अफगाणिस्तान-तालिबान संघर्ष : 'आम्ही अशा वळणावर आहोत जिथून बाहेर कसं पडायचं हे माहीत नाही'

फोटो स्रोत, DUSTIN DUONG FOR THE BBC
- Author, हॉली हॉन्डेरिच आणि बर्न्ड डेबुस्मॅन ज्युनियर
- Role, बीबीसी न्यूज, वॉशिंग्टन, अमेरिका
जिया गफुरी, गर्भवती पत्नी आणि तीन लहान मुलांबरोबर सप्टेंबर 2014 मध्ये काबूलहून अमेरिकेला पोहोचले होते. त्यांच्याकडं अमेरिकेचे पाच जणांचे व्हिसा होते.
अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या स्पेशल फोर्समध्ये 14 वर्ष दुभाषकाचं काम केल्यानं त्यांना हे बक्षीस देण्यात आलं होतं.
पण त्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा बंद करण्यात आल्या. इथं आल्यानंतर जिया बेघर झाले. त्यांना काही स्वयंसेवकांनी निर्वासितांच्या एका छावणीत पाठवलं आणि याठिकाणी त्यांना कुटुंबासह नवी सुरुवात करता येईल, असं सांगण्यात आलं.
सात वर्षांनंतरही त्यांना हे सर्व आठवलं की राग येतो. त्यांना मुलांशी नजरा मिळवणं शक्य होत नव्हतं आणि ते अमेरिकेला आणल्याबाबत मुलांची माफी मागायचे, असं नॉर्थ कॅरोलिनाहून बीबीसीबरोबर बोलताना त्यांनी म्हटलं.
"माझे अश्रू थांबत नव्हते. दोन्ही देशांसीठी मी जे काही केलं त्यानंतर माझ्याबरोबर खरंच असं व्हायला हवं का? असं मला वाटायचं,'' असं ते म्हणतात.
पण 37 वर्षीय जिया यांना असं वाटतं की, त्यांच्या मित्रांशी तुलना करता ते अधिक नशिबवान होते. कारण त्यांना अमेरिकेत येण्यात यश मिळालं. 2001 मध्ये सुरू झालेल्या अफगाण युद्धानंतर जेव्हा अमेरिका आणि सहकारी सैन्य देशाला तालिबानच्या ताब्यातून सोडवण्यासाठी संघर्ष करत होते, त्यावेळी अनेक अफगाणिस्तानींनी अनुवादक (दुभाषक), फिक्सर किंवा गाइड बनून मदत केली होती.
अनेक दशकांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकेच्या सर्वात दीर्घकाळ चाललेल्या संघर्षानंतर सैन्य परत बोलावण्याची घोषणा केली. तसंच 11 सप्टेंबरपर्यंत सर्व सैन्य परत येईल असंही जाहीर केलं. त्यानंतर तालिबानची शक्ती पुन्हा वाढू लागली.
लष्कराशी संलग्न अनेक अफगाण लोकांना मृत्यूची भीती
सर्व दुभाषकांना ऑगस्टपूर्वीच परत आणलं जाईल, असं आश्वासन बायडन यांनी दिलं होतं. शुक्रवारी या 2500 पैकी 200 अफगाणी व्हिसाप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि नव्यानं आयुष्याची सुरुवात करण्याच्या उद्देशानं अमेरिकेत पोहोचले.

फोटो स्रोत, ZIA GHAFOORI
आतापर्यंत जवळपास 50,000 दुभाषकांनी अमेरिकेच्या लष्करासाठी काम केलं आहे. 2008 पासून जवळपास 70,000 अफगाणिस्तानी दुभाषक आणि त्यांचे कुटुंबीय स्पेशल व्हिसाद्वारे अमेरिकेत राहायला आले आहेत. मात्र अजूनही दुभाषक आणि त्यांचे कुटुंबीय मिळून जवळपास 20,000 जण अफगाणिस्तानातून निघण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
व्हिसा मिळवण्याच्या प्रक्रियेसाठी अनेक वर्षं लागू शकतात. त्यांना त्यासाठीच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा सामना करावा लागतो. तसंच तालिबानचं सामर्थ्य दिवसेंदिवस वाढत असल्यानंही ते घाबरले आहेत. या दुभाषकांनी अमेरिकेच्या सैन्याची मदत केल्यानं त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. 2009 पासून अमेरिकेचा व्हिसा मिळवण्याच्या प्रक्रियेदरम्यान आतापर्यंत 30 दुभाषकांनी प्राण गमावले आहेत.
जिया यांनीदेखील या सर्वाचा अनुभव घेतला आहे. "हे लोक दोन्ही देशांसाठी खांद्याला खांदा लावून उभे राहिले, आणि आपण त्याकडं डोळेझाक करत, त्यांना मरण्यासाठी मागंच सोडून देत आहोत," असं ते म्हणतात.
सोबत लढा दिला
जिया यांनी दुभाषक म्हणून अमेरिकेच्या लष्कराबरोबर काम करण्यासाठी 2002 मध्ये अर्ज केला होता. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांची ही पहिली नोकरी होती. जिया यांच्या संपूर्ण कहाणीत, त्यांनी आईला सहा वर्षांपूर्वी दिलेल्या वचनाचाही उल्लेख आला. त्यावेळी अफगाणिस्तानात तालिबानचं वर्चस्व होतं.
जिया त्यावेळी शाळेत होते आणि बालपणी मिळणाऱ्या त्यांच्या स्वातंत्र्यावर अचानक कुऱ्हाड कोसळली होती. बालपणी शाळेत, फुटबॉल खेळण्यात आणि सात भावंडांसह त्यांचा वेळ निघून जायचा.

फोटो स्रोत, ZIA GHAFOORI
त्यावेळी 20 वर्षाच्या असलेल्या त्यांच्या भावाला कोणीतरी पंजशीर गावाची भाषा बोलताना ऐकलं होतं. त्यानंतर त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली आणि त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं. मारहाण केल्यानं त्यांचे पाय एवढे सुजले होते की, त्यांना बूटही परिधान करता येत नव्हते आणि चालणंही कठिण झालं होतं, असं जिया सांगतात.
काही दिवसांतच त्यांच्या वडिलांनी तिथं राहायचं नाही असा निर्णय घेतला. काबूलमधलं घर सोडून ते पाकिस्तानच्या पेशावरमध्ये निघून गेले. "मी आईला म्हटलं होतं (तालिबानबाबत) की, मी मोठा होईल, तेव्हा या लोकांचा बदला घेईल," असं त्यांनी सांगितलं.
पेशावरमध्ये शाळेत ते इंग्रजी शिकले. त्यांचं कुटुंब 2001 पर्यंत पाकिस्तानात राहिलं. त्यावेळी अमेरिकेनं त्यांच्या मोहिमेची सुरुवात केली होती. "आम्ही परत गेलो तर तिथं एक स्थिर सरकार स्थापन झालेलं होतं. मला वाटलं की, आता काहीतरी आशा आहे," असंही ते म्हणाले.
ते तिथंच अफगाणिस्तानात स्थायिक झाले. लग्न केलं आणि एका स्थानिक शाळेत इंग्रजी शिकवायला सुरुवात केली. परतल्यानंतर काही महिन्यांतच एका मित्रानं त्यांना सांगितलं की, अमेरिकेच्या सैन्याला दुभाषकाची गरज आहे.
दुसऱ्याच दिवशी ते काबूलला एका लष्करी तळावर नोकरी मागण्यासाठी गेले. "ते केवळ इंग्रजी येत असलेल्यांना, नोकरी देत होते. मला लष्कराशी संबंधित शब्द माहिती नव्हते. पण ते म्हणाले नो प्रॉब्लम."
जिया यांना अनेक महिने घरापासून लांब राहावं लागत होतं. तसंच तिथं तैनात असल्यानं धोकाही असायचा. तरीही त्यांना काम खूप आवडलं, असं जिया सांगतात.
जिया यांच्या पत्नीनं अनेकदा काम सोडून द्या असं म्हटलं, पण त्यांनी नकार दिला. अमेरिकेचं लष्कर त्यांच्या 'भावंडा'प्रति कटिबद्ध आहे, असं ते म्हणायचे.
"आम्ही लष्कराचे डोळे आणि तोंड होतो," असं ते सांगतात.

फोटो स्रोत, DUSTIN DUONG FOR THE BBC
जिया अमेरिकेच्या लष्कराच्या 'ग्रीन बेरेट्स' बरोबर काम करायचे. त्यामुळं हिंसाचार आणि जीव जाण्याची भीती कायम असायची.
एप्रिल 2008 मध्ये ते अमेरिकेच्या सैनिकांबरोबर 'शोक घाटी'मध्ये एका युद्धात अडकले. सहा तास चाललेलं हे युद्ध सुरू झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच त्यांच्या दुभाषक मित्राचा मृत्यू झाला होता. या युद्धात सहभागी झालेल्यांना सर्वाधिक सिलव्हर स्टार मिळाले होते. पदकांचा विचार करता व्हिएतनाममध्ये झालेल्या युद्धांनंतर सर्वाधिक पदकं याच लढाईत वाटण्यात आली.
जिया यांना पर्पल हार्ट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या लढाईत त्यांच्या शरिरात अनेक अणकुचिदार वस्तू घुसल्या होत्या. ते अमेरिकेला पोहोचले तेव्हाही त्यांच्या शरीरात त्या वस्तू होत्या.
त्यांनी एका नव्या नियमांतर्गत व्हिसासाठी अर्ज केला. हे नियम अमेरिकेच्या सैनिकांबरोबर काम करणाऱ्या अफगाणिस्तानी आणि इराकच्या नागरिकांसाठी होते.
पण जिया यांना व्हिसा मिळायला सहा वर्षे लागली.
सौम्य स्वभाव असलेले जिया या संपूर्ण प्रक्रियेला "अत्यंत वाईट" असं म्हणतात. उशीर लागण्यामागं काहीही कारण नव्हतं, असं त्यांचं म्हणणं आहे.
"आपलं नाव आधीच अमेरिकेच्या डेटाबेसमध्ये असतं तरीही एवढा वेळ का लागतो, हे कळत नाही," असं ते म्हणतात.
"या लोकांनी दोन्ही देशांसाठी काय केलं आहे, हे अमेरिकेला कोण सांगेल, हेच मला कळत नाही."
'मला सोबत काहीही नेता आलं नाही'
जिया यांनी 2014 मध्ये जलालाबाद इथं ड्युटीवर असताना व्हिसा मंजूर झाल्याचा मेल आला. पण अफगाणिस्तान सोडताना त्यांनी तिथं जे काही कमावलं ते त्यांना बरोबर नेता येणार नव्हतं. त्यांना हा नियम विचित्र वाटला.
तालिबाननंही त्यांच्यावर दबाव आणला. त्यांना कुटुंबाच्या माध्यातून पत्रं पाठवली जात होती. त्यात अमेरिकेच्या लष्कराला मदत करण्यापासून दूर राहायला हवं, असं लिहिलेलं असायचं.
व्हिसा मंजूर झाल्यानंतर तीन महिन्यांनी जिया यांनी अमेरिकेच्या टेनेसे येथील नॅशव्हिलेसाठी फ्लाईटचं तिकिट काढलं. त्यांच्याकडं कपड्यांच्या अनेक बॅग होत्या. विमानाचं भाडं होतं, $6,500 डॉलर.

फोटो स्रोत, Getty Images
ते तिथं उतरले तेव्हा मदत आणि सुरक्षेची काहीही व्यवस्था नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. जिया यांना हे पाहून धक्काच बसला.
"मला तिथं एकही अफगाणिस्तानी दिसला नाही," असं ते म्हणतात.
जिया हे कुटुंबासह टॅक्सी घेऊन व्हर्जिनियाच्या मॅनेसासला पोहोचले. या परिसरात अफगाणी मोठ्या संख्येनं राहतात हे त्यांनी ऐकलं होतं. ते एका हॉटेलमध्ये थांबले. जिया यांनी स्पेशल व्हिसाद्वारे आलेल्यांची मदत करणाऱ्या काही संस्थांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.
काही दिवसांनी एका स्वयंसेवकांनं त्यांना येऊन सांगितलं की, त्यांच्यासाठी एक नवी जागा शोधली आहे. त्याठिकाणी ते जीवनाची नव्यानं सुरुवात करू शकतील.
"त्या मला एका शेल्टर होममध्ये घेऊन गेल्या. मी चारही बाजुंना पाहिलं आणि म्हटलं की, या जागी मी मुलांना मोठं करू शकत नाही," असं जिया यांनी सांगितलं.
पण त्यांच्याकडे दुसरी कोणतीही जागा नव्हती. ज्यानं काळजी घेण्याचं आश्वासन दिलं होतं, त्याच देशानं धोका दिला असं जिया यांना वाटलं. त्यांची दोन मुलं अगदी लहान होती. त्यांना काहीही कळत नव्हतं. अफगाणिस्तानात मागं सोडून आलेल्या नातेवाईक आणि मित्रांबाबत मुलं नेहमी जिया यांना विचारायचे.
'हे तुमचं घर आहे'
त्रासलेल्या जिया यांनी त्यांच्या माजी कॅप्टनना फोन करून अमेरिकेला पोहोचल्याची माहिती दिली आणि त्याठिकाणची परिस्थिती सांगितली. "त्यांना प्रचंड राग आला होता," असं जिया म्हणतात.
काही दिवसांनी ते जिया यांना भेटले आणि त्यांना कुटुंबासह नॉर्थ कॅरोलिनाच्या त्यांच्या घरी घेऊन आले. हे तुमचंच घर आहे, असं ते म्हणाल्याचं जिया यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, DUSTIN DUONG FOR THE BBC
"तुम्हाला हवं तोपर्यंत याठिकाणी तुम्ही राहू शकता, असंही ते म्हणाले. मी ते कधीही विसरू शकत नाही."
काही दिवसांनी जिया त्यांच्या कुटुंबासह शार्लोटमध्ये त्यांच्या घरी अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले. त्यांनी आधी कन्सट्रक्शन आणि नंतर दुकानांमध्ये काम करायला सुरुवात केली.
अमेरिकेच्या न्यूयॉर्क सिटी, वॉशिंग्टन डीसी, लास वेगास या शहरांची नावं आणि त्याबद्दल जिया यांनी बरंच ऐकलं होतं. नॉर्थ कॅरोलिना त्या शहरांसारखं नव्हतं, पण जिया यांना इथं सुरक्षित असल्याची जाणीव झाली. त्यांची मुलं कोणत्याही अडचणीशिवाय शाळेत जाऊ शकत होते. पत्नीलाही कधीही कुठंही जाण्याचं स्वातंत्र्य होतं.
त्यांची चार मुलं लवकरच चांगली इंग्रजी शिकले. आता ते जिया यांच्या चुकांची खिल्ली उडवतात. गेल्यावर्षी जिया, त्यांच्या पत्नी आणि तीन मोठ्या मुलांना अमेरिकेचं नागरिकत्व प्रदान करण्यात आलं. तर त्यांचा सर्वात लहान मुलगा अमेरिकेतच जन्मलेला आहे. त्यांच्या भाषेत दक्षिण अमेरिकेची झलक ऐकायला मिळते.
काही दिवसांपूर्वी ते एका सामान्य घरात शिफ्ट झाले. त्यांच्या घराबाहेर एका खांबावर अमेरिकेचा एक झेंडा लावलेला आहे.
'काहीही बदललं नाही'
आजही जुन्या आठवणी जिया यांच्या स्मरणात आहेत.
वॉशिंग्टनची संस्था फाऊंडेशन ऑफ डिफेन्स ऑफ डेमोक्रेसीच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेच्या लष्करानं परतण्याची घोषणा केल्यानंतर तालिबानचा ताबा असलेल्या भागांची संख्या तिपटीनं वाढून 221 झाली आहे. पुढील वर्षीपर्यंत अफगाणिस्तान सरकारची सत्ता संपुष्टात येईल असं अमेरिकेच्या सरकारचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, DUSTIN DUONG FOR THE BBC
कंदाहार आणि हेलमंदसारख्या भागांवरही तालिबान ताबा मिळवण्याची भीती आहे. याठिकाणी हजारो अमेरिकन सैनिक राहत होते. पण आता याठिकाणच्या स्थानिक दुभाषकांना त्यांची हत्या होण्याची भीती आहे.
दुभाषकांच्या "जीवाला धोका" असणं "ही काही लपून राहिलेली बाब नाही. एका दशकापेक्षा अधिक काळापासून आमच्या दुभाषकांची हत्या करण्यात आलेली आहे," असं निवृत्त कर्नल माइक जॅक्सन म्हणतात.
"आम्ही अशा एका वळणावर आहोत, जिथून बाहेर कसं पडायचं हे आम्हाला माहिती नाही."
स्टेट डिपार्टमेंटनं प्रक्रियेचा वेग वाढवण्याच्या विश्वास दिला आहे. पण त्यांच्या प्रतिक्रियेवर माजी सैनिक आणि दुभाषक दोघंही नाराज आहेत.
"आम्ही तिथून जात आहोत, हा निर्णय अचानक घेण्यात आलेला नाही. आम्हाला अचानक तसं करावं लागलं नाही," असं अमेरिकेच्या लष्कराचे माजी अधिकारी आणि लेखक जो कॅसेबियन म्हणाले.
"आम्ही आधीपासूनच याची तयारी करायला हवी होती आणि आपण आता असं काम करत आहोत, जणू ही आणीबाणीची स्थिती आहे."
अमेरिकेच्या लष्करानं परतणं हे त्याठिकाणच्या लोकांना एकटं सोडण्यासारखं असल्याचं जिया म्हणतात. अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित होण्यामागचा संघर्ष त्यांनी पाहिला आहे.
"तालिबान अजूनही निर्दोषांचा बळी घेत आहे. काहीही बदललेलं नाही," असं ते म्हणतात.
पण अमेरिकेनं त्यांना मदत करणाऱ्या सहकाऱ्यांना सोडून सैनिकांना परत बोलावण्याचा निर्णय कसा घेतला, हे त्यांना समजेनासं झालं आहे. ज्या देशानं त्यांना स्वीकारलं त्या देशावर ते प्रेम करतात. पण ज्यांनी देशाची सेवा केली त्या इतर अनेकांना नेत्यांनी दगा दिला आहे, असंही त्यांना वाटतं.
"ते आमच्यापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत," असं ते म्हणतात.
(संशोधनासाठी चेल्से बेली यांनी मदद केली)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








