1971च्या युद्धात तलावात लपून पाइपनं श्वास घेत बचावलेल्या भारतीय पायलटची गोष्ट

फोटो स्रोत, ASIA@WAR
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
4 डिसेंबर 1971 च्या सकाळी दमदम विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या 14 स्क्वार्डनच्या दोन हंटर विमानांनी ढाक्यातील तेजगाव विमानतळावर हल्ला केला.
स्क्वार्डन लीडर कंवलदीप मेहरा हे एक हंटर विमान उडवत होते तर दुसरं विमान उडवत होते, त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेले फ्लाइट लेफ्टनंट संतोष मोने.
तेजगाव विमानतळावरून विमान नेलं त्यावेळी त्यांना पाकिस्तानची लढाऊ विमानं दिसली नाहीत. कारण पाकिस्ताननं विमानं इतर बाजुंना ठेवलेली होती. इतकी काही ठिकाणी बॉम्ब हल्ले केल्यानंतर जेव्हा मेहरा आणि मोने परतायला लागले, त्यावेळी ते एकमेकांपासून दूर गेले.
सर्वात आधी मोनेंना काही अंतरावर पाकिस्तानची दोन सेबर जेट विमानं दिसली. काही सेकंदांमध्येच दोन सेबर जेट विमानं भारताच्या हंटर विमानांच्या मागं लागली. एक सेबरजेट विमान मागे येत असल्याचं मेहरा यांच्या अचानक लक्षात आलं.
मेहरा यांनी डावीकडे वळण घेत, मोनेंना त्यांची पोझिशन विचारली. पण त्यांना उत्तर मिळालं नाही. सेबर विमानानं मेहरांच्या विमानावर अनेक फायर केले. मेहरा यांनी मोनेंना सेबर विमानावर मागून हल्ला करण्यास सांगितलं. पण मोने यांच्या विमानाच्या मागेही एक विमान लागलेलं होतं, याचा त्यांना अंदाज नव्हता.
कॉकपिटमध्ये भरला धूर
त्यावेळी मोने यांच्या विमानाचा वेग 360 नॉट्स म्हणजे ताशी 414 किमी होता. मोने यांनी विमान कमी उंचीवर नेलं आणि पूर्ण शक्तीनं ते विमान उडवू लागले. पाकिस्तानी पायलटनं त्यांच्यावर हल्ला सुरू ठेवला, पण ते त्यांना हानी पोहोचवू शकला नाही.
कवलदीप मेहरा मात्र एवढे नशिबवान नव्हते. त्यांच्या हंटरवर फ्लाइंग ऑफिसर शम्सुल हक एकापाठोपाठ गोळीबार करत होते. ते 100 फूट उंचीवरून उडत होते. त्यांच्या विमानात आग लागली होती.
त्याचवेळी मागून येणारं सेबर विमान मेहरा यांच्या विमानाला ओव्हरशॉट करत पुढं निघून गेलं. मेहरा यांना त्यावर नेम धरायचा होता. मात्र कॉकपिटमध्ये धूर भरला गेल्यानं त्यांना ते शक्य झालं नाही. त्यांना श्वास घ्यायला अडचण होत होती. हळू-हळू ही आग कॉकपिटपर्यंत पोहोचायला लागली.
''मेहरा यांनी जराही वेळ न लावता पायाजवळ असलेलं इजेक्शन बटन दाबलं. पण एका मायक्रोसेकंदामध्ये उघडणारं पॅराशूट तेव्हा उघडलंच नाही. विमानाच्या वरची कॅनपी मात्र उडून गेली. त्याचा परिणाम म्हणजे एवढ्या वेगानं हवा आली की, मेहरा यांचे ग्लोव्ह्ज आणि घड्याळ तुटले आणि हवेत उडून गेले. एवढंच नव्हे, तर त्यांच्या शरीराचा उजवा भाग एवढ्या वेगानं मागं ढकलला गेला की, त्यांचा खांदा उखडला,'' असं पीव्हीएस जगनमोहन आणि समीर चोप्रा यांनी त्यांच्या 'इगल्स ओव्हर बांग्लादेश' पुस्तकात लिहिलं आहे.

फोटो स्रोत, ASIA@WAR
''बऱ्याच प्रयत्नांनंतर मेहरा यांनी पुन्हा डाव्या हातानं पॅराशूटचं लिव्हर दाबलं. यावेळी पॅराशूट उघडलं आणि मेहरा हवेत उडाले. मेहरा खाली पडताच बंगालमधील ग्रामस्थांनी त्यांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण सुरू केली.
नशीब म्हणजे दोघांनी गर्दीला थांबवलं आणि मेहरा यांची चौकशी केली. मेहरा यांची सिगारेट आणि ओळखपत्रामुळं ते भारतीय असल्याचं समजलं. मेहरा यांचं नशीब म्हणून ते मुक्ती वाहिनीच्या सदस्य असलेल्या परिसरात पडले होते,'' असं जगनमोहन आणि चोपडा यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.
'मिसिंग इन अॅक्शन' जाहीर
गावकऱ्यांनी मेहरा यांना उचललं. त्यांना कपडे बदलून लुंगी परिधान करायला दिली. मुक्ती वाहिनीच्या एका सदस्यानं त्यांचं पिस्तुल ताब्यात घेतलं. मेहरा एवढे जखमी झाले होते की, त्यांना चालणंही शक्य होत नव्हतं. त्यांना स्ट्रेचरवर टाकून जवळच्या एका गावात नेण्यात आलं. जाताना रस्त्यातच ते बेशुद्ध झाले होते.
गावात पोहोतल्यानंतर, गावकऱ्यांनी त्यांना नाश्ता दिला. दिवसभरात त्यांना मिळालेलं ते पहिलं अन्न होतं. कारण मेहरा हे पहाटेच विमान घेऊन हल्ला करण्यासाठी निघाले होते. मेहरा भारतीय हवाई दलाला काही दिवस सापडले नाहीत, तेव्हा त्यांना 'मिसिंग इन अॅक्शन' जाहीर करण्यात आलं.

फोटो स्रोत, BHARATRAKSHAK.COM
नंतर पाकिस्तानचे फ्लाइंग ऑफिसर शम्सुल हक यांनी या लढाईची माहिती देताना, पाकिस्तानच्या हवाई दलाचं नियतकालिक शाहीनमध्ये 'अॅन अनमॅच्ड फीट इन द एअर' नावाचा एक लेख लिहिला. त्यांनीच स्क्वार्डन लीडर मेहरा यांचं विमान पाडलं होतं, असं त्यांनी त्यात सांगितलं होतं.
ढाक्याच्या जवळच ते विमानातून बाहेर पडले होते. मुक्ती वाहिनीची मदत मिळाल्यानं ते पाकिस्तानी सैनिकांच्या हाती लागले नाही आणि नंतर भारतात सुरक्षितपणे परत आले.
आगरतळ्याच्या भारतीय हेलिपॅडपर्यंत पोहोचले
या घटनेच्या नऊ दिवसांनंतर आगरतळा भागातील सीमा परिसरात एका हेलिपॅडवर एक भारतीय हेलिकॉप्टर उतरलं. त्यात भारतीय लष्करातील एक जनरल बसले होते. जनरल हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर एक स्थानिक एअरमन त्या हेलिकॉप्टरची सर्व्हीस करत होते, तर पायलट आपसांत चर्चा करत होते.
त्याचवेळी दुसऱ्या बाजुनं एक शर्ट आणि लुंगी परिधान केलेला एक व्यक्ती येत असल्याचं कुणाच्याही लक्षात आलं नाही. त्यांचा उजवा हात बांधलेला होता. दाढी वाढलेली होती आणि संपूर्ण चेहऱ्यावर जखमांच्या खुणा होत्या. त्यांचा हात निळा झाला होता. त्यात गँगरीनची सुरुवात झाली होती. प्रथमदर्शनी पाहता, तो व्यक्ती शरणार्थीसारखा दिसत होता. त्या काळात आगरतळामध्ये सगळीकडं शरणार्थी होते.
त्या व्यक्तीनं 'मामा' म्हटलं तेव्हा त्यांना प्रचंड आश्चर्य वाटलं. कारण त्यापैकी एका जणाला सगळे 'मामा' म्हणत होते. मात्र भारतात मामा हा शब्द नातेवाईकासाठीही वापरतात, तसं कोणीतरी बोलत असेल असं त्यांना वाटलं. युद्धाच्या काळात भिकाऱ्यानं त्रास देऊ नये असं त्यांना वाटत होतं, त्यांनी अत्यंत रुक्षपणे त्या व्यक्तीला 'काय आहे?' असं विचारलं.

फोटो स्रोत, HARPER COLLINS
''त्या व्यक्तीनं पायलटचा हात पकडला आणि म्हटलं, 'अरे मला ओळखा.' पायलटनं रागात हात ओढला आणि म्हटलं 'मला हात लावू नको.'
त्यावेळी त्या अनोळखी व्यक्तीनं त्यांना विचारलं, 'तुमचा केडी नावाचा एखादा मित्र आहे का?' पायलटनं म्हटलं, 'हो स्क्वार्डन लीडर केडी मेहरा. पण त्यांचा तर मृत्यू झाला आहे.'
त्यावर तो व्यक्ती म्हणाला, 'नाही तो मी आहे.' त्यानंतर पायलटला याची जाणीव झाली की, त्याच्यासमोर भिकाऱ्यासारखा दिसणारा व्यक्ती दुसरा कोणी नसून, स्क्वार्डन लीडर केडी मेहरा हेच आहेत. केडी मेहरा 'मिसिंग इन अॅक्शन' होते आणि त्यांचा मृत्यू झाला आहे, असं समजलं जात होतं. मुक्ती वाहिनीच्या मदतीनं मेहरा हे जवळपास 100 मैल अंतर कापत त्याठिकाणापर्यंत पोहोचले होते,'' असं चोपडा आणि जगनमोहन यांनी पुस्तकात लिहिलं आहे.
4 डिसेंबरला मेहरा यांचं विमान कोसळल्यानंतर मुक्ती वाहिनीच्या सदस्यांनी त्यांची काळजी घेतली होती. त्यांना खायला दिलं होतं, तसंच त्यांना उपचार देत त्यांची खातरदारी केली होती.
मुक्ति वाहिनीतील तरुण सदस्य शुएबनं मेहरा यांना लुंगी आणि शर्ट परिधान करून भारतीय ठिकाण्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेतली होती. त्यापूर्वी त्यांचा फ्लाइंग सूट आणि ओळखपत्र जाळून नष्ट करण्यात आलं होतं.
तलावाच्या पाण्याखाली ठेवलं
''मेहरा मुक्ती वाहिनीबरोबर असल्याची माहिती भारतीय लष्करापर्यंत पोहोचवण्यात आली होती. पण पाकिस्तानींनी त्यांचा शोध सुरू करायला नको म्हणून, याबाबत फार चर्चा करण्यात आली नव्हती. वाचवण्यात आलेले पायलट हे कदाचित केडी मेहरा असावे असं मेहरा यांच्या 14 स्क्वार्डनला दोन दिवसांनंतर सांगण्यात आलं," असं विंग कमांडर एमएल बाला यांनी त्यांच्या 'इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर ऑफ द अनटोल्ड स्टोरी ऑफ 1971' मध्ये लिहिलं आहे.

फोटो स्रोत, PAKISTAN AIRFORCE
''मेहरा यांना विमान पडलं त्या गावात थोड्या वेळासाठीच ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना झोपडीतून काढून एका तलावाच्या पाण्याखाली लपवण्यात आलं. त्यांना श्वास घेण्यासाठी एक पाईप देण्यात आला. मेहरा हे दुपारभर तलावाच्या पाण्याखाली होते. सायंकाळी अंधार झाल्यानंतर गावकऱ्यांनी येऊन त्यांना पाण्याबाहेर काढलं होतं. मेहरा यांना शोधायला आलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी संपूर्ण गाव जाळलं, मात्र कोणीही मेहरा यांच्याबाबत माहिती दिली नाही. पाकिस्तानी सैनिकांचे अत्याचार सहन करत गावकऱ्यांनी मेहरा यांना पाच दिवस त्यांच्यासोबतच सुरक्षितपणे ठेवलं,'' असं एमएल बाला यांनी लिहिलं आहे.
पाकिस्तानी गनबोटपासून विमानांनी वाचवलं
केडी मेहरा यांनी ढाक्याच्या पश्चिमेला पॅराशूटद्वारे उडी मारली होती. मुक्ती वाहिनीनं त्यांना पूर्व दिशेला आगरतळ्याकडं जाणं योग्य राहील, असं सांगितलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
''शुएबला सोबत घेतलेल्या मेहरा यांनी एका मच्छिमाराच्या नावेद्वारे मेघना नदी ओलांडली. त्याचवेळी त्यांच्याबरोबर मुक्ती वाहिनीचा आणखी एक सदस्य सरवरही आला. नदी ओलांडताना पाकिस्तानच्या गन बोटचा एक ताफा येताना दिसला तेव्हा एक मोठा धोका निर्माण झाला होता.
मेहरा आणि त्यांच्या बरोबर असलेल्यांनी पाकिस्तानी गनबोटपासून दूर राहण्याचा खूप प्रयत्न केला. कारण त्यांना पाकिस्तानच्या बोटनं पकडलं असतं, तर त्यांच्या मृत्यू होणार हे निश्चित होतं,'' असं जगनमोहन आणि चोपडा यांनी लिहिलं.
''पाकिस्तानची बोट जवळ येत होती आणि मेहरा आणि त्यांच्या साथीदारांनी वाईटातील वाईट गोष्टीसाठी मनाची तयारी केली होती. त्याचवेळी अचानक भारतीय हवाई दलाच्या चार विमानांनी पाकिस्तानच्या गनबोटवर हल्ला केला. त्यांनी हल्ला केलेल्या बॉम्बमुळं बोटमध्ये आग लागली. त्यामुळं मेहरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या जीवात जीव आला आणि त्यांनी पूर्वेच्या दिशेला पुढं जायला सुरुवात केली.
पुढे त्यांना पाकिस्तानची आणखी एक बोट दिसली. पण त्यांनी काही अंतरावर जात, लांब गवताचा आडोसा घेतला. त्यामुळं पाकिस्तानला त्यांच्याबाबत माहिती मिळाली नाही," असं त्यांनी लिहिलं आहे.
हवाई दलाच्या मुख्यालयाला संदेश
मेघना नदीच्या पूर्व किनाऱ्यावर उतरल्यानंतर त्यांनी आगरतळापर्यंत तीन मैलाचं अंतर पायी चालून कापलं. जखमा आणि वेदना असूनही मेहरा हे तासन् तास चालत राहिले.

फोटो स्रोत, ASIA@WAR
अखेर ते भारतीय लष्कराची वाहनं ये-जा करत असलेल्या मार्गावर पोहोचले. त्यांनी हात दाखवून एक जीप अडवली आणि भारतीय सैनिकांना संपूर्ण घटना सांगितली.
त्या तिघांना एका जीपमधून कॅम्पमध्ये नेण्यात आलं. त्याठिकाणी त्यांची कसून चौकशी करण्यात आली. मेहरा यांनी आग्रह केल्यानं हवाई दलाच्या मुख्यालयाला एक संदेश पाठवण्यात आला. त्यानंतर मेहरा यांना घेण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवत असल्याची माहिती मिळाली. या दरम्यान भारतीय लष्कराच्या एका डॉक्टरनं मेहरा यांना काही वेदनाशामक औषधं दिली.
''त्या रात्री मी शांतपणे झोपू शकलो. कारण गेल्या आठ दिवसांमध्ये प्रथमच मला सुरक्षित असल्याची जाणीव झाली होती. एवढे दिवस मी एवढा व्यवस्थित राहू शकलो नाही. कारण मी पाकिस्तानचा ताबा असलेल्या भागात होतो,'' असं मेहरा यांनी नंतर दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं.
12 डिसेंबरला लष्काराच्या कमांडिंग ऑफिसरनं मेहरा यांना एका जनरलसह एक हेलिकॉप्टर तिथं येणार असल्याचं सांगितलं. मेहरा मुक्ती वाहिनीचे सदस्य शुएबबरोबर एका स्कूटरवरून त्या हेलिपॅडपर्यंत पोहोचले. मेहरा यांनी हेलिकॉप्टर आणि पायलटला पाहिलं तेव्हा, त्यांनी त्यांचे ज्युनियर आणि 'मामा' निकनेम असलेल्या पायलटला लगेचच ओळखलं.
मेहरांनी घेतली निवृत्ती
केडी मेहरा यांना तिथून आगरतळा इथं आणि नंतर शिलाँगला नेण्यात आलं. त्याठिकाणी लष्करी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना एका डकोटा विमानाद्वारे दिल्लीला आणण्यात आलं. अनेक महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. एक वेळ तर अशी आली की, त्यांचा हात कापावा लागणार असं वाटलं होतं. त्यांचा हाच वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं. पण आरोग्याच्या इतर समस्यांमुळं त्यांना विमान उड्डाण करण्यास मनाई करण्यात आली.
युद्ध संपल्यानंतर पाच वर्षांनी त्यांनी हवाई दलामधून वेळेआधीच निवृत्ती स्वीकारली. 4 सप्टेंबर 2012 रोजी स्क्वार्डन लीडर कवलदीप मेहरा यांनी वयाच्या 73 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








