एकनाथ शिंदेंनी तिकीट कापल्यानंतर श्रीनिवास वनगा 'नॉट रिचेबल', शिवसेनेची तिसरी यादी इथे पाहा

पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांचे शिवसेना शिंदे गटाने तिकीट कापल्याने वनगा कालपासून नाराज असून ते वारंवार आत्महत्या करण्याच्या गोष्टी करत असल्याची माहिती वनगा यांच्या पत्नीने पत्रकार परिषदेत दिली आहे.
सध्या ते घरात नसून 'नॉट रिचेबल' असल्याची माहितीही त्यांच्या पत्नीने दिली आहे.
40 पैकी 39 आमदारांना तिकीट दिलं मग माझ्या पतीचा राजकीय बळी का घेतला, असा प्रश्न श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी उपस्थित केला आहे. कवाडा येथे वनगांच्या राहत्या घरी सोमवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वनगा कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.
वनगा 'नॉट रिचेबल'
पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांचे शिवसेना (शिंदे) पक्षातर्फे उमेदवारी डावलल्याने वनगा कालपासून नाराज आहेत.
आमच्या प्रामाणिकपणाचे हेच फलित आहे का असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली फसवणूक केल्याचे आरोप केले आहेत.
पालघर विधानसभेसाठी श्रीनिवास वनगा यांच्या ऐवजी माजी खासदार राजेंद्र गावित यांना संधी देण्यात आली आहे. श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारताना निवडून येण्याची क्षमता नसल्याचे तसेच सर्वेक्षणात नकारात्मक निकाल मिळाल्याचे त्यांना पक्षाच्या वरिष्ठ मंडळींकडून सांगण्यात आले होते. अशावेळी भाजपामधून शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश देऊन गावीत त्याला उमेदवारी देण्यात आली होती.
राजेंद्र गावित यांना पक्षप्रवेश देण्यापूर्वी श्रीनिवास वनगा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वी प्रदीर्घ चर्चा झाली होती. त्यावेळी डहाणू मतदार संघात भाजपातर्फे उमेदवारी देण्याचे त्यांना आश्वासन देण्यात आले होते. मात्र डहाणूची उमेदवारी भाजपाने विनोद मेढा यांना दिल्यानंतर श्रीनिवास वनगा यांच्या भावनांचा बांध फुटला.

फोटो स्रोत, Facebook
गेल्या दोन दिवसांपासून श्रीनिवास वनगा यांनी शिवसेना (शिंदे) पक्षाच्या अनेक स्थानिक नेत्यांशी संपर्क साधताना रडत आपली फसवणूक झाल्याचे मांडले होते. आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवून उमेदवारी च्या निर्णयात बदल होईल अशी त्यांना आशा वाटत होती.
आपल्या घरी पत्रकारांशी श्रीनिवास वनगा यांनी आपली व्यथा मांडली. आपण मतदार संघात निवडून येणार नाही असे 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सांगण्यात आल्याचे कथन केले. तरीदेखील पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रत्येक वेळी आपण प्रामाणिकपणे काम केल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यमान आमदारकीच्या कारकीर्द मतदार संघात अनेक विकास काम केली असताना देखील आपल्याला या पद्धतीचे फलित मिळत असल्याने त्यांनी साश्रू नयनांनी आपल्याला डावल्याच्या भावना व्यक्त केल्या.
एकनाथ शिंदे यांनी आम्हाला फसवलं, उद्धव ठाकरे सारख्या देव माणसाला सोडून आपले पती एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले ही त्यांची घोडचूक होती. माझ्या मुलाच्या वाढदिवसाचं कारण सांगून बंड करणारे आमदार गुवाहाटीला गेले. मात्र माझ्याच पतीला का फसवलं असा सवाल श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी केला आहे. 40 पैकी 39 आमदारांना तिकीट दिलं, मग माझ्या पतीचा राजकीय बळी का घेतला, असा प्रश्न उपस्थित केला.
एकनाथ शिंदेंची तिसरी यादी जाहीर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तिसरी यादी जाहीर केली आहे. यात संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांविरोधातील उमेदवाराच्या नावाचाही समावेश आहे.
थोरातांविरोधात शिंदे गटाकडून अमोल खताळ यांना तिकीट मिळालं आहे. विशेष म्हणजे अमोल खताळ भाजपचे संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख आहेत.

या यादीत 15 उमेदवारांचा समावेश आहे. त्यातील 13 उमेदवार थेट शिंदे गटाचे आहेत, तर 2 उमेदवार शिंदे गटाच्या सहयोगी पक्षांचे आहेत. यात जनसुराज्य पक्ष आणि राजश्री शाहुविकास आघाडीचा समावेश आहे.
जाहीर झालेल्या तिन्ही याद्या मिळून आतापर्यंत शिंदे गटाकडून 80 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
शिंदे गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी
1. सिंदखेडराजा - शशिकांत नरसिंगराव खेडेकर
2. घनसवांगी - हिकमत बळीराम उडाण
3. कन्नड - संजना जाधव
4. कल्याण ग्रामीण - राजेश गोवर्धन मोरे
5. भांडूप पश्चिम - अशोक धर्मराव पाटील
6. मुंबादेवी - शायना मनिष चुडामासा मुनोट (शायना एन सी)
7. संगमनेर - अमोल धोंडीबा खताळ
8. श्रीरामपूर - भाऊसाहेब मल्हारी कांबळे
9. नेवासा - विठ्ठलराव वकीलराव लंघे पाटील
10. धाराशिव - अजित बाप्पासाहेब पिंगळे
11. करमाळा - दिग्विजय बागल
12. बार्शी - राजेंद्र विठ्ठल राऊत
13. गुहागर - राजेश रामचंद्र बेंडल
शिवसेना सहयोगी पक्षांचे उमेदवार
15. हातकणंगले - अशोकराव माने (जनसुराज्य पक्ष)
16. शिरोळ - राजेंद्र शामगोंडा पाटील येड्रावकर (राजश्री शाहुविकास आघाडी)
याआधी शिंदे गटाने 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती. या यादीत देखील दिग्गजांना संधी देण्यात आली आहे. कुडाळमधून निलेश राणे, रिसोडमधून भावना गवळी, तर वरळी मतदारसंघातून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिंदे गटाकडून यापूर्वी 45 जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. तर दुसऱ्या यादीत 20 उमेदवारांना स्थान मिळाले.
शिंदे गटाच्या उमेदवारांची दुसरी यादी
- अक्कलकुआ - आमश्या पाडवी
- बाळापूर- बळीराम शिरसकर
- रिसोड - भावना गवळी
- हदगाव - बाबुराव कदम कोहळीकर
- नांदेड दक्षिण - आनंद तिडके पाटील (बोंडारकर)
- परभणी - आनंद शेषराव भरोसे
- पालघर - राजेंद्र गावित
- बोईसर (अज) - विलास तरे
- भिवंडी ग्रामीण (अज) - शांताराम तुकाराम मोरे
- भिवंडी पूर्व - संतोष मंजय्या शेट्टी
- कल्याण पश्चिम - विश्वनाथ आत्माराम भोईर
- अंबरनाथ – डॉ. बालाजी प्रल्हाद किणीकर
- विक्रोळी - सुवर्णा सहदेव करंजे
- दिंडोशी - संजय ब्रिजकिशोरलाल निरुपम
- अंधेरी पूर्व - मुरजी कांनजी पटेल
- चेंबूर - तुकाराम रामकृष्ण काते
- वरळी - मिलींद मुरली देवरा
- पुरंदर - विजय सोपानराव शिवतारे
- कुडाळ - निलेश नारायण राणे
- कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर
नात्या-गोत्यात उमेदवारी
शिंदे गटानं जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील दोन नावांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ते म्हणजे राजापूरमधून विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, उदय सामंत आणि किरण सामंत हे सख्खे भाऊ एकाच वेळी निवडणुकीच्या रिंगणात दिसतील.
जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून खासदार बनलेले रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना संधी देण्यात आली आहे.
तर छत्रपती संभाजीनगरचे खासदार बनलेले संदिपान भूमरे यांचे पुत्र विलास भूमरे यांना पैठणमधून उमेदवारी देण्यात आलीय.

फोटो स्रोत, ANI
सांगलीच्या खानापूर मतदारसंघातील विद्यमान आमदार अनिल बाबर यांचे निधन झाल्यानंतर, या जागेवरून त्यांचे पुत्र सुनील बाबर यांना तिकीट देण्यात आलंय.
जळगावमधील एरंडोल मतदारसंघातून अमोल पाटील यांना एकनाथ शिंदेंनी उमेदवारी दिलीय. अमोल पाटील हे विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांचे पुत्र आहेत.
तसेच, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा मुलगा अभिजित अडसूळ यांना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीय.
दर्यापूरमध्ये 2019 ला भाजपचा उमेदवार होता. आताही नवनीत राणा यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू होती. यावरून अभिजीत अडसूळ आणि राणांमध्ये वादही झाला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी अभिजीत अडसूळ यांना संधी दिली आहे.


एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 45 उमेदवार :
- कोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदे
- साक्री - मंजुळा गावित
- चोपडा - चंद्रकांत सोनावणे
- जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील
- एरंडोल - अमोल पाटील
- पाचोरा - किशोर पाटील
- मुक्ताईनगर - चंद्रकांत पाटील
- बुलढाणा - संजय गायकवाड
- मेहकर - संजय रायमुलकर
- दर्यापूर - अभिजित अडसूळ
- रामटेक - आशिष जैस्वाल
- भंडारा - नरेंद्र भोंडेकर
- दिग्रस - संजय राठोड
- नांदेड उत्तर - बालाजी कल्याणकर
- कळमनुरी - संतोष बांगर
- जालना - अर्जुन खोतकर
- सिलोड - अब्दुल सत्तार
- छत्रपती संभाजीनगर (मध्य) - प्रदीप जैस्वाल
- छत्रपती संभाजीनगर (पश्चिम) - संजय शिरसाट
- पैठण - विलास संदीपान भुमरे
- वैजापूर - रमेश बोरनारे
- नांदगाव - सुहास कांदे
- मालेगाव बाह्य - दादा भुसे
- ओवळा माजिवडा - प्रताप सरनाईक
- मागाठाणे - प्रकाश सुर्वे
- जोगेश्वरी पूर्व - मनीषा वायकर
- चांदिवली - दिलीप लांडे
- कुर्ला - मंगेश कुडाळकर
- माहीम - सदा सरवणकर
- भायखळा - यामिनी जाधव
- कर्जत - महेंद्र थोरवे
- अलिबाग - महेंद्र दळवी
- महाड - भरत गोगावले
- उमरगा - ज्ञानराज चौगुले
- परांडा - तानाजी सावंत
- सांगोला - शहाजी बापू पाटील
- कोरेगाव - महेश शिंदे
- पाटण - शंभूराज देसाई
- दापोली - योगेश कदम
- रत्नागिरी - उदय सामंत
- राजापूर - किरण सामंत
- सावंतवाडी - दीपक केसरकर
- राधानगरी - प्रकाश आबिटकर
- करवीर - चंद्रदीप नरके
- खानापूर - सुहास अनिल बाबर











