शाहू महाराजांच्या काळात घडलेले वेदोक्त प्रकरण काय होते?

फोटो स्रोत, FACEBOOK/INDRAJIT SAWANT
वेदोक्त आणि पुराणोक्त हे शब्द महाराष्ट्रात अनेकदा कानावर पडतात. बहुतांश लोकांना कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज आणि त्यांच्या बाबतीत घडलेले वेदोक्त प्रकरण यांचा संदर्भ ऐकून माहिती असतो.
वेदोक्त प्रकरणामुळे सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे सामाजिक आणि राजकीय मन ढवळून निघाले होते. यावर दीर्घकाळ चर्चा, मंथन, टीका, आरोप-प्रत्यारोप होत राहिले होते.
त्यांच्याबाबतीत घडलेले हे वेदोक्त प्रकरण काय आहे याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ.
ही माहिती ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या ‘राजर्षी शाहू छत्रपती जीवन व कार्य’ या पुस्तकातून घेतलेली आहे. (पृष्ठ क्र-31-37)
वेदोक्त म्हणजे काय?
वेदोक्त याचा शब्दशः अर्थ ‘वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे’ असा होतो. तथापि, हिंदू धर्मामधील सोळा संस्कार व इतर धर्मकृत्ये वैदिक मंत्रांनी करण्याचा अधिकार म्हणजे वेदोक्त असा त्याचा अर्थ रुढ झाला होता.
हा अधिकार प्राचीन काळी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णांना होता. काही काळाने तो फक्त ब्राह्मण वर्णापुरताच मर्यादित झाला आणि इतर तीन वर्ण एका गटात ठेवण्यात आले.
त्यामुळे ब्राह्मणांना वेदोक्त आणि इतर तीन वर्णांच्या गटाला पुराणोक्त अशा मंत्रांची योजना करण्यात आली. वेदातले मंत्र ते प्रथम दर्जाचे म्हणून ते ब्राह्मणांसाठी आणि इतरांसाठी पुराणोक्त म्हणजे दुय्यम दर्जाचे मंत्र ठेवण्यात आले.
अशी ही थोडक्यात झालेली विभागणी आहे. या विभागणीमुळेच पुढे हे प्रकरण उद्भवले.
वेदोक्त प्रकरण
1899 साली हे प्रकरण कोल्हापूरामध्ये घडले. कार्तिक महिन्यात शाहू महाराज पंचगंगा नदीवर स्नानासाठी जात असत. यावेळेस त्यांच्या परिवारातले काही सदस्य बंधू बापूसाहेब महाराज, मेहुणे मामासाहेब खानविलकर आणि स्नानाच्यावेळेस मंत्र म्हणणारे नारायण भटजी असत.
एकेदिवशी महाराजांचे स्नेही आणि प्रकांड पंडित राजारामशास्त्री भागवतही होते. महाराजांचे स्नान सुरू असताना भटजी म्हणत असलेले मंत्र वेदोक्त नसून पुराणोक्त असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
त्यांनी हे महाराजांच्या लक्षात आणून दिलं. महाराजांनी भटजींना विचारताच त्यांनी शूद्रांना पुराणोक्त मंत्रच सांगावे लागतात असं उत्तर दिलं.

फोटो स्रोत, Getty Images
हे उत्तर शाहू महाराजांसाठी एक मोठ्या विचारमंथनाचं कारण ठरलं. त्या वाक्यानं ते अंतर्मूख तर झालेच त्याहून पुढील मोठ्या सामाजिक चळवळीसाठी सिद्ध झाले.
क्षत्रियकुलावतंस हिंदुपदपातशहा असं बिरुद लावणाऱ्या राजालाही दर्जा मिळत नसेल तर बाकी लोकांवर काय अन्याय होत असेल याची त्यांना जाणीव झाली.
वेदोक्ताचं असं प्रकरण उद्भवण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळीही असा वाद निर्माण झाला होता. शिवाजी महाराजांनी काशीहून गागाभट्टांना बोलावून राज्याभिषेक करवून घेतला होता.
साताऱ्याचे महाराज प्रतापसिंह यांच्या कार्यकाळातही वेदोक्ताधिकाराचा तंटा निर्माण झाल्यावर त्यांनी पंडितांची एक निर्णयसभा बोलावली आणि त्यामध्ये मराठ्यांचे क्षत्रियत्व सिद्ध होऊन त्यांना वेदोक्ताचा अधिकार मान्य केला गेला.
1896 साली बडोद्यात सयाजीराव गायकवाड यांच्याकडील धार्मिक विधी महाराष्ट्रीय ब्राह्मणांनी वेदोक्त पद्धतीने करण्यास नकार दिल्यावर सयाजीरावांनी राजस्थानी आणि गुजराती ब्राह्मणांकरवी ते करवून घेतले होते.
वेदोक्त प्रकरणाचे पडसाद
या वेदोक्त प्रकरणाचे पडसाद कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात न पडते तरच नवल. यातून एकप्रकारचा संघर्षच निर्माण झाले. महाराष्ट्रातील तत्कालीन वर्तमानपत्रांतून, सभा-भाषणांतून त्याची दोन्ही बाजूंनी चर्चा होऊ लागली.
ऑक्टोबर 1901 मध्ये लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरीमध्ये वेदोक्ताचे खूळ या नावाचे दोन अग्रलेख लिहिले. त्यातून त्यांनी वेदोक्तातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ती थोडक्यात अशी होती, “या युगात ब्राह्मण व शूद्र असे दोनच वर्ण राहिले आहेत. शिवाजी महाराजांच्या कार्यावर मोहिती होऊन तत्कालीन कर्त्या पुरुषांनी खास सवलत म्हणून त्यांना क्षत्रियत्व बहाल करुन गागाभट्टाच्या हस्ते वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला; पण त्यावेळी भोसले घराण्याची सर्व धर्मकृत्ये पुराणोक्तच करावीत अशी परंपरा ब्राह्मणांनी घालून दिली होती. हीच परंपरा पाळली गेली पाहिजे. छत्रपती घराण्याशिवाय अन्य मराठे क्षत्रिय नाहीत. सबब त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही.”

फोटो स्रोत, Getty Images
छत्रपतींच्या भोसले घराण्याशिवाय इतर घराण्यांना वेदोक्ताचा अधिकार नाकारणं हे शाहू महाराजांना अस्वस्थ करणारं होतं. आधी फक्त आपल्यापुरते राजवाड्यासाठी वेदोक्ताचा आग्रह धरणाऱ्या महाराजांनी समस्त मराठ्यांना हा अधिकार मिळावा असा आग्रह धरला आणि तसेही प्रयत्नही केले.
पुढे जाऊन राजर्षी शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर जातीतींल मुलांना वेद शिकण्याचा अधिकार मिळावा यासाठी थेट वैदिक स्कूल काढूनच आपल्या कृतीतून उत्तर दिले.
ज्या ब्राह्मणांनी वेदोक्त पद्धतीने विधी करण्यास नकार दिला त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.
संस्थानचे राजोपाध्यांचे राजसेवेसाठी दिलेले 30 हजारांचे इनाम जप्त करण्यात आले. करवीरच्या शंकराचार्य मठाचे ब्रह्मनाळकर स्वामी यांचे 50 हजार रुपयांचे उत्पन्न सरकारजमा करण्यात आले. इतरही शेकडो ब्राह्मणांची उत्पन्नं आणि इनाम सरकारजमा करण्यात आले.
हे प्रकरण कोलकात्याच्या गव्हर्नर जनरलपर्यंतही गेले. वेदोक्ताचा अधिकार कोणाला द्यायचा यावर चर्चा, टीका घडत राहिली. 1905 साली डिसेंबर महिन्यामध्ये जाहीर सभेतील ठरावात महाराजांचे क्षत्रियत्व आणि त्यांना वेदाधिकार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण निवळले.
वेदोक्तामुळे काय झाले?
वेदोक्त हा शाहू महाराजांच्या उत्क्रमणशील जीवनातला एक महत्त्वाचा आणि पहिला टप्पा होता हे लक्षात घेतले पाहिजे. हे स्पष्ट आहे की महाराजांनी चार्तुवर्ण्य व्यवस्थेच्या अंतर्गत मराठ्यांच्या क्षत्रियत्वाचा आणि वेदाधिकाराचा आग्रह धरला होता. त्यांनी या टप्प्यावर चातुर्वर्ण्य व्यवस्था नाकारलेली नाही.
वर्णश्रेष्ठत्व, जातिभेद आणि अस्पृश्यता यांच्याविरोधात त्यांनी 1910 नंतरच्या दशकात सर्वंकष लढा पुकारला. ही त्यांच्या उत्क्रमणशील जीवनातील फार पुढची म्हणजे 1915-16 सालानंतरची पायरी आहे. त्या पायरीचे निकष 1901-02 सालच्या महाराजांच्या जीवनाला लावणे चुकीचे होईल.
खुद्द महाराजांनीही आपण पुढे महाराष्ट्रातील अखिल ब्राह्मणेतरांचे, दलित पतितांचे कैवारी बनून आपणास त्यांच्या हक्कासाठी आणि अभ्युदयासाठी लढा द्यावा लागेल याचे स्वप्न पूर्णांशाने पडले होते, असे म्हणता येणार नाही.
एखाद्या कळीचे रुपांतर विकसित सुगंधी फुलात व्हावे त्याप्रमाणे महाराजांचे सार्वजनिक जीवन हळूहळू विकसित होत गेले. वेदोक्त कालखंडात महाराजांच्या या जीवनाची कळी नुकतीच उमलू पाहात होती असं म्हणावं लागेल.
कृतीतून दिला संदेश
शाहू महाराजांनी समाजाला दुभंगीत करणाऱ्या आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या सर्व अनिष्ट प्रथा आणि व्यवस्थांच्या मुळाशी जाऊन त्यांची उत्तरं शोधण्याचा, त्यांना मानवी पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला.
उदात्त मानवी जीवन उभारण्याची त्यांची एक खास शैली होती. ती कधी सडेतोड, कधी मुत्सद्देगिरीची, कधी अपरंपार प्रेमाची, कधी प्रतिस्पर्ध्याला आव्हान देणारी तर कधी मिश्किलपणे धडा शिकवणारी होती.
तो काळच असा होता की अस्पृश्यांना शिवणे म्हणजे मोठी अपवित्र गोष्ट आणि अस्पृश्यांनी स्पृश्यांच्या वस्तुंना, ठिकाणांना, देवळांना शिवणे हा मोठा गुन्हा समजला जात होता.
या स्पृश्यांमध्ये केवळ ब्राह्मणच नव्हे तर मराठे आणि तत्सम अनेक जातींचे लोकही होते. अशा सामाजिक परिस्थितीत शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीत स्वतःच जाहीर कृत्यांनी प्रस्थापित समाजाला हादरे दिले.

फोटो स्रोत, Getty Images
शाहू महाराज 1920मध्ये नागपूरला अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेला अध्यक्ष म्हणून गेले होते. यात त्यांनी मुद्दामच अस्पृश्य व्यक्तीच्या हातचा चहा घेतला होता.
पुढच्याच महिन्यात नाशकात अस्पृश्य वसतिगृहाच्या पायाभरणी समारंभासाठी गेले होते. इथं त्यांनी शेकडो लोकांच्या समोर अस्पृश्य व्यक्तीच्या हातचा चहा घेतला. याचीच पुनरावृत्ती त्यांनी तासगावला केली होती.
शिवाजी महाराजांच्या वंशजानं त्याकाळात कर्मठ समाजासमोर अस्पृश्य व्यक्तीच्या हातचं अन्नपाणी घेणं, हा शाहू महाराजांनी दिलेला एक क्रांतिकारक संदेश होता.
1902 साली त्यांनी आपल्या संस्थानामध्ये मागासवर्गीयांना 50 टक्के जागा राखीव करण्याचे धोरण जाहीर केले तर 1919 साली शाहू महाराजांनी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता न पाळण्याचा जाहीर हुकूम काढला होता.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








