महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय नेते.

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाच्या सभा, लोकार्पण सोहळे आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा सपाटा लावला आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी राज्यभर दौरे आणि भेटीगाठींचे सत्र सुरु केले आहे.

मात्र निवडणुका नेमक्या कधी होणार? हे काही अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नव्हतं. मात्र आज 15 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांसाठी पत्रकार परिषद घेत असल्याचं निवडणूक आयोगानं पत्रक प्रसिद्ध केलं आहे.

आज दुपारी तीन वाजता होत असलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो स्रोत, X

महाराष्ट्राच्या विद्यमान विधानसभेची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत आहे. 26 नोव्हेंबरपूर्वी राज्यात नवीन सरकार स्थापन होणं गरजेचं आहे.

तसं झालं नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागू शकते. म्हणजे यापूर्वाच निवडणुका आणि निकाल जाहीर होणं अपेक्षित आहे.

जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकांची घोषणा करताना निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत नंतर घोषणा केली जाईल असं म्हटलं होतं.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी 28 सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला. तसंच विधानसभेचा अधिकृत कार्यकाळ संपण्याआधीच महाराष्ट्राच्या निवडणुका पार पडतील, असंही ते म्हणाले होते.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

महाराष्ट्रातील निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होणं अपेक्षित होतं

नियमानुसार 26 नोव्हेंबर 2024 आधी महाराष्ट्रात नवीन विधानसभा गठीत झाली पाहिजे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर साधारणतः 45 दिवसांनी नवीन विधानसभेची स्थापना होणे अपेक्षित असते.

या गणिताचा विचार केला तर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात आचारसंहिता लागू शकते, असं म्हटलं जात आहे.

महाराष्ट्राच्या निवडणुकीसंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राजीव कुमार यांनी म्हटलं होतं की, "गेल्या वेळी महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक एकत्र झाली होती. पण त्यावेळी जम्मू काश्मीरचा मुद्दा नव्हता. यावेळी चार राज्यांत निवडणुका आहेत. नंतर लगेचच पाचव्या राज्यात म्हणजे दिल्लीतही. त्यामुळं सुरक्षा दलांच्या उपलब्धतेचा विचार करून आम्ही दोन निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय घेतला."

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार

जम्मू-काश्मीरची निवडणूक सुरू असताना मध्येच दुसऱ्या निवडणुकीच्या घोषणेची शक्यता नाही, असंही त्यांनी म्हटलं.

राजीव कुमार यांनी पुढे म्हटलं की, "इतरही काही कारणे आहेत. महाराष्ट्रात पाऊस होता. तसंच गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्र असे सण येत असल्यानं आम्हाला एकावेळी दोन निवडणुका शक्य आहेत, असं वाटलं नाही."

विधानसभांच्या कार्यकाळाच्या सहा महिन्यांपर्यंत तसाही कालावधी असतो, असंही त्यांनी म्हटलं.

राज्याच्या राजकीय स्थितीचा विचार करता यावेळी राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती अशी दोन आघाड्यांमध्ये निवडणूक होणार हे जवळपास स्पष्ट आहे.

निवडणुकांबाबत मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होतील, असं सांगितलं होतं.

चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांना विजयी करण्याचं आवाहन करताना एकनाथ शिंदे म्हणाले होते की, "आता दोन महिन्यांत निवडणुका आहेत ना? नोव्हेंबरमध्ये. तेव्हा आपण सगळ्यांनी प्रचंड मताधिक्याने दिलीप लांडेंच्या मागे उभं राहायचं."

त्यामुळं नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील, असे अंदाज वर्तवण्यास सुरुवात झाली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी तयारी सुरु केली आहे. युद्धपातळीवर होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठका आणि निर्णय, राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी यातून अनेक प्रकारचे संकेत मिळत आहेत.

सरकारमधील तीन पक्ष आणि आणि विरोधातीलमहाविकास आघाडीतील तीन पक्ष सगळ्यांनीच राज्यभर मेळावे, सभा आणि बैठका घेऊन विधानसभेसाठी कंबर कसली आहे.

2019 मधील स्थिती?

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 105 आमदार निवडून आले होते. तत्कालीन शिवसेनेचे 56, तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 54, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची त्या निवडणुकीत बरीच घसरण झाली होती, त्यांचे 44 आमदार निवडून आले होते.

या निवडणुकीत 13 अपक्ष आमदार निवडून आले होते आणि इतर 16 आमदार निवडून आले होते. महाराष्ट्रातील 7 लाख 42 हजार 134 मतदारांनी नोटाला मतदान केलं होतं.

आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्येक पक्षानं आपली वेगळी रणनिती आखायाला सुरुवात केली आहे. लोकसभेच्या निकालाचं आपल्या पद्धतीनं आकलन करून विधानसभेच्या रणांगणात उतरण्यासाठी हे पक्ष सज्ज झाले आहेत.

त्यामुळं आता सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती तारखा जाहीर होण्याची.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.