मोहन भागवत म्हणतात तसं खरंच शिवरायांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधली आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, श्रीरंग गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी शोधून लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला, असे नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले.
त्यावर ही समाधी महात्मा फुलेंनी शोधल्याचा इतिहास असताना भागवत दिशाभूल करत आहेत, असे म्हणत ठिकठिकाणी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर या शिवसमाधीचा इतिहास काय आहे यावर टाकलेली एक नजर.
‘‘शिवछत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी रायगडी जाण्यास निघालो. समाधीची जागा शोधण्यात 2/3 दिवस गेले. घाणेरी व इतर जंगली झुडपे कुऱ्हाडीने तोडीत रस्ता काढावा लागला. शिवजन्मोत्सव साजरा करावा म्हणून समाधीवरील सर्व कचरा धुऊन काढून त्यावर फुले वाहिली. त्यांचे स्मारक म्हणून मी अल्प काव्य केले आहे ते त्यांना समर्पण करतो.”
छत्रपती शिवाजी महारांजाची समाधी शोधण्यासाठी काय प्रयत्न करावे लागले यासंबंधी महात्मा जोतिराव फुले यांनी हा मजकूर लिहिला आहे. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र मानले जाणाऱ्या 'दीनबंधू' या वृत्तपत्रात हा मजकूर पाहायला मिळतो. महात्मा फुलेंनी लिहिलेला हा लेख नंतरच्या काळात म्हणजेच 27 मे 1938 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता.
कोल्हापूरचे भाई माधवराव बागल यांनी लिहिलेला यासंबंधीचा लेख महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या ‘महात्मा फुले साहित्य आणि चळवळ’ या ग्रंथातही प्रसिद्ध करण्यात आला आहे.
शिवरायांची समाधी शोधल्यानंतर महात्मा फुले यांनी त्यांच्यावर एक दीर्घ पोवाडा लिहिला.
‘कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा। छत्रपती शिवाजीचा’।। अशा ओळींनी सुरू होणारा हा पोवाडा प्रसिद्ध आहे.


मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत नुकतेच पुण्यात एका कार्यक्रमात म्हणाले, ‘शिवाजी महाराजांचं स्मरण व्हावं आणि जागरण व्हावं म्हणून रायगडावर उत्सव सुरू केला. टिळकांनीच ते सर्व शोधून काढलं.’
यामुळे हा महात्मा फुलेंचे श्रेय नाकारण्याचा प्रकार असल्याचा आरोप करत भागवत यांचा महाराष्ट्रात ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे.
दोन वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनीही भाषणात रायगडावरील शिवछत्रपतींची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली, असे वक्तव्य केल्यावर वाद निर्माण झाला होता.
अनेक वर्षे शिवछत्रपतींची समाधी उपेक्षित
शिवछत्रपतींच्या समाधीच्या शोधाचा घटनाक्रम ‘बीबीसी’ला सांगताना इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, "1680 मध्ये शिवछत्रपतींचे देहावसान झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी बांधली. मात्र मधल्या काळात ती विस्मृतीत गेली. कारण नंतरच्या काळात रायगड किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेला.
"जवळपास 50 वर्षे रायगड मुघलांच्या ताब्यात होता. नंतर हा किल्ला सिद्दीकडे गेला. 1733 मध्ये साताऱ्याच्या शाहू महाराजांनी रायगड सिद्दीकडून जिंकला. तो पुढे पोतणीसांकडे गेला. त्यांच्याकडून पेशव्यांनी जिंकून घेतला.
"1818 मध्ये रायगड इंग्रजांनी पेशव्यांकडून जिंकून घेतला आणि किल्ल्यावर सर्वसामान्यांना येण्यास बंदी घातली. यादरम्यानच्या काळात शिवरायांच्या समाधीची काय परिस्थिती होती, याबाबतची कागदपत्रे अद्याप उजेडात आलेली नाहीत, असं इंद्रजित सावंत सांगतात.

10 मे 1818 रोजी इंग्रज सेनापती कर्नल प्रॉथर याने पेशव्यांकडून रायगड ताब्यात घेतला. तहानुसार किल्ल्यावर असणाऱ्या दुसऱ्या बाजीरावांच्या पत्नी वाराणशीबाई यांना पुण्याला पाठविण्यात आले. त्यानंतर कर्नल प्रॉथर याने संपूर्ण किल्ल्याची पाहणी केली. त्यावेळी त्याला तिथे शिवरायांची समाधी दिसली.
एवढ्या महान राजाच्या समाधीकडे दुर्लक्ष झाल्याचे त्याला आश्चर्य वाटले. आपल्या पत्रव्यवहारात त्याने त्याबाबत लिहिले. हाच शिवरायांच्या समाधीचा पहिला लिखित उल्लेख! 1890च्या दशकात छापण्यात आलेल्या ‘कुलाबा गॅझेटियर’मध्ये ही नोंद करण्यात आली आहे.
‘मराठा अँड पेंढारी वॉर’ या पुस्तकात या ब्रिटिशांनी केलेल्या सविस्तर नोंदी वाचायला मिळतात. त्यानंतर 1869मध्ये शिवरायांची समाधी पाहिलेले महात्मा फुले हे पहिले एतद्देशीय व्यक्ती!
इतिहास अभ्यासक डॉ. रमेश जाधव म्हणाले, 'रायगडावरील शिवछत्रपतींची समाधी महात्मा फुलेंनी शोधून काढली हेच खरे आहे. कारण टिळकांचे काम नंतरचे आहे. महात्मा फुलेंचे समकालीन कृष्णराव भालेकर त्यावेळी दीनबंधू नावाचे वृत्तपत्र चालवत होते. त्यात फुलेंनी शिवरायांची समाधी शोधल्याबाबतचा वृत्तांत छापून आला होता. कोल्हापूरचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक भाई माधवराव बागल यांनी 'बहुजन समाजाचे शिल्पकार' या आपल्या पुस्तकात त्याबाबत नोंदवले आहे."
तसंच, गणेशोत्सव आणि शिजयंती उत्सवही लोकमान्य टिळकांनी नव्हे, तर दुसऱ्यांनीच सुरू केल्याच्या नोंदी आहेत, असंही डॉ. रमेश जाधव म्हणतात.
समाधी जिर्णोद्धार आणि शिवजयंतीसाठी लोकवर्गणी
इंद्रजित सावंत पुढे सांगतात की, आता यापुढच्या काळात तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर कोणालाही पडू नये, म्हणून महात्मा फुले यांनी काही तरी ठोस करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी पुण्यातील हिराबाग येथे शिवसमाधी विषयक सभा आयोजित केली.
याच सभेत त्यांनी शिवजयंती उत्सव सुरू करण्याचा विचार मांडला. त्याला सर्वांनी पाठिंबा दिला. तेथेच शिवजयंतीसाठी लोकवर्गणी जमवण्याचा निर्णय झाला. सभेतच एकूण 27 रूपये जमले. त्यातील 3 रुपये स्वतः जोतिराव फुलेंनी दिले.
या सभेत शिवरायांच्या समाधीचा जिर्णोद्धार करणे, शिवजयंती साजरी करणे आणि शिवरायांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी साहित्य छापणे, असे ठरले. त्यानुसार लोकवर्गणी आणि ब्रिटीश अधिकाऱ्यांनी दिलेल्या निधीतून रायगडावरील शिवछत्रपतींच्या समाधीची दुरुस्ती करण्यात आली.

फोटो स्रोत, Raigad Vikas Pradhikaran
समाधीची देखभाल, दिवाबत्तीसाठी इंग्रजांकडून एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात झाली. महात्मा फुले यांनी 1869 मध्येच शिवाजी महाराजांवर दीर्घ पोवाडा लिहिला होता. त्याचे पुस्तक जून 1869 मध्ये प्रसिद्ध करण्यात आले.
‘‘हे मराठीतलं शिवरायांबद्दलचं पहिलं पुस्तक. मुंबईतील ओरिएन्टल छापखान्यात छापलेले हे पुस्तक मुंबईत काळबादेवीला वासुदेव बाबाजी नवरंगे यांच्या, तर पुण्यात स्वत: जोतीरावांच्या वेताळ पेठेतील पुस्तकांच्या दुकानात विक्रीला ठेवलं होतं. त्याची किंमत अवघी सहा आणे ठेवण्यात आलेली होती’’, अशी नोंद दिवंगत अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी केलेली आहे.
पुणे आणि रायगडावरील शिवजयंती उत्सवाची प्रेरणा घेऊन 1880 मध्ये मुंबईतही शिवजयंती उत्सव सुरू करण्यात आला. फुले यांचे सहकारी आणि कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. 1895मध्ये ‘दीनबंधू’मध्ये आलेल्या बातमीत हा वृत्तांत आलेला आहे.
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि शिवफंड
काही दिवसांपूर्वी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार – ‘‘1883 मध्ये जेम्स डग्लस नावाचा एक इतिहासप्रेमी इंग्रज शिवचरित्र वाचून जिज्ञासेपोटी गडावर गेला. शिवाजी महाराजांच्या समाधीच्या दुरवस्थेविषयी त्याने आपल्या 'बुक ऑफ बॉम्बे' या पुस्तकात लिहिले.
डग्लसचे हे वर्णन वाचून 1885 मध्ये लोकमान्य टिळक यांच्या पुढाकारातून, न्यायमूर्ती रानडे, रावबहादूर जोशी, न्यायमूर्ती तेलंग, न्यायमूर्ती कुंटे इत्यादी तत्कालीन समाजधुरिणांनी पुण्यातील हिराबागेत एका सभेचे आयोजन केले. त्यात समाधी जिर्णोध्दारासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली. तसेच रायगड आणि समाधीच्या दुरवस्थेविषयी ब्रिटीश सरकारकडे एक निवेदन पाठविण्यात आले.
त्याचा परिणाम ब्रिटीश सरकारने सालाना फक्त 5 रुपये नेमणूक केली. पुढे 30 मे 1895 रोजी लोकमान्य टिळकांनी पुण्याच्या हिराबागेत पुन्हा एकदा भव्य सभेचे आयोजन केले. या सभेमध्ये लोकमान्य टिळकांनी शिवरायांच्या रायगडावरील समाधीच्या जिर्णोद्धाराची भावी योजना मांडून त्यासाठी निधी देण्याचे आवाहन केले. या कार्यासाठी एका मंडळाची स्थापना झाली. तेच हे 'श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ' होय.

लोकमान्य टिळकांनी 'केसरी', 'मराठा'च्या माध्यमातून समाधीच्या जिर्णोद्धारासाठी देणग्यांचे आवाहन केले. या सगळ्या कार्याकडे लक्ष वेधणे व जनजागृती करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी रायगडावर शिवजन्मोत्सव व पुण्यतिथी सोहळा करण्याची योजना आखली.
टिळकांच्या उपस्थितीत दि. 24 व 25 एप्रिल 1896 असे दोन दिवस रायगडावरील पहिला शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा झाला.
लोकमान्य टिळकांच्या आवाहनातून अनेक शिवभक्तांनी उदार हस्ताने समाधी जिर्णोद्धार कार्यासाठी दिलेला निधी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने डेक्कन बँकेमध्ये साठविला होता. दुर्दैवाने ही डेक्कन बँक 1913 साली बुडीत निघाली.
त्याविरुद्ध टिळक आणि खरे यांनी पुणे फर्स्टक्लास कोर्टात दावा दाखल करून व्याजासह रु. 33, 911/- किमतीचे हुकूमनामे मिळविले. परंतु त्याची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी बँक लिक्विडेशनमध्ये निघाली. त्यामुळे मंडळाच्या या कार्याचे फार नुकसान झाले.
लोकमान्य टिळकांनी डगमगून न जाता 'पुनश्च हरी ओम' म्हणत निधी जमविण्याच्या कार्याला सुरुवात केली व तब्बल 12 हजार रुपयांचा निधी जमा केला. याचबरोबर टिळक ब्रिटीश सरकारकडे समाधीच्या जिर्णोध्दाराची परवानगी मिळविण्यासाठी अथक प्रयत्न करीत होते. दरम्यान लोकमान्य टिळकांचे 1920 साली दु:खद निधन झाले.

टिळकांच्या निधनानंतर 5 वर्षांनी म्हणजेच 6 फेब्रुवारी 1925ला ब्रिटीश सरकारने समाधीच्या जिर्णोध्दाराची परवानगी दिली.
'श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळा'चे रु. 12 हजार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रु. 5 हजार आणि पुरातत्व विभागाचे रु. 2043/-असे 19043/- रुपये एकत्रित निधीतून समाधीच्या जिर्णोद्धारास सुरुवात झाली.
रत्नागिरीच्या पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटच्या वतीने व रायगड मंडळाच्या देखरेखीने प्लॅन तयार करून कामाला सुरुवात झाली.
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने सादर केलेल्या आराखड्याप्रमाणे मंडळाच्या देखरेखीखाली पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, रत्नागिरी विभागाच्या माध्यमातून सन 1926 साली आज आपण पाहतो ती शिवाजी महाराजांची जिर्णोध्दारीत समाधीची वास्तू उभी राहिली.
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी 1951 मध्ये लिहिलेल्या ‘महाराष्ट्राचा परमेश्वर छत्रपति शिवरायाची राजधानी नि समाधीस्थान रायगड यात्रा-दर्शन-माहिती’ या पुस्तकात लोकमान्य टिळकांच्या शिवसमाधीसाठीच्या या प्रयत्नांची माहिती देण्यात आली आहे.
पहिला मान महात्मा जोतिराव फुल्यांचाच
इंद्रजित सावंत सांगतात, ‘‘मधल्या काळात शाहू महाराजांनी शिवरायांच्या रायगडावरील समाधी जिर्णोद्धाराची तयारी चालविली होती. त्यासाठी त्यांनी रायगडावर इंजिनियरही पाठवला होता.
दरम्यान ‘शिवछत्रपती हे सर्वांचेच आहेत, त्यामुळे लोकवर्गणीतून त्यांच्या रायगडावरील समाधीचा जिर्णोद्धार व्हावा’, अशी भूमिका लोकमान्य टिळकांनी मांडली. त्यासाठी ‘शिवाजी फंड’ स्थापन करण्यात आला.
"यासाठी देणगी देण्यासाठी टिळकांनी शाहू महाराजांनाही विनंती केली. त्याप्रमाणे शाहू महाराजांनी भरघोस निधी दिल्याचा उल्लेख असणारी पत्रे उपलब्ध आहेत. सयाजीराव गायकवाड महाराजांनीही यासाठी देणगी दिली."
"1895 ते 1920 असा 25 वर्षे हा निधी गोळा करण्यात आला. पण टिळकांच्या हयातीत या निधीतून शिवरायांच्या समाधीचा जिर्णोद्धार झाला नाही. कारण 1920 मध्ये त्यांचे निधन झाले," असं सावंत सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, या निधीत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी केले. दिनकरराव जवळकर, ‘विजयी मराठाकार’ यांनी त्याबाबत लिहिले. कृष्णराव अर्जुन केळुस्करांनी लिहिलेल्या शिवचरित्राच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत या निधीतील भ्रष्टाचाराबद्दल लिहिले आहे.
इंद्रजित सावंत सांगतात, "अलीकडच्या काळात गोपाळ चांदोरकर यांनी ‘शिवसमाधी’ नावाचे एक पुस्तक लिहिले होते. त्यात काही गोष्टींचा उल्लेख मला पटला नाही त्यामुळे त्याचा प्रतिवाद करण्यासाठी म्हणून मी ‘शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध व बोध’ हे पुस्तक लिहिले. त्यामध्ये या समाधीचा पूर्ण इतिहास आला आहे."
"लोकमान्य टिळक आयुष्यात दोनदा रायगडावर गेल्याच्या नोंदी आहेत. त्यांनी शिवजयंतीला प्रोत्साहन दिले, मात्र त्यांनी शिछत्रपतींची समाधी शोधली आणि तिचा जिर्णोद्धार केला, हे म्हणणे इतिहासाला धरून नाही,’’ इंद्रजित सावंत सांगतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











