणजे आदित्य ठाकरेंविरोधात राज ठाकरे यांनी वरळीतून उमेदवार दिलेला नव्हता. त्यामुळे इथे मनसेची किती ताकद आहे, याचा अंदाज नाही.
मनसेच्या संदीप देशपांडेंसह शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या मिलिंद देवरा यांचंही आव्हान असेल.
मिलिंद देवरा यांचा यापूर्वीचा लोकसभा मतदारसंघ दक्षिण मुंबई राहिलेला आहे. वरळी हा याच लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. यामुळे मिलिंद देवरा यांचा चेहरा वरळीसाठी तसा नवीन नाही. तसंच, गुजराती आणि जैन मतांचा फायदा देवरा यांना होऊ शकतो, असं जाणकारांना वाटतं.
वरळीतील लढतीवर राजकीय विश्लेषक काय म्हणाले होते?
वरळीत ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व दिसून येत होतं. या मतदारसंघातून पूर्वी आमदार राहिलेले सुनील शिंदे, सचिन अहिर हे सध्या ठाकरेंसोबतच असून दोघेही विधानपरिषदेवर आमदार आहेत. याशिवाय, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा वॉर्ड देखील याच मतदारसंघात आहे.
आदित्य ठाकरे यांनी 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोठं शक्तिप्रदर्शन केलं गेलं.
अर्ज भरल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की, “आज सर्वांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने मी पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज भरला आहे. पक्षाने माझ्यावर पुन्हा एकदा जबाबदारी टाकली आहे. जो बदल, जे परिवर्तन आम्हाला महाराष्ट्रात आणायचं आहे, त्याची सुरुवात आता झाली आहे.”
"दोन वर्षांपूर्वी त्यांनी ऑपरेशन सुरत त्यांनी (एकनाथ शिंदे गट) केले. त्याचा बदला आम्ही यावर्षी घेणार आहोत,” असे म्हणत त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाला टोला लगावला.
मिलिंद देवरा यांना शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी देण्यावरून संजय राऊत यांनी टीका केली होती.
राऊत म्हणाले की, "शिंदे गटाने खासदाराला उमेदवारी द्यावी किंवा एकनाथ शिंदे यांनी स्वतः वरळीत उतरावे. तरीही आदित्य ठाकरेच निवडून येणार."
तसंच, अमित शाह यांचे चिरंजीव जय शाह यांचाही उल्लेख करून संजय राऊत यांनी टीका केली.
वरळीतील तिरंगी लढतीबाबत ज्येष्ठ पत्रकार सचिन धानजी सांगतात, "लोकसभा आणि विधानसभेची तुलना होऊ शकत नाही. संदीप देशपांडे साधारण दीड वर्षांपासून मतदारसंघात संघटनात्मक बांधणी करत आहे. यामुळे ते वरळीचे नाहीत असंही म्हणता येत नाही. कारण त्यांनी दीड वर्षांपासून काम सुरू केलं होतं.
"दुसरीकडे मिलिंद देवरा हा सुद्धा पक्षाने एक विश्वासक चेहरा दिला आहे. कारण वरळीतील मतदार देवरा यांना ओळखतात. शिंदे गटाकडे तसंही देवरा यांच्याशिवाय दुसरा तितका ताकदीचा पर्यायी चेहरा नव्ह्ता.
"आदित्य ठाकरे यांना गेले पाच वर्ष वरळीत कामाची संधी मिळाली. तसंच, ते अडीच वर्षे मंत्री सुद्धा होते आणि त्यावेळी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होते."

फोटो स्रोत, Facebook
सचिन धानजी पुढे म्हणतात, "वरळीत आदित्य ठाकरे यांच्यासोबत आणखी दोन आमदार आहेत. सुनील शिंदे आणि सचिन अहिर आहेत. तसंच, माजी महापौर किशोरी पेडणेकर याच मतदारसंघातील आहेत. यामुळे तीन आमदार असताना, जो विकास अभिप्रेत होता, तसा मतदारसंघाचा विकास झालेला दिसत नाही. बीडीडी चाळींमध्ये बॅनर लागलेत की, मतं मागण्यासाठी येऊ नका. तसंच कोस्टल रोडच्या कामावरून कोळी बांधवांमध्येही नाराजी आहे."
तर आदित्य ठाकरेंसमोरील आव्हानांवर बोलातना ज्येष्ठ विनया देशपांडे सांगतात, "मला वाटतं आदित्य ठाकरेंसाठी मिलिंद देवरा आव्हानं उभं करू शकतील. जरी शिवसेनेला या मतदारसंघात सातत्याने मताधिक्य मिळालं असलं, तरी लोकसभेत मिलिंद देवरा यांना या भागात मतं वाढवण्यासाठी काम सोपवलं होतं. दक्षिण मुंबईतून पक्षाचं संघटन वाढवण्याची जबाबदारी होती. आता तर त्यांना उमेदवारी दिली आहे."
विनया देशपांडे पुढे म्हणतात की, "मिलिंद देवरा यांच्यासाठीही अजिबात सोपं नाही. कारण हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ नाही. मराठी मतदारांचं विभाजन होईल, कारण संदीप देशपांडे यांना राज ठाकरेंनी उमेदवारी दिली आहे. यामुळे मिलिंद देवरा यांना त्याचा फायदा होईल का आणि कितपत होईल, हा मुद्दा महत्त्वाचा राहील."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











