सुप्रीम कोर्टात आश्वासन देऊनही महाराष्ट्रात विखारी भाषणांना मोकळं रान मिळतंय का?

देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे (संग्रहित छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे (संग्रहित छायाचित्र)
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

“पोलिसांना एक दिवसाची सुट्टी देतो. तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि आम्ही हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानात येतोय. आम्हाला बघायचं आहे की दुसऱ्या दिवशीची सकाळ हिंदू बघतात की मुसलमान...”

भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगली जिल्ह्यातल्या शिराळा इथं सभेत बोलताना असं चिथावणीखोर वक्तव्य केलं होते. पण, अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे असं नाही.

सप्टेंबर महिन्यातच आतापर्यंत त्यांनी तिसऱ्यांदा आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्याआधीही त्यांनी अशी अनेक वक्तव्यं केली आणि त्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे.

यावर नितेश राणेंनी हिंदुंची बाजू घेणं म्हणजे दंगली भडकावणं नसतं असं स्पष्टीकरण दिलं आहे. तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, नितेश राणेंशी चर्चा केली असून ते काळजी घेतील असं म्हटलं आहे.

महाराष्ट्र सरकारनं हेट स्पीचवर आळा घालण्याचं आश्वासन गेल्यावर्षी सुप्रीम कोर्टात दिलं होतं. पण तरीही विखारी भाषणांचं प्रमाण कमी होत नसल्याचं चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी याआधी कोणकोणती वादग्रस्त वक्तव्य केली, त्यांच्यावर कुठे कुठे गुन्हे दाखल झाले? आणि त्या गुन्ह्यानंतर काही कारवाई झाली का? या वक्तव्यांबद्दल कायद्यामध्ये काय म्हटलंय? चिथावणीखोर भाषणं करणाऱ्या नितेश राणेंना महाराष्ट्राच्या गृहविभागाचं अभय आहे का? अशा वारंवार उपस्थित होणाऱ्या प्रश्नावंर आपण चर्चा करुयात.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

नितेश राणे यांनी याआधी कोणकोणती वक्तव्य केली आणि कुठे गुन्हा दाखल झाला?

1) अहमदनगरमधल्या श्रीरामपूरमध्ये सकल हिंदू समाजानं रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता. यावेळी झालेल्या भाषणात नितेश राणे यांनी मुस्लीम धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

“मी हिंदूंचा गब्बर आहे. आपल्या वाकड्यात जायचं नाही. मी चालायला लागलो तर लोक दरवाजे बंद करतात. जर कोणी मस्ती केली तर चून चून कर मारेंगे. रामगिरी महाराजांना विरोध केला तर मशिदीत घुसून मारू,” असं चिथावणीखोर वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं.

यानंतर अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात कलम 353(2), 351(1) आणि 302 भारतीय न्याय संहितेच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.

तसेच श्रीरामपूर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला होता. शिवाय नागपुरातल्या गिट्टीखदान पोलीस ठाण्यातही त्यांच्याविरोधात कलम 353(2), 352, 302, 299 आणि 196 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच त्यांच्याविरोधात भिवंडीच्या भोईवाडा पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला आहे.

नितेश राणे

फोटो स्रोत, facebook/NiteshRane23

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

2) 13 सप्टेंबरला नवी मुंबईत गणेश उत्सवाचा कार्यक्रम होता. यावेळी त्यांनी एका विशिष्ट धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं.

“प्रत्येक हिंदुंना आवर्जून सांगतो, तुम्ही ज्याच्यासोबत व्यवहार करता ते हिंदूच असले पाहिजे. व्यवहार करताना आधारकार्ड बघा. ते स्वतःचं नाव पण बरोबर सांगत नाही. प्रत्येकानं एक शपथ घेतली पाहिजे मी फक्त हिंदुंसोबतच व्यवहार करणार. आपल्याला या हिरव्या सापांना वाढू द्यायचं नाही. या हिरव्या सापांना दूध पाजायचं नाही. ते आपले कधीच होणार नाहीत. फक्त हिंदुंनाच आर्थिक सक्षम बनवायचं आहे. सर्वधर्म समभाव आपण मानायचा नाही. भाईचारा वगैरे त्यांच्या XXX घाला, अशी अर्वाच्य भाषा वापरत त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं.

यानंतर त्यांच्याविरोधात तक्रार झाल्यानंतर 15 सप्टेंबरच्या रात्री नितेश राणे यांच्याविरोधात नवी मुंबईतल्या एनआरआय पोलिसांनी चिथावणीखोर वक्तव्य आणि दोन समाजात द्वेष पसरवणारं वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

3) 13 ऑगस्टला नितेश राणे यांनी सांगलीतल्या पलूस इथं पोलिसांनाच धमकी दिली होती.

“सरकार हिंदूंचं आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की, जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही,” अशी धमकी त्यांनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर पुण्यात सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्थेकडून 14 ऑगस्टला निदर्शन करण्यात आली होती.

4) नितेश राणे यांनी अकोल्यात 18 फेब्रुवारीला पोलिसांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. “पोलीस आमच्या राज्यात आम्हाला काय करणार? त्यांना जागेवर राहायचे आहे की नाही? ते माझ्या भाषणाचे चित्रिकरण करून केवळ बायकोला दाखवू शकतील. पोलीस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत”, असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी अकोल्यात केलं होतं.

नितेश राणे आणि भाजपचे आमदार टी. राजा

फोटो स्रोत, facebook/NiteshRane23

5) याआधी 27 जानेवारीला सोलापुरातील माळशिरस इथंही त्यांनी अधिकाऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्यं केलं होतं. “माझं काही वाकडं होणार नाही. आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय. कोणत्याही अधिकाऱ्यानं आपल्याकडं वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याच्या कानाखाली 12 वाजवल्याशिवाय गप्प बसायचं नाही”, असं चिथावणीखोर वक्तव्य नितेश राणे यांनी माळशिरस इथं केलं होता. त्यांनी फडणवीसांना त्यांचा बॉस म्हटलं होतं.

पोलिसांबद्दलच्या वक्तव्यावरून कुठंही गुन्हा दाखल झाल्याची माहिती आम्हाला मिळाली नाही.

6) तसंच 6 जानेवारीला सोलापुरात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढला होता. या सभेत नितेश राणे आणि भाजपचे आमदार टी. राजा यांनी प्रक्षोभक वक्तव्य केली होती.

“सोलापुरातल्या या जिहाद्यांना, या हिरव्या सापांना सांगेन की, आमच्या नादाला लागू नका. आमच्या हिंदू समाजाच्या कोणावरही कुठलाही अन्याय कराल, तर न सांगता सोलापुरात येऊन आपल्याबरोबर कुठेही घेऊन जाऊ. आम्हाला कोणी काही करू शकत नाही. कारण हे हिंदू राष्ट्र आहे. हिंदू समाज म्हणून तुम्ही जागृत व्हाल तर कुठलाही पोलीस तुमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहू शकणार नाही.

दोन्ही भाजप आमदारांविरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी राणे आणि टी. राजा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

लाल रेष

लाल रेष

नितेश राणेच नव्हे, इतरांननीही केली चिथावणीखोर वक्तव्यं

1) नांदेड जिल्ह्यातील बिलोली इथं रामनवमीनिमित्त 7 एप्रिल 2023 रोजी कार्यक्रम आयोजित केला होता. तिथं कालीचरण महाराजांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी मुस्लीम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. देशात फक्त काही लोकांमुळंच दंगली होतात, असंही ते म्हणाले होते. त्यांच्या भाषणाची क्लीप व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात नांदेड पोलिसांनी 13 एप्रिला 2023 ला गुन्हा दाखल केला.

कालीचरण महाराज

फोटो स्रोत, CG KHABAR/BBC

फोटो कॅप्शन, कालीचरण महाराज

2) गुजरातमधील सोशल मीडिया इंफ्लूएंसर काजल हिंदूस्थानी या महिलेनं नवी मुंबईतल्या वाशीत सकल हिंदू समाजाच्या सभेत 26 फेब्रुवारीला विशिष्ट समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तसंच आमचा हिंदू समाज फळ विक्रेता आणि भाजी विक्रेत्या अब्दुलवर बहिष्कार टाकत आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर जवळपास दोन महिन्यानंतर 27 एप्रिलला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पण, पुढील कारवाई झालेली दिसली नाही.

3) लातूरमध्ये 19 फेब्रुवारी 2023 रोजी शिवजयंतीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तेलंगणाचे भाजप आमदार टी. राजा. यांनी एका विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यात त्यांनी हिंदू-मुस्लीम कधीच भाऊ-भाऊ होऊ शकत नाही यासह बरंच काही आक्षेपार्ह बोलले होते. त्यांच्यावर दहा दिवसानंतर 28 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला होता. यानंतरही टी. राजा यांनी सोलापूर आणि मीरा भाईंदर इथं आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत.

सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारचं निवेदन

हेट स्पीचच्या संदर्भातील एका सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानं गेल्यावर्षी एका सुनावणीत अशा वक्तव्यांना आळा घालण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले होते. त्यावेळी सरकार त्यांच्या बाजूनं पूर्ण कारवाई करत असल्याचं निवेदन महाराष्ट्र सरकारनं सु्प्रीम कोर्टात दिलं होतं.

महाराष्ट्रातील सकल हिंदू समाजाच्या मोर्चा आणि सभांतील हेट स्पीचबाबत केरळचे पत्रकार शाहीन अब्दुल्ला यांनी फेब्रुवारी 2023 सुप्रीम कोर्टात याचिका केली होती. चिथावणी खोर वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर या सभांवर बंदी घालण्याची मागणी त्यात करण्यात आली होती. त्यावेळी कोर्टानं राज्य सरकारला निर्देश दिले होते.

सर्व पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्तांना महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांनी सुमोटो गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचंही सरकारनं सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं.

पण याच्या एका वर्षानंतरही राज्यातील हेट स्पीच संदर्भातील गुन्ह्यांच्या स्थितीत फार काही बदल झाला नसल्याचं इंडियन एक्सप्रेसच्या एका आरटीआयद्वारे स्पष्ट झालं आहे.

त्यामुळं सरकारनं सुप्रीम कोर्टात आश्वासन देऊनही चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यांना मोकळीक मिळत असल्याची चर्चा आहे.

नितेश राणेंची वक्तव्य म्हणजे हेट स्पीच?

ही आहेत नितेश राणे यांनी केलेली काही आक्षेपार्ह वक्तव्य. पण, त्यांची ही वक्तव्य हेट स्पीचमध्ये बसतात का? याबद्दल कायदा काय सांगतो?

तर “नितेश राणेंची वक्तव्य ही दोन सामाजिक घटकांमध्ये द्वेषभावना, वैमनस्य वाढेल अशाप्रकारची निश्चितच आहे. हे हेट स्पीच आहे,” असं राज्य गुप्तचर विभागाचे अतिरिक्त उपायुक्त शिरीष इनामदार सांगतात.

बीबीसी मराठीसोबत बोलताना ते म्हणाले की, अशा प्रकरणात पोलिसांनी कोणाची तक्रार येण्याची वाट न बघता सुमोटो दाखल करणं आवश्यक असून पुढील कारवाई करणं गरजेचं आहे.

“मशिदीत घुसून मारण्याची भाषा करत असतील तर शंभर टक्के हे हेट स्पीच आहे. हा दखलपात्र गुन्हा असून अशी द्वेषपूर्ण वक्तव्य ही गंभीर समस्या आहे. पोलिसांनी सत्ताधारी पक्षाच्या किंवा नेत्याच्या दबावाला बळी न पडता कारवाई करायला पाहिजे आणि त्या कारवाईला कोर्ट, माध्यमं आणि नागरिकांनी सुद्धा पाठिंबा द्यायला हवां”, असं माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर म्हणतात.

कार्ड

अशी चिथावणीखोर वक्तव्य, दोन समाजांमध्ये दुही निर्माण करणं, द्वेषपूर्ण भाषण करणं या प्रकरणात 196, 299, 353 अशा भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला जातो.

नितेश राणेंवर काही ठिकाणी असे गुन्हे दाखल झाले. पण, गुन्हा दाखल झाल्यानंतरची पुढची प्रक्रिया काय असते? याबद्दल माजी आपीएस अधिकारी शिरीष इनामदार सविस्तर समजावून सांगतात.

ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, “गुन्हा दाखल झाल्यानंतर प्राथमिक चौकशी केली जाते. त्यानंतर आरोपीला बोलवून त्याची चौकशी केली जाते. यामध्ये आरोपीचा हेतू कळतो. त्याला हे करण्यामागे कोण प्रोत्साहीत करतं, कोण साथ देतं या गोष्टी कळतात. त्याला साथ देणाऱ्या लोकांनाही सहभागाप्रमाणे सहआरोपी करतात.

त्याला अटक करून साक्षीदारांचा जबाब नोंदवून अशा वक्तव्यांमधून तिरस्कार वाढला का? वैमनस्य वाढलं का? सामाजिक शांतता भंग झाली का? हे तपासून आरोपपत्र दाखल करायचं असतं. दरम्यानच्या काळात त्याला जामीन मिळू शकतो. पण, एखादा आरोपी गुन्ह्याची पुनरावृत्ती पुन्हा करणार असेल, पुरावा नष्ट करणार असेल तर जामीन नाकारला जातो. असं वक्तव्य किंवा हा गुन्हा पुन्हा करता येणार नाही अशा अटी घालून कोर्ट देखील जामीन देतं.”

पण, नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल होऊनही पुढची प्रक्रिया का झाली नसेल? त्यांना अटक का झाली नसेल?

याबाबत माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, “आम्ही तपास करतोय, अद्याप चौकशी सुरू आहे किंवा त्यांचं वक्तव्य कायदा आणि न्यायव्यवस्थेकडे छाननीसाठी पाठवलं आहे असे सबब पोलीस देऊ शकतात. त्यामुळेच कदाचित त्यांच्यावर पुढची कारवाई झालेली नसेल.”

सोबतच सध्याचं हे चित्र पाहून आमच्यासारख्या जुन्या अधिकाऱ्यांना दुःख होत असल्याचीही खंतही खोपडे बोलून दाखवतात.

सुप्रीम कोर्टानं चिथावणीखोर भाषणांबद्दल काय म्हटलं?

सुप्रीम कोर्टानंही याआधी 2022 मध्ये धार्मिक सभांमध्ये अल्पसंख्याक समाजाविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती.

आपण धर्माच्या नावावर कोणत्या स्तराला येऊन पोहोचलो आहोत? असा सवाल करत सरकारनं अशा प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करण्याचे आदेश न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठानं दिले होते.

मुस्लीम समाजाविरोधात आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर भाषणं तत्काळ थांबवण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी करणारी याचिका शाहीन अब्दुल्ला यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती.

त्यावर सुनावणी करताना एका धर्मनिरपेक्ष देशात अशा गोष्टी होणं धक्कादायक असल्याचं कोर्टानं म्हटलं होतं. तसेच सरकारनं आणि पोलिस अधिकाऱ्यांनी तक्रार येण्याची वाट न बघता स्वतः कारवाई करायला पाहिजे, असे निर्देशही सुप्रीम कोर्टानं त्यावेळी दिले होते.

नितेश राणेंना गृहविभागाचं अभय आहे का?

कायद्यानुसार हेट स्पीचच्या प्रकरणात सरकारनं, पोलिसांनी वाट न बघता स्वतः कारवाई करणं अपेक्षित असतं. पण, नितेश राणे वारंवार अशी वक्तव्य करून देखील त्यांच्यावर कारवाई होत नाही. मग त्यांना राज्यातल्या गृहविभागाचं अभय आहे का? त्यांना गृहविभागाचा पाठिंबा आहे का?

आता हे प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे नितेश राणेंबद्दल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली प्रतिक्रिया.

नितेश राणेंचे वक्तव्य खपवून घेणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला होता. तसेच त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केल्याचंही वृत्त होतं. यावरच देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.

“अजित पवार यांनी कोणाकडे तक्रार केली माहिती नाही. पण नितेश राणे हिंदुत्ववादी आहेत. ते हिंदुत्वाचे विषय अतिशय तडफेने मांडतात. कधी कधी त्यांच्या बोलण्याचे वेगळे अर्थ निघतात. पण नारायण राणे साहेबांनी आणि मी देखील त्यांच्यासोबत चर्चा केली आहे. त्यामुळे नितेश काळजी घेतील”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, नितेश राणे आणि नारायण राणे

फोटो स्रोत, facebook/NiteshRane23

फोटो कॅप्शन, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, नितेश राणे आणि नारायण राणे

फडणवीसांच्या याच वक्तव्यावरून गृहखात्याचा, फडणवीसांचा नितेश राणेंना पाठिंबा असल्याचं दिसतंय, असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राजेंद्र साठे यांना वाटतं.

ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, “फडणवीसांच्या या वक्तव्यावरून देखील त्यांचा नितेश राणेंना पाठिंबा आहे हे त्यांनी मान्यच केलं आहे. गृहमंत्री असं वक्तव्य करत असतील तर हे त्यांच्या सांगण्यावरून सर्व काही सुरू आहे असं म्हणता येतं."

तसेच तुम्ही कितीही वरिष्ठांकडे तक्रारी करा आम्ही आमचा अजेंडा सुरूच ठेवणार, असा अप्रत्यक्षपणे इशारा फडणवीसांनी अजित पवारांना दिलाय, असंही ते म्हणाले.

नितेश राणेंचे भडकावू वक्तव्य चूक की बरोबर याबाबत त्यांच्या पक्षानं, त्यांच्या नेत्यांनी आजपर्यंत खुलासा केलेला नाही. त्यामुळे हे सगळं पक्षाच्या आदेशावरून चाललेलं आहे हे म्हणायला वाव आहे. भाजपनं अशी वक्तव्य करण्यासाठी नितेश राणेंना मुद्दाम सोडलेलं आहे, असं साठे म्हणाले.

 देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, कार्ड

राजकीय विश्लेषक उदय ताणपाठक यांचं मत मात्र वेगळं आहे. त्यांना वाटतं की देवेंद्र फडणवीस अशा चिथावणीखोर वक्तव्यावर काय बोलतील? ते कितीही म्हटले की, नितेश राणे हिंदुत्वाची भूमिका मांडतात तरी अशा वक्तव्यांमुळे देवेंद्रजींचा नाईलाज झाला आहे.”

ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, देवेंद्रजी काय करणार आहेत? असे वाचाळवीर नेते त्यांना, भाजपला डोईजड झाले आहेत. देवेंद्रजींनी नारायण राणेंना सांगितलं. आता मुलाला समज द्यायची जबाबदारी वडिलांची आहे. नितेश राणेंवर पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे. सोबतच सगळ्याच पक्षातील वाचाळांवर कारवाई व्हायला पाहिजे.”

नितेश राणेंचे स्पष्टीकरण

नितेश राणेंच्या वक्तव्यावरून गदारोळ झाल्यानंतर याआधीही त्यांनी माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिलं होतं. त्यांनी 19 सप्टेंबरला सांगलीत बोलतानाही अशा वक्तव्यांवर त्यांची बाजू मांडली होती.

“हिंदुंची बाजू घेणं म्हणजे दंगली भडकवणं नाही. बाळासाहेब ठाकरेंनीही हिंदुंची बाजू घेतली होती. त्यांना काय दंगली भडकवायच्या होत्या का? कितीही तक्रारी झाल्या तरी हिंदूत्वाच्या भूमिकेत कुठेही तडजोड करणार नाही. मी आमदार आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाहीतर हिंदू म्हणून मी लढतोय,” असं नितेश राणेंचं म्हणणं आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.