छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती का, याबद्दल इतिहासकार काय सांगतात ?

सुरतेची लूट: स्वराज्य उभारणीस मदत आणि देशभर मराठ्यांचा दरारा निर्माण करणारी घटना

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, श्रीरंग गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, 'छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटले नव्हते, तर काँग्रेसने हा खोटा इतिहास शिकवला आहे', असं वक्तव्य केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी खरंच सुरत लुटली होती का? यावरुन चर्चा होत आहे. शिवाजी महाराजांनी सुरतेवर जी स्वारी केली होती त्याबाबत इतिहासकारांनी काय म्हटले आहे हे आपण या लेखात पाहू.

कोकणातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे पडसाद सर्वत्र उमटत असतानाच ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही. त्यांनी केवळ स्वराज्याचा खजिना योग्य त्या लोकांकडून घेतला,’ असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज

फोटो स्रोत, Getty Images

‘शिवाजी महाराज जणू काही सर्वसामान्य माणसांची लूट करायला सूरतला गेले होते, अशा प्रकारचा इतिहास काँग्रेसने आम्हाला इतके वर्षे शिकवला’, असे म्हणत फडणवीस यांनी विरोधी पक्ष काँग्रेसवर टीका केली.

त्यांच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरू असून त्यामुळे शिवरायांच्या सुरत लुटीच्या इतिहासाची पुन्हा उजळणी होऊ लागली आहे.

सुरत बंदर

फोटो स्रोत, Getty Images

मुघलांचे आर्थिक केंद्र होते सुरत

छत्रपती शिवाजी महाराजांनी दोनदा गुजरातमधील सुरत शहर लुटले, असे दाखले इतिहासात मिळतात. इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांनी लिहिलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या शिवचरित्रात, कृष्णराव अर्जुन केळूसकर यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या नावाने 1906 मध्ये लिहिलेल्या शिवचरित्रात, तसेच जदुनाथ सरकार यांनी लिहिलेल्या1919 ते 1952 या काळात लिहिलेल्या शिवचरित्रांमध्ये सुरत लुटीविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

त्यातील सारांश असा -

जानेवारी 1664 मध्ये शिवरायांनी सुरत लुटली, त्याला पार्श्वभूमी शाहिस्तेखानाने पुण्यात केलेल्या लूट, अत्याचारांची होती. मोगल सरदार आणि औरंगजेबाचा मामा असलेला शाहिस्तेखान महाराष्ट्रात तीन वर्षे तळ ठोकून होता. त्याच्यामुळे मराठा साम्राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती.

शिवरायांनी स्वत: लाल महालात शाहिस्तेखानाची बोटे छाटून त्याला पुण्यातून हुसकावून लावले. त्यानंतर राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिवरायांनी तातडीने पावले उचलली. राजधानी राजगडापासून सव्वातीनशे किलोमीटरवर दक्षिण गुजरातधील सुरत हे मोगलांचे आर्थिक केंद्र आणि प्रमुख व्यापारी बंदर होते. ते लुटण्याचे महाराजांनी ठरविले.

जदुनाथ सरकार ‘छत्रपती शिवाजी महाराज काळ आणि कर्तृत्व’ या शिवचरित्रात लिहितात, ‘सुरतेत पोहोचल्यावर महाराजांनी असं जाहीर केलं, की ते तिथे कोणाही इंग्रजाला किंवा इतर व्यापाऱ्यांना इजा करायला आले नव्हते.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

'औरंगजेबानं त्यांचा देश लुटून त्यांच्या काही नातेवाईकांना ठार मारल्याबद्दल त्याच्यावर सूड उगविण्यासाठीच ते तिथे आले होते. परंतु पैसा मिळवणं हाही त्यांचा एक हेतू होता. त्यांना त्या चार दिवसांच्या कालावधीत शक्य तितकी लूट गोळा करायची होती. लूट घेऊन त्यांना शक्य तितक्या लवकर तिथून निघून जायचं होतं.’

आमच्या सुरतच्या वखारीला संरक्षण द्या, असं विनंती करणारं पत्र जहाँगीर बादशहाला आग्रा दरबारात देणारा थॉमस रो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आमच्या सुरतच्या वखारीला संरक्षण द्या, असं विनंती करणारं पत्र जहाँगीर बादशहाला आग्रा दरबारात देणारा थॉमस रो.

सुरत शहर होते जागतिक व्यापाराचे केंद्र

त्याकाळी सुरतेचा व्यापार केवळ भारताशीच नाही, तर युरोप, आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील देशांशी होत असे. व्यापार करातून मुघलांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत होते. सुरतेला तटबंदीसह पाच हजार सैनिकांचे संरक्षण होते.

शिवाजी महाराजांनी आपले हेरप्रमुख बहिर्जी नाईक यांच्या मार्फत पहिल्यांदा सुरतेवर बारकाईने नजर ठेवली. सुमारे तीन महिने पाळत ठेवून बहिर्जी यांच्या राघोजी नावाच्या माणसाने सुरतेची बित्तंबातमी काढली.

सुरतेत मोगलांच्या पाच हजारांपैकी केवळ एकच हजार सैन्य लढाऊ आहे. त्यांना अधिक कुमक मिळण्याअगोदर आपण मोहीम फत्ते करायला हवी, असे बहिर्जींनी सुचविले होते. त्यानुसार अत्यंत वेगवान हालचाली करून मराठ्यांचे 8 हजारांचे घोडदळ 20 दिवसांत 5 जानेवारी 1664 रोजी सुरतेजवळच्या गणदेवी गावाजवळ पोहोचले.

नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील शिवाजी महाराजांचा पुतळा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील शिवाजी महाराजांचा पुतळा
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तेथून त्यांनी मोगलांच्या सुरतेतील सुभेदार इनायतखान याच्याकडे वकील पाठवला. त्याच्यामार्फत 'इनायतखान आणि सुरतेतील नामवंत व्यापाऱ्यांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा सुरतेची 'बदसुरत' झाल्यास आमची जबाबदारी नाही', असा संदेश पाठवला. इनायतखान घाबरून सुरतेच्या किल्ल्यात लपला. त्याच्या सैन्याचा प्रतिकार मराठ्यांनी सहज मो़डून काढला.

शहरात घुसून त्यांनी जागोजागी चौक्या बसविल्या. मुघल आरमाराने समुद्रातून येऊन प्रतिकार करू नये म्हणून सुरतेच्या बंदरावर हल्ला चढवून तेथील धक्क्याला आग लावली. तेथील युरोपीय वकिलाती, किल्ले किंवा आरमारांना मात्र मराठ्यांनी धक्का लावला नाही. मुख्य हेतू सुरत लुटीचा असल्याने अकारण त्यांच्याशी लढाई करण्याचे मराठ्यांना काही कारण नव्हते. त्याही मंडळींनी मराठ्यांची कुरापत काढली नाही.

कडेकोट बंदोबस्तात मराठ्यांनी शहरात वसुली सुरू केली. मोगल ठाणेदार आणि महसूलदप्तरांचे खजिने रिकामे केले. पोर्तुगीजांकडे बचावासाठी पुरेसे सैन्य नाही, हे पाहून त्यांच्याकडूनही खजिना मिळवला. सतत तीन दिवस मराठा सैनिकांनी सुरतेतील व्यापारी, सावकार यांच्या वाड्यांतून अमाप संपत्ती गोळा केली.

यामध्ये वीरजी वोरा, हाजी झहीद बेग, हाजी कासम यांसारख्या मातब्बर व्यापाऱ्यांचा समावेश होता. सुरतेत त्यावैळी मोहनदास पारेख हा इस्ट इंडिया कंपनीचा हस्तक राहात होता. तो दानधर्म करणारा आणि लोकांना मदत करणारा होता. त्यामुळे त्याच्या वाड्याला मराठ्यांनी धक्का लावला नाही. तसेच इतर धर्मीय मिशनऱ्यांच्या मालमत्तेलाही अपाय केला नाही.

'सुरतेच्या खजिन्याचा वापर स्वराज्य उभारणीसाठी'

'रेव्हरंड फादर अँब्रोझच्या ऑर्डर ऑफ फ्रायर्स मायनोर कॅपुचिनच्या इमारतींचा मराठ्यांनी आदर केला. फ्रँकिश पादरी चांगले लोक आहेत त्यांच्यावर हल्ला करू नये, असे आदेश शिवरायांनीच दिले होते', असे फ्रेंच प्रवासी फ्रांस्वा बर्निये याने आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहे.

दरम्यान, इनायतखानाने मराठ्यांकडे वाटाघाटींसाठी वकील पाठवला. भेटीसाठी आलेल्या या वकिलाने थेट शिवाजी महाराजांवरच हल्ला केला. शिवरायांच्या अंगरक्षकांनी त्या वकिलाला ठार मारले.

मग संतप्त मराठ्यांनी चार कैदी मारले आणि 24 कैद्यांचे हात छाटून टाकले. त्यानंतर सर्व खजिना घेऊन मोगलांची अधिक कुमक येण्यापूर्वी सुरतेतून चपळाईने निघून मराठे राजगडावर पोहोचले. सुरतेच्या या खजिन्याचा वापर महाराजांनी स्वराज्याच्या उभारणीसाठी केला, असा उल्लेख वा. सी. बेंद्रे यांच्या पुस्तकात आहे.

गेट वे ऑफ इंडिया जवळील शिवाजी महाराजांचा पुतळा.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गेट वे ऑफ इंडिया जवळील शिवाजी महाराजांचा पुतळा.

आग्र्याहून सुटका झाल्यानंतर सुरतेची दुसरी लूट

पहिल्या सुरत लुटीच्या सहाच वर्षांनी म्हणजे 3 ऑक्टोबर 1670 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची दुसरी लूट केली. स्वराज्याची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी सुरतेतून मोठी संपत्ती आणली. यावेळची पार्श्वभूमी होती, शिवरायांची आग्र्याहून मुघलांच्या कैदेतून झालेली सुटका. पहिल्या लुटीनंतर औरंगजेब खवळला होता. त्याने मिर्झाराजे जयसिंह यास मराठ्यांच्या स्वराज्यावर आक्रमणासाठी पाठवले.

प्रचंड सेनेसह आलेल्या जयसिंहासोबत परिस्थितीनुरूप शिवाजी महाराजांना तह करावा लागला होता. त्या प्रसिद्ध पुरंदरच्या तहात महाराजांना आपले 23 किल्ले आणि खंडणी म्हणून चार लाख रुपये द्यावे लागले होते. तसेच त्यानंतर आग्रा येथे औरंगजेबाच्या भेटीला जावे लागले होते.

दरबारात अपमान झाल्यावर नजरकैदेतही राहावे लागले होते. त्या कैदेतून महाराजांनी करून घेतलेली सुटका इतिहासात सुप्रसिद्ध आहे. दरम्यान, स्वराज्याचे मोठे नुकसान झालेले होते. ते भरून काढण्यासाठी त्यांनी पुन्हा सुरत लुटण्याचे ठरवले.

रयतेवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी आणि राज्याची आर्थिक घडी बसविण्यासाठी त्यांनी पुरेशी तयारी करून दुसऱ्यांदा सुरत शहरावर हल्ला चढविला. खरे तर या हल्ल्याची खबर अगोदरच सुरतच्या सुभेदाराला लागली होती. पण कमजोर झालेले मराठे दुसऱ्यांदा हल्ला करतील, असे त्याला वाटले नाही.

'महाराजांनी आधी संदेश पाठवून चौथाई मागितली होती'

तेथील इंग्रज प्रेसिडेंट जिरॉल्ड अँजियर याने मात्र आपली वखार नदीपलीकडील स्वाली बंदरावर हलवली. मुघल सुभेदार मात्र 300 सैनिकांच्या बळावर निर्धास्त बसला होता. 2 ऑक्टोबर 1670 रोजी मराठ्यांचे 15 हजार सैन्य सुरतेच्या सीमेवर येऊन धडकले.

महाराजांनी मोगल सुभेदाराला खलिता पाठविला. ‘तुमच्या राज्यकर्त्यांच्या वागण्यानेच मला मोठे सैन्य बाळगण्यास भाग पाडले आहे. या सैन्याला पोसण्यासाठी पैसा लागतो. त्यामुळे मोगलांनी आपल्या साऱ्याचा चौथा हिस्सा मला द्यावा.’

त्या काळात जो भूप्रदेश स्वराज्यात नाही पण त्या राजापासून आक्रमणाचे संरक्षण मिळावे म्हणून चौथा हिस्सा दिला जात असे. त्याला चौथाई म्हणत. छत्रपती शिवाजी महाराजांनी तीच मागणी केली होती.

पण, खलित्याचे उत्तर मिळाले नाही आणि मराठे 3 ऑक्टोबरला सुरतमध्ये घुसले. तीन दिवस मराठा सैन्य सुरतेची लूट करत होते. सामान्य प्रजेला अजिबातही त्रास न देता, मोठे व्यापारी, धनिक, श्रीमंत यांच्याकडून पैसा, सोने, हिरे, जड-जवाहीर लुटले गेले.

धार्मिक, चांगल्या प्रवृत्तीच्या लोकांनाही या लुटीतून वगळले गेले. पहिल्या लुटीत मराठ्यांना सुरतेतून 80 लक्ष मिळाले होते, तर या दुसर्‍या लुटीत 66 लाख रुपयांचा खजिना हाती लागला.

अनेक लिखाणांत 'लूट' असाच उल्लेख

या हेरगिरीवरच इतिहास अभ्यासक संजय सोनवणी यांनी ‘राघोजी आणि लूट सुरतेची’ ही साडेसहाशे पानांची कादंबरी लिहिली आहे. त्यातही हा सर्व चित्तथरारक घटनाक्रम आला आहे. ही कादंबरी जरी असली तरी ऐतिहासिक तथ्यांवरच आधारित कादंबरी असल्यामुळे इतिहासाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेतल्याचे सोनवणी सांगतात.

राघोजी आणि सुरतेची लूट

‘लूट हा शब्द काँग्रेसने प्रचलित केला’, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यावर इतिहास अभ्यासक संजय सोनवणी बीबीसी मराठीला म्हणाले, की ‘हाच शब्द त्यावेळच्या पत्रव्यवहारांमध्ये, शिवकालीन दरबारी कागदपत्रांमध्ये आहे.

परदेशी इतिहासकारांनीही या घटनेला ‘लूट’च म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर ‘शिवराजभूषण’ हा ग्रंथ लिहिणारे प्रसिद्ध शिवकालीन कवी भूषण यांनीही आपल्या काव्यात

दिल्लीय दलन दबाय करि सिव सरजा निरंसक।

लूटि लियो सूरति सहर बंकक्करि अति डंक।।

वंकक्करि अति डंकक्करि अस संकक्कुलि खल।

सोचच्चकित भरोचच्चलिय विमोचच्चखजल।।

तठ्ठइमन कठ्ठठिक सोइ रठ्ठिल्लिय।

सद्दद्दिसि दिसि भद्दद्दबिभई रद्दद्दिल्लिय।।

असे या घटनेला ‘लूट’च म्हटले आहे.’

द लंडन गॅझेटचे कात्रण
फोटो कॅप्शन, द लंडन गॅझेटमध्ये शिवाजी महाराज आणि सुरतेच्या लुटीबाबत करण्यात आलेला उल्लेख.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या ‘राजा शिवछत्रपती’ या शिवचरित्राच्या दोन्हीही खंडांत सुरतेच्या लुटीचे सविस्तर वर्णन आले आहे. त्यात पहिल्या लुटीनंतर शिवाजी महाराज म्हणतात, ‘कोणाशीही आमचे व्यक्तिगत वैर नव्हते आणि नाही. आम्ही सुरत लुटली ती औरंगजेबाची म्हणून लुटली. औरंगजेबाने आमच्या मुलुखाची सतत तीन वर्षे बर्बादी केली, कत्तली केल्या. त्याचा सूड म्हणून आम्ही सुरत लुटली. बऱ्याच दिवसांची आमची मसलत आज पार पडली.’

'शिवाजी महाराजांनी नैतिक पथ्ये पाळली होती'

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणतात, ‘सुरतीच्या लुटीनंतर तेथील इंग्रजांच्या वखारीतून इंग्लंडला पत्रव्यवहार झाला. त्यात स्पष्टपणे Plunder अर्थात ‘लूट’ हा शब्द वापरण्यात आला आहे. एस्कलेट नावाचा इंग्रज अधिकाऱ्याने छत्रपती शिवरायांच्या तंबूत त्यांच्यासमोर लावलेल्या अगणित संपत्तीच्या ढिगाचे वर्णन केले आहे.

वा. सी. बेंद्रेंनी प्रकाशित केलेले शिवाजी महाराजांचे चित्र

सभासद बखर, इतिहासकार जदुनाथ सरकार, गजानन मेहेंदळे, बाबासाहेब पुरंदरे आदींनी या घटनेबद्दल सविस्तर लिहिले आहे. अर्थात त्या काळात शत्रूच्या प्रदेशावर आक्रमण करून लुटालूट करणे, खंडण्या गोळा करणे ही सर्वसामान्य बाब होती. सर्वच राजे एकमेकांच्या प्रदेशात तसे करत असत. अर्थात शिवाजी महाराजांनी याबाबतही काही नैतिक पथ्ये पाळली होती.

उदाहरणार्थ सुरतेच्या लुटीत महिलांना धक्का लागू द्यायचा नाही, गरिबांना लुटायचे नाही, अशा सूचना शिवरायांनी आपल्या सैन्याला दिल्या होत्या. विशेष म्हणजे या लुटीच्या धामधुमीत त्यांनी एका ब्रिटीश महिलेच्या घराला संरक्षण दिले होते. शिवाय लुटीनंतर बरीच संपत्ती त्यांनी तेथील गोरगरिबांमध्ये वाटून टाकली होती.

'ही धोरणात्मक चाल होती'

स्वराज्याची आर्थिक स्थिती सुधारण्याबरोबरच मोगलांचे बलस्थान बनलेल्या सुरत बंदराला धक्का देणे ही शिवरायांची धोरणात्मक चाल होती. त्यानंतर पश्चिम किनारपट्टीवरील व्यापाऱ्यांना त्यांनी संरक्षण दिले.

सुरतमध्ये शिवरायांचा जो पुतळा उभारला गेला आहे, तो अलिकडच्या काळातील आहे. मधल्या काळात मराठ्यांची सत्ता गुजरातवर होती. सरदार दमाजी गायकवाड, दमाजी थोरात आदींनी गुजरातवर वर्चस्व ठेवले होते. त्यांच्या माध्यमातून शिवरायांचा दरारा गुजरातमध्ये कायम राहिला.’

शिवरायांच्या या हालचालींवर ब्रिटीश बारकाईने लक्ष ठेवून होते. म्हणूनच तर सुरतेच्या दुसऱ्या लुटीची बातमी ‘लंडन गॅझेट’ या ब्रिटिशांच्या सरकारी वृत्तपत्रात छापून आली होती.

त्यामध्ये या घटनेनंतर मुघलांसह इंग्रजही घाबरले असल्याचा उल्लेख आहे. ‘क्रांतिकारी छत्रपती शिवाजी महाराज जवळजवळ देशाचे स्वामी झाले आहेत’, असा ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या पत्रांमधील उल्लेख त्यांनी या बातमीत केला आहे.

सुरत लुटीचा स्वराज्याला झाला फायदा

'सुरतेची लूट' या घटनेचा छत्रपती शिवरायांना काय फायदा झाला, याबाबत इतिहासकार वा. सी. बेंद्रे त्यांनी लिहिलेल्या शिवचरित्रात सभासद बखरीतील उल्लेख करतात.

'सुरतेच्या लुटीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शक्तिसामर्थ्याचा लौकिक दूरवर पसरला आणि त्यांना दोन मोठ्या शाह्यांस सतत तीन-चार वर्षे तोंड देण्यात जी द्रव्यहानी सोसावी लागली होती, ती भरून निघाली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे एम. व्ही. धुरंदर यांनी काढलेले चित्र
फोटो कॅप्शन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे एम. व्ही. धुरंदर यांनी काढलेले चित्र

हिंदवी स्वराज्या'च्या प्रयत्नात नंतर ढिलाई करण्याचे कारण पडले नाही. उलट, ही घटना स्वराज्याच्या विस्तारास पोषक अशीच झाली. शिवाय, मोगली लष्कराला दूरवर स्वारीस जाण्यापूर्वी स्वदेश संरक्षणार्थ ठिकठिकाणी बरेच लष्कर राखून ठेवावे लागल्याने या स्वाऱ्यांचे शक्तिसामर्थ्य बरेच घटले.'

सुरत लुटीचा मोठा फायदा शिवरायांना स्वराज्य उभारणीसाठी आणि मराठ्यांचा दरारा देशभरात निर्माण होण्यासाठी झाला, असे मत बहुतेक इतिहासकारांनी नोंदविलेले आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)