अजित पवार असं का म्हणाले की, ‘सुप्रियाच्या विरोधात सुनेत्राला उमेदवारी देऊन चुकलो’?

फोटो स्रोत, X/@AjitPawarSpeaks
- Author, नीलेश धोत्रे
- Role, बीबीसी मराठी
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्या जोडीत अनेक साम्य आहेत. मात्र, एका गोष्टीत त्यांच्यात अद्याप साम्य नाहीय, ती गोष्ट कुठली हे आपण पुढे पाहूच. पण हे नसलेलं साम्यही खरं ठरतंय की काय, अशी शक्यता आता निर्माण झालीय.
ती गोष्ट म्हणजे, शरद पवार यांना विरोधपक्ष नेतेपदापर्यंत मजल मारूनही त्याच्या पुढची पायरी म्हणजे पंतप्रधानपद काही गाठता आलं नाही. अर्थात, यासाठी शरद पवार यांची राजकीय पावलंसुद्धा कारणीभूत आहेत.
तसंच, अजित पवार यांचीही मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाही. अजित पवारही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेतेपदापर्यंत मजल मारू शकलेत.
पण आता त्यांनीसुद्धा त्यांच्या काकांनी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती केली आहे का? या चुका त्यांच्या लक्षात आल्याने त्या सुधारण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे का? असे प्रश्न सहज उपस्थित होतात.
हे प्रश्न पडण्याचं मुख्य कारण आहे, ते म्हणजे, अजित पवार यांनी केलेलं एक वक्तव्य.
जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार म्हणाले की, “मागच्या काळात माझ्याकडून चूक झाली. मी माझ्या बहिणीविरोधात सुनेत्राला (पत्नी) उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं, पार्लमेंटरी बोर्डानं निर्णय घेतला. परंतू आता जे झालं, एकदा बाण सुटल्यावर परत आता आपण काही करू शकणार नाही. पण आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं.”
आता पुढचा प्रश्न हा आहे की, अजित पवार यांनी आपल्याकडून चूक झाली आहे हे आताच का मान्य केलं? हे त्यांना निवडणुकांचे निकाल आले, तेव्हाही लगेच बोलता आलं असतं किंवा विधानसभा निवडणुकांच्या निकालांनंतरही बोलता आलं असतं.

फोटो स्रोत, X/@AjitPawarSpeaks
जनसन्मान यात्रा सुरू असताना आणि ऐन विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीत अजित पवारांनी आपण चुकलो, असं म्हटल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
अर्थात, अजित पवार यांच्या परतीची दोर कापले गेलेत, असं शरद पवारांनी आधीच स्पष्ट केलंय. पण तरीही अजित पवार परतीची चाचपणी करत आहेत की त्यांना आणखी काही साध्य करायचं आहे?
तर त्याचं उत्तर आहे फक्त 3.60 टक्क्यांमध्ये.
हा आकडा आहे नुकत्याच झालेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल्या मतांच्या टक्केवारीचा. अर्थात त्यांनी फक्त 48 पैकी फक्त 4 जागा लढवल्या आणि जिंकली एक.
अजित पवार जिंकलेल्या एका जागेपेक्षा हारलेल्या एका जागेसाठी राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरले.
तिकडे शरद पवार यांच्या नेतृत्वात लढलेल्या पक्षाला 10.27 टक्के मिळाली. त्यांनी 10 जागा लढवल्या आणि 8 खासदार निवडून आले.


तरीही अजित पवार यांनी सर्व मरगळ झटकून टाकली. पत्नी सुनेत्रा यांना राज्यसभेवर पाठवलं आणि विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली.
निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पॉलिटिकल आणि पीआर एजन्सींची मदत घेतली आहे. त्यांचं गुलाबी जॅकेट त्यातूनच पुढे आल्याची चर्चा आहे.
गुलाबी रंगाचं जॅकेट घालून अजित पवार यांनी राज्यभर यात्रा काढलीय. (अर्थात हे गुलाबी जॅकेट नसल्याचा अजित पवार यांचा दावा आहे.)
अजित पवारांनी थेट लोकांमध्ये जायला सुरुवात केलीय. त्यांच्या यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादाचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावरून प्रसारित केले जात आहेत.
या यात्रेच्या माध्यमातून निर्माण केलेलं चित्र तरी सर्वकाही अलबेल असल्याचं सांगतंय, मग अजित पवारांनी चुकीची कबुली का दिली?

फोटो स्रोत, X/@AjitPawarSpeaks
याचं विश्लेषण करताना ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे एका म्हणीची आठवण करून देतात.
“तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणं. इथं म्हणायचं तर कुटुंब गेलं, विजय हाती आला नाही आणि नचक्की झाली. अशी अजित पवार यांची स्थिती झाली आहे. त्यामुळेच आता ते सर्व शक्यता पडताळून पाहात आहेत,” असं राजेंद्र साठे यांना वाटतं.
शिवाय, या कबुलीच्या माध्यमातून भाजपच्या दबावाखाली आपण चुकीचे निर्णय घेतले हे अजित प्रतित करुन द्यायचं आहे, असंही राजेंद्र साठेंना वाटतं.
कारण भाजपमुळे अल्पसंख्याक आणि दलित मतदार आपल्यापासून दुरावला अशी भावना अजित पवारांच्या पक्षात आहे. काही नेत्यांनी ते अप्रत्यक्षपणे बोलूनही दाखवलं आहे.
दुसरीकडे, अजित पवार आणि भाजपमध्ये सर्वकाही अलबेल आहे, असंही म्हणता येणार नाही. कारण भाजपचे नेते त्यांच्यावर थेट टीका करत नसले, तरी भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र अजित पवार आणि त्यांच्या पक्षाला लक्ष्य केलेलं आहे.
विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा आता सुरू झाली आहे. जास्तत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न महायुतीतल्या तिन्ही पक्षाचा आहे. भाजप कुठल्याही स्थितीत 150 जागांच्या खाली येणार नाही, असं आता वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये येऊ लागलं आहे. त्याखालोखाल जागा पदरात पाडून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनीसुद्धा जोर लावलाय.
या महायुतीत अजित पवार यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकाचा ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या पदरात तिसऱ्या क्रमांकाच्या जागा पडण्याची चर्चा सध्या सुरू आहे आणि आता हे अजित पवार यांच्यासुद्धा लक्षात येतंय.

फोटो स्रोत, X/@PawarSpeaks
“अजित पवारांची कोंडी झाली आहे आणि प्रचाराला बाहेर पडल्यावर त्यांना लक्षात येतंय की, त्यांची कशी अडचण होतोय ते. त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्येही त्यांना यंदाची निवडणूक सोपी नाही हे आता लक्षात आलं आहे, पार्थ पवारांच्या पिंपरी चिंचवडमधल्या वक्तव्यांतून ते दिसून येतंय,” असं निरीक्षण राजेंद्र साठे नोंदवतात.
आता पदरात जगा कमी पडणं म्हणजे कमी जागा निवडून येणं आणि कमी आमदार निवडून येणं म्हणजे छोट्या समूहाचं नेतृत्व करणं. म्हणजे आपसूकच 'बार्गेनिग पॉवर' कमी होणं. ज्याचा थेट परिणाम महत्वाकांक्षेवर होतो आणि त्याला मुरड पडते.
त्यासाठी छोटं उदाहरण द्यायचं झालं तर 1999 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून आतापर्यंत झालेल्या कुठल्याही लोकसभा निवडणुकीत त्यांना दोन आकडी खासदार निवडून आणता आलेले नाहीत. राज्यात स्वबळावर सत्ता आणता आलेली नाही.
1999 च्या आधीपर्यंत शरद पवार काँग्रेसचे बडे नेते होते. लोकसभेतले विरोधी पक्षनेते होते. पण नंतर त्यांची बार्गेनिंग पॉवरही कमी झाली आणि पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेलासुद्धा त्यांना मुरड घालावी लागली.
“एक आकडी खासदारांच्या बळावर पंतप्रधानपदाची स्वप्न पाहता येत नाही,” असं त्यांनी नंतर बोलून दाखवलं होतं.
म्हणूनच मग अजित पवार यांचं हे वक्तव्य त्यांच्या काकांनी केलेल्याच चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न आहे का? आगामी काळच याचं उत्तर देईल. मात्र, या प्रश्नानं राजकीय वर्तुळाला चर्चेस मुद्दा दिलाय, हे निश्चित.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











