अफगाणिस्तान : ‘तालिबान आता क्रिकेट खेळणाऱ्या मुलींचा शोध घेतंय’

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जॉर्ज राइट
- Role, बीबीसी न्यूज
आसेल आणि अफगाणिस्तानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकट संघातील तिच्या सहकारी सध्या लपून बसल्या आहेत. आसेल हे तिचं खरं नाव नाही. सध्या काबूलमध्ये तालिबानचे लोक या संघातील मुलींचा शोध घेत आहेत.
"क्रिकेट किंवा इतर खेळ खेळणारी कोणतीही महिला सध्या सुरक्षित नाही," असं आसेल सांगते. "काबूलमधली परिस्थिती खूपच वाईट आहे."
"व्हॉट्स-अॅपवर आमचा एक ग्रुप आहे. रोज रात्री आम्ही आमच्या अडचणींविषयी बोलतो आणि काय करायला हवं याबद्दल योजना आखतो. आम्ही सगळ्याच हताश झाल्या आहोत."
ऑगस्टच्या मध्यात तालिबान काबूलमध्ये दाखल झाल्यापासून आसेल तिच्या घराबाहेर फारशी गेलेलीच नाही. तिने स्वतःचं क्रिकेट किट कपाटात कुलुपबंद करून ठेवलं आहे. तिच्या एका संघ-सहकारी मुलीला शहरात कसं लक्ष्य करण्यात आलं, ते ती सांगते.
"त्या ज्या गावात क्रिकेट खेळायच्या, तिथले त्यांना ओळखणारे काही लोक तालिबानसोबत काम करतात. तालिबानच्या लोकांना काबूल ताब्यात घेतलं तेव्हा त्यांनी या मुलींना धमकावलं, 'तुम्ही पुन्हा क्रिकेट खेळलात तर आम्ही तुम्हाला ठार करू," असं आसेल सांगते.
ताक्वा (नाव बदललं आहे) अनेक वर्षं अफगाणी महिला क्रिकेटशी संबंधित होती. काबूलचा पाडाव झाल्यानंतर ती देशातून पळून गेली. देशाबाहेर पडण्याच्या आठवडाभर आधी ती तालिबान्यांच्या नजरेत न येण्यासाठी वेगवेगळ्या घरांमध्ये राहत होती. तालिबानने तिच्या वडिलांना फोन केला, पण आपला मुलीशी काही संपर्क नसल्याचं त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
"काय झालं असतं, याचा विचार मला करवत नाही," असं ती म्हणते. "तालिबानी काबूलला आले, तेव्हा आठवडाभर मी काही खाल्लं नाही की झोपलेही नाही."
"मी फक्त स्वतःचीच काळजी करत होते असं नाही, पण माझ्या सर्व मुलींची मला चिंता वाटत होती. त्यांनी स्वतःचं जगणं, स्वतःचा अभ्यास सगळ्याचा त्याग केला आहे. अफगाणिस्तानसाठी खेळायला मिळावं म्हणून त्यातल्या काहींनी लग्नसुद्धा केलं नाही. मला त्यांच्या जीवाची खूप चिंता वाटते."
दुसरी एक माजी खेळाडू हरीर (नाव बदललं आहे) हिच्यासाठी अफगाणी महिला म्हणून क्रिकेट खेळणं हे केवळ विकेट घेणं व धावा काढणं एवढ्यापुरतं मर्यादित नव्हतं.
"मी खेळते तेव्हा मला सामर्थ्यवान स्त्री असल्यासारखं वाटतं," असं ती म्हणते. "मला आत्मविश्वास मिळतो आणि स्वतःचा अभिमान वाटतो."
"काहीही करू शकणारी, स्वतःची स्वप्नं प्रत्यक्षात उतरवणारी स्त्री म्हणून स्वतःकडे पाहायला मला आवडतं."
पण हरीरसाठी आणि अफगाणी महिला क्रिकेट संघातील उर्वरित मुलींसाठी आता स्वप्नं उद्ध्वस्त झाल्यात जमा आहेत.
वर्षभरापूर्वी त्यांना खूप आशावादी वाटत होतं, पण आता त्यांना स्वतःच्या सुरक्षेबाबतची भीती भेडसावते आहे आणि क्रीडाविषयक प्रशासनाने आपल्याला वाऱ्यावर सोडल्याची भावना त्यांच्या मनात आहे.
अफगाणिस्तानात क्रिकेटचा उदय एखाद्या परिकथेसारखाच वाटत होता. इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिलने (आयसीसी) 2001 साली अफगाणिस्तानला संलग्न सदस्यत्व दिलं. त्याच्या वर्षभर आधी तालिबानने या खेळावरील बंदी उठवली होती. लवकरच तालिबानला सत्तेवरून खाली खेचण्यात आलं आणि फूटबॉलसारख्या इतर खेळांप्रमाणे क्रिकेट पुन्हा बहरलं.

फोटो स्रोत, Getty Images
"गेल्या 20 वर्षांचा विचार केला, तर आम्ही युद्ध पाहिलं, आत्मघातकी हल्ले पाहिले, आमच्या समोर अनेक समस्या उद्भवल्या, पण केवळ खेळ या एकाच घटनेवेळी संपूर्ण राष्ट्र आनंदी राहत होतं, सर्वांची खेळांमधे भावनिक गुंतवणूक झाली होती," असं बीबीसी पुश्तूचे संपादक एमाल पासर्ली यांनी ऑगस्टमध्ये 'द स्पोर्ट्स डेस्क'शी बोलताना म्हटलं होतं.
"केवळ खेळांच्या निमित्ताने लोकांना आनंदी राहण्यासाठी वेळ आणि जागा मिळत असे आणि त्यांच्या भोवतीच्या बाकीच्या घडामोडींचा त्यांना विसर पडत असे."
2000 च्या दशकात अफगाणिस्तानातील क्रिकेटवेड वाढलं. पुरुषांच्या संघाने जागतिक पटलावर लक्षणीय कामगिरी केली. ऑस्ट्रेलियात 2015 साली झालेल्या विश्वचषकासाठी अफगाणी पुरुषांचा संघ पात्र ठरला, तेव्हा देशभरात जल्लोष करण्यात आला.
2017 साली त्यांना कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाला. रशीद खान आणि मोहम्मद नाबी यांसारखे खेळाडू आता आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय आहेत आणि देशात सर्वत्र त्यांच्याविषयी तितकंच प्रेम आणि आदर आहे.
अफगाणिस्तानातील पहिला राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ 2010 साली तयार झाला. त्यांना सुरुवातीपासूनच विरोधाला सामोरं जावं लागलं.
सुरुवातीच्या काळात अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) 'तालिबानकडून धमक्या' आल्याच्या कारणावरून महिलांच्या संघाला अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळू दिलं नाही.
2012 साली हा महिला संघ सहा संघांच्या प्रादेशिक क्रीडास्पर्धेसाठी ताजिकीस्तानला गेला आणि तिथे त्यांनी विजय मिळवला. पण दोन वर्षांनी त्यांना गाशा गुंडाळावा लागला. यावेळीसुद्धा तालिबानी धमक्यांमुळे असा निर्णय घ्यावा लागल्याचं एसीबीने सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
राष्ट्रीय संघ संपुष्टात आला असला, तरी अफगाणी मुली आणि तरुणी देशभरात तात्पुरत्या मैदानांवर क्रिकेट खेळत राहिल्या. महिलांचे सामने आयोजित करण्याची जबाबदारी असलेला छोटेखानी कर्मचारीवर्ग एसीबीकडे होता.
पण नवीन पिढीतील महिला क्रिकेटपटूंसमोरही त्याच समस्या उभ्या राहिल्या.
एसीबीमधील अनेक पदाधिकारी सहकार्य करत नव्हते आणि महिला खेळाडूंनी सामने खेळवायची 'भीक मागितली तरच' सामने आयोजित केले जात असत, असं हरीर सांगते. मैदानावर नसताना कसं वागावं, याचेही धडे बोर्ड सदस्य महिला खेळाडूंना देत असत.
"मी बॉलर आहे. पण मी विकेट घेतली तर ओरडायचं नाही आणि मला आनंद झालाय हे व्यक्तही करायचं नाही, कारण पुरुष माझ्याकडे पाहत असतात," असं ती सांगते.
"मला स्वतःच्या भावनांना आवर घालावी लागते. माझ्या संघ-सहकाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मी ओरडायचं नाही, त्यांना पाठिंबा द्यायचा नाही. 'तुम्हाला आनंद साजरा करता येणार नाही, तुम्ही ओरडायचं नाही किंवा हातवारे करायचे नाहीत,' असं ते आम्हाला सांगतात."
पण पुरुषांच्या संघाची पत वाढत गेल्यानंतर एसीबीला महिला संघाकडेही गांभीर्याने पाहाणं भाग पडलं. आयसीसीच्या नियमांनुसार संस्थेच्या 12 पूर्ण सदस्य-देशांचा राष्ट्रीय महिला संघही असायला हवा. अफगाणिस्तान 2017 साली आयसीसीचा सदस्य झाला. त्यामुळे नोव्हेंबर 2020 मध्ये 25 महिला क्रिकेटपटूंना करारबद्ध करण्यात आलं.
अगदी दहाच महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानातील महिला क्रिकेटपटूंच्या क्षितिजावर नवीन पहाट उगवल्याची चिन्हं होती. पण ही आशा अल्पजीवी ठरली.
तालिबानने 1996 ते 2001 या काळात राजवट चालवताना मुलींना आणि महिलांना जवळपास सर्व प्रकारच्या शिक्षणापासून प्रतिबंध केला होता (आठ वर्षांपुढील मुलींना शाळेत जायची मुभा नव्हती), शिवाय पुरुष नातलग सोबत नसेल तर महिलांना कामावर जाण्याची किंवा घराबाहेर पडण्याचीही परवानगी नव्हती.

फोटो स्रोत, Getty Images
आता तालिबानने स्वतःची काहीशी मवाळ प्रतिमा रंगवायचा प्रयत्न केला असला, तरी महिलांना खेळांमध्ये सहभागी होता येण्याची शक्यता फारशी नाहीच.
एसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हमीद शिनवारी म्हणाले की, तालिबानने पुरुषांच्या संघाला पाठिंबा दिला होता, त्यामुळे या संघाला नोव्हेंबरमध्ये हॉबर्ट इथे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या पहिल्यावहिल्या कसोटी सामन्यात खेळायची संमती आहे. पण महिला संघाने खेळ थांबवावा अशी अपेक्षा त्यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केली. यामुळे अफगाणिस्तानच्या आयसीसी सदस्यत्वाचा भंग होईल.
ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलिया सरकारने बाहेर काढलेल्या 50 महिला क्रीडापटूंप्रमाणे आपल्यालाही तालिबानी राजवटीपासून पळ काढता येईल, अशी अफगाणी महिला क्रिकेटपटूंना आशा आहे.
फूटबॉलपटू आणि इतर मैदानी खेळ खेळणाऱ्या क्रीडापटूंना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी "गुंतागुंतीच्या वाटाघाटी" सुरू आहेत, असं फूटबॉलची जागतिक नियामक संघटना असणाऱ्या 'फिफा'ने म्हटलं आहे.
आयसीसीच्या प्रवक्त्या म्हणाल्या, "अपेक्षेप्रमाणे आम्ही अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाशी संपर्क ठेवून आहोत आणि तिथल्या परिस्थितीकडे आमचं लक्ष आहे. आम्ही त्यांना सहकार्य देऊ केलं आहे."
पण आयसीसीने देशातील महिला क्रिकेटपटूंशी थेट संपर्क ठेवलेला नाही, असं ताक्वा सांगते. एसीबीनेही त्यांच्या परिस्थितीमध्ये फारसा रस दाखवलेला नाही.
"आयसीसी आम्हाला कधीही मदत करत नाही, त्यांनी आम्हाला कायम निराश केलेलं आहे. एसीबीच्या नवीन अध्यक्षांसारखे जे लोक महिला क्रिकेटच्या विरोधात आहेत, त्यांच्याशी आयसीसी चर्चा करते," असं ताक्वा म्हणते. तालिबानने देशाची सत्ता हस्तगत केल्यानंतर एसीबीचे अध्यक्ष म्हणून अझिझुल्लाह फाझ्ली यांची नियुक्ती करण्यात आली, त्या संदर्भात तिने ही विधानं केली.
एसीबी अजूनही महिलांच्या क्रिकेटला पाठिंबा देते का, असा प्रश्न विचारला असता शिनवारी म्हणाले, "यासंबंधीचा निर्णय आगामी सरकार घेईल."
परिस्थिती इतकी बिकट असतानाही अफगाणिस्तानी महिला क्रिकेट संघ पुन्हा एकत्र येईल अशी आसेलची धारणा आहे. चांगल्या भवितव्याबद्दलची आपली स्वप्नं सांगताना हरीर आनंदून जाते.
"मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व्हायचं आहे," असं हरीर म्हणते.
"मला इतर लोकांच्या जगण्यात बदल घडवू शकेल, अशी समर्थ अफगाणी स्त्री व्हायचं आहे. इतर अफगाणी स्त्रिया आणि मुलींसाठी मला आदर्श घडवायचा आहे. अफगाणिस्तानातील मोजक्या पुरुषांचं तरी मनपरिवर्तन करायची माझी इच्छा आहे. मला स्वतःविषयी अभिमान वाटेल असं काहीतरी करायचं आहे. इतकंच."
आसेल यात भर टाकत सांगते, "अफगाणी संस्कृतीमध्ये महिलांच्या खेळण्यावर बंधनं आहेत. महिला दुबळ्या असतात आणि त्यांची शारीरिक क्षमता क्रिकेट खेळण्यासाठी पूरक नाही, महिलांनी लग्न करावं, मुलांना जन्म द्यावा आणि घरातली कामं करत मुलांचं संगोपन करावं, असं ते म्हणतात. बायकांनी त्यांच्या नवऱ्यांची काळजी घ्यायला हवी, असं त्यांचं म्हणणं असतं."
"इस्लामी संस्कृतीनुसार बाईने क्रिकेट खेळता कामा नये, त्यामुळे मी क्रिकेट खेळायला नको, असं माझेही काही नातलग म्हणतात. पण मला क्रिकेट खेळायला आवडतं. आमची परिस्थिती बिकट आहे. पण आमचा श्वासोच्छवास सुरू आहे तोवर आशा आहे. आम्हाला देशातून बाहेर काढलं आणि दुसरं कुठेतरी नेलं तर आम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करू."
"आम्ही स्वतःच्या स्वप्नांवरचा विश्वास कोलमडू देणार नाही, इन्शाअल्लाह."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








