गुरु तेग बहादूर : काश्मिरी हिंदूंच्या रक्षणासाठी मृत्यू पत्करला, पण औरंगजेबासमोर झुकले नाहीत

- Author, रेहान फझल
- Role, बीबीबी प्रतिनिधी
11 ऑगस्ट 1664 च्या दिवशी दिल्लीतील शिखांचा एक जत्था पंजाबच्या दिशेनं रवाना झाला.
हा जत्था निघण्यापूर्वी सहा महिने शिखांचे आठवे गुरू हरकिशन यांनी बकालामध्ये त्यांचा उत्तराधिकारी मिळेल असं सांगितलं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर हा जत्था पंजाबमधील बकाल गावाच्या दिशेनं निघाला.
बकाल गावात शिखांची एक विशेष सभा बोलावण्यात आली होती. या सभेत तेग बहादूर यांना शिखांचे पुढचे गुरू म्हणून घोषित करण्यात आलं.
या पारंपरिक समारंभात गुरदित्ता रंधावा यांनी नव्या गुरूंच्या कपाळावर भगवा नाम ओढून त्यांना नारळ आणि पाच पैसे दिले आणि त्यांना गुरूच्या गादीवर बसवलं.
सुरुवातीच्या काळात गुरू तेग बहादूर फारसे बोलके नव्हते. खुशवंत सिंह त्यांच्या 'ए हिस्ट्री ऑफ द सिख्स' या पुस्तकात लिहितात, "गुरू तेग बहादूर अत्यंत नम्र स्वभावाचे असल्याने सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय झाले. धीरमल यांनी त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आलं नाही."

खुशवंत सिंह लिहितात, "तेग बहादूर बकाला सोडून अमृतसरला आले, पण हरमंदिर साहिबचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद केले गेले. मग ते तिथून त्यांच्या वडिलांनी वसवलेल्या किरतपूर गावी गेले. तिथूनच पाच किलोमीटर अंतरावर त्यांनी आनंदपूर नावाचं नवं गाव वसवलं."
आज या ठिकाणाला आनंदपूर साहिब या नावाने ओळखलं जातं. पण इथंही त्यांच्या शत्रूंनी त्यांना सुखानं राहू दिलं नाही.

गुरु तेग बहादूर यांना अटक
शिखांचे सहावे गुरु हरगोविंद यांचे सर्वात धाकटे पुत्र म्हणजे गुरू तेग बहादूर. त्यांचा जन्म 1621 साली झाला.
आनंदपूरमध्ये राहिल्यानंतर काही दिवसांनी गुरु तेग बहादूर यांच्या मनात पूर्व भारताला भेट देण्याचा विचार आला.
ते पूर्वेकडे निघाले असताना, वाटेत आलम खानच्या नेतृत्वाखाली मुघल सैनिकांनी त्याला अटक करून दिल्लीला परत आणलं.
गुरू तेग बहादूरांना अटक का झाली याबद्दल इतिहासकारांच्यात आजही एकमत नाहीये. खुशवंत सिंग लिहितात, "मुघलांचा दरबारी राम रायने त्यांना अटक करवली. गुरु तेग बहादूर यांनी शांततेचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला."
इतिहासकार फौजा सिंग मात्र या याच्याशी सहमत नाहीत. ते म्हणतात, तोपर्यंत रामराय तेग बहादूर यांना आपला गुरू मानू लागले होते, त्यांचा कोणताही वाईट हेतू नव्हता.
औरंगजेबासमोर हजर केलं
सरबप्रीत सिंग त्यांच्या 'स्टोरी ऑफ द शिख्स' या पुस्तकात लिहितात, "त्यांच्या अटकेची कारणं काही असो पण 8 नोव्हेंबर 1665 ला गुरु तेग बहादूर यांना अटक करून दिल्लीला नेण्यात आलं. आणि त्यांना औरंगजेबासमोर हजर करण्यात आलं."
गुरू तेग बहादूर सम्राट औरंगजेबाशी बोलताना म्हणाले की, "भले ही माझा धर्म हिंदू नसेल, भले ही मी वेदांच्या श्रेष्ठतेवर, मूर्तीपूजेवर आणि इतर चालीरीतींवर माझा विश्वास नसेल पण हिंदू आणि त्यांच्या धार्मिक श्रद्धांचा आदर आणि हक्कांसाठी मी कायमस्वरूपी लढेन."
पण गुरू तेग बहादूर यांच्या या शब्दांचा औरंगजेबावर काहीही परिणाम झाला नाही. औरंगजेबाच्या दरबारात जे उलेमा होते त्यांनी औरंगजेबाचे कान भरले. त्यांनी औरंगजेबाला सांगितलं की, तेग बहादूरांचा वाढता प्रभाव इस्लामसाठी धोकादायक ठरू शकतो."

त्यामुळे औरंगजेबाने त्यांना फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. पण औरंगजेबाच्या दरबारात असलेला एक राजपूत मंत्री राजा रामसिंहाने त्यांना जिवंत सोडण्याची विनंती केली. आणि औरंगजेबाने राजपूत मंत्र्यांची विनंती मान्य केली.
जवळपास एक महिना गेला. डिसेंबर महिन्यात गुरु तेग बहादूर यांच्यावरील सर्व आरोप मागे घेण्यात आले आणि त्यांची सुटका करण्यात आली. त्यांची सुटका होताच त्यांनी पूर्वेकडचा प्रवास पुन्हा सुरू केला. ते मथुरा, आग्रा, कानपूर, अलाहाबाद, वाराणसी, बोधगया मार्गे पाटण्याला पोहोचले.
गुरु तेग बहादूर यांच्या पत्नी माता गुजरी यांनी तिथंच राहायचं असं ठरवलं. पण गुरु तेग बहादूर यांना त्यांच्या अनुयायांना भेटण्यासाठी ढाक्याकडे जायचं होतं.
ढाक्यात असतानाच त्यांना मुलगा झाल्याची बातमी मिळाली. त्यांच्या मुलाचं नाव गोविंद राय ठेवण्यात आलं. पण पुढे जाऊन त्यांना गुरु गोविंद सिंग या नावाने ओळखलं जाऊ लागलं.
आसाममध्ये तीन वर्षांचं वास्तव्य
याच दरम्यान कामरूपच्या राजाने बंड केलं होतं. त्याचं हे बंड शमविण्यासाठी औरंगजेबाने राजा रामसिंग याच्यावर जबाबदारी सोपवली.
त्या काळात कामरूपला धोकादायक मानलं जायचं, कारण इथल्या शूर योद्ध्यांची आणि काळ्या जादूची चर्चा असायची. राजा राम सिंह यांचा गुरु तेग बहादूर यांच्या आध्यात्मिक सामर्थ्यावर प्रचंड विश्वास होता.
राजा राम सिंहाने गुरू तेग बहादूर यांना कामरूपच्या मोहिमेत सहभागी होण्याची विनंती केली. आणि तेग बहादूरांनी देखील ती विनंती नाकारली नाही.
सरबप्रीत सिंह लिहितात, "या युद्धाच्या कालावधीत तेग बहादूर यांनी आसाममध्ये तीन वर्ष घालवली. या दरम्यान त्यांनी मध्यस्थांची भूमिका पार पाडली.
पाटण्यात आल्यावर त्यांना पंजाबमध्ये येण्याची विनंती करण्यात आली, कारण पंजाबमध्ये त्यांची गरज होती, त्यामुळं त्यांना त्यांच्या पत्नीला भेटता आलं नाही.
मार्च 1672 मध्ये ते चक नानकीच्या गादीवर परतले. त्यांनी अशा ठिकाणी प्रवास केला, जिथं गुरू नानक वगळता इतर कोणत्याही शीख गुरूंनी भेट दिली नव्हती."

काश्मिरी पंडितांची विनंती
25 मे 1675 मध्ये गुरु तेग बहादूर आनंदपूर साहिबमध्ये एका संगतीत बसले होते, तिथंच काश्मिरी पंडितांचा एक गट त्यांच्या भेटीसाठी आला. पंडित किरपा राम या गटाचं नेतृत्व करत होते. त्यांनी तेग बहादूरांपुढं हात जोडले आणि त्यांना म्हणाले की, हजारो वर्षांपूर्वीचा त्यांचा धर्म धोक्यात आलाय.
औरंगजेबाने नेमलेला काश्मीरचा गव्हर्नर इफ्तेखार खान याने सगळ्यांना इस्लामचा स्वीकार करण्याची सक्ती केलीय. जो कोणी इस्लाम स्वीकारणार नाही त्यांना मृत्युदंड देण्यात येईल असाही आदेश दिलाय.
किरपा रामची ही कहाणी ऐकून गुरू तेग बहादूर यांचं मन द्रवलं, पण त्यांनी त्यांच्या विनंतीवर लगेच काही उत्तर दिलं नाही.
हरी राम गुप्ता त्यांच्या गुरु तेग बहादूर यांच्या चरित्रात लिहितात, "काश्मिरी पंडितांशी बोलताना गुरू तेग बहादूर म्हणाले, बादशाहाच्या प्रतिनिधींना सांगा की, ज्या दिवशी गुरु तेग बहादूर इस्लामचा स्वीकार करतील तेव्हा आम्हीही आमचा धर्म बदलू."
हरिराम गुप्ता लिहितात, "सर्व शीख गुरू तेग बहादूर यांना 'सच्चा बादशाह' म्हणायचे. आणि औरंगजेबाला यावर आक्षेप होता. औरंगजेबाला वाटलं की, तेग बहादूरांना आपणच खरे बादशाहा आहोत आणि भारताचा शासक नकली बादशाहा आहे असं जाणवून द्यायचं होतं. तेग बहादूरांच नाव 'बहादूर' होतं हे सुद्धा औरंगजेबाला खटकायचं. कारण हे नाव मुघल दरबारात उपस्थित मान्यवरांना उपाधी म्हणून दिलं जायचं."
शेवटी औरंगजेबाने गुरू तेग बहादूर यांना दिल्लीत आपल्यासमोर हजर करावं आणि इस्लाम स्वीकारावा अन्यथा जीव गमवावा लागेल, असे आदेश दिले.

गुरु तेग बहादूर यांची प्रश्न - उत्तरं
गुरू तेग बहादूर यांनी त्यांच्या कुटुंबियांचा आणि साथीदारांचा निरोप घेतला. आणि सर्वांना सांगितलं की, त्यांच्यानंतर पुढचे शीख गुरू त्यांचे पुत्र गोविंद राय बनतील.
11 जुलै 1675 रोजी गुरु तेग बहादूर आपल्या पाच अनुयायांसह दिल्लीकडे निघाले. त्यात भाई मती दास, त्यांचे धाकटे भाऊ सती दास, भाई दयाला, भाई जैता आणि भाई उदय होते.
थोडं अंतर चालून गेल्यावर त्यांनी भाई उदय आणि भाई जैता पुढची बातमी काढण्यासाठी दिल्लीला पाठवलं.
पण पुढच्याच दिवशी त्यांना रोपड पोलीस स्टेशनचे हकीम मिर्झा नूर मोहम्मद खान यांनी मलिकपूरमधील रंघारण गावात अटक केली.
रोपडहून त्यांना आणि त्यांच्या तीन साथीदारांना कडक बंदोबस्तात सरहिंदला नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना दिल्लीतील चांदणी चौक पोलिस ठाण्यात नेण्यात आलं. चार महिन्यांच्या या तुरुंगवासात त्यांचा आणि त्यांच्या तीन साथीदारांचा अतोनात छळ करण्यात आला.
गुरू तेग बहादूर यांचं चरित्र लिहिणारे हरबंस सिंह विर्दी त्यांच्या 'गुरु तेग बहादूर सेव्हियर ऑफ हिंदू अँड हिंदुस्थान' या पुस्तकात लिहितात,
"गुरू तेग बहादूर आणि त्यांच्या तीन साथीदारांना दिल्लीच्या लाल किल्ल्यावर नेण्यात आलं. तिथं त्यांना हिंदू आणि शीख धर्माविषयी प्रश्न विचारण्यात आले. तिथं त्यांना विचारलं की, जाणवं घालणाऱ्यांसाठी आणि कपाळावर टीका लावणाऱ्यांसाठी तुम्ही तुमचा प्राण का देताय?"
यावर गुरू तेग बहादूर म्हटले, हिंदू जरी दुर्बल असतील तरी त्यांनी नानकांच्या दरबारात शरण मागितली. जर मुस्लिमांनी ही मदत मागितली असती तरीही आम्ही त्यांच्यासाठी आमचे प्राण दिले असते.
औरंगजेबाची चेतावणी

डॉ. त्रिलोचन सिंह त्यांच्या 'गुरु तेग बहादूर प्रोफेट एंड मार्टियर' या पुस्तकात लिहितात,
"औरंगजेब सकाळी 9 वाजता दिवाण-ए-आममध्ये दाखल झाला. त्याने सफेद सिल्कचा झब्बा घातला होता. त्याच्या कमरेला एक सिल्कचा कमरबंद होता त्याला रत्नजडित खंजीर लटकवला होता. डोक्यावर सफेद साफा होता. बादशाहाच्या दोन्ही बाजूला किन्नर उभे होते. याकच्या शेपटीपासून आणि मोरांच्या पंखापासून बनवलेल्या पंख्यांनी ते बादशहाला वारा घालत होते.
बादशहाला आधी शीख धर्माची माहिती देण्यात आली. त्याला हे ही माहीत होतं की मुस्लिमांप्रमाणे शीखही मूर्तीपूजेच्या विरोधात आहेत. त्याला असं वाटत होतं की तो गुरू तेग बहादूरांना इस्लाम स्वीकारण्यास राजी करेल.
औरंगजेबाने गुरू तेग बहादूर यांना सांगितलं की, तुमचा ना मूर्तीपूजेवर विश्वास आहे, ना या ब्राह्मणांवर, मग तरीही तुम्ही यांचं प्रकरण माझ्याकडे घेऊन का आलाय?
गुरू तेग बहादूरांनी औरंगजेबाला आपल्या परीने सांगायचा प्रयत्न केला मात्र तरीही औरंगजेब काही ऐकला नाही. शेवटी दरबारात स्पष्ट करण्यात आलं की, त्यांनी एकतर इस्लाम स्वीकारावा नाहीतर मरायला तयार व्हावं.
गुरु तेग बहादूर यांना लोखंडी पिंजऱ्यात घालून बेड्या ठोकण्यात आल्या.
औरंगजेबाने गुरू तेग बहादूरांकडे बरेच दूत पाठवले, पण त्यांनी आपला मुद्दा सोडला नाही.
एकेदिवशी तुरुंगाचा प्रमुख गुरू तेग बहादूरांना म्हणाला, "तुम्ही इस्लाम स्वीकारावा अशी बादशाहाची इच्छा आहे. जर तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर निदान काहीतरी चमत्कार दाखवा, म्हणजे तुम्ही पवित्र पुरुष आहात यावर त्यांचा विश्वास बसेल."
हरबंस सिंह विर्दी लिहितात, "यावर तेग बहादूर उत्तरले, माझ्या मित्रा, चमत्कार म्हणजे दैवी कृपा. तो जगासमोर जादू दाखवण्याची अनुमती देत नाही. त्याच्या कृपेचा गैरवापर केला तर त्याला राग येईल. असा चमत्कार दाखवण्याची मला गरज नाही, कारण आपल्यासमोर रोजच चमत्कार घडत आहेत. बादशाहा दुसऱ्यांना मृत्यूदंड देतोय पण त्याला अंदाज नाहीये की, एक दिवस त्याला ही मृत्यू येणार आहे. आणि हा चमत्कार नाहीये का?"

तीन साथीदारांना मृत्यूदंड

गुरू तेग बहादूर आपल्या म्हणण्यावरून माघार घेत नाहीयेत असं कळताच त्यांच्या साथीदारांचा छळ सुरू करण्यात आला.
हरी राम गुप्ता त्यांच्या गुरु तेग बहादूर यांच्या चरित्रात लिहितात, "चांदणी चौकात जिथं आज कोतवाली आहे, तिथं कारंज्याजवळ भाई मती दास यांची वार करून हत्या करण्यात आली. त्यांनी या अत्याचाराचा सामना शांती आणि धैर्याने केला, आजही शिखांच्या दैनिक अरदास मध्ये त्यांचा उल्लेख केला जातो."
तिथं जवळच गुरू तेग बहादूर उभे होते, त्यांना पाहून मतीदास यांनी आशीर्वाद घेण्यासाठी हात जोडले. त्यानंतर सती दास यांना उकळत्या तेलात टाकण्यात आलं तर दयाला यांच्या अंगाला कापूस गुंडाळून एका खांबाला बांधण्यात आलं, आणि नंतर त्याला आग लावण्यात आली.
हा सर्व प्रकार पाहण्यासाठी तिथं मोठी गर्दी जमली होती. आणि हे सर्व गुरू तेग बहादूर यांच्या डोळ्यासमोर सुरू होतं. गुरू तेग बहादूर सतत वाहे गुरूंचा जप करत होते.
तिथं जैता दास नावाचे आणखीन एक शिष्य उपस्थित होते. त्यांनी त्या रात्री मारलेल्या इतर शिष्यांचे मृतदेह जवळून वाहणाऱ्या जमुना नदीत फेकून दिले.
गुरू तेग बहादूरांचा शेवटचा दिवस
ज्या दिवशी गुरू तेग बहादूरांना मृत्युदंड देण्यात येणार होता, त्यादिवशी ते झोपेतून लवकर जागे झाले. कोतवालीजवळील विहिरीवर त्यांनी आंघोळ करून प्रार्थना केली.
11 वाजता त्यांना फाशीच्या ठिकाणी नेण्यात आलं. तिथं काझी अब्दुल वहाब बोरा यांनी त्यांना फतवा वाचून दाखवला. जल्लाद जलालुद्दीन समोर तलवार घेऊन उभा होता. त्या क्षणाला आकाशात ढग दाटून आले होते, लोक रडत होते. गुरु तेग बहादूर यांनी दोन्ही हात वर करून उपस्थितांना आशीर्वाद दिला. जलालुद्दीनने गुरु तेग बहादूर यांचा शिरच्छेद करताच गर्दीत शांतता पसरली. ज्या ठिकाणी गुरु तेग बहादूर यांचा शिरच्छेद करण्यात आला, त्याच ठिकाणी नंतर सिसगंज गुरुद्वारा बांधण्यात आला. तेग बहादूर यांचे शिष्य जैता दास यांनी त्यांचं शीर दिल्लीपासून 340 किमी अंतरावर वसलेल्या आनंदपूरला नेलं आणि त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलाला गोविंद राय यांना दिलं. त्यांच्या मुलाने ते शीर आनंदपूर साहिबमध्ये सन्मानपूर्वक दफन केलं.
लखी शाह नामक व्यक्तीने कोतवालीपासून आठ किलोमीटर दूर असलेल्या रकाबगंज इथं गुरू तेग बहादूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. तिथंच त्यांच्या स्मरणार्थ गुरुद्वारा बांधण्यात आला.
मुघलांच्या पतनाची सुरुवात
गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानानंतर अनेक पंडितांनी शीख धर्म स्वीकारला. काश्मिरी ब्राह्मणांचं नेतृत्व करणाऱ्या किरपा राम यांनीही शीख धर्म स्वीकारला.
शीख अध्येता गुरुमुख सिंह यांनी त्यांच्या 'गुरु तेग बहादूर द ट्रू स्टोरी' या पुस्तकात लिहिलंय की, "गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाने बऱ्याच गोष्टी बदलल्या. यातून भारतीय उपखंडाचा इतिहास बदलला. मानवी हक्कांसाठी लढताना दिलेल्या बलिदानापैकी हे एक मोठं बलिदान होतं. आणि इथूनच भारतातील बलाढ्य मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाची सुरुवात झाली."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








