गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधला की उत्तर प्रदेशातला? भारतीय पुरातत्त्वशास्त्रज्ञाने असं शोधलं जन्मस्थान

फोटो स्रोत, MINISTRY OF CULTURE, GOVT. OF INDIA
- Author, अमिताभ भट्टसाळी
- Role, बीबीसी न्यूज बांगला, कोलकाता
तो दिवस होता 23 जानेवारी 1898 चा...ब्रिटिश भारतातील अवध आणि वायव्य सरहद्द प्रांताचे प्रमुख वास्तुकार सी. डब्ल्यू. वुडलिंग आणि फैजाबादचे आयुक्त व्हिन्सेंट स्मिथ यांच्या सूचनेनुसार पूर्णचंद्र मुखर्जी यांनी लखनौ सोडून नेपाळच्या तराई प्रदेशात जाण्यासाठी प्रस्थान केलं.
पूर्णचंद्र मुखर्जी हे त्यावेळच्या वायव्य सरहद्द प्रांताच्या पुरातत्व विभागात कार्यरत होते. विभागात रुजू होण्याची त्यांची ही दुसरी वेळ होती.
पुरातत्व विभागात कामाला लागल्यावर त्यांनी डॉ. फुहेर यांचे सहाय्यक म्हणून काम केलं. पण डॉ. फुहेर यांच्या एका शोधावर पुरातत्त्वशास्त्रज्ञांना गंभीर शंका असल्याने त्यांना नोकरी सोडावी लागली.
पुढे तथाकथित शोधाची सत्यता पडताळण्याची आणि योग्य माहिती शोधण्याची जबाबदारी पूर्णचंद्र मुखर्जी यांच्यावर येऊन पडली.
फैजाबादचे आयुक्त मिस्टर व्हिन्सेंट स्मिथ यांनी मुखर्जी यांना गौतम बुद्धांचे जन्मस्थान असलेल्या प्राचीन कपिलवस्तु आणि लुंबिनी गार्डनचे अचूक स्थान शोधण्याचे काम सोपवले होते.
वरिष्ठ अधिकारी मिस्टर व्हिन्सेंट स्मिथ यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेसह मुखर्जी यांनी सादर केलेला अहवाल भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने 1901 मध्ये पुस्तक स्वरूपात प्रकाशित केला होता.
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वेबसाइटवर हे पुस्तक उपलब्ध आहे.
मोहीमेची सुरुवात कशी झाली
या पुस्तकाचं नाव 'अ रिपोर्ट ऑन टूर ऑफ एक्सप्लोरेशन ऑफ द एन्टक्विटीज इन द तराई, नेपाळ द रिजन ऑफ कपिलवस्तु'
या पुस्तकात मुखर्जी लिहितात की, "प्रवासाला सुरुवात करताच मी न थांबता नेपाळची राजधानी तौलिवा गाठली. दुसऱ्या दिवशी निग्लिव्हाला जाऊन मेजर वॅडेलला भेटलो. शासनाच्या आदेशानुसार माझं काम तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आलं असल्यामुळे मी गोरखपूरला परत आलो."

फोटो स्रोत, KRISHANU BHATTACHARYA
मुखर्जी लिहितात, "सरकारकडून नवीन तार मिळाल्यानंतर मी पुन्हा नेपाळकडे रवाना झाली. 3 फेब्रुवारीपासून तिलौराकोट परिसरात खोदकाम सुरू केलं.
इथे मला आशादायक परिणाम मिळू लागले. 6 तारखेला मी सागरवा येथील अवशेषांना भेट दिली. निरीक्षणावरून असं दिसून आलं की, तिलौराकोट येथे बुद्धांच्या वडिलांचं वास्तव्य असावं."
तिलौराकोट मधील उत्खनन
मेजर वॅडेलने अचानक सर्व उत्खनन थांबवलं आणि काही दिवसांतच आदेश पलटवला.
या टप्प्यावर मुखर्जींनी तिलौराकोट आणि चित्रादेई प्रदेशात मोठ्या प्रमाणावर उत्खननाचं काम सुरू केलं होतं.
शेवटी व्हिन्सेंट स्मिथ यांनी सांगितल्याप्रमाणे मुखर्जी 11 मार्च रोजी रुम्मिन-देईला रवाना झाले आणि दुसर्या दिवशी तेथे पोहोचले.

फोटो स्रोत, MINISTRY OF CULTURE, GOVT. OF INDIA
मुखर्जी लिहितात, "जंगल साफ केल्यानंतर सापडलेली मोठ्या ढिगाऱ्याची बारकाईने पाहणी केली. उत्खनन सुरू करण्यासाठी नेपाळी कामगारांना कामाला लावले.
उत्खननाच्या सुरुवातीला मला आशेचा एक किरण दिसला. सुरुवातीला मातीचा मोठा ढीग उपसावा लागला. उत्खननात सापडलेल्या सर्वात महत्त्वाच्या वस्तूंमध्ये मायादेवीचं मंदिर होतं. पायाच्या विटांवर सुंदर नक्षीकाम केलं होतं. अनेक छोटे स्तूप आणि इतर कलाकृतीही बाहेर आल्या."
रुम्मीन-देई की लुंबिनी?
रुम्मीन-देई ही बौद्ध कथेतील लुंबिनीची बाग आहे. या परिसरात सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तूपावर कोरलेल्या शिलालेखात या ठिकाणाचं वर्णन लुम्मिनी असं करण्यात आलंय.
मागधी भाषेत लिहिलेला शिलालेख वाचल्यानंतर पूर्णचंद्र मुखर्जी या निष्कर्षापर्यंत पोहोचले की, रुम्मीन-देई हे प्राचीन लुम्मिनी किंवा लुंबिनी हेच शहर होते.

फोटो स्रोत, MINISTRY OF CULTURE, GOVT. OF INDIA
मुखर्जींचे वरिष्ठ व्हिन्सेंट स्मिथ यांनी त्यांच्या प्रस्तावनेत लिहिलंय की, "रुम्मीन हे नाव लुंबिनी किंवा लुम्मिनीशी संबंधित आहे. शिलालेख मगधी भाषेत लिहिलेला आहे. हा 'र' शब्द संस्कृतमध्ये भाषांतरीत केल्यास 'ल' असा होतो.
ह्युएन त्सांगच्या म्हणण्यानुसार, बागेतून आग्नेयेकडे वाहत जाणारी एक छोटीशी नदी होती. या नदीला स्थानिक भाषेत 'तेलाची नदी' असं म्हटलं जायचं. आज तिला 'टीला नदी' असं नाव आहे.
बुद्धांच्या जन्मवृक्षाच्या दक्षिणेला एक आंघोळीचा तलाव होता. 'फा हिएन'च्या मते हा तलाव 20 ली आणि ह्युएन त्सांगच्या मते 25 ली आहे. जन्म-वृक्षांजवळ कोरलेली शिल्प आजही 25 ली दूर आहेत.
'ली' हे अंतर मोजण्याचं प्राचीन चिनी एकक आहे. साधारणपणे एक 'ली' म्हणजे 500 मीटर किंवा मैलाचा एक तृतीयांश इतका भाग म्हणता येईल.
याशिवाय ह्युएन त्सांग याने उल्लेख केलेला सम्राट अशोकाचा स्तूप उत्खननात सापडला.
या चार पुराव्यांच्या आधारे गौतम बुद्धांचे जन्मस्थान अचूक शोधण्यात येणार होते..
व्हिन्सेंट स्मिथ लिहितात की, हेच गौतम बुद्धांचे जन्मस्थान होते हे निःसंशयपणे सिद्ध झाले आहे.
रुम्मीन-देई किंवा लुंबिनी हे निश्चितपणे गौतम बुद्धांचे जन्मस्थान म्हणून सिद्ध झाले असले तरी भारताच्या उत्तरप्रदेशातील पिपरहवा मध्ये गौतम बुद्धांचा जन्म झाल्याचा दावा केला जातो.
हे ठिकाण नेपाळ आणि ब्रिटिश भारत यांच्या सीमेच्या अगदी जवळ आहे. बौद्ध धर्माचे अनेक पुरातत्व अवशेषही येथे सापडले आहे. पूर्णचंद्र मुखर्जी यांनी स्वतः त्या भागांना भेटी दिल्या.
त्यातील अनेक कलाकृती नंतर कलकत्ता संग्रहालयात ठेवण्यात आल्या. पूर्वी त्याला 'कलकता पुराद्र्यवलय' असं म्हटलं जायचं.
चिनी प्रवाश्यांनी वर्णन केल्याप्रमाणे पिपरहवा मध्येही काही साम्य आढळलं, मात्र तिथे अनेक विसंगतीही होत्या.
त्यामुळे पूर्णचंद्र मुखर्जी आणि त्यांचे वरिष्ठ व्हिन्सेंट स्मिथ यांना खात्री पटली की प्राचीन कपिलवस्तु हे दुसरं तिसरं कोणतंही शहर नसून नेपाळमधील रुम्मीन-देई अर्थात लुंबिनी आहे.
पैशांची कमतरता, खराब उपकरणं
तराई प्रदेशातील मोहीम पूर्ण करून 5 एप्रिल रोजी पूर्णचंद्र लखनौला परतले.
पूर्णचंद्र मुखर्जी यांनी त्यांच्या अहवालात लिहिलंय की, "माझ्या मागच्या मोहिमेत सर्वेक्षण आणि रेखाचित्र उपकरणं अत्यंत खराब होती. फोटोग्राफीची उपकरणंही जुनी होती. ही उपकरणं नीट काम करत नसल्यामुळे माझ्या कामात खूप अडचणी आल्या."
त्यानंतर त्यांना एकच ड्राफ्ट्समन देण्यात आला.

फोटो स्रोत, MINISTRY OF CULTURE, GOVT. OF INDIA
मुखर्जी लिहितात, "नेपाळ सरकारने दिलेल्या लोकांमध्ये भीमसेन छेत्री आणि 12 डोंगर खोदणाऱ्यांचा समावेश होता. कधीकधी मैदानी प्रदेशातून काही लोकांना मदतीसाठी बोलावलं जायचं."
कपिलवस्तु आणि लुंबिनी गार्डन येथील गौतम बुद्धांच्या जन्मस्थानाचे तपशीलवार वर्णन करण्यास सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी या मोहिमेच्या खर्चाबद्दल माहिती दिली.
"गेल्या वर्षीच्या खर्चातून 2,000 रुपये वाचले. यावर्षी आणखी 800 रुपये देण्यात आले. या उत्खननाच्या कामासाठी एकूण 2800 रुपये नेपाळ राज्याकडून देण्यात आले. एकूण खर्च 300 रुपये आला."
मुखर्जी लिहितात, "माझ्या हिशोबानुसार, अजूनही 2500 रुपये अजून बाकी आहेत, जेणेकरून पुढच्या वर्षीच्या मोहिमेचे आणि उत्खननाचे कामही करता येईल."
वयाच्या 53 व्या वर्षी निधन
पूर्णचंद्र मुखर्जी हे कोलकात्याजवळील पाणिहाटचे होते. पूर्णचंद्र मुखर्जी यांनी त्यांच्या घराला 'कपिलवस्तु भवन' असं नाव दिलं होतं.
पूर्णचंद्र मुखर्जी यांचा जन्म 1849 मध्ये झाला. त्यांचे वडील कालिदास मुखर्जी कलकत्ता टाकसाळीत कामाला होते.
कृष्णू भट्टाचार्य सांगतात, "मुखर्जी यांनी आगरपारा मिशनरी स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. हुशार आणि धाडसी असूनही त्यांना शिक्षणात विशेष रस नव्हता. ते फक्त इतिहास, भूगोल आणि नकाशे यामध्येच रस घ्यायचे."

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून मॅट्रिक आणि नंतर लखनऊच्या कॅनिंग कॉलेजमधून एफए उत्तीर्ण केलं. पण ते पदवी स्तरावरची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत असं भट्टाचार्य सांगतात.
त्यांनी आयुष्यभर विविध प्रकारच्या सरकारी नोकऱ्या केल्या. अवध-रोहिलाखंड रेल्वे विभागात काम केल्यानंतर ते पुन्हा लखनौ संग्रहालयात रुजू झाले.
तेथून त्यांना सरकारी निधीतून चित्रकलेच्या शिक्षणासाठी मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये पाठवण्यात आलं. दोन वर्षांनी ते परत लखनौ संग्रहालयातील नोकरीवर रुजू झाले.
त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी भट्टाचार्य यांनी लखनौ संग्रहालयाला भेट दिली तेव्हा त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही. त्याच्याबद्दलची सर्व माहिती विविध ठिकाणांहून आणि जुन्या वर्तमानपत्रांमधून गोळा करावी लागली.

फोटो स्रोत, Getty Images
"त्यावेळी पुरातत्व विभाग सरकारी बांधकाम विभागाच्या अखत्यारीत यायचा. पूर्णचंद्र मुखर्जी 1882 मध्ये पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणून कामावर रुजू झाले. तीन वर्षांनंतर तत्कालीन कनिष्ठ सर आल्फ्रेड लायन्स यांनी पुरातत्व विभागात मुखर्जींसाठी एक विशेष पद निर्माण केलं."
पण या पदावर डॉ.फुहेर यांची नियुक्ती झाली होती. पूर्णचंद्र यांची सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
1886 मध्ये उत्खनन विभागांतर्गत काम करत असताना त्यांनी बुंदेलखंड परिसरात पुरातत्व संशोधन केलं.
कपिलवस्तुचा शोध घेण्यापूर्वी पूर्णचंद्र यांनी पाटलीपुत्र किंवा सध्याच्या पाटणा प्रदेशातील संदलपूर, बंकीपूर, बुलंदबाग आणि नवरत्नपूर या भागातील 12 फूट खोल मौर्य आणि बौद्ध मंदिरे, अशोक स्तंभाचे अवशेष, एक बौद्ध मठ शोधून काढला होता.
त्यांच्या पुरातत्व शोधांचे अहवाल 1902 च्या नोव्हेंबर-डिसेंबर आणि जानेवारी 1903 च्या इंडियन अँटिक्वेरीच्या अंकांमध्ये प्रकाशित झाले होते.
त्याआधी 1896 मध्ये त्यांनी कलकत्ता संग्रहालयाच्या क्युरेटरची जबाबदारी स्वीकारली होती.पूर्णचंद्र मुखर्जी यांच्या दोन बंगाली कलाकृतींपैकी एक कोलकाता संग्रहालयाविषयी आहे.
हा लेख प्रवासी वृत्तपत्रात छापून आला होता.
'कलिकाता पुराद्र्यवलय' या नावाचं शीर्षक असलेल्या लेखात संग्रहालयातील पुरातत्त्व विभागातील विविध विभागांची नावे, तेथील संग्रहांचे प्रकार तपशीलवार लिहिले होते.
पूर्णचंद्र मुखर्जी यांचे 4 ऑगस्ट 1903 रोजी वयाच्या 53 व्या वर्षी त्यांच्या कपिलवस्तु भवन या निवासस्थानी निधन झाले.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








