तक्षशिलातली ती बुद्धांच्या महापरिनिर्वाणाची मूर्ती आणि ख्रिश्चन क्रॉसच्या आकाराचा स्तूप

- Author, उमेर सलिमी
- Role, बीबीसी उर्दू
बौद्ध धर्म जगातल्या प्रमुख धर्मांपैकी एक समजला जातो. पण पाकिस्तानात या धर्माचं पालन करणारे खूपच कमी लोक आहेत. तरीही गौतम बुद्धांच्या अनुयायांसाठी इथे प्राचीन स्थळं आणि मौल्यवान कलाकृती आहेत.
गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान त्यांच्या देशात धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी कर्तारपूर कॉरिडोरसह अनेक योजनांवर काम करतोय.
आता पाकिस्तानात जुन्या काळी असलेल्या गांधार संस्कृतीमध्ये परदेशी पर्यटकांचा रस पाहून बौद्धधर्मियांसाठी कार्यक्रमही आयोजित केलेले आहेत.
इसवीसन पूर्व पाचशे ते तीनशे या काळात आताच्या पाकिस्तानात असणारं तक्षशिला बौद्ध शिक्षणाचं एक महत्त्वाचं केंद्र समजलं जायचं. इथे आजही अनेक स्तूप, पूजा स्थळं आणि पुरातत्विक अवशेष आहेत ज्यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळू शकते.
तक्षशिला पाकिस्तानातलं एक प्राचीन स्थळ तर आहेच पण त्याबरोबरीने बौद्धधर्मियांच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पूजा स्थळ आहे.
जगात भारत, म्यानमार, कोरिया आणि नेपाळसह अनेक देशांमध्ये या धर्माला मानणारे लोक आहे.
तक्षशिलेतल्या बौद्धधर्मियांसाठी इथे काही दिवसांपूर्वी एका विशेष पूजा समारंभाचं आयोजन केलं गेलं होतं. कोरियाच्या बौद्ध भिख्खूनी इथे शांततेचा संदेश दिला.
कोरियातले जेष्ठ भिख्खू डॉ. सिनम यांचं म्हणणं होतं की, "आमच्यासाठी जगातली सात स्थळं सर्वांत पवित्र आहेत. तक्षशिला त्यापैकी एक आहे. इथे ब्रम्हांडाची शक्ती एकवटलेलली आहे."
तक्षशिलेतला स्तूप खानपूर बांधजवळ एका टेकडीवर स्थित आहे. हे प्राचीन स्थळ वरतून एका क्रॉससारखं दिसतं ही यातली सर्वांत रंजक गोष्ट. गांधार संस्कृतीच्या काही शेवटच्या खुणांपैकी एक ही जागा आहे.
या स्तूपाला भामाला स्तूप असं म्हणतात. इथे जाण्यासाठी खानापूर बांधपासून एक रस्ता जातो. रस्त्याची अवस्था फारशी बरी नाही, पण इथल्या टेकड्यांमधलं दृश्य तुमचा थकवा पळवून लावतो.
हा प्राचीन स्तूप 1930 साली ब्रिटिश पुरातत्व शास्त्रज्ञ सर जॉन मार्शल यांनी शोधला होता. यांनी सिंध प्रांतातल्या लारकाना शहरात मोहेंजदडोचा शोध लावला होता.
मोहेंजदडोचे काही अवशेष तक्षशिला संग्रहालयात पाहाता येतात.

इथे पोहचल्यानंतर आणि बऱ्याचशा पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला क्रॉसच्या आकारातला स्तूप दिसतो. इथे जवळच्या हजारा विद्यापीठातले विद्यार्थी स्तूपाचं निरीक्षण करताना दिसतात. इथे तीन वेळा खोदकाम झालेलं आहे.
संशोधकांना आशा आहे की इथे प्राचीन संस्कृतीच्या काही महत्त्वाच्या खूणा सापडतील.
या स्तूपाच्या चारी बाजूंनी पायऱ्या आहेत आणि बौद्धधर्मिय इथे पूजा करायला येतात. इथे चुन्याच्या मुर्ती, पूजा करायची जागा आणि प्राचीन मूर्ती आसपास दिसतात.
स्वप्नील बुद्धाची प्रतिमा
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की भामाला स्तूपात सापडलेली एक मूर्ती कंजूर खडकापासून बनलेली आहे आणि कदाचित या प्रदेशातल्या सर्वांत जुन्या मूर्तींपैकी एक आहे.
तक्षशिला संग्रहालयाचे क्यूरेटर अब्दुल नासिर यांनी बीबीसीला सांगितलं की, "अफगाणिस्तानात हेदा आणि पाकिस्तानात तक्षशिला गांधार संस्कृतीच्या अवशेषांसाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत."
ते म्हणतात, "ही कला घरात नाही तर स्तूपांमध्ये भिख्खूव्दारे रेखाटली, मूर्तीत घडवली जायची. ज्या प्रकारे मुस्लीम मशीद बनवतात तसंच या मूर्ती खास पुजांच्या वेगवेगळ्या प्रथांचं प्रतीक आहे. या मूर्तींचे कपडे, दागिने आणि शैली संपूर्ण जगात एकसारख्या आहेत."

भामाला स्तूपात सापडलेल्या मूर्तीबदद्ल ते म्हणतात की इथल्या 'स्वप्नील' बुद्धाच्या मूर्तीची विशेष गोष्ट अशी की यात गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण दाखवलं आहे.
धार्मिक पर्यटनसाठी धार्मिक सलोख्याची गरज
स्तूपात होणाऱ्या कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी एक शामिल सदफ रजा यांनी सांगितलं की, "पाकिस्तान सरकारबरोबर इथल्या गांधार संस्कृतीच्या संवर्धनासाठी काय करता येईल हे पाहायला कोरियाचे भिख्खू इथे आलेले आहेत."
"जर आपण या जागा त्यांच्यासाठी उघडल्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी काम केलं तर आपल्या देशातलं पर्यटन वाढेलच, पण या लोकांनाही एक शांततामय जागा मिळेल."
भिख्खू डॉ. सिनम यांनी या प्रसंगी काश्मीर मुद्द्यावरही चिंता व्यक्त केली.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले की त्यांची इच्छा आहे इथे शांतता नांदावी.
ते म्हणाले, "आपण सगळे एक आहोत. तुम्ही बौद्ध धर्म मानणारे असा किंवा नसा पण पाकिस्तान आमच्यासाठी आमच्या देशासारखाच आहे. देवाची इच्छा नाही की आपण एकमेकांचा तिरस्कार करावा. असं केलं तर आपण देवाच्या आज्ञेचा भंग करतो आहोत."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








