अल्लाउद्दीन खिल्जीने देवगिरीच्या यादवांना लुटून सोनं, हिरे, एक हजार मण चांदी लुटलेली?

अल्लाउद्दीन खिल्जी, देवगिरी किल्ला
फोटो कॅप्शन, अल्लाउद्दीन खिल्जी, देवगिरी किल्ला
    • Author, सिद्धनाथ गानू
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

दिल्लीचा सुल्तान अल्लाउद्दीन खिल्जीने महाराष्ट्रावर स्वारी केली. देवगिरी आणि आसपासच्या मुलुखावर त्याने ताबा मिळवला. इतकंच नाही तर देवगिरी लुटून त्याने मणामणांनी सोनं, मोती, हिरे आणि अनेक मौल्यवान वस्तू लुटून नेल्या अशी गोष्ट तुम्ही ऐकली असेल.

अल्लाउद्दीन खिल्जीच्या क्रौर्याच्या इतिहासात अनेक कथा आणि दंतकथा आहेत. पण देवगिरी लुटून खिल्जीने इतकी मोठी खंडणी नेल्याची कथा ही फक्त एक वदंता आहे का असाही प्रश्न पडतो.

मध्ययुगापासून महाराष्ट्राची बदलती रुपरेषा पाहिलेला एक बेलाग किल्ला म्हणजे देवगिरी किंवा दौलताबाद. या किल्ल्यावर अनेक राजवटींनी सत्ता गाजवली, इतकंच काय, देवगिरीला मोहम्मद बिन तुघलकाने त्याची राजधानीही बनवलं. काय आहे या किल्ल्याची कहाणी?

यादव राजवंशातल्या भिल्लम पाचवा याने आपली राजधानी देवगिरीवर हलवली. हा किल्ला यापूर्वीही अस्तित्त्वात होताच, पण यादवकाळानंतरचा या किल्ल्याचा इतिहास विशेष नजरेत भरतो.

यादव, खिलजी, तुघलक, बहामनी, निजामशाही, मोगल, मराठे आणि असफजाही असा अनेक राजवटींचे झेंडे - निशाणं मिरवत हा किल्ला इतिहासात आपलं स्थान भक्कम करून गेला.

देवगिरी / दौलताबाद किल्ला
फोटो कॅप्शन, देवगिरी / दौलताबाद किल्ला

देवगिरीच्या किल्ल्याभोवती तीन ‘कोट’ आहेत. सगळ्यात बाहेर आहे अंबरकोट. निजामशाहीचा वजीर मलिक अंबरने याची निर्मिती केली म्हणून याला ‘अंबरकोट’ म्हणतात. या अंबरकोटाच्या आत वसलंय दौलताबाद शहर. अंबरकोट ते महाकोट यादरम्यान साधारण 14 चौरस किलोमीटरचं क्षेत्र आहे.

कालाकोट म्हणजे किल्ल्याची मुख्य तटबंदी. कालाकोटमधून आत गेल्यानंतर लागतो देवगिरीचा मुख्य किल्ला.

200 मीटर उंच असलेला हा जमिनीवरचा किल्ला त्याच्याभोवतीच्या खंदकामुळे आणि तटबंदीमुळे जवळपास अभेद्य असल्यासारखा भासतो. पण या किल्ल्यालाही आक्रमणांचा सामना करावा लागला. यातलं सर्वाधिक चर्चिलेलं आक्रमण होतं दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिल्जीचं.

अल्लाउद्दीन खिल्जीची स्वारी आणि देवगिरीची लूट

इतिहासकार मोहम्मद कासीम फरिश्ताच्या 'तारीख - ए - फरिश्ता' या पुस्तकात अल्लाउद्दीन खिल्जी आणि रामचंद्रराय यांच्यातल्या लढाईचं आणि त्यानंतर देवगिरीच्या लुटीचं एक वर्णन आहे.

यादव घराण्याचे राजे रामचंद्रराय हे 1271मध्ये राजगादीवर आले. रामचंद्ररायांच्या काळात यादव राज्य आणि देवगिरी सधन झाले होते.

दक्षिणेतल्या प्रतिस्पर्धी राजांवर नजर असलेल्या रामचंद्र रायांचा 1296 मध्ये मुकाबला झाला अलाउद्दीन खिल्जीशी. खिल्जीची स्वारी झाली तेव्हा रामचंद्रराय औरंगाबाद किंवा आताच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या लासूर या ठिकाणाजवळ होते.

हल्ल्यानंतर गोंधळून गेलेल्या रामचंद्ररायांनी देवगिरीत आसरा घेतला. पण खिल्जीच्या सैन्याने अफवा पसरवली की उत्तरेतून आणखी 20 हजारांचं सैन्य चालून येतंय.

दौलताबाद / देवगिरीचा किल्ला
फोटो कॅप्शन, दौलताबाद / देवगिरीचा किल्ला

नाईलाजाने रामचंद्रराय आणि खिल्जीत तह झाला आणि 6 मण सोनं, 7 मण मोती, 2 मण हिरे, माणिक, पाचूसह मौल्यवान खडे, 1 हजार मण चांदी आणि 4 हजार गज रेशमी कापड दिलं गेलं.

ही कहाणी वाचताना तो काळ अक्षरशः डोळ्यांपुढे उभा राहतो. पण तुम्हाला ठाऊक आहे का की हे सगळं वर्णन फक्त फेरिश्ताच्याच पुस्तकात आहे? खिल्जीच्या काळात ज्यांनी विपुल लेखन केलं ते कवी आणि इतिहासकार आमीर खुसरो किंवा त्यानंतर अब्दुल मलिक इसामी यांनी देवगिरीच्या स्वारीचं जे सविस्तर वर्णन केलंय त्यात या लुटीबद्दल कुठेच उल्लेख नाहीत. त्यामुळे अनेक इतिहास अभ्यासकांनी या नोंदीच्या विश्वासार्हतेवर शंका घेतल्या आहेत.

फेरिश्ता आला 17 व्या शतकात, त्यामुळे 13 व्या शतकातील घटनांबद्दल त्याने केलेल्या नोंदींना ऐतिहासिक आधार किती होता आणि त्यात कल्पनाविलास किती होता हा प्रश्न राहतोच.

ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांनीही आपल्या देवगिरीचे यादव या पुस्तकात या लुटीबद्दल शंका उपस्थित केलीय. तसंच खिल्जी या मुलुखात आला असला तरी खुद्द देवगिरीपर्यंत पोहोचलाच नसावा असाही कयास ते लावतात.

व्हीडिओ कॅप्शन, पद्मदुर्ग : जंजिऱ्याच्या उरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला

देवगिरीची प्रसिद्ध अंधारी आणि मिथकं

देवगिरीच्या लढायांबद्दल आणि स्थापत्याबद्दल वाचताना अगदी हमखास सापडणारी नोंद म्हणजे इथली अंधारी.

मुख्य किल्ल्याचं प्रवेशद्वार असलेला हा मार्ग असमान उंचीच्या पायऱ्यांचा आणि मिट्ट काळोखाने भरलेला होता. चाल करून आलेल्या शत्रूला थेट किल्ल्याभोवतीच्या खंदकात पाडून नामोहरम करणाऱ्या या अंधारीबद्दल जितकं आकर्षण आहे तितकीच मिथकंही.

या अंधारीचा रस्ता वळणावळणांचा आहे. आतमध्ये बऱ्याच पायऱ्या आहेत पण त्यांची उंचीही समसमान नाही आणि आकारही. म्हणजे कुणी जबरदस्तीने इथून घुसण्याचा प्रयत्न केलाच तर ती व्यक्ती ठेचकाळून पडलीच पाहिजे. या अंधारीत टप्प्याटप्प्यावर पहारेकऱ्यांसाठी चौक्या होत्या.

अंधारीच्या टोकाशी एक लोखंडी सरकता दरवाजा होता. पण यातली सर्वांत कल्पक योजना होती आग आणि धुराची.

किल्ल्यात प्रवेश करण्यासाठीची अद्भुत अंधारी
फोटो कॅप्शन, किल्ल्यात प्रवेश करण्यासाठीची अद्भुत अंधारी

अंधारीच्या साधारण मध्यावर शेजारच्या दगडी भिंतींमध्ये ज्यातून वारा येऊ शकेल असं एक भगदाड होतं. योजना अशी होती की एका लोखंडी पिंजऱ्यात जळते कोळसे ठेवून या वाऱ्याने त्यांचा धूर अंधारीत पसरवायचा. या धुरातून पुढे जाणं जवळपास अशक्य होऊन बसावं. अशीच काहीशी योजना इ.प.पूर्व 189 मध्ये अँब्रेशियाला रोमन सैन्याने वेढा घातला तेव्हा तो वेढा सोडवण्यासाठी केली गेली होती असं ग्रीक इतिहासकार पॉलिबियसने लिहून ठेवलंय.

काही ठिकाणी अशीही नोंद सापडते की ही आग अंधारीच्या वरच्या टोकाला लावली जात असे. पण वरच्या दारापाशी अशाप्रकारे वाऱ्याची झुळूक यायला वाव नव्हता आणि ते दार कालांतराने आपल्या मूळ जागेपासून काही फूट उंच उचललं गेलं होतं त्यामुळे तिथे आगीची आणि धुराची योजना शक्य नाही असं भारतातील किल्ल्यांविषयीच्या ‘स्ट्राँगहोल्ड्स ऑफ इंडिया’ या आपल्या पुस्तकात सिडनी टॉय यांनी म्हटलं आहे.

‘स्ट्राँगहोल्ड्स ऑफ इंडिया’ पुस्तकातील संदर्भ

फोटो स्रोत, archive.org

फोटो कॅप्शन, ‘स्ट्राँगहोल्ड्स ऑफ इंडिया’ पुस्तकातील संदर्भ

या भुयारातून पुढे जायला तीन वाटा दिसतात. एका वाटेने बाहेर गेल्यास अचानक उजेडात आल्याने डोळे दिपून तोल जाऊन माणूस खंदकात पडू शकतो. दुसऱ्या वाटेने गेल्यास पुढच्या मोठ्या खड्ड्यात पडू शकतो आणि तिसरा मार्ग पुढे किल्ल्यात जातो.

देवगिरीचा विशाल खंदक आणि मलिक अंबर

देवगिरी हा खरा डोंगरावरचा किल्ला. त्याला संरक्षक तटबंदी आहेच, पण या किल्ल्याच्या रक्षणात भूमिका बजावणारा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्याभोवती असलेला खंदक. हा खंदक यादवकाळात नव्हता.

सुरुवातीला तुम्ही ज्या फेरिश्ताबद्दल वाचलंत त्याच्या वर्णनातही हा खंदक आढळत नाही. या खंदकाचं मूळ शोधायला गेलात की तुम्ही पोहोचाल निजामशाहीचा धोरणी वजीर मलिक अंबरपाशी.

मलिक अंबर हा मूळचा आफ्रिकन गुलाम. पण भारतात येऊन आपल्या अक्कलहुशारीच्या आणि कौशल्याच्या जोरावर तो निजामशाहीत थेट वजीरपदापर्यंत पोहोचला.

देवगिरीचा खंदक
फोटो कॅप्शन, देवगिरीचा खंदक

निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद याने 1490 च्या सुमारास देवगिरीवर ताबा मिळवला. पुढे मूर्तजा निजामशाह याचं 1610 च्या सुमारास देवगिरीत आगमन झालं. मलिक अंबर मूर्तजा निजामशाहचा वजीर होता. 1636मध्ये औरंगजेबाने निजामशाहीचा पराभव केला आणि दख्खनमध्ये आपलं अस्तित्व भक्कम केलं.

पण दरम्यानच्या काळात देवगिरीत खंदकाच्या बांधणीसाठी पुरेसा कालावधी मलिक अंबराकडे होता असा निष्कर्श या काळाचा तौलनिक अभ्यास करून काढता येतो. या महाकाय खंदकात दर 200 मीटर अंतरावर बांध घातलेले होते. त्यांची उंची क्रमशः वाढत जाणारी होती. तटबंदी ओलांडून शत्रू जर किल्ल्यात शिरायचा प्रयत्न करत असेलच तर त्याला खंदकात अडकवण्याची ही योजना होती.

निजामशाहीचा वजीर मलिक अंबर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, निजामशाहीचा वजीर मलिक अंबर

प्र. के. घाणेकर यांनी 'यादवांचा देवगिरी' या आपल्या पुस्तकात या खंदकाबद्दल विवरण दिलंय. या खंदकावर कधी काळी एक काढता घालता येईलसा पूल असावा असा अंदाज आहे पण त्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाही. या खंदकाच्या उपयोगाबद्दल ते लिहीतात, “ह्या खंदकात दोन बंधारेवजा रचना आहेत. शत्रूची चाहूल लागली की एका बंधाऱ्यातून दट्टे काढून पाणी सोडले जायचे, तर दुसऱ्या बंधाऱ्यातून तेपाणी बाहेर जाणारे मार्ग दट्ट्यांनी बंद करायचे. म्हणजे पाण्याची पातळी वाढत जाईल व हा खालच्या पातळीवरील पूल पाण्यात जाईल. आता शत्रूला खंदक ओलांडणेच कठीण होईल.”

“सध्या याच जागी 1952 मध्ये लोखंडी सांगाड्याच्या पुलाची निर्मिती केली गेली. त्यामुळे या खंदकाच्या निर्मितीची आणि त्यातील पाण्याच्या पातळीवर नियंत्रण राखून दुर्गसंरक्षणाची एक अद्वितीय करामत मलिक अंबरने केल्याचा अभ्यासकांचा दावा आहे.”

...आणि राजधानी देवगिरीत आली

सुलतान अल्लाउद्दीन खिल्जीच्या मृत्यूनंतर दिल्लीत काही काळ अनागोंदी होती. अल्लाउद्दीनचा मुलगा कुतुबुद्दीन मुबारकशाह सुलतान झाला. पुढे खिलजींकडून सुलतानपद आलं तुघलकांकडे.

देवगिरीचं नाव आधी कुतुबाबाद आणि मग कुवत उल इस्लाम झालं. पण देवगिरीचं आणखी एक नामांतर व्हायचं होतं.

मोहम्मह बिन तुघलकाची इतिहासात विक्षिप्त राजा म्हणून नोंद झाली आहे. यानेच आपल्या सत्तेची राजधानी दिल्लीहून देवगिरीला हलवण्याचा निर्णय घेतला आणि देवगिरीचं नामांतर केलं दौलताबाद.

तुघलकाने 1327 साली राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलवण्याचं फर्मान काढलं. त्यासाठी जोरदार तयारी केली आणि राजधानी उत्तरेतून थेट दख्खनमध्ये येऊन दाखल झाली.

देवगिरीचं अनेकदा नामकरण झालं
फोटो कॅप्शन, देवगिरीचं अनेकदा नामकरण झालं

पण तुघलकाची राजधानी दौलताबादमध्ये अल्पकाळ टिकली. 1334 मध्ये तुघलकाने राजधानी पुन्हा दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतला आणि सत्तेचं केंद्र पुन्हा एकदा उत्तरेत गेलं. पण या अल्पशा काळात दौलताबादचं भूराजकीय महत्त्व वाढलं. दख्खनमधील सत्तेचं एक महत्त्वाचं केंद्र म्हणून देवगिरीचा किल्ला आणि दौलताबादला ओळखलं जाऊ लागलं.

तुघलकाने राजधानी हलवताना साहजिकच दौलताबाद आणि आसपासच्या भागात बांधकाम केलं. बाजार, मशिदी, विहिरी, सराई अशा तुघलककालीन बांधकामांच्या खुणा आजही पाहायला मिळतात.

गुहा, मिनार आणि भारतमातेचं मंदिर

देवगिरीच्या डोंगरात काही गुहाही सापडतात. काळ्या कोटाच्या आत तीन – चार गुंफांचा एक गुच्छ आहे. मधोमध असलेलं लेणं सगळ्यात मोठं होतं ज्यात तीन गाभारे होते. या लेण्यासमोरच आणखी एक प्रशस्त गुहा आहे ज्यात चोवीस कोनाडे खोदलेले आहेत. यात पूर्वी चोवीस जैन तिर्थंकरांच्या मूर्ती असाव्या असं मानतात. आता अर्थातच कोणत्याही मूर्ती शिल्लक नाहीत. या गुहांपर्यंत पोहोचणंही सोपं नाही.

या किल्ल्यावर एक मशीद आहे जिचा इतिहास फार रोचक आहे. खिल्जींकडे देवगिरीचा ताबा गेल्यानंतर अल्लाउद्दीनचा मुलगा कुतुबुद्दीन मुबारक याने किल्ल्यावर एक मशीद बांधली आणि तिला नाव दिलं जामी मसजिद. पश्चिमेकडे प्रार्थनेसाठी एक मंडपही उभारला गेला जो 126 खाबांवर उभा आहे.

किल्ल्यावरील भारतमाता मंदिर
फोटो कॅप्शन, किल्ल्यावरील भारतमाता मंदिर
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

भारत स्वतंत्र झाल्यानंतरही हैदराबादच्या निजामाने त्याच्या प्रांतावरची पकड सोडली नव्हती. जेव्हा हैदराबादला मुक्त करण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन पोलो चालवलं आणि निजामाची राजवट संपुष्टात आली तेव्हा या किल्ल्यावर असलेल्या मशिदीत भारतमातेची मूर्ती स्थापन करून त्याचं रुपांतर भारतमाता मंदिरात केलं गेलं.

संत ज्ञानेश्वरांनी आपल्या भावार्थदीपिकेत 'योगदुर्ग' नावाची कल्पना मांडली आहे. डोळ्यापुढे देवगिरी किल्ला ठेवून ज्ञानदेवांनी ही लिहील्याचा अनेकांचा दावा आहे.

मराठी साहित्याचे प्रसिद्ध अभ्यासक प्राध्यापक म. वा. धोंड तसेच ग. कृ. आगाशे यांनी याबद्दल सविस्तर लिखाणही केलं आहे. पण इतिहास आणि पुरातत्त्वाचे ख्यातनाम अभ्यासक म. श्री. माटे यांनी हा युक्तीवाद खोडून काढला आहे.

ज्ञानेश्वरीतील योगदुर्गात केलेलं वर्णन आणि प्रत्यक्ष उत्खनन तसेच ऐतिहासिक पुरावे यांचा तौलनिक अभ्यास यातून ज्ञानेश्वरीतील योगदुर्ग म्हणजे दौलताबाद / देवगिरी किल्ला नाही असं ते 1995 साली लिखित 'योगदुर्ग आणि देवगिरी' या लेखात ठामपणे सांगतात.

मध्ययुगापासून ते भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत आणि त्यानंतरचाही काळ या किल्ल्याने पाहिला आहे. स्थापत्य, विस्तार आणि त्या त्या काळातील प्रमुख राजकीय घडामोडींचा साक्षीदार असलेला हा किल्ला आजही दुर्गप्रेमींना भुरळ घालतो यात नवल नाही.

बहुधा म्हणूनच या किल्ल्याच्या सुरस - चमत्कारिक कहाण्या वेळोवेळी ऐकायला मिळतात. यातील काही कहाण्या तथ्यांशी आणि ऐतिहासिक संदर्भांशी सांगड घालून तुमच्यापर्यंत आणण्याचा हा प्रयत्न.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)