शिवाजी महाराज, औरंगजेब आणि संभाजीराजे यांचा इतिहास सांगणारा 'तो' पत्रव्यवहार

दस्तावेज
    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी, बिकानेरहून

"पाच या साडेपाच फूट का एक कठिला सा बदन और चेहरे पे सुरज जैसे तेज लिया हुआ एक आदमी घोडे पे बैठकर आग्रा मे प्रवेश कर रहा है. उसके साथ इतने हाथी है इतने घोडे है.. इतने पैदल सैनिक है"

छत्रपती शिवाजी महाराज दिल्ली दरबारी निघाले आहेत. औरंगजेबाच्या भेटीला ते जात आहेत. त्यावेळचं वर्णन करणारा पुरातन दस्तावेज शिवरायांचं वर्णन करतोय ते असं. हा वकील रिपोर्ट लिहिलेला आहे मिर्झाराजे जयसिंग यांच्यासाठी काम करणाऱ्या दरबारात असलेल्या प्रकालदास यांनी.

आग्र्याहून सुटकेचा थरार आपण अनेकांनी ऐकलेला. पण त्या आधी नेमकं काय घडलं याचं संपूर्ण वर्णन या वकील रिपोर्टमध्ये आहे. इतिहासाची साक्ष सांगणारा, वर्णन करणारा हा महत्वाचा दस्तावेज आहे राजस्थानच्या बिकानेरमधल्या दस्तावेजांच्या संग्रहालयात.

अनेक महत्वाच्या नोंदी जपून ठेवणारं हे डॅाक्युमेंट म्युझियम देशातलं पहिलंच.

राजस्थानच्या राजघराण्यांचा इतिहासाच्या अनेक महत्वाच्या नोंदी इथे आहेतच. पण यात महत्वाचं आहे ते एक खास दालन म्हणजे छत्रपती शिवराय औरंगजेब आणि नंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास उलगडणारं.

राजस्थानच्या राजघराण्यांची सद्दी संपुष्टात आली, तेव्हा राजघराण्यांकडचे सारे दस्तावेज सरकारकडे गेले. यात अनेक महत्वाच्या नोंदी होत्या.

अनेक कागद अगदी जीर्ण अवस्थेत होते. अगदी अलिकडचे कागदसुद्धा जिथे खराब होतात तिथे या जुन्या इतिहासकालीन दस्तावेजांची अवस्था फारशी बरी कशी असावी?

पण यातून एक एक दस्तावेज शोधून त्याचे वाचन करुन हे महत्वाचे कागद शोधून काढले आहेत राजस्थान सरकारच्या पुरातत्व विभागाने.

दिल्ली दरबारात गेलेल्या शिवरायांचा अपमान करण्यात आला. त्याचं वर्णन करताना प्रकालदास म्हणतात, छत्रपती शिवराय जेव्हा दिल्ली दरबारात गेले तेव्हा त्यांचा सन्मान केला गेला नाही. त्यांना जिथे उभं करायला हवं होतं, तिथे त्यांना उभं न करता पाच हजारी मनसबदारांच्या रांगेत जोधपूरच्या राजांच्या मागे उभं केलं गेलं.

नजराणा पेश करुन या रांगेत पाठवलं गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराज तडक उठले. त्यांचे डोळे क्रोधाने लाल झाले होते. औरंगजेब हे बघत होता. त्याने मिर्झाराजे जयसिंह यांचा मुलगा रामसिंह याला विचारले की नेमके काय झाले आहे. त्यांची तब्येत ठिक दिसत नाही.

दस्तावेज

रामसिंग यांनी शिवाजी महाराजांचा हात पकडला तो झटकून छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, मी तुला पाहिलं. तुझ्या वडिलांना पाहिलं. आणि तुझ्या पातशाहला सुद्धा पाहिलं. मला त्यांची हुजुरी करणं मंजूर नाही. मला मारायचं आहे तर मारा. कैद करायचं असेल तर कैद करा. असं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला पाठ दाखवत दरबारातून निघून गेले.

या वकिल रिपोर्टमध्ये लिहिलेलं हे वर्णन आणि त्याचं भाषांतर राजस्थान सरकारमधल्या पुरातत्व खात्याचे संचालक महेंद्रसिंह खडगावत सांगत असतात. त्यांच्या बोलण्यातून तो प्रसंग पुन्हा पुन्हा जिवंत होत रहातो.

दस्तावेज

या खडगावतांनीच पुढाकार घेत हे संग्रहालय उभारलं आहे. त्यांच्याकडच्या दस्तावेजांमधून इतिहास उलगडत गेलाय. महाराणा प्रताप यांनी दिलेले ताम्रपट, राजपूत घराण्यांच्या शौर्याचा इतिहास इथल्या प्रत्येक कक्षात आहे.

फर्मान, वही असे ऐतिहासिक दस्तावेज जसेच्या तसे जतन करुन ठेवले आहेत. आणि याच संग्रहालयाच आहे एक अख्खं दालन राजपूत राजांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडणारं. त्यांची युद्ध, तह आणि शौर्याच्या गाथा सांगणारं.

पुरंदरचा तह

या दालनात आपण प्रवेश करतो तेव्हा समोर दिसतं ते एक भलं मोठं आडवं शोकेस.

या शोकेसमधला दस्तावेज हा या दिल्ली दरबारातल्या शिवाजी महाराजांच्या भेटीच्या आधीची कहाणी सांगणारा. तो म्हणजे पुरंदरच्या तहाचा.

या तहाच्या कागदाची उंची आहे तब्बल 22 फूट.

पुरंदरच्या तहाच्या वेळी मिर्झाराजे जयसिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे कोणते किल्ले, त्या किल्ल्यावरची शस्त्रे द्यायची याचा उल्लेख यात केला आहे.

हा तहाचा कागद मिर्झाराजे जयसिंग यांनी औरंगजेबाला पाठवला. तो परत पाठवताना औरंगजेबाने त्याच्या सोबत शिवाजी महाराजांसाठी एक पत्र पाठवलं.

त्याच्या सोबतच एक पोशाख देखील पाठवला होता. अगदी निवडक पत्रांवर उमटवला जात असलेला पंजा या शिवाजी महाराजांसाठीच्या पत्रावर उमटवला होता.

हाताचा पंजा

यात औरंगजेब म्हणतो , "त्यांच्या (छत्रपती शिवाजी महाराज) नावे एक मूल्यवान पोशाख या आदेशासह पाठवला आहे. या आदेशावर आमचे पंजाचे निशाण सुशोभित आहे. त्यांच्या नावे जो आदेश पाठवला आहे त्यात त्यांचे अपराध माफ केले आहेत आणि त्यांच्या चुकांना दुर्लक्षित केले आहे.

"पोशाख (बादशहाकडून दिला गेलेला पोशख) त्यांच्या सन्मानार्थ आणि गौरवान्वित करण्यासाठी आहे. हा पोशाख शिवाजीस पोहोचवून त्यांना सन्मानित व गौरवान्वित करुन त्यांना वचनबद्ध करावे की ते नेहमी सेवाभावे, सरळ व सुमार्गांवर ठाम राहून आदेश पालनात ठाम व स्थिर राहतील व आणि बादशहाची सेवा करण्यास सदैव आतूर आणि प्रयत्नशील राहतील.

"शिवाजीस जे भाग दिले आहेत ते आहेत तळकोकण, विजापूरचा तो भाग ज्याचे चार लाख होन (सोन्याची नाणी) आहे आणि आदिल खानाच्या बालाघाट क्षेत्राचा तो भाग ज्याची वसूली पाच लाख होन आङे. ही वसुली ज्याप्रकारे दिली जाणार आहे त्याची पद्धत त्यांच्या नावे पाठविलेल्या आदेशात लिहिली आहे. त्याची नकस आपल्या नावे पाठवलेल्या या फरमानाबरोबर दिली जाईल.

दस्तावेज

हा संपूर्ण तहाचा कागद मिळाला तेव्हा तो जीर्ण अवस्थेत होता.

खडगावत सांगतात, "तहाचा हा कागद मिर्झाराजे जयसिंह यांच्या सोबत राजस्थानला आला. जेव्हा हा कागद मिळाला तेव्हा तो अतिशय वाईट अवस्थेत होता. आम्ही तो नीट जोडला. त्यावर प्रक्रिया केली. आणि तो जतन केल्यानंतर तो इथे ठेवण्यात आला.

"आता जतन केला असला तरी त्याला नुकसान होऊ नये म्हणून त्याच्या डिस्प्ले शेजारी खास लाईट लावण्यात आले आहेत. या तहाच्या कागदाचं भाषांतर आम्ही विविध भाषांमध्ये केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा

शिवरायांच्या काळात झालेल्या घडामोडींचे दस्तावेज तर आहेतच. पण त्याच बरोबर छत्रपती संभाजीराजेंना जेव्हा जयपूरचे तत्कालिन महाराजा रामसिंह यांनी दिल्लीच्या बादशहा चा विरोध न करता त्यांच्या सोबत काम करा असं पत्र धाडले होते ते देखील या संग्रहालयात पहायला मिळते.

छत्रपती संभाजीराजेंनी त्यांना दिलेलं उत्तर देखील इथे आहे.

महाराजा रामसिंह यांच्या पत्राला उत्तर देताना छत्रपती संभाजीराजे म्हणतात, "आम्ही घेतलेले निर्णय आणि जे गमावलं आहे ते विचार करुन गमावलं आहे. आम्हांला ही शाही आयुष्य जगता आलं असतं. आमची माणसं मारली जात आहेत. त्याची घरं तोडली जात आहेत. मंदिरं तोडली जात आहेत. तुम्ही दिल्लीचे बादशाह बना आम्ही तुमच्या सोबत येउ. नाही तर तुम्ही ते सोडून आमच्या सोबत या.”

राजस्थानमधील पहिलं दस्तावेजांचं संग्रहालय

राजस्थानच्या 27 राजघराण्यांकडून आलेल्या या दस्तावेजांची छाननी करण्याचे काम आजही सुरु आहे.

प्रत्येक दस्तावर रासायनिक प्रक्रिया करुन ते जतन करण्यात आले आहेत. ते वाचण्याचे काम देखील आजही इतक्या वर्षांनीही सुरु आहे.

प्रत्येक कागद जतन केला जातो आहेच पण त्या बरोबरच त्याचे डिजीटायजेशन सुद्धा केले जात आहे.

दस्तावेज

खडगावत सांगतात, “आमच्याकडे 17 व्या शतकापासून 20व्या शतकापर्यंतची कागदपत्र आहेत. मुघलांनी राजपूत राजांना लिहिलेल्या फर्मानांची संख्या आहे 327. ही सगळी कागदपत्र सापडली तेव्हा ते खूप वाईट अवस्थेत होते. त्यांच्यावर प्रक्रिया त्यांच्यावर प्रक्रिया करुन त्याचे जतन करुन या संग्रहालयात लावले आहेत. मिसल काय होते दस्तूर कोंवर काय होते हे येणाऱ्या पिढ्यांना कळावे म्हणून हे संग्रहालय निर्माण केले.”

आजही नवे नवे कागद संशोधकांच्या हाती लागत आहेत. राजपूतांच्या नजरेतून उलगडणारा हा मराठा इतिहास कदाचित या पुढच्या काळात इतिहासाची आणखी महत्वाची पानं उलगडतील.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)