'औरंगजेबाची औलाद' पासून सुरू झालेला वाद 'गोडसे सुपुत्र' म्हणण्यापर्यंत कसा पोहोचला?

फोटो स्रोत, Getty Images
मंगळवारी (6 जून) छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा कोल्हापुरात साजरा करण्यात आला.
याच दिवशी शहरातल्या तिघा संशयितांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे कथितरित्या उदात्तीकरण करणारे स्टेटस ठेवल्याने जातीय तणाव निर्माण झाला होता.
यावरून राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलं होतं.
याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी औरंगजेबाची औलाद असं विधान केल्यानंतर हा वाद वाढू लागला.
फडणवीसांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी नथुराम गोडसेचा उल्लेख केला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
यावर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी गोडसेला 'भारताचा सुपुत्र' म्हटल्याने वाद आणखीनच चिघळला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येप्रकरणी गोडसेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींची हत्या झाली. महात्मा गांधी प्रार्थना सभेत सहभागी होण्यासाठी जात असताना गोडसेने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.
वाद नेमका कसा सुरू झाला
मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेका दिनी कोल्हापुरातील तिघा संशयितांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचं कथितरित्या उदात्तीकरण करणारे स्टेटस ठेवले.
यावरून कोल्हापुरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
परिस्थितीचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "राज्यातील काही जिल्ह्यात अचानक औरंगजेबाच्या औलादी पैदा झाल्या आहेत. त्याचे फोटो, स्टेटस ठेवून समाजात दुर्भावना निर्माण होत आहे. या कारणाने तणाव निर्माण होतोय. अचानक औरंग्याच्या इतक्या औलादी या महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या? हे आपल्याला शोधावं लागेल. त्यांचे बोलविते धनी कोण आहेत, हे शोधल्याशिवाय आम्ही राहणार नाही."
ते म्हणाले की, "महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करण्यामागे कोण आहे हे आम्ही शोधून काढू."
ओवेसींनी दिलं प्रत्युत्तर
यावर एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या शैलीत आक्षेप नोंदवत नथुराम गोडसे आणि आपटेचा उल्लेख केलाय.
महात्मा गांधींच्या हत्येप्रकरणी नारायण आपटे यांनाही शिक्षा झाली होती.
ओवेसी म्हणाले "महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की औरंग्याच्या औलादी. कोण कोणाची औलाद आहे तुम्हाला सगळं माहितीये? मला माहिती नाही की तुम्ही कोणत्या गोष्टीचे एक्सपर्ट आहात. पण मग गोडसेची औलाद कोण आहे? आपटेंची औलाद कोण आहे? याचेही उत्तर द्या."

फोटो स्रोत, Getty Images
औरंगजेबाच्या औलादीवरून राजकीय वातावरण तापलं असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, अशी वक्तव्यं करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय.
ते म्हणाले, "कोणी मोबाईलवर स्टेटस ठेवला म्हणून रस्त्यावर उतरून त्याला लगेच धार्मिक रंग देणं योग्य नाही. सत्तेत असलेल्यांनी अशा गोष्टींना प्रोत्साहन देणं चांगलं नाही. राज्यात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणं ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण राज्य सरकारच जर लोकांना भडकावू लागलं दोन समाज, दोन जातींमध्ये तेढ निर्माण करू लागलं तर हे चांगलं लक्षण नाहीये."
गिरीराज सिंह म्हणाले - 'गोडसे भारताचा सुपुत्र'
या मुद्द्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी ओवेसींना प्रत्युत्तर दिलं असून आता हा वाद आणखीनच चिघळला आहे.
गिरीराज सिंह म्हणाले, "नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली असली तरीही तो भारताचा सुपुत्र होता. कारण नथुराम गोडसेचा जन्म भारतात झाला. औरंगजेब किंवा बाबर यांच्या प्रमाणे घुसखोर नव्हता. ज्याला बाबरची औलाद आहोत हे म्हणण्यात धन्यता वाटते तो भारतमातेचा सुपुत्र असू शकत नाही."
गिरीराज सिंह यांच्या वक्तव्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले जाऊ लागलेत.
दरम्यान माजी काँग्रेस नेते आणि समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी यावर प्रत्युत्तर दिलं आहे. गिरीराज सिंह यांच्या विधानाचा समाचार घेताना ते म्हणाले, "गिरीराजजी केंद्रात मंत्री आहेत. त्यामुळे गिरीराज सिंह केंद्र सरकारच्या वतीनेच बोलत आहेत असा अर्थ घ्यायचा का? मग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह सुद्धा गिरीराज सिंह यांच्याशी सहमत आहेत का? त्यामुळेच मी माझ्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं की नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी हे विधान नाकारलं पाहिजे. पण मला शंका आहे की असं होणार नाही. कारण भाजपाचा हाच हेतू आहे."
"भाजप संघापेक्षा वेगळी असूच शकत नाही. आरएसएसनं इंग्रजांबरोबर तडजोड केली, इंग्रजांना सांगितलं की आम्ही तुमची मदत करू."

फोटो स्रोत, Getty Images
तृणमूल खासदार सौगत रॉय यांनीही गिरिराज सिंह यांच्या या वक्तव्याचा निषेध केलाय.
ते म्हणाले, "गिरीराज सिंह यांनी जातीयवादी वक्तव्य केलंय. राष्ट्रपित्याची हत्या करणाऱ्या व्यक्तीचा त्यांनी गौरव केलाय. जातीयवादी लोक 'बाबरची औलाद' सारखे शब्द वापरतात. आम्हाला हे मान्य नाही. मुघल सम्राट भारतातील जनतेविरुद्ध होते असा प्रचार सुरू आहे."
जनता दल युनायटेडचा गिरिराज सिंह यांना टोला, म्हणाले - वीरप्पन, दाऊद आणि मल्ल्या हेही देशाचे सुपुत्र
जनता दल युनायटेडचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी भाजप नेते गिरिराज सिंह यांच्या नथुराम गोडसेबाबत केलेल्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे.

फोटो स्रोत, ani
ते म्हणाले, "जर गोडसेसारखा व्यक्ती भारतमातेचा सुपुत्र असेल तर चंबळचे डाकूही भारतमातेचे सुपुत्र आहेत. वीरप्पन, दाऊद आणि विजय मल्ल्यासारखे आर्थिक गुन्हेगारही भारत मातेचे सुपुत्र आहेत. हा तर भारतमातेसाठी कलंक आहे ज्याने राष्ट्रपित्याची हत्या केली."
"गोडसे, वीरप्पन, दाऊद, विजय मल्ल्या हे तर भाजपचे आवडते असू शकतात. पण भारत मातेच्या सुपुत्रांविषयी बोलायचं तर शहीद-ए-आझम भगतसिंग असो प्रफुल्ल चंद्र चाकी, राम प्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान हे सगळेजण भारत मातेचे सुपुत्र आहेत."
संजय राऊत म्हणाले - 400 वर्षांपूर्वी गाडलेल्या औरंगजेबचा दंगली भडकवण्यासाठी वापर होतोय
राज्यात औरंगजेबाच्या मुद्द्यावरून वातावरण तापताच खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. नेते संजय राऊत म्हणाले, "कोल्हापुरातील जातीय सलोखा बिघडवण्याचा हा राजकीय कट होता. कर्नाटकातही हा प्रयोग करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. दंगल घडवण्यासाठी बाहेरून लोक आणले जातात हे कोल्हापूरच्या जनतेला माहीत आहे. कोल्हापुरात जे घडलं ते महाराष्ट्राचे गृहमंत्री फडणवीसांचं अपयश आहे. ज्या औरंगजेबाला 400 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी गाडलं होतं त्याचा वापर करून तुम्ही दंगली घडवत आहात."
मंगळवारी कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. त्याच दिवशी शहरातील तीन संशयितांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर औरंगजेब आणि टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारे स्टेटस ठेवले.
या स्टेटसवर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला. काही वेळात हे स्टेटस संपूर्ण शहरात व्हायरल झाले.
यानंतर, सायंकाळच्या सुमारास शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते हे एकत्रित येऊ लागले.
व्हॉट्सअप स्टेटस ठेवणाऱ्या तरुणांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी संबंधित कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, असं म्हणत आक्रमक झालेल्या जमावाने स्टेटस ठेवणाऱ्या तरुणांच्या निवासस्थानी धाव घेतली.
मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला पुन्हा पोलीस ठाण्याकडे आणलं. दरम्यान, काही कार्यकर्त्यांनी परिसरातील वाहनांची तोडफोड करत दगडफेकीचा प्रयत्न केला.
त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. तर काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
अखेर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली. सर्व कार्यकर्त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र यावं, असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलं होतं.
अखेर, शहरातल्या कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला.
या प्रकरणी तीन पोलीस स्टेशनमध्ये तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात 36 जणांना तब्यात घेण्यात आलं आहे. त्यातील 3 तरूण अल्पवयीन आहेत," असं कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं आहे.
कुणी बाहेरून येऊन शहराची शांतात बिघडवली आहे का, हे तपासण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातल्या सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे, अशी माहितीसुद्धा महेंद्र पंडित यांनी दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








