जेव्हा भारतीय नौदलाच्या हल्ल्यानंतर कराचीतला तेल डेपो सात दिवस जळत होता...

फोटो स्रोत, Indian navy
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
1971 च्या युद्धापूर्वी भारतीय नौदलाचे अध्यक्ष अॅडमिरल एस. एम. नंदा यांनी 'ब्लिट्झ' वृत्तपत्राला एक मुलाखत दिली होती.
त्यावेळी ते म्हणाले, "मी माझ्या करिअरची सुरुवात कराची बंदरावरूनच केली होती. त्यामुळे कराची बंदराच्या कानाकोपऱ्याची मला माहिती आहे. संधी मिळालीच तर कराची बंदराला आगही मी लावू शकतो."
दरम्यान, भारतीय नौदलाने आपल्या नाविक ठिकाणांच्या सुरक्षेसाठी सोव्हिएत संघाकडून काही मिसाईल बोटी खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
कॅप्टन के. के. नायर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय नौदल अधिकाऱ्यांचं एक पथक सोव्हिएत संघात दाखल झालं. गुंतागुंतीची यंत्रणा असलेल्या या मिसाईल बोटी हाताळण्याचं प्रशिक्षण ते तिथून घेणार होते.
या पथकाने फक्त मिसाईल बोटींचंच प्रशिक्षण घेतलं असं नाही, तर त्यांनी रशियन भाषाही चांगली अवगत केली.
भारतीय नौसेनिक रशियात प्रशिक्षण घेतल असताना कॅप्टन नैय्यर यांनी आपल्या पथकाला एक प्रश्न विचारला.
ते म्हणाले, "या मिसाईल बोटींचा वापर संरक्षणाव्यतिरिक्त आक्रमणासाठी केला जाऊ शकतो का?"
मेजर जनरल इयान कारडोजो यांनी आपल्या 1971 'स्टोरीज ऑफ ग्लोरी फ्रॉम इंडिया पाकिस्तान वॉर' या पुस्तकात याविषयी लिहिलं आहे.
ते लिहितात, की या बोटींमध्ये वेग होता पण समुद्रात लांबपर्यंत जाण्यासाठी त्या बोटींची रचना करण्यात आली नव्हती. वेग जास्त वाढवल्यास या बोटींना जास्त इंधन लागत असे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत समुद्रात 500 नॉटिकल मैलांपेक्षा जास्त प्रवास त्या करू शकत नसत. शिवाय या बोटींची उंची ही कमी होती. त्यामुळे समुद्राच्या लाटा याच्या वरून जाण्याची शक्यताही होती.
मिसाईल बोटी कोलकात्यात
या मिसाईल बोटींचा आक्रमक वापर करण्याबाबत नौदलाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. कमांडर विजय जयरथ यांना यासंदर्भात एक अहवाल लिहिण्यास सांगण्यात आलं. कॅप्टन नैय्यर यांच्या पाहणीनंतर हा अहवाल दिल्लीत नौदलाच्या मुख्यालयात नेवल ऑप्स अँड प्लॅन्स यांच्याकडे पाठवण्यात आला.

फोटो स्रोत, PENGUIN BOOKS
जानेवारी 1971 मध्ये या मिसाईल बोटी सोव्हिएत संघातून भारतात दाखल झाल्या. प्रत्येक बोटीचं वजन सुमारे 180च्या आसपास होतं. मुंबई बंदरात मोठ्या जहाजातून या बोटी उतरवण्यासाठी क्रेनची सोय नसल्याने या बोटी कोलकात्यात उतरवण्यात आल्या.
पण नंतर या बोटी कोलकात्याहून मुंबईला कशा न्यायच्या, हा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी अनेक प्रयोगांनंतर दुसऱ्या एका बोटीला बांधून (टो) या सर्व बोटी मुंबईला आणल्या गेल्या. लांबचं लक्ष्य उद्ध्वस्त करण्यासाठी या बोटींसह अनेक सराव करण्यात आले.
बोटीची रडार रेंज आणि लक्ष्यावर अचून हल्ला करण्याची क्षमता यांमुळे नौदलातील अधिकारी आश्चर्यचकीत झाले होते. भारत-पाकिस्तानदरम्यान युद्ध सुरू झाल्यास मिसाईल बोटींचा वापर कराचीवर हल्ल्यासाठी जरूर करूयात, अस त्यांनी त्यावेळी ठरवलं.
निपात, निर्घट आणि वीर यांनी केला कराचीवर हल्ला
4 डिसेंबर 1971 च्या रात्री निपात, निर्घट आणि वीर नामक तीन बोटी कराचीच्या दिशेने रवाना झाल्या. किल्टन आणि कछाल या दोन फ्रिगेट पेट्या क्लासच्या बोटींना बांधून वरील तिन्ही बोटींना पाकिस्तानच्या दिशेने नेलं जात होतं.

1971 च्या युद्धादरम्यान भारताचे नौदल प्रमुख असलेले अॅडमिरल एस. एम. नंदा यांनी आपल्या 'द मॅन व्हू बॉम्ब्ड कराची' या आपल्या आत्मकथेत लिहिलंय, "कराचीच्या किनाऱ्यावर लावण्यात आलेले रडार या मिसाईल बोटींच्या हालचाली ओळखतील. त्यानंतर हवाई हल्ला केला जाईल, अशी शंका त्यावेळी आम्हाला होती."
त्यामुळे हा हल्ला रात्रीच्या वेळी करावा, असं आम्ही ठरवलं. सूर्यास्त होईपर्यंत या मिसाईट बोटी कराचीत उपस्थिती विमानांच्या हवाई हद्दीबाहेरच राहतील. रात्री आपलं काम आटोपून सकाळच्या आत ते निघून येतील, असं ठरवण्यात आलं.
सुरुवातीला खैबरला बुडवलं
पाकिस्तानी नौदलाचं एक जहाज PNS खैबर हे कराचीच्या दक्षिण-पश्चिम दिशेला गस्तीवर होतं. 1965 साली झालेल्या युद्धात भारताच्या द्वारका येथील नौदलाच्या ठिकाणांवर याच जहाजामार्फत अनेक हल्ले करण्यात आले होते.

फोटो स्रोत, AFP
इंडियन डिफेन्स रिव्ह्यूच्या जुलै 1990 च्या अंकात टास्क ग्रुपचे कमांडर के. पी. गोपाल राव यांनी एका लेखात या मोहिमेचं वर्णन केलं होतं.
ते लिहितात, "भारतीय जहाज कराचीच्या दिशेने येत आहे, याची माहिती खैबर जहाजाला रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी मिळाली. या जहाजाने आम्हाला पकडण्यासाठी आपली दिशा बदलून वेग वाढवला. 10 वाजून 40 मिनिटांनी जहाज आमच्या रेंजमध्ये आलं. त्यावेळी निर्घट बोटीने त्याच्यावर पहिली मिसाईल डागली."
खैबरनेही आपल्या विमानभेदी तोफांमधून गोळाफेक सुरू केली. पण मिसाईलच्या हल्ल्यातून ते स्वतःला वाचवू शकले नाहीत. खैबरच्या बॉयलर रुममध्येच आग लागली. त्यानंतर मी त्याच्यावर आणखी एक मिसाईल डागण्याचा आदेश दिला. दुसरा मिसाईल खैबरवर जाऊन आदळताच त्याची गती मंदावली. जहाजातून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला.

फोटो स्रोत, Indian navy
45 मिनिटांनी PNS खैबरने कराचीपासून 35 मैल दक्षिण-पश्चिम दिशेला समुद्रात जलसमाधी घेतली.
'द स्टोरी ऑफ द पाकिस्तान' नेव्हीमध्ये या हल्ल्याचं वर्णन करताना लिहिण्यात आलं आहे, "सुरुवातीला खैबरचे कमांडिंग ऑफिसर यांना वाटलं की चमकदार पांढरा प्रकाश म्हणजे भारतीय विमानांमार्फत सोडण्यात आलेला फ्लेअर आहे. पण त्याचा वेग पाहून ते कदाचित एक विमान असावं असंही वाटलं. पण ते एक मिसाईल होतं. हे मिसाईल खैबर जहाजाच्या इलेक्ट्रिशियन्स मेस डेकवर जाऊन आदळलं. या हल्ल्यानंतर खैबरच्या इंजिनाने काम करणंच बंद केलं.
त्याच अंधारात जहाजातून पाकिस्तानच्या सैनिक मुख्यालयाला संदेश पाठवण्यात आला. "एनिमी एअरक्राफ्ट अॅटॅक्ड शिप. नंबर वन बॉयलर हिट. शिप स्टॉप्ड."
11 वाजून 15 मिनिटांनी खैबर जहाजावरील सर्व नौसैनिकांना बुडतं जहाज सोडण्याचा इशारा देण्यात आला. 11 वाजून 20 वाजता ते जहाज समुद्राच्या पोटात सामावून गेलं.
व्हीनस चॅलेंजरही बुडवलं
त्याव्यतिरिक्त निपात बोटीचा सामना 11 च्या सुमारास एका अज्ञात जहाजाशी झाला. निपातने केलेला मिसाईल हल्ला लक्ष्यावर अचून लागला. दुसऱ्या मिसाईलनंतर त्या जहाजातून धूर येऊ लागला.

फोटो स्रोत, HARPER COLLINS INDIA
के. पी. गोपाल राव लिहितात, "माझ्या मते, त्या मिसाईलमुळे जहाजात ठेवलेल्या शस्त्रसाठ्याच्या ठिकाणी आग लागली. आम्ही रडारवर पाहिलं की त्या जहाजाचे दोन तुकडे झाले आहेत. हे जहाज कराचीच्या दक्षिणेला 26 मैल अंतरावर समुद्रात बुडालं.
नंतर मिळालेल्या माहितीनुसार हे जहाज सैगोन येथून पाकिस्तानी लष्कर आणि वायूदलासाठी अमेरिकन बनावटीची शस्त्रास्त्रं घेऊन जात होतं.
लंडनच्या रॉयल रजिस्टर ऑफ शिपिंगमधून माहिती मिळाली की या जहाजाचं नाव एम. व्ही. व्हीनस चॅलेंजर असं होतं.
पाकिस्तान सरकारने ते विकत घेतलं होतं. त्याला 5 डिसेंबर 1971 रोजी दुपारी दीड वाजता कराचीत पोहोचणं अपेक्षित होतं.
वीर या तिसऱ्या मिसाईल बोटीने 11 वाजून 20 मिनिटांनी दुसऱ्या एका पाकिस्तानी जहाजाला लक्ष्य केलं.
PNS मुहाफिज असं त्या जहाजाचं नाव होतं. हे जहाज सुमारे 70 मिनिटे आगीच्या भक्ष्यस्थानी होतं. कराचीच्या 19 मैल दक्षिणेला ते समुद्रात बुडालं.
INS विनाशचा दुसरा हल्ला
कराचीच्या दिशेने शक्य तितके मिसाईल हल्ले करावेत, असे या सर्व मिसाईल बोटींना आदेश होते. INS निपटला आपल्या रडारवर किमारी तेल टँक दिसले. त्याच्यापासून 18 मैल अंतरावरून निपातने त्याच्यावर मिसाईल डागले.

फोटो स्रोत, Indian navy
कराचीवर 6 डिसेंबर रोजीही 'ऑपरेशन पायथॉन' नामक आणखी एक हल्ला करण्यात येणार होता. पण खराब हवामानामुळे हा हल्ला रद्द करण्यात आला.
दोन दिवसांनंतर 8 डिसेंबर रोजी INS विनाशने तो हल्ला केला. त्याच्यासोबत भारतीय नौसैनेच्या त्रिशूल आणि तलवार या दोन फ्रिगेट बोटीही होत्या. या मिसाईल बोटींची कमान लेफ्टनंट कमांडर विजय जयरथ यांच्या हाती होती.
विनाथ जहाजातील 30 नौसैनिक कराचीवर दुसरा हल्ला करण्याचं नियोजन करतच होते की जहाजातली वीज गुल झाली. त्यामुळे ऑटो-पायलट स्वरुपात ही बोट चालवली जात होती.
अजूनही बॅटरीमार्फत मिसाईल चालवता येणं शक्य होतं. पण आपलं लक्ष्य रडारमधून ते आता पाहू शकत नव्हते.
यामधून तोडगा काढण्यासाठी ते विचार करतच होते, इतक्यात 11 वाजता वीज पुन्हा आली.
किमारी तेल डेपोवर दुसरा हल्ला
याबाबत बोलताना जयरथ यांनी बीबीसीला सांगितलं, "मी रडारमध्ये पाहिलं, एक जहाज हळूहळू कराची बंदरातून निघत होतं. मी त्या जहाजाची पोझिशन पाहतच होतो, इतक्यात माझी नजर किमारी तेल डेपोकडे गेली. त्यानंतर मिसाईल मॅन्युअल आणि मॅक्झिममवर सेट करून मिसाईल फायर केलं.

फोटो स्रोत, Indian navy
मिसाईलने तेल डेपोमधील टँकरचा वेध घेतला. अचानक तिथं एक प्रकारे प्रलय आल्याप्रमाणेच परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, त्याच वेळी मी दुसऱ्या मिसाईलने जहाजांच्या एका समूहाला लक्ष्य केलं.
तिथं उभं असलेलं एस. एस. हरमटन आणि पनामाचं गल्फस्टार हे जहाजही या हल्ल्यात उद्धव होऊन बुडाले.
चौथं मिसाईल PNS ढाकावर डागण्यात आलं. पण त्याच्या कमांडलने आपलं कौशल्य आणि बुद्धिचातुर्याचा उपयोग करून आपलं जहाज वाचवलं. पण किमारी तेल डेपोमध्ये लागलेली आग प्रचंड मोठी होती. ही आग 60 मैल अंतरावरूनही पाहता येऊ शकली असती.
ऑपरेशन पूर्ण होताच जयरथ यांनी रेडिओवर एक संदेश पाठवला, 'फोर पिजन्स हॅपी इन द नेस्ट रिजॉईनिंग.'
त्यांना उत्तर मिळालं, "इतकी मोठी दिवाळी आम्ही आजपर्यंत नाही पाहिली."
कराची तेल डेपोमध्ये लागलेली आग पुढच्या सात दिवसांपर्यंत विझवता आली नाही. पुढच्या दिवशी भारतीय वायुसेनेचे विमानचालक कराचीवर बॉम्बवर्षावर करण्यासाठी गेले होते. तेव्हा ती आशिया खंडातली सर्वात मोठी आग असल्याचं त्यांनी सांगितलं.
कराचीच्या वर इतका धूर जमा झाला होता की तीन दिवस शहरात सूर्यप्रकाश पोहोचू शकला नव्हता.
या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या नौदलाला मोठा धक्का बसला. त्यांनी आपली सगळी जहाजं बंदराच्या आतील भागात बोलावून घेतली.
भारतीय नौदलाकडून कराची बंदराची नाकाबंदी
जनरल इयान कॉरडोजो लिहितात, "पाकिस्तानी नौदलाच्या दुर्दैवाने त्यांचं वायूदल मदतीसाठी येऊ शकलं नाही. कराचीच्या आसपास ते भारतीय नौदलाला आव्हान देऊ शकले नाहीत.

फोटो स्रोत, LANCER PUBLICATION
भारतीय नौदलाने आता अरबी समुद्रात पूर्ण नियंत्रण मिळवलं होतं. कराचीच्या जलसीमेत भारत सरकारच्या परवानगीशिवाय एकही जहाजाला प्रवेश अथवा बाहेर जाऊ दिलं नाही.
अॅडमिरल गोर्शकॉव यांनी केलं कौतुक
सोव्हिएतच्या उपग्रहांनी घेतलेल्या फोटोंमधून कराचीजवळच्या लढाईचे दृश्य सोव्हिएत नौसेना प्रमुख अॅडमिरल गोर्शकॉव यांच्याकडे पोहोचत होते.

फोटो स्रोत, Getty Images
अॅडमिरल गोर्शकॉव यांना आपल्या डोळ्यावर विश्वास होत नव्हता. ज्या मिसाईल बोटी त्यांनी भारताला स्वयंसंरक्षणाच्या उद्देशाने दिल्या होत्या. त्यांच्याच मदतीने भारताने कराचीवर मोठा हल्ला केला.
गोर्शकॉव हे दृश्य पाहून प्रचंड आनंदी झाले. त्यांनी तिथं उपस्थित आपल्या सहकाऱ्याला मिठी मारली. काही दिवसांनी अॅडमिरल गोर्शकॉव आपल्या पथकासोबत मुंबईलाही आले.
मेजर जनरल कॉरडोजो लिहितात, "गोर्शकॉव यांनी भारताच्या नौदल प्रमुखांना म्हटलं की त्यांना कराची हल्ल्यात सहभागी नौसैनिकांची भेट घ्यायची आहे."
त्यावेळी अॅडमिरल गोर्शकॉव यांना INS विक्रांत या भारतीय विमानवाहक जहाजावर पाठवण्यात येत होतं. सर्व सोव्हिएत आणि भारतीय पाहुण्यांनी आपली परंपरागत मेस ड्रेस परिधान केलेली होती. पण मिसाईल बोटचे कमांडर आपल्या युद्धासाठीच्या वर्दीत होते.

फोटो स्रोत, HARPER COLLINS INDIA
सोव्हिएत अॅडमिरल यांना सांगण्यात आलं की मिसाईल बोटीचे कमांडर त्यांच्यासोबत आयोजित भोजन कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाहीत. कारण त्यासाठी त्यांच्याकडे सुयोग्य असे कपडे सध्या उपलब्ध नाहीत.
पण अॅडमिरल गोर्शकॉव यांनी अॅडमिरल नंदा यांना विनंती केली की त्या सर्व कमांडर्सना त्याच पोशाखात भोजन कार्यक्रमात पाठवून दिलं जावं. त्यानंतर नंदा यांनीही हे मान्य करत सर्व कमांडर्सना बोलावलं.
भोजनानंतर दिलेल्या भाषणात अॅडमिरल गोर्शकॉव म्हणाले, "या लढाईत आपण एकटे नव्हतो, हे आपण प्रथम समजून घेतलं पाहिजे. आम्ही अमेरिकेच्या हालचालींकडे लक्ष ठेवून होतो. गरज पडल्यास आम्ही हस्तक्षेपही केला असता. पण तुम्ही आपल्या मिसाईल बोटींचा वापर ज्याप्रकारे केला, त्याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








