महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : आजपासून अर्ज भरण्याची सुरुवात, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक इथे पाहा

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC
निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या निवडणुकांची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकांची घोषणा केली आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे.
आजपासून म्हणजे 22 ऑक्टोबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक :
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 29 ऑक्टोबर 2024 (मंगळवार)
- अर्ज पडताळणीची तारीख - 30 ऑक्टोबर 2024 (बुधवार)
- अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख - 4 नोव्हेंबर 2024(सोमवार)
- मतदानाचा दिवस - 20 नोव्हेंबर 2024
- मतमोजणीची तारीख - 23 नोव्हेंबर 2024

महाराष्ट्र निवडणुकीसंदर्भातील इतर महत्त्वाच्या बातम्या :

महाराष्ट्रातल्या एकूण मतदारांच्या आकडेवारीचा विचार केला तर महाराष्ट्रात 9.63 कोटी मतदार आहेत, त्यापैकी 4.97 कोटी पुरुष मतदार आहेत. तर 4.66 कोटी महिला मतदार आहेत.
महाराष्ट्रात एकूण 1 लाख 186 मतदान केंद्र आहेत. यात शहरांमध्ये 42 हजार 604 तर ग्रामीण भागात 57 हजार 582 मतदान केंद्र आहेत. यावेळी देखील आम्ही 530 मॉडेल मतदान केंद्र बनवणार आहोत.
निवडणूक आयोगाच्या पत्रकारी परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
- अनेकांना ही शंका होती की निवडणूक आयोग जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक घेऊ शकेल की नाही? पण आम्ही यशस्वीपणे या निवडणुका घेऊन दाखवल्या.
- जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकीत हिंसाचाराची एकही घटना घडली नाही.
- महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपत आहे.
- महाराष्ट्रातल्या एकूण मतदारांच्या आकडेवारीचा विचार केला तर महाराष्ट्रात 9.63 कोटी मतदार आहेत, त्यापैकी 4.97 कोटी पुरुष मतदार आहेत. तर 4.66 कोटी महिला मतदार आहेत.
- महाराष्ट्रात एकूण 1 लाख 186 मतदान केंद्र आहेत. यात शहरांमध्ये 42 हजार 604 तर ग्रामीण भागात 57 हजार 582 मतदान केंद्र आहेत. यावेळी देखील आम्ही 530 मॉडेल मतदान केंद्र बनवणार आहोत.
- झारखंडचा विचार केला तर तिथे एकूण 24जिल्हे आहेत. तिथे एकूण 81जागा आहेत. त्यापैकी खुल्या वर्गासाठी 44 जागा आहेत, अनुसूचित जमातींसाठी 28 जागा राखीव आहेत तर उर्वरित जागा या अनुसूचित जातींच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
- 5 जानेवारी 2025 रोजी झारखंडच्या विधानसभेची मुदत संपत आहे. झारखंडमध्ये एकूण 2 कोटी 60 लाख मतदार आहेत. ज्यामध्ये 1.29 कोटी महिला मतदार तर 1 कोटी 30 लाख पुरुष मतदार आहेत.

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. त्यासाठी आता निवडणूक जाहीर होत आहेत.


2019 च्या निवडणुकीत काय झालं होतं?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 105 आमदार निवडून आले होते. तत्कालीन शिवसेनेचे 56, तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 54, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची त्या निवडणुकीत बरीच घसरण झाली होती, त्यांचे 44 आमदार निवडून आले होते.
या निवडणुकीत 13 अपक्ष आमदार निवडून आले होते आणि इतर 16 आमदार निवडून आले होते. महाराष्ट्रातील 7 लाख 42 हजार 134 मतदारांनी नोटाला मतदान केलं होतं.
आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्येक पक्षानं आपली वेगळी रणनिती आखायाला सुरुवात केली आहे. लोकसभेच्या निकालाचं आपल्या पद्धतीनं आकलन करून विधानसभेच्या रणांगणात उतरण्यासाठी हे पक्ष सज्ज झाले आहेत.
महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय पक्षांची नावं
- काँग्रेस,
- राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गट आणि अजित पवार गट
- शिवसेना- एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट
- भारतीय जनता पार्टी
- महाराष्ट्र नवनिर्माण सेना
- बहुजन विकास आघाडी
- एमआयएम
- वंचित बहुजन आघाडी
- भारतीय कम्युनिस्ट पक्ष
- प्रहार
- शेतकरी कामगार पक्ष
- जनसुराज्य पक्ष
- शेतकरी संघटना
- राष्ट्रीय समाज पक्ष
- भारिप
- भारत राष्ट्र समिती
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











