राजगड : शिवाजी महाराजांनी हा किल्ला मुघलांशी तह करतानाही सोडला नाही, पण इथून राजधानी का हलवली?

Rajgad

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राजगड किल्ला
    • Author, प्राजक्ता धुळप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

रायगडच्या आधी शिवाजी महाराजांनी राजकीय केंद्र म्हणून पुणे जिल्ह्यातल्या राजगडची निवड केली होती. राजगडावर त्याचं थोडी थोडकी नाही तर 25 वर्ष वास्तव्य होतं असं म्हटलं जातं.

किल्ले गोष्ट

“राजगडची प्रचंड उंची पाहाता तो सर्व किल्ल्यांमध्ये श्रेष्ठ आहे. त्याचा घेर 12 कोसांचा आहे. राजगडाच्या मजबुतीची आणि उंचीची कल्पनाही करवत नाही. या डौंगराच्या दऱ्याखोऱ्यांतून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही. इथे पावसालाच फक्त वाट मिळू शकते."

औरंगजेबचा अधिकारी साकी मुस्तैदखान याने सतराव्या शतकात शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगडाचं केलेलं हे वर्णन.

1 कोस म्हणजे साधारण 3.22 किलोमीटर. साहजिकच होतं, 12 कोस असलेल्या राजगडाला वेढा घालणं सोपं नव्हतं.

औरंगजेबचा अधिकारी साकी मुस्तैदखान याने 'मासिरे आलमगिरी' हा फारसी भाषेत लिहिलेला ग्रंथ. औरंगजेबाने दक्षिणेत स्वारी केली तेव्हा मुस्तैदखान सोबत होता. किल्ल्यांच्या वेढ्याचं वर्णन त्याने ग्रंथात लिहिल्याचं इतिहासकार नमूद करतात.

Rajgad

“शिवाजीने गडाच्या तटांची मजबूत रचना केली होती. या तटाच्या खाली भयंकर दऱ्या आहेत, अतिशय अवघड वाटा आहेत. तिथून माणसे जाणे अशक्यच."

बांधकामासाठी सर्वाधिक वेळ लागलेला हा महाराष्ट्रातला किल्ला छत्रपतींच्या अनेक नाट्यमय घटनांचा साक्षीदार आहे. किल्ल्याची तटबंदी आणि पायथ्याजवळचं जंगल रणनितीचा आणि दुर्ग स्थापत्यशास्त्राचा उत्तम दाखला मानला जातो.

मुघल इतिहासकार महंमद हाशिम उर्फ खाफिखान यानेही 1732मध्ये मुन्तखाब-अल-लबाब-ए-महंमदशाही नावाच्या पुस्तकात राजगडाचं वर्णन केलंय.

“राजगड किल्ला म्हणजे डोंगरांची रांगच. त्याला सगळीकडून वेढा घालणे कठीण होते.”

या वर्णनांवरुन राजगडाबद्दल मुगल सैन्याला भीती वाटत होती हे निश्चित.

आजही राजगडावर पोहचायचं असेल तर पायवाट आणि अवघड चढाई याशिवाय पर्याय नाही.

राजगड कसा बांधला असेल?

राजगड किल्ला पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यात आहे. राजगडावर पोहचण्यासाठी पुण्याहून साधारण 50 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यासाठी गडाच्या पायथ्याजवळील गुंजवणे आणि पाली गावांपर्यंत जाता येतं.

गडाला मुख्य असे दोन दरवाजे. पाली दरवाजा हा मुख्य दरवाजा, तर गुंजवणे हा त्याही पूर्वी बांधलेला प्राचीन काळातील दरवाजा. पायथ्यापासून पद्मावती माचीवर पोहचायला साधारण अडीच तास ते साडेचार तासांचा ट्रेक करावा लागतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल वेगवेगळ्या 8-10 वाटांनी राजगडावर पोहचता येतं.

Rajgad

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राजगड गुंजवणे वाटेवरुन

राजगडाचं वैशिष्ट्य म्हणजे माचीशी जोडलेल्या सोंडेच्या आकाराच्या डोगररांगा आणि किल्ल्याची भरभक्कम रचना. लांबवर पसरलेल्या सुवेळा माची आणि संजीवनी माचीची लांबी प्रत्येकी अडीच किलोमीटर असून ती 3 टप्प्यात बांधण्यात आली आहे. तर पठारी भागावर असलेल्या पद्मावती माचीवर आजही देवीचं मंदिर आणि मध्ययुगीन स्थापत्य रचनेच्या खाणाखुणा आहेत. आणि या तिन्ही माचांच्या मधोमध सर्वात उंचावर असलेला बालेकिल्ला पाहताना आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही.

राजगड किल्ला एका दिवसात पाहून होण्यासारखा नाही. किमान दोन दिवस आणि जास्तीत जास्त आठ दिवस तरी किल्ला पाहायला लागतात.

तीन माच्यांची आणि बालेकिल्ल्याची सुरक्षा तटबंदी छत्रपती शिवाजी महाराजांनी कशी करून घेतली असेल, असा प्रश्न आपल्याला पडतो.

मौल्यवान खजिना हाती लागला...

राजगडची नोंद शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासून आढळते. या किल्ल्याचं नाव बहामनी राजवटीत मुरुमदेव वा मुरुंबदेव होतं. बिरमदेवाचा डोंगरही म्हटलं जाई.

बहामनी नंतर निजामशाहीकडून आदिलशाहीकडे, पुन्हा निजामशाहीच्या हा किल्ला ताब्यात होता.

Map maharashtra

मुरुंबदेवाचा डोंगर शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला भक्कम तटबंदी घालून बांधून काढला आणि त्याचं राजगड असं नामकरण केलं. आपलं राज्य स्वतंत्र आहे हे शत्रूच्या निदर्शनाला आणण्यासाठीच त्यांनी किल्ल्याचं नाव राजगड ठेवलं होतं. आणि या किल्ल्यावर स्वतःची देवनागरी लिपीतील नाणीही पाडली.

याच डोंगराची निवड छत्रपतींनी केली यामागे महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे मावळ प्रांतावरचं वर्चस्व. मावळ हा पुण्याच्या पश्चिमेकडील खोऱ्यांचा प्रांत सह्याद्रीच्या रांगांमधला राजकीय हालचालींचा महत्वाचा भूभाग होता. पूर्वेकडे दख्खनचं पठार आणि पश्चिमेकडील अंगाला कोकणची किनारपट्टी यामुळे राजगडचं ठिकाण राज्यकारभारासाठी सोयीचं होतं.

गुंजण मावळ खोऱ्यातील राजगडाच्या पद्मावती माचीवर उभं राहिलं की नजरेच्या टप्प्यात आपल्याला तोरणा, सिंहगड आणि पुरंदर हे किल्ले दिसतात. मावळ प्रांतातले हे महत्त्वाचे किल्ले.

Rajgad

आपल्या राज्याची, ‘स्वराज्या’ची स्थापना करताना तोरणा किल्ल्याचा विस्तार पाहून त्याला 'प्रचंडगड' असं नाव महाराजांनी दिलं.

तोरणा किल्ल्यात काम सुरू असताना मौल्यवान खजिना हाती लागला त्याचा उपयोग राजगडाच्या बांधकामात झाला असं म्हटलं जातं. राजगडाचं बांधकाम अनेक वर्षं सुरू होतं असं ऐतिहासिक कागदपत्रांवरून पुढे येतं.

पण काही अभ्यासक सांगतात, 1642 ते 1662 म्हणजे वीस वर्षं, इतका प्रदीर्घ काळ राजगडाचं बांधकाम सुरू होतं. इतिहास संकलक आणि अभ्यासक अप्पा परब यांच्या मते राजगडाची जुनी तटबंदी तोडत असताना सापडलेल्या गुप्तधनाचा उपयोगही या बांधकामाला झाला असावा.

शिवाजी राजे तोरण्याहून राजगडावर कधी गेले याचं निश्चित वर्षं नाही, पण इतिहासातील पत्रांवरून त्याचं अनुमान इतिहासकार बांधतात.

1652 मध्ये राजगडावर शिवाजी महाराजांसमोर वतनविषयक दावे आणि तंटे चालत असत. याविषयीची पत्रं ऐतिहासिक दस्तावेजात आहेत.

तह केला, पण किल्ला राखला

औरंगजेबच्या आदेशावरुन शाहिस्तेखानने 1660 मध्ये मावळ प्रातांवर स्वारी केली. फारसी साधनांच्या माहितीनुसार शाहिस्तेखानने राजगडाकडे जी फौज पाठवली होती त्यांनी जवळपासची खेडी उद्धवस्थ केली पण राजगड जिंकण्याचा प्रयत्न केला नाही. नंतर तीनच वर्षांत शिवाजी महाराजांनी लालमहालावर छापा घालून शाहिस्तेखानाला धडा शिकवला.

पण 1665 मधील मुघल सैन्याने केलेल्या लढाईने राजगडावरच्या शासनव्यवस्थेवर खोल परिणाम झाला.

Rajgad

फोटो स्रोत, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग

फोटो कॅप्शन, राजगडचा नकाशा

इतिहास लेखक प्र.न.देशपांडे लिहितात- “मिर्झा राजा जयसिंगाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी करताना सर्व मुलखाची एकाच वेळी कोंडी करण्याचं तंत्र स्वीकारलं. त्यानुसार दाऊदखान आणि रायसिंग या दोघांबरोबर सैन्य देऊन त्यांना रोहिडा आणि राजगड या किल्ल्यांकडे पाठवलं. त्यांनी राजगडाच्या परिसरातील अनेक गावं जाळून दहशत निर्माण केली. 30 एप्रिल 1665 मध्ये मुघल सैन्याने राजगडावर चाल केली. पण किल्ल्यावरून विलक्षण मारा झाल्यामुळे मुघलांना माघार घ्यावी लागली.

जून 1665मध्ये शिवाजी महाराजांनी पराभव मान्य केला आणि जयसिंगाबरोबर तह करताना 23 किल्ले मुघलांना देण्याचं मान्य केलं. स्वतःकडे 12 किल्ले ठेवले. या बारा किल्ल्यांमध्ये राजगड आणि तोरणा या दोन्ही किल्ल्यांचा समावेश होता.

Shivaji maharaj
फोटो कॅप्शन, छत्रपती शिवाजी महाराज

इतिहासात ठळकपणे नोंदवल्या गेलेल्या घटनांचा राजगड साक्षीदार होता. त्यात छत्रपती शिवाजी आणि राजे संभाजी यांची आग्राहून सुटका, पन्हाळ्याच्या वेढातून सुटका, अफजलखानचा वध, सिंहगडवर विजय अशा अनेक घटनांचा संबंध थेट राजगडाशी आहे.

“छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्मही राजगडावर झाला, म्हणूनच त्यांचं नाव राजाराम ठेवलं असावं,” प्र.न.देशपांडे लिहितात.

पहिली राजधानी असलेल्या राजगडचं अस्तित्व आजही ठसठशीतपणे नजरेत भरतं ते किल्ल्यावरल्या वास्तूंमुळे.

राज्यकारभाराची पद्मावती माची

प्रशासकीय कामकाज या माचीवर चालत असल्याने जुन्या इमारतींचे अवशेष इथे आजही आहेत. सचिवालय, दिवाण-एक-आम, सदर, मोरोपंत पिंगळे सोनोपंत डबीर यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची निवसस्थानं पद्मावती माचीवर होती.

पद्मावती मंदिरही पाहण्यासारखं आहे, काहीशी डागडुजी झाली असल्याने ते नीट पाहता येतं. मंदिराजवळच सईबाईंची समाधीही आहे.

Rajgad

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पद्मावती माचीवरील तलाव

राजगडावर मुक्काम करणाऱ्या अभ्यासक आणि दुर्गप्रेमींसाठी हे मंदिर आश्रयाचं ठिकाण आहे. मंदिराच्या जवळच पद्मावती तलाव आहे.

गडावर पडणारं पावसाचं पाणी खोदकाम करून मोठ्या खुबीने तलावात साठवण्याचं तंत्र वापरण्यात आलं आहे.

शत्रूची दिशाभूल करण्यासाठीच्या चोरदिंड्या वा चोर दरवाजा इथेही आहेत. त्या काळातली शोचालयं आणि मलनि:सारण व्यवस्था कशी होती हे देखील पाहता येतं.

सुवेळा माचीची अनोखी रचना

पद्मावती माचीनंतर सुवेळा माची बांधण्यात आली. पाण्याची टाकी आणि चिलखती तटबंदी आणि उतार असलेली ही माची आहे.

या माचीवर असलेल्या गुंजवणे दरवाजाचं बांधकाम हेमाडपंथी पद्धतीत आहे. जवळच वेगवेगळ्चा राजवटीतली शिल्पही पहायला मिळतात.

Rajgad

फोटो स्रोत, JB VLOGS

फोटो कॅप्शन, सुवेळा माची

पुढे गेल्यावर झुंजार बुरूज लागतो. सैन्याला टेहाळणी करता यावी यासाठी खंबीरपणे उभा असलेला झुंजार बुरुज लागतो. पाण्याच्या टाक्या हे इथलं आणखी एक वैशिष्ट्य. माचीवर राहणाऱ्यांना बारमाही पाणी पुरावं या दृष्टीने तयार केलेल्या.

Rajgad

फोटो स्रोत, JB VLOGS

फोटो कॅप्शन, सुवेळा माचीवरील नेढं

सुवेळा माचीच्या खडकाला वाऱ्यामुळे पडलेलं एक आरपार भगदाड आहे, त्याला नेढं असं म्हणतात. हे नेढं ट्रेकर्ससाठी साहसाचं ठिकाण आहे. जवळच असलेली पेशवे काळातली गणेशमूर्ती आणि संताजी सिलिंबकरांचे स्मारक दुर्गप्रेमी आवर्जुन पाहतात.

गोलाकार ऐवजी निमुळता असलेला काळेश्वरी बुरूजही विशेष लक्षात राहतो.

उंचावरचा कणखर बालेकिल्ला

एका उंच निमुळत्या टेकडीवर असणाऱ्या बालेकिल्लाला जाणारी वाट अतिशय कठीण आणि अरुंद आहे. पूर्वी खडकातच कोरलेल्या पायऱ्या होत्या. आणि एका बाजूला दरी.

त्यामुळे इथे चढाई करताना दोन्ही हातांचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही. पण पुढे गेल्यावर अजूनही चांगल्या अवस्थेत असणारा बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो.

Rajgad

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बालेकिल्ल्याचा महादरवाजा

टेकडीवरच्या या बालेकिल्ल्याला संरक्षित करण्यासाठी तटबंदी करण्यात आली आणि त्याला अभेद्य करण्यात आलं. इतक्या वरच्या भागात असूनही पाणी साठवण्यासाठी खडकात खोदून काढलेलं चंद्रकोर आकाराचं तळं पाहण्यासारखं आहे.

Rajgad

फोटो स्रोत, JB VLOGS

फोटो कॅप्शन, बालेकिल्ल्याचा बर्ड आय व्ह्यू

जननी देवीचं आणि ब्रम्हऋषीचं मंदिर याखेरीज इथे बाजारपेठ भरायची याचे अवशेष असावेत असं इतिहासकार सांगतात. पण बाजारपेठ असल्याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.

बालेकिल्ल्यावरील बऱ्याच इमारती भग्नावस्थेत आहेत, त्यातील एका चौथऱ्यावरून एक इमारत ही शिवाजी महाराजांचं निवासस्थान असावं, असा इतिहास अभ्यासकांचा अंदाज आहे.

बालेकिल्ल्यावर राणी तलाव, दिवाण-ए-खास, धान्याची कोठारं याच्या खाणाखुणा दिसतात.

Rajgad

फोटो स्रोत, Goodwords, UK

संजीवनी माचीची चिलखती तटबंदी

शिवाजी महाराजांनी सर्वात शेवटी संजीवनी माची बांधली. तटबंदीला मोठ्या जंग्या बांधल्या. माचीवरच्या 19 बुरुजांपैकी 9 बुरुजांना चिखलती बुरुजांची जोड दिली.

अळू दरवाजाने संजीवनी माचीवर आपण जातो तेव्हा समोर नागमोड्या वळणाच्या तटबंदीचं अप्रतिम दृश्य दिसतं.

Rajgad

फोटो स्रोत, JB VLOGS

बिनीचा बुरुज म्हणजे राजगडाची करडी नजर.

बुरुजाखालील दगड तासून काढून त्यावर बांधकाम करण्यात आलंय. 360 अंशामध्ये चौफेर मारा करू शकेल अशी चाकावरची तोफ वापरता येईल इतकी जागा या बुरुजावर आहे. दिलेरखान आणि मिर्झा राजा जयसिंगाने राजगडावर हल्ला केला, तेव्हा संजीवनी माचीच्या चिलखती रचनेमुळे आणि तोफांच्या माऱ्यामुळे हा हल्ला सैन्याला परतवून लावता आला, असं अप्पा परब सांगतात.

मराठा साम्राज्याची राजधानी राजगडानंतर रायगडावर हलवण्यात आली. “1670-71 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड स्थान निश्चित केलं तरीही राजगडाच्या नव्या बांधकामाकडे किंवा दुरुस्तीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं नाही. एका पत्रातील उल्लेखावरून त्यांनी राजगडासाठी 10 हजार होन मंजूर केले अशी माहिती मिळते.”

राजधानी का हलवली?

याच सुमारास दुसऱ्यांदा सुरतेची लुट, इंग्रज-डच यांच्याबाबतीत आक्रमकता आणि मुघल सैन्यासोबतचा संघर्ष अशा घडामोडी घडत होत्या. या धामधुमीत रायगड ही राजधानी करण्यामागे महाराजांचा हेतू स्पष्ट होता, याविषयी अप्पा परब सांगतात.

“राज्य स्थिर करायचं असेल तर छत्रसिंहासन हवं ही गरज विश्वासू सहकाऱ्यांकडून पुढे आली होती. बारा मावळमधल्या अंतर्गत कुरबुऱ्या त्याला पोषक नव्हत्या. हा मावळ मुलुख पूर्ण शेतीवर अवलंबून होता. त्यामुळे धान्य वा मदतीसाठी सोयीचा होता.

Rajgad

“दक्षिणोत्तर सह्याद्रीतले घाट ताब्यात घेतले होते. या मार्गातल्या व्यापाराचं चेकपोस्टचं मुख्य कार्यालय रायगडावर करणं सोयीचं होतं. रायगडवरची बाजारपेठ आणि सचिवालय त्यासाठी मोक्याची जागा होती. इथेच कस्टम ड्युटीमुळे राज्याला फायदा झाला.

आयात-निर्यातीमुळे राज्याची महसूल हुकमी होती. शिवाय रायगडच्या आजूबाजूचा परिसरातील कोकणातील लहान मोठे राजे महाराजांच्या शब्दाबाहेर नव्हते.”

राज्य अधिक स्थिर होण्यासाठी तसंच व्यापार आणि महसूल याच्या दृष्टीने सोयीस्कर म्हणून शिवाजी महाराजांनी आपली राजधानी राजगडावरून रायगडावर हलवली.

RAIGAD

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दुसरी राजधानी रायगडचा दरवाजा

राजधानी नव्हती तरी राजगडाचं मह्त्व राजकीय दृष्ट्या काही कमी झालं नव्हतं. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मुघलांनी जून 1689 मध्ये राजगड जिंकून घेतला. त्यानंतर मराठा सैन्याने पुन्हा राजगड मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालवले.

1703 मध्ये या प्रयत्नांना यश आलं. पण तह करून औरंगजेबाने वर्षभरात राजगड पुन्हा मिळवला. राजगड 1704 मध्ये मुघलांच्या ताब्यात गेला तेव्हा त्याचं नाव नविशाहगड ठेवलं गेलं.

पण पुढल्या काही वर्षांतच औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठे-मुघल संघर्ष संपला. आणि काही वर्षांनी राजगड पेशव्यांच्या ताब्यात आला. तोपर्यंत डोंगरावरच्या किल्ल्याचं महत्त्वही अस्ताला गेलं होतं. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत राजगडावर भोर संस्थानाचा हक्क होता.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)