अफजल खानानं खरंच त्याच्या 63 पत्नींची हत्या केली होती का? जाणून घ्या सत्य

अफजल खानानं खरंच आपल्या 63 पत्नींची हत्या केली होती का?

फोटो स्रोत, SOCIAL MEDIA

फोटो कॅप्शन, कर्नाटकातील विजयपूरमधील साठ कबरी या नावाच्या पर्यटन स्थळाबद्दल म्हटलं जातं की इथे अफजल खानानं आपल्या 63 पत्नींना ठार केलं होतं.
    • Author, वकार मुस्तफा,
    • Role, संशोधक

विजापूरची आदिलशाही, अफजल खान आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला वाघनख्यांनी ठार करणं या गोष्टींबद्दलचं कुतुहल आजदेखील कमी होत नाही.

विजापुरात अफजल खानाच्या पत्नींच्या कबरी आणि त्यासंदर्भातील कहाणी त्यामुळेच आजदेखील अनेकांच्या कुतुहलाचा आणि चर्चेचा विषय असतो. त्या कबरींमध्ये दडलेलं सत्य आपण आज जाणून घेणार आहोत.

कर्नाटकच्या विजापूरमधील एक चबुतऱ्यात कबरींच्या सात रांगा आहेत.

पहिल्या चार रांगांमध्ये अकरा, पाचव्या रांगेत पाच आणि सहाव्या आणि सातव्या रांगेत सात अशा एकूण 63 कबरी आहेत.

या कबरींमधील समान अंतर, त्यांचा समान आकार आणि रचना यामुळे असं वाटतं की, या कबरींमध्ये असे लोक आहेत, ज्यांचा मृत्यू जवळपास एकाचवेळी झाला होता.

कबरीच्या वरील चपट्या भागामुळे हे स्पष्ट होतं की, त्या सर्व कबरी महिलांच्या आहेत.

2014 मध्ये कर्नाटकातील विजापूरचं नाव बदलून विजयपूर असं करण्यात आलं.

शहराच्या एका कोपऱ्यात असलेल्या या पर्यटनस्थळाला 'साठ कबरी' या नावानं ओळखलं जातं.

1668 पर्यंत हे शहर आदिलशाहीची राजधानी होतं.

विजापूरच्या आदिलशाहीचा सेनापती असलेल्या अफजल खानाने आदिलशाहीचा विस्तार दक्षिणेत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

हा तोच अफजल खान आहे ज्याला स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनख्यांनी ठार केलं होतं.

1659 मध्ये विजापूरचा सुलतान अली आदिल शाह दुसरा याने अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांशी युद्ध करण्यास पाठवलं होतं.

छत्रपती शिवाजी महाराज

भारतीय पुरातत्व खात्याच्या हेन्री कझिन्स यांच्या मते, या मोहिमेवर जाण्याआधी अफजल खानाला ज्योतिषांनी सल्ला दिला होता की, तो युद्धातून जिवंत माघारी येणार नाही.

हेन्री कझिन्स यांनी 'बिजापूर : द ओल्ड कॅपिटल ऑफ द आदिलशाही किंग्स' या आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की, 'अफजल खानाला भविष्यवाणींवर इतका विश्वास होता की तो प्रत्येक पावलावर त्यांची दखल घेत असे.'

हेन्री कझिन्स 1891 ते 1910 दरम्यान भारतीय पुरातत्व विभागाचे पश्चिम विभागाचे अधिक्षक होते.

1905 मध्ये त्याचं हे पुस्तक प्रकाशित झालं होतं. त्यात लिहिलं आहे की, रीतीरिवाजानुसार अफजल खान आपल्या महालाजवळच स्वत:ची कबर आणि एक मशीद बांधून घेत होता.

या दोन मजली मशिदीचं बांधकाम 1653 मध्ये पूर्ण झालं होतं. असं मानलं जातं की सर्वात वरचा मजला महिलांसाठी ठेवण्यात आला असेल.

मशिदीमध्ये अफजल खानाच्या नावानिशी ही तारीख नोंदवण्यात आली आहे.

ज्यावेळेस अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध मोहिम सुरू करण्याचा आदेश देण्यात आला होता, त्यावेळेपर्यंत ही कबर पूर्ण तयार झाली नव्हती.

'पत्नींना बुडवून मारण्याचा निर्णय'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ज्योतिषांनी सांगितलेल्या भविष्यवाणीचा अफजल खानावर इतका प्रभाव पडला होता की, ज्या दिवशी त्याने या मोहिमेची सुरुवात करण्यासाठी प्रस्थान केलं, तोच दिवस कबरीच्या दगडावर आपल्या मृत्यूचा दिवस म्हणून लिहिला होता.

याच कारणामुळे विजापूरहून निघताना अफजल खान आणि त्याचे सहकारी याच विचाराने बाहेर पडले की ते जिवंत परत येणार नाहीत.

हेन्रीनं पुस्तकात लिहिलं आहे की, "याच कारणामुळे अफजल खानाने आपल्या पत्नींना बुडवून ठार करण्याचा निर्णय घेतला होता."

इतिहासकार लक्ष्मी शरत यांनी 'द हिंदू' मध्ये लिहिलं होतं की, युद्धात आपला मृत्यू झाल्यानंतर आपल्या पत्नी इतर कोणाच्या हाती लागू नयेत म्हणून अफजल खानाने आपल्या सर्व पत्नींना एक-एक करून विहिरीत ढकलून दिलं होतं.

लक्ष्मी शरत यांनी लिहिलं आहे की, "अफजल खानाच्या एका पत्नीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र नंतर ती पकडली गेली आणि तिलाही ठार करण्यात आलं."

हेन्री कझिन्स यांच्या मते, या परिसरात 63 महिलांच्या कबरींव्यतिरिक्त आणखी एक कबर आहे. ती कबर रिकामी आहे.

ते लिहितात की, "कदाचित अफजल खानाची एक किंवा दोन पत्नी जिवंत वाचल्या होत्या. रिकामी कबर याच गोष्टीकडे इशारा करते."

इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्या मते, "अफजल खानाच्या या मोहिमेबद्दलचे अनेक किस्से नंतरच्या काळात प्रसिद्ध झाले आहेत. अशाच किश्श्यांपैकी हा देखील एक किस्सा आहे. यामध्ये म्हटलं आहे की शिवाजी महाराजांच्या विरुद्धच्या मोहिमेला निघण्यासाठी ज्योतिष्यांनी अफजल खानाला भविष्य वर्तवलं होतं की तो या मोहिमेतून जिवंत परतणार नाही. त्यामुळेच त्याने आपल्या 63 पत्नींचा विजापूर जवळ अफजलपुरा इथं ठार मारलं. आपल्या मृत्यूनंतर त्या परपुरुषाच्या हाती लागू नयेत यासाठी अफजल खानानं असं केलं होतं."

BAIJAPUR/ BOOK TITLE

फोटो स्रोत, BAIJAPUR/ BOOK TITLE

संशोधक मुहम्मद अनीसुर रहमान खान यांच्या मते, कर्नाटकातील विजापूरमध्ये अलामिन मेडिकल कॉलेजजवळ एका जुन्या इमारतीमध्ये एक मंचावर सात रांगांमध्ये अनेक एकसारख्या कबरी आहेत. याला स्थानिक लोक 'साठ कबरी' या नावानं ओळखतात.

अनीसुर रहमान खान यांच्या संशोधनानुसार, "या सर्व कबरी अफजल खानाच्या पत्नींच्या आहेत. आपल्या मृत्यूनंतर आपल्या पत्नींनी इतर कोणाशीही लग्न करू नये यासाठी शिवाजी महाराजांविरुद्धच्या मोहिमेआधी अफजल खानाने त्यांना ठार केलं होतं."

अफजल खानाची इच्छा होती की त्याच्या पत्नींशेजारीच त्यालादेखील दफन करण्यात यावं. मात्र तो या मोहिमेतून जिवंत परतू शकला नाही.

मुहम्मद शेख इकबाल चिश्ती यांचा संदर्भ देत अनीसुर रहमान खान लिहितात की "लोकांमध्ये ही गोष्ट प्रसिद्ध आहे की इथं 60 कबरी आहेत. मात्र हे खरं नाही. कारण इथं एकूण 64 कबरी आहेत. त्यातील एक कबर रिकामी आहे."

अनीसुर रहमान खान पुढे लिहितात की, "बहुधा शाही कुटुंबातील महिलांसाठी हे कब्रस्तान राखीव असेल. त्या काळात ही सर्वसामान्य बाब होती. असं असतानादेखील एक सेनापती अज्ञानातून असं भित्रटपणाचं पाऊल कसं काय उचलू शकतो?"

लक्ष्मी शरत यांना कबरीबद्दलची ही कहाणी खरी आहे असं वाटतं.

कब्रस्तान पाहिल्यानंतर लक्ष्मी शरत यांनी लिहिलं आहे की, "काळ्या दगडांनी बनलेल्या या कबरी सुस्थितीत आहेत. त्यातील काही कबरींचे दगड तुटले आहेत. तिथं कमालीची शांतता आहे. ज्यांना मृत्यूच्या दारात ढकलण्यात आलं, त्या महिलांच्या अखेरच्या क्षणातील किंकाळ्या जणू त्या शांततेत दडलेल्या आहेत. मला तिथं विचित्र अस्वस्थता जाणवत होती."

त्या पुढे लिहितात, "अफजल खानाला वाटत होतं की, त्याला त्याच्या पत्नींच्या शेजारीच दफन करण्यात यावं. मात्र तो युद्धातून जिवंत परत येऊ शकला नाही."

कझिन्स च्या मते, "अफजल खानाच्या महालाच्या अवशेषांमध्ये उत्तरेला त्याची कबर रिकामीच राहिली."

कझिन्स लिहिलात, "छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी अफजल खानाला मारलं होतं त्याच ठिकाणी प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याला दफन करण्यात आलं होतं. त्याचा मृतदेह विजापूरमध्ये बनलेल्या कबरीपर्यंत नेण्यात आला नव्हता."