भगवान महावीर, जैन धर्म, श्वेतांबर-दिगंबर पंथ याविषयी जाणून घ्या

फोटो स्रोत, Getty Images
- Author, हर्षल आकुडे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
महावीर जैन हे जैन धर्मातील 24 वे आणि अंतिम तीर्थंकर होते. त्यांचा जन्म इ. स. पूर्व सहाव्या शतकातील मानला जातो.
जैन ग्रंथांमधील भगवान महावीर यांचा जन्म चैत्र महिन्यातील त्रयोदशीदिवशी झाला. इंग्रजी कॅलेंडरनुसार दरवर्षी हा दिवस मार्च अथवा एप्रिल महिन्यात येतो.
यादिवशी जैन बांधव भगवान महावीर यांच्या मूर्तीसह रथ यात्रेचं आयोजन करतात. जैन प्रार्थना, स्तवन आणि इतर धार्मिक कार्यक्रम या दिवशी केले जातात.
भगवान महावीर यांचं जीवन, जैन धर्म तसेच जैन धर्मातील श्वेतांबर आणि दिगंबर यांच्याविषयी आपण या बातमीत जाणून घेऊ...
जैन धर्माचा परिचय
जैन धर्म हा एक प्राचीन धर्म आहे. या धर्मातील तत्वज्ञानानुसार सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. अहिंसा, जगा आणि जगू द्या, या तत्वावर हा धर्म आधारित आहे.
'जैन' शब्दाची उत्पत्ती 'जिन' शब्दाने झाली. 'जिन'चा अर्थ होतो विजेता.

फोटो स्रोत, MDS0
जैन धर्मात सर्वाधिक महत्त्व अहिंसेलाच देण्यात आलं आहे. जगातील सगळ्या प्राण्यांना अहिंसेच्या माध्यमातून मुक्तीचा मार्ग मिळू शकतो, असा संदेश जैन धर्मात देण्यात आलेला आहे.
जैन धर्माचे संस्थापक कोण आहेत, याविषयी मतमतांतरे पाहायला मिळतात. काहींच्या मते, हिंदू धर्माप्रमाणेच जैन धर्माचाही कुणी संस्थापक नाही. हा धर्म 24 तीर्थकरांचं आयुष्य आणि संदेश यांच्या पायावर आधारलेला आहे, असं ते मानतात.
तर, काहींच्या मते, पहिले तीर्थंकर ऋषभनाथ यांनी जैन धर्म स्थापन केला. पण इतरांच्या मते, जैन धर्म आधीपासून अस्तित्वात असला तरी त्याला आजचं स्वरुप भगवान महावीर यांच्या काळात प्राप्त झालं.
इसवी सन पूर्व 500 च्या काळात भगवान महावीर यांनी जैन धर्माचा प्रचार केल्यानंतरच हा धर्म प्रामुख्याने सर्वांसमोर आला, असं अनेकांचं मत आहे.
वर उल्लेख केल्याप्रमाणे जैन धर्माचा आधार 24 तीर्थंकर हेच आहेत. तीर्थंकर म्हणजे अशा महान व्यक्ती ज्यांनी मानवी जीवनातील त्रासदायक आणि हिंसाचाराने भरलेलं आयुष्य पार करून अध्यात्मिक मुक्ती मिळवली.
जैन धर्माची शिकवण
जैन धर्मात 5 महाव्रतांबाबत सांगण्यात आलेलं आहे.
यामध्ये अहिंसा, सत्य, अचौर्य (चोरी न करणे), परिग्रहत्याग (अनासक्ति) आणि ब्रह्मचर्य यांचा समावेश आहे.
जैन धर्मामध्ये त्रिरत्न नावाचं तत्वज्ञान आचरणात आणलं जातं. ते म्हणजे सम्यक दर्शन (योग्य विश्वास), सम्यक ज्ञान (योग्य ज्ञान) आणि सम्यक चरित्र (योग्य चारित्र्य/वागणूक) होय. जैन धर्म स्वतःचं काम स्वतः करावं, या सूत्रावर भर देतं.

जैन धर्मामध्ये निरीश्वरवादी सिद्धांत मानला जातो. त्यानुसार, मनुष्याला मदत करण्यासाठी कोणताही देवता येणार नाही.
जैन तत्त्वज्ञानानुसार, संपूर्ण सृष्टी ही सजीव आहे. इतकंच नव्हे तर दगड-धोंडे किंवा पाण्यातही जीवन आहे.
जिवंत प्राणी, विशेषतः मनुष्य, प्राणी, पक्षी, झाडे आणि कीटक यांच्या प्रति अहिंसेचा भाव बाळगणं हाच जैन तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू आहे.
जैन धर्मातील मान्यतेनुसार, जीवनचक्रातून मोक्षप्राप्ती मिळवण्यासाठी घोर तपस्या आणि प्रचंड मोठ्या त्यागाची आवश्यकता असते.
संथारा किंवा संलेखना हा जैन धर्मातील एक अविभाज्य भाग आहे. हा एक उपवास करण्याचा विधी आहे. श्वेतांबर पंथातील जैन त्याला संथारा म्हणतात, तर दिगंबर जैन त्याला संलेखना असं संबोधतात.

फोटो स्रोत, Getty Images
भगवान महावीर कोण होते?
जैन धर्मातील पहिले तीर्थंकर हे ऋषभनाथ होते, तर भगवान महावीर हे 24 वे आणि अंतिम तीर्थंकर होते.
एका बाजूला, पहिल्या 23 तीर्थंकरांविषयी अधिक तपशील विस्ताराने उपलब्ध नाहीत. ते कुठून आले, त्यांचे ऐतिहासिक दस्तऐवज काय, याविषयी स्पष्ट असं सांगता येणार नाही.
त्याच वेळी, भगवान महावीर यांच्याबाबत ठामपणे सांगितलं जाऊ शकतं की त्यांनी या पृथ्वीवरच जन्म घेतला होता. जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या महावीर यांचा जन्म क्षत्रिय कुळात झाला.

फोटो स्रोत, MDS0
महावीर जैन यांचे वडील राजे सिद्धार्थ तर आईचं नाव राणी त्रिशाला असं होतं. भगवान महावीर यांचं नाव लहानपणी वर्धमान असं होतं.
30 व्या वर्षी वर्धमान यांनी आपल्या घराचा त्याग केला आणि एक संन्यासी बनले. जैन धार्मिक ग्रंथ कल्पसूत्रमध्ये त्यांच्या या प्रवासाचा उल्लेख आहे.
त्यांनी अशोक वृक्षाच्या खाली आपले दागिने, मौल्यवान अलंकार आणि सुंदर वस्तूंचा त्याग केला. त्यानंतर अडीच दिवसांच्या निरंकार उपवासानंतर त्यांनी दिव्य वस्त्र धारण केले.
त्यावेळी ते एकटेच होते. आपल्या केसांचं लुंचन (केस तोडण्याचा विधी) महावीरांनी केलं.
वर्धमान यांनी 12 वर्षे कठोर तपस्या केली. 42 व्या वर्षी त्यांना कैवल्य प्राप्ती झाली झाली. कैवल्यची व्याख्या जैन धर्मात सुख आणि दुःखावर विजय मिळवणे अशी करण्यात आली आहे. ही जैन धर्मातील सर्वोच्च अध्यात्मिक ज्ञान प्राप्ती आहे.
कैवल्य प्राप्तीनंतर भगवान महावीर यांनी आपला पहिला उपदेश पावापुरी येथे दिला. त्यानंतर त्यांचा संदेश संपूर्म भारतात पसरला. विशेषतः पश्चिम भारतातील गुजरात, राजस्थान आणि दक्षिण भारतात अनेकांनी जैन धर्म स्वीकारला.
महावीर जैन आणि गौतम बुद्ध यांच्यातील साम्य
भगवान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा काळ हा समकालीन असल्याचं मानलं जातं.
इतकंच नव्हे तर गौतम बुद्ध यांच्याप्रमाणेच महावीर जैन यांचं मूळ गावसुद्धा बिहारच्या मगध प्रांतातीलच आहे.
मराठी विश्वकोशातील माहितीनुसार, सुरुवातीला पाश्चिमात्य अभ्यासकांना बौद्ध धर्म व जैन धर्म यांमध्ये अनेक बाबतींत प्रचंड साम्य आढळून आलं.

फोटो स्रोत, Getty Images
या साम्यामुळे जैन धर्म हा बौद्ध धर्मातून उत्पन्न झालेला असावा, अशी त्यांची चुकीची कल्पना बनली होती. मात्र, हेर्मान याकोबी नामक जर्मन संशोधकाने जैन आगमांची प्राचीनता सिद्ध केली. त्यांनी जैन धर्म बौद्ध धर्माहून वेगळा असून त्यापेक्षाही प्राचीन कालखंडापासून हा आचरणात आणला जात होता, हे सप्रमाण सिद्ध केलं.
शिवाय, गौतम बुद्धांपूर्वी जैन धर्म अस्तित्वात होता, हे दाखविणारे अनेक उल्लेख बौद्ध व जैन वाङ्मयात आढळतात.
खरं तर, गौतम बुद्ध आणि भगवान महावीर हे दोघेही ब्राह्मण वर्चवस्ववाद, कर्मकांड आणि वैदिक प्रथा यांच्याविरोधात उभ्या ठाकलेल्या आंदोलनांचे प्रणेते मानले जातात.
महावीर आणि गौतम बुद्ध यांनी दोघांनीही अहिंसेला प्राधान्य दिलं होतं, मात्र असं असलं तरी इतर काही बाबींमध्ये दोन्ही धर्मात काही मूलभूत फरक असल्याचं दिसून येतं.
उदाहरणार्थ, भगवान महावीरांचे जैन अनुयायी आत्मा आणि पुनर्जन्माचा सिद्धांत मान्य करतात. तर बौद्ध धर्मात आत्मा आणि पुनर्जन्माची संकल्पना नाकारण्यात आलेली आहे.
जैन धर्मातील दोन पंथ - श्वेतांबर आणि दिगंबर
काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथे एका जैन मंदिराचा वाद समोर आला होता.
शिरपूर येथे जैन धर्मीयांचे 23 वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांचं मंदिर आहे.
या मंदिराचा वाद न्यायालयात गेल्या 42 वर्षांपासून प्रलंबीत होता. मंदिर खुले करण्यासाठी आणि मूर्ती लेप करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम आदेश देण्यात आला. मात्र ते उघडण्यादरम्यान जैन धर्मातील श्वेतांबर आणि दिगंबर पंथीयांमधील वाद चिघळल्याचं दिसून आलं. वाद विकोपाला जाऊन हाणामारीपर्यंत हे प्रकरण गेलं होतं. त्यावेळी या वादाची मोठी चर्चा माध्यमांमध्ये झाली होती.
पण एकाच जैन धर्मातील श्वेतांबर आणि दिगंबर पंथांमध्ये वाद का? शिवाय त्यांच्यामध्ये काय फरक आहे, हेसुद्धा आपल्याला जाणून घ्यावं लागेल.

फोटो स्रोत, Getty Images
श्वेतांबर आणि दिगंबर पंथांमधील वादाचं मूळ शेकडो वर्षांपूर्वी घडलेल्या एका दुष्काळात आहे.
भगवान महावीरांच्या काळात जैन धर्माचा प्रसार देशात सर्वत्र झाला. महावीरांच्या निर्वाणानंतर त्यांचे दोन अनुयायी भद्रबाहू आणि स्थूलभद्र हे जैन धर्माचे प्रमुख आचार्य होते.
नंतरच्या काळात मगध प्रांतात दुष्काळ पडणार असल्याचं आचार्य भद्रबाहू यांना लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी काही कालावधीसाठी दक्षिणेकडे जाऊन राहण्याचा निर्णय घेतला.
त्यावेळी आचार्य भद्रबाहूंच्या नेतृत्वाखाली 12 हजार जैन अनुयायी दक्षिणेत गेले.
पण, इतर काही अनुयायी हे त्यांच्यासोबत न जाता मगधातच राहिले. मागे राहिलेल्या या जैन धर्मीयांचं नेतृत्व स्थूलभद्र यांनी केलं.
दुष्काळाचा प्रभाव वाढत गेला तसा स्थूलभद्र यांनी धर्मात काही सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पाटलीपुत्रमध्ये एक परिषद भरवून यासंदर्भातील निर्णय घेतले.
दरम्यानच्या काळात, दक्षिणेत वास्तव्य करत असलेल्या भद्रबाहूंनी जैन धर्मातील प्रथा कठोरपणे पाळणं सुरूच ठेवलेलं होतं.
मात्र, भद्रबाहू दक्षिणेतून मगधात परतल्यावर त्यांनी स्थूलभद्रांचे नवे निर्णय मान्य केले नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
या मतभेदातूनच पुढे जैन धर्मात श्वेतांबर व दिगंबर असे दोन प्रमुख पंथ निर्माण झाले. यामुळेच भद्रबाहू यांचं वास्तव्य राहिलेल्या दक्षिण भारतात दिगंबर पंथीय जैनांचं प्रमाण जास्त आहे. तर उत्तरेसह गुजरात आणि राजस्थानमध्ये श्वेतांबर पंथीय जैनांची संख्या जास्त असल्याचं पाहायला मिळतं.
साधारणपणे इ. स. पहिल्या शतकात या दोन पंथांतील वेगळेपणा स्पष्ट होऊन उत्तरोत्तर प्रत्येकाचे स्वतंत्र स्वरूप निश्चित होत गेले.
दिगंबर पंथीय हे मुख्य साधूस ‘भट्टारक’ म्हणतात, तर श्वेतांबर ‘सूरी’ असं संबोधतात.
दिगंबर पंथीयांच्या मते, स्त्रीजन्मात जीवाला मोक्ष मिळत नाही, स्त्रीला चांगले कार्य करून पुढच्या जन्मात पुरुष जन्म मिळवावा लागतो, त्यानंतरच त्यांना मोक्ष प्राप्ती होऊ शकते, असं दिगंबर पंथीयांचे मत आहे.दुसरीकडे, स्त्री जन्मातही मोक्ष मिळू शकतो, असे श्वेतांबर पंथीय मानतात.
श्वेतांबर पंथाचे साधू श्वेत (पांढरी) वस्त्रे धारण करतात. पात्र, पात्रबंध, पात्रप्रमार्जनिका, रजस्त्राण, दोन चादरी, कांबळे, मुखवस्त्र इ. चौदा उपकरणे ते जवळ बाळगतात. दुसरीकडे, दिगंबर साधू हे नग्न राहतात.
‘दिगंबर’ शब्दाचा अर्थ दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे म्हणजे नग्न, असा होतो. दिगंबर पंथाचे अनुयायी मोक्षप्राप्त्यर्थ नग्नतेचा पुरस्कार करतात तसेच स्त्रीमुक्तीचाही ते निषेध करतात.
जैन धर्मातील मूळ जिनप्रतिमा नग्नस्वरूपात होत्या परंतु मंदिरासंबंधी व मूर्तीसंबंधी वाद होऊ लागले, तेव्हा श्वेतांबर पंथीय अनुयायी वस्त्रांकित मूर्तीची पूजा करू लागले व मूर्तीवर पूजेच्या वेळी इतर अलंकारही घालू लागले.
दिगंबरांना श्वेतांबरप्रणीत 45 आगम मान्य नाहीत. त्यांच्या मते मूळ आगमग्रंथ कालोदरात नष्ट झाले आहेत.
दिगंबर व श्वेतांबर हे दोन पंथ वेगळे झाले तेव्हापासून आपल्या मताला पोषक असलेल्या अथवा करून घेतलेल्या ग्रंथांचेच पठण त्या त्या पंथांमध्ये केले जाऊ लागले आहे.
संदर्भ -
- बीबीसी हिंदीचा लंडन किंग्ज कॉलेजचे प्राध्यापक सुनील खिलनानी यांच्या फैला उजियारा मालिकेत प्रकाशित महावीर स्वामी : अहिंसा के सिपाही वर आधारित लेख - महावीर जयंती और महावीर स्वामी के बारे में जानें ये खास बातें
- मराठी विश्वकोश - जैन धर्म, भगवान वर्धमान महावीर, श्वेतांबर आणि दिगंबर पंथांविषयीचे लेख











