दसरा मेळाव्यांच्या भाषणांत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांचे दसरा मेळावे झाले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या दसरा मेळाव्यात दोन्ही शिवसेनेच्या गटांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर शिवसेना - एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर झाला.
यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांनीही एकमेकांवर सडकून टीका केली. प्रथमच आदित्य ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाषण केलं.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
केंद्रीय यंत्रणांसह सर्व शक्ती पणाला लावून दिल्लीकरांनी उद्धव ठाकरेला संपवण्याचा प्रयत्न केला. पण जोपर्यंत जनता माझ्याबरोबर आहे, तोपर्यंत कुणाला घाबरणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितलं.
टाटांनी लज्जत वाढवण्यासाठी मीठ दिलं पण आताचे उद्योगपती मिठागरं गिळायला निघाली आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी धारावीच्या मुद्द्यावरून टीका केली.
यावेळी उद्धव ठाकरेंनी कौरवांची उपमा देत भाजपवर टीका केली. देशात दुसरा कोणताही पक्ष शिल्लक राहणार नाही, असे भाजपचे प्रयत्न असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यातही पैसा खाल्ला, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार, अशी घोषणा त्यांनी केली. त्याचबरोबर प्रत्येक राज्यात मंदिर व्हायला पाहिजे असंही ते म्हणाले.
ईव्हीएमसारखा छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करू नका, असं ते म्हणाले.
मोहन भागवत जे काही सांगत आहेत, ते कुणासाठी सांगत आहेत? असा प्रश्न उद्धव ठाकरेनी केला. हिंदूंना स्वसंरक्षणासाठी पुढं या असं भागवत म्हणतात, मग मोदी कशाला पाहिजे असं त्यांनी म्हटलं.
गद्दारांना आणि चोरांना नेता बनवून आमच्याशी लढावं लागतं, यातंच भाजपचा पराभव असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
गायीला राज्यमाता मानता पण आईचा हंबरडा ऐकू येत नाही. फक्त महागाई आवरता येत नसल्यानं गाईच्या मागे लपणं सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली.
शिंदे सरकारनं अनेक कामांत भ्रष्टाचार केला असून त्याची सरकार आल्यानंतर चौकशी करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. राज्य सरकारने कर्ज घेण्याची पुढची मुदत वापरली असल्याची टीका त्यांनी केली.
सरकार आल्यानंतर सर्वात आधी धारावीचं टेंडर रद्द करणार. त्याठिकाणी पोलीस, गिरणी कामगार आणि मुंबईतील मराठी माणसाला जागा देणार असं ते म्हणाले. बदलापूर प्रकरणातील इतरांना वाचवण्यासाठी या प्रकरणातील आरोपीला गोळी घातली असल्याचा आरोप ठाकरेंनी केला.
तीन सर न्यायाधीशांची कारकिर्द संपली पण निकाल लागत नाही, अशी जगातली विचित्र केस असल्याचं, उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री बनल्यानंतर घेतलेल्या शपथेचा व्हीडिओदेखिल यावेळी दाखवला. त्यानंतर एक शपथ घेतली आणि उपस्थितांनाही शपथ दिली.


काय म्हणाले एकनाथ शिंदे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच बाळासाहेब ठाकरे यांच्या उल्लेखापासून केली. ते म्हणाले की, "अलीकडे आता बाळासाहेबांचं नाव घ्यायला आणि त्यांना हिंदूहृदयसम्राट म्हणायलाही काहींना लाज वाटत आहे.
मात्र, हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोटींनाच ही लाज वाटत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यांपासून आपण शिवसेना मुक्त केली आहे," असा दावाही त्यांनी केला.
बाळासाहेबांची सगळी स्वप्ने पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली, असंही ते म्हणाले.
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, "महाराष्ट्र विरोधी आघाडीला घरी पाठवून आपलं सरकार आलं तेव्हा ते सरकार टिकणार नाही आणि ते सहा महिन्यांतच पडेल, अशी टीका अनेकांनी केली. मात्र, आपण ठासून दोन वर्षे पूर्ण केली."
आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये केलेल्या उठावाचं समर्थन करणारी विधाने वारंवार केली. ते म्हणाले की, "अडीच वर्षांपूर्वी हा उठाव केला नसता तर शिवसेनेचं खच्चीकरण होत राहिलं असतं आणि महाराष्ट्र अनेक वर्षे मागे पडला असता. आपल्या सरकारमार्फत आपण आपलं राज्य पहिल्या क्रमांकावर आणलं," असा दावाही त्यांनी केला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
एकनाथ शिंदे यांनी वारंवार 'लाडकी बहिण' योजनेचाही उल्लेख केला. 'लाडक्या बहिणी सरकारच्या ब्रॅण्ड अॅम्बेसिडर झाल्या आहेत' असा दावा करतानाच 'माझ्या लाडक्या बहिणींच्या विरोधात विरोधक कोर्टात गेले', अशीही टीकाही त्यांनी विरोधकांवर केली.
"करोनाला लपून बसलेला हा मुख्यमंत्री नसून लोकांसाठी रस्त्यावर उतरलेला हा मुख्यमंत्री आहे. माझ्या दाढीवरून माझ्यावर टीका केली जाते. मात्र, याच दाढीवाल्याने महाविकास आघाडी उद्धवस्त केली. त्यामुळे मला हलक्यात घेऊ नका, मी घरात बसणारा मुख्यमंत्री नाही", असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
"महाराष्ट्रात सत्तांतर झालं नसतं तर सकाळी मोरु उठला, मोरुने अंघोळ केली आणि मोरु परत झोपला हेच सुरू राहिलं असतं," असंही ते म्हणाले.
हरियाणामध्ये भाजपची सत्ता पुन्हा आल्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, "हरियाणाच्या लोकांनी विरोधकांना दाखवून दिलं आहे. हरियाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही", असा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला.
संविधान कुणीही बदलू शकत नाही. संविधान बदलणार नाही. कुठल्याही समाजावर अन्याय न करता न्याय देणार, असं म्हणून त्यांनी संविधानाबद्दल विरोधकांच्या प्रचाराला प्रत्युत्तर देण्याचाही प्रयत्न केला.
दसरा मेळाव्यात पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांचं भाषण
शिवतिर्थावरच्या दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाषण केलं. या भाषणात आदित्य ठाकरे यांनी 'स्वत:साठी खोके, राज्याला धोके' असा मिंधे सरकारचा कारभार आहे, अशी टीका केली. ते म्हणाले की, "आगामी विधानसभेची लढाई महत्त्वाची लढाई असून आपण गेली दोन वर्षे ज्या क्षणाची वाट बघतो आहोत, तो क्षण लवकर येणार आहे.
लवकरच राज्याची निवडणूक जाहीर होणार आहे. मात्र, जोपर्यंत अदाणींचं सगळं काम होणार नाही, तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही, असं मला एका अधिकाऱ्यांनी खासगीत सांगितलं, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
"ही लढाई वैयक्तीक नव्हे तर महाराष्ट्राची लूट थांबवण्यासाठीची लढाई आहे. मुंबईला अदाणीच्या घशात घालू द्यायचं का, याचा निर्णय जनतेला घ्यायचा आहे. मित्रांना अनेक प्रकल्पांचं वाटप करणं सुरू आहे . ते थांबवण्यासाठी आपल्याचा एकजूट दाखवायची आहे", असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











