शरद पवारांचा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात इनकमिंगसाठी नेमका प्लॅन काय आहे?

फोटो स्रोत, X/@DrShingnespeaks
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
माजी मंत्री आणि बुलडाण्यातील सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
राजेंद्र शिंगणे हे यापूर्वी शरद पवारांसोबतच होते. मात्र, अजित पवारांनी बंड केल्यानंतर, ते त्यांच्यासोबत महायुतीच्या सरकारमध्ये सामिल झाले. मात्र, त्यांना कुठलेही मंत्रिपद देण्यात आले नव्हते.
कोल्हापूरच्या कागलचे सत्यजित घाटगे, पुण्यातील इंदापूरचे हर्षवर्धन पाटील आणि आता बुलडाण्याच्या सिंदखेडराजाचे राजेंद्र शिंगणे असे एकामागोमाग एक तीन मोठे नेते शरद पवारांच्या सोबतीला आलेले दिसून येत आहेत.
यापूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.
हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशावेळी शरद पवार म्हणाले होते की, “हर्षवर्धन पाटील यांचं मी स्वागत करतो. असे अनेक लोक आहेत. हा दुसरा धक्का आहे तुम्ही म्हणत आहेत. अशा अनेकांना आमच्यासोबत काम करायचं आहे. ही त्याची सुरुवात आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवारांच्या बंडानंतर पुन्हा एकदा पक्ष संघटना मजबूत करण्यावर जोर दिला आहे.
कोल्हापूरमधून भाजपचे नेते समरजीत घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर आता हर्षवर्धन पाटील यांचीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत एन्ट्री हा भाजपसाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दुसरा मोठा धक्का मानला जात आहे.
एवढंच नाही तर शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरातून सत्ताधारी पक्षातून अनेक आमदार, माजी आमदार आणि नेते शरद पवार यांची भेट घेताना दिसत आहे.
शरद पवारही पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा मतदारासंघांकडं विशेष लक्ष देताना दिसत आहेत.
तसंच अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघांमध्येही उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनिती आखलीय. नेमकं काय घडतंय? आणि याचा पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम होईल? जाणून घेऊया.


भाजपला दोन मोठे धक्के
इंदापूरचे माजी आमदार, माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे.
त्यांनी 3 ऑक्टोबरला शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली होती.
हर्षवर्धन पाटील यांनी 2019 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्याने त्यांनी भाजपत प्रवेश केला.
पण गेल्यानिवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आता इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांच्या पक्षात असल्यानं प्रतिस्पर्धी म्हणून शरद पवार यांच्याकडं हर्षवर्धन पाटील तुल्यबळ उमेदवार ठरू शकतात.

फोटो स्रोत, facebook/harshvardhanpatil
हर्षवर्धन पाटील यांनी 4 ऑक्टोबरला कार्यकर्त्यांचा मेळावा घेत भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, “मी हा निर्णय घेण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. इंदापूरची जागा ही विद्यमान सदस्याला जाणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. दुसरा पर्याय काढू असं फडणवीस म्हणाले. पण दुसरा पर्याय स्वीकारणं कार्यकर्त्यांना मान्य झालं नसलं.”
तर शरद पवार यांनीही आपण हर्षवर्धन पाटील यांचं स्वागत करू अशी प्रतिक्रिया दिली आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो. यामुळे या भागात पूर्वीपासूनच शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
यामुळं इंदापूरमध्ये यावेळी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होताना दिसेल.
गेल्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा अवघ्या तीन ते साडे तीन हजार मतांनी पराभव झाला होता.
यामुळं या मतदारसंघात अजित पवार यांचे उमेदवार विरुद्ध शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार यांच्यात चुरशीची लढत होताना दिसू शकेल.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
केवळ समरजीत घाटगे आणि हर्षवर्धन पाटील ही दोनच नावं नाहीत तर येत्या काळात शरद पवार यांना साथ देणाऱ्या मोठ्या नेत्यांची संख्या वाढू शकते.
याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांत सत्ताधारी पक्षातून विशेषत: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून आणि भाजपमधून अनेक नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आपण निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचं सांगितलं आहे.
शरद पवार यांची भेट घेणारे सत्ताधारी पक्षातील नेते कोण?
गेल्या काही दिवसांत कोणत्या महत्त्वाच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली पाहूया,
- अजित पवार यांच्यासोबतचे माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी शरद पवार यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली आहे.
- तर जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनीही पवारांची भेट घेतली आहे.
- भोसरी विधानसभेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असलेले माजी आमदार विलास लांडे
- वाई विधानसभेतून 2019 मध्ये भाजपकडून निवडणूक लढवलेले मदन भोसले यांनीही शरद पवार यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगितल्याचे समजते.
- तसंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे. मंगळवेढ्यात आपलं काम असून आपली राजकीय भूमिका कुटुंबापेक्षा वेगळी असल्याचं ते म्हणाले आहेत.

फोटो स्रोत, facebook
तसंच भाजपमध्ये असलेल्या मधुकर पिचड यांनीही शरद पवार यांची भेट घेतलीय.
या नावांमध्ये आणखी भर पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
एकाबाजूला लोकसभा निकालात महाविकास आघाडीला मिळालेलं यश आणि दुसरीकडे महायुतीत अजित पवार यांना सोबत घेतल्याने इतर दोन पक्षात असलेली नाराजी यामुळे महायुतीत संधी मिळत नसलेल्यांनी आता विधानसभेसाठी शरद पवारांची भेट घेण्यास सुरुवात केलीय.
विशेषत: पश्चिम महाराष्ट्रावर शरद पवार यांचं विशेष लक्ष आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भातील इतर काही महत्त्वाच्या बातम्या :

साखरपट्ट्यासाठी लढाई
पश्चिम महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही आघाड्यांनी कंबर कसली आहे.
एकिकडं शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये स्वत: दौरे सुरू केले आहेत. तर राहुल गांधीही कोल्हापूरचा दौरा करत आहेत.
इंदापूरमधून राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (एसपी) प्रवेश करत आहेत. कोल्हापूरमधून समरजीत घाटगे यांनीही प्रवेश केला. तर सोलापूरमधून मोहिते-पाटील यांनीही शरद पवारांना साथ दिली. तर इतरही अनेक आमदार आणि माजी आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचे समजते.
यामुळे पक्षात फूट पडली असली तरी पश्चिम महाराष्ट्रावर आपलं वर्चस्व कायम राहील यासाठी शरद पवार विशेष लक्ष देत असल्याचं दिसून येतं.
भाजपलाही कायम पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जावं लागेल. यामुळे या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मदतीने आणि आपलीही स्वतंत्र रणनिती आखत साखरपट्ट्यातील जागा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून केला जाईल.

फोटो स्रोत, ANI
पुणे, अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यात एकूण 70 विधानसभा मतदारसंघ आहेत.
यापैकी 39 जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. यात काँग्रेस 27 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आमदार आहेत.
तर भाजप 20 आणि पाच जागांवर शिवसेनेचे आमदार निवडून आले होते. उर्वरित सहा जागांवर अपक्ष आमदार आहेत.
यातील दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे.
यामुळं यातील अनेक विद्यमान आमदार हे सत्ताधारी पक्षांमध्ये असले तरी लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता महाविकास आघाडीने महायुतीसमोर एक मोठं आव्हान उभं केलं आहे.
शरद पवार यांची रणनिती काय?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची 5 ऑक्टोबरला कोल्हापूर येथे सभा होणार आहे. तर शरद पवारही पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये स्वत: दौरे करत आहेत. जिंकण्याची क्षमता असलेल्या प्रत्येक मतदारसंघाकडं ते बारकाईनं लक्ष देत आहेत.
लोकसभेच्या निकालाचाही महाविकास आघाडीतील पक्षांना फायदा होत आहे. पण अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्हाची कायदेशीर लढाई जिंकली असली तरी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसचा गड राहिलेल्या या भागात वर्चस्व कायम राखण्यासाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत.
तसंच महायुतीमध्ये अजित पवार यांच्यासमोर जुनी पारंपरिक व्होट बँक पुन्हा आपल्याकडे खेचण्याचं आव्हान आहे.
भाजपसोबत गेल्याने अल्पसंख्यांक मतदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुरावल्याचं लोकसभा निकालात दिसलं. यामुळं अजित पवार यांच्यासाठीही ही लढाई सोपी नाही हे स्पष्ट आहे.
यासंदर्भात बोलताना ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे म्हणाले की, “पक्षात फूट पडल्यानंतर आता जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचे आव्हान शरद पवारांसमोर आहे. त्यातही ज्यांनी दगा दिला आहे त्यांना शरद पवार धडा शिकवतील अशी पवारांना मानणाऱ्यांची भावना आहे.
अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांचा पराभव करायचा असेल तर तितक्याच ताकदीचा उमेदवार द्यावा लागणार, त्यादृष्टीने शरद पवारांनी खेळी खेळायला सुरुवात केली आहे."

फोटो स्रोत, facebook/sharadpawar
दीपक भातूसे पुढे म्हणाले की, "जिथे त्यांच्या पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार नाही, तिथे भाजपमधील तुल्यबळ नेत्यांना आपल्याकडे खेचण्यास शरद पवारांनी सुरूवात केली आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही पक्षाचा स्ट्राईक रेट जास्त रहावा यासाठी शरद पवार या वयातही राज्यभरात दौरे करत आहेत.
शरद पवार ज्या पद्धतीने पक्ष वाढीसाठी मेहनत घेत आहेत, ते पाहता त्यांच्या पक्षातील इतर नेते आणि पदाधिकारीही चार्ज झालेले आहेत. महायुतीचा पराभव करायचा आणि अजित पवारांना अद्दल घडवायची यादृष्टीने त्यांनी डावपेच आखले आहेत.”
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात जिथे तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहे त्यामागे आपली पूर्ण ताकद लावून विजयाचं गणित जुळवण्याचा प्रयत्न शरद पवार यांचा असणार आहे, असं ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे म्हणाले.
त्यांच्या मते, “इंदापूरमध्ये शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. गेल्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील अवघ्या तीन-साडे तीन हजार मतांनी पडले होते. यामुळे निवडून येणाऱ्या जागा हेरून तसंच त्यासाठी योग्य रणनिती आखून शरद पवार काम करत आहेत.
त्यात लोकसभा निकालामुळंही शरद पवार यांना मोठा फायदा होताना दिसतोय. ते सकारात्मकदृष्ट्या पुढं जाताना दिसत आहेत. यामुळं अजित पवार गेल्यानंतर आता शरद पवार यांच्या पक्षाचं पुढं काही होणार नाही किंवा भवितव्य नाही असं म्हणणाऱ्यांना ते उत्तर देताना दिसत आहेत.”
तूर्तास तरी अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपमधून नेते पवारांकडे गेलेले दिसतात. सध्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला तसा धक्का लागलेला दिसत नाही.
पण मधल्या काळात एकनाथ शिंदे आणि शरद पवारांच्या भेटीगाठींवरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्याचा याच्याशी काही संबंध आहे का? हा प्रश्नही त्यामुळे ओघाने उपस्थित होतो.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











