प्रकाश आंबेडकरांची 'वंचित' भाजपची 'B' नव्हे, तर 'A' टीम आहे, असं डॉ. प्रज्ञा दया पवार का म्हणाल्या?

प्रकाश आंबेडकर, प्रज्ञा दया पवार

फोटो स्रोत, FB/Prakash Ambedkar & Pradnya Daya Pawar

    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत राज्यातील 80 आंबेडकरी, पुरोगामी विचारवंत आणि लेखकांनी एक पत्र लिहून देशपातळीवर इंडिया आघाडीला आणि राज्याच्या पातळीवर महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला होता.

त्यातच काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या विधानामुळे वंचित बहुजन आघाडीने यापैकी काही लेखक आणि विचारवंतांच्या विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून आघाडी उघडली होती.

डॉ. रावसाहेब कसबे, यशवंत मनोहर, डॉ. प्रज्ञा पवार आणि वकील असीम सरोदे यांच्या घर आणि कार्यालयाबाहेर सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी 'जवाब दो' आंदोलन केलं.

या आंदोलनानंतर राज्यातील अनेक विचारवंत आणि लेखकांनी या आंदोलनावर तर टीका केलीच पण वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय भूमिकेबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

या आंदोलनावर डॉ. प्रज्ञा दया पवारांनी समाजमाध्यमांवर लिहिलेल्या पोस्टवरुन नव्या वादाला तोंड फुटलं. या पोस्ट वरुन प्रज्ञा पवारांना विविध मार्गांनी ट्रोल करण्यात आलं.

'प्रज्ञा पवार या आरक्षणाच्या लाभार्थी आहेत आणि काँग्रेस राष्ट्रवादीने वेळोवेळी आरक्षण विरोधी भूमिका घेतल्या आहेत' त्यामुळे त्यांना पाठिंबा दिला तर ट्रोलिंग सहन करावं लागेल असा पवित्रा प्रकाश आंबेडकरांनी बीबीसी मराठीशी बोलताना घेतला.

तर वंचित ही संघाला अपेक्षित असलेल्या भुमिका घेत आहे. 'ते भाजपची बी नव्हे तर ए टीम आहे' असं म्हणत या ट्रोलिंगला प्रज्ञा पवारांनी उत्तर दिलं आहे.

वंचित विरुद्ध आंबेडकरी लेखक विचारवंत हा वाद काय आहे?

वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनाची घोषणा करताना वंचितच्या सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे म्हणण्यात आलं होतं, 'असीम सरोदे यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करावा किंवा आरक्षण वाद्यांची माफी मगावी याकरिता आम्ही हे आंदोलन करत आहोत.'

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांनी आरक्षण संपविण्याचा केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून केलं जात असल्याचं सांगण्यात आलं.

असीम सरोदे यांनी 'निर्भय बनो' या उपक्रमाच्या माध्यमातून महाविकास आघाडीला मतदान करा, असे आवाहन महाराष्ट्रातील मतदारांना केले होते.

त्यामुळे असीम सरोदेंनी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करावा किंवा आरक्षण वाद्यांची माफी मागावी यासाठी असीम सरोदे यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं.

त्यानंतर याच पद्धतीने डॉ. रावसाहेब कसबे यांच्या घरासमोर देखील सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे 'जवाब दो' आंदोलन करण्यात आलं.

डॉ. यशवंत मनोहर यांच्या घरासमोर देखील आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.

ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या निवासस्थानाबाहेर सम्यक विद्यार्थी आंदोलनाने केलेलं आंदोलन

फोटो स्रोत, facebook/SVANashik

फोटो कॅप्शन, ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या निवासस्थानाबाहेर सम्यक विद्यार्थी आंदोलनाने केलेलं आंदोलन

याच पार्श्वभूमीवर डॉ. प्रज्ञा पवार यांनी पोस्ट लिहिली.

यामध्ये आपली भूमिका मांडताना प्रज्ञा पवार म्हणाल्या, “ असीम सरोदे यांच्यापासून सुरुवात करुन डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. यशवंत मनोहर यांच्या घरांवर वंचितच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करणं ही निषेधार्ह आणि दुखद घटना असली तरी ती अजिबात अनपेक्षित नाही. अखेर हा राजकीय झगडा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित पिछेहाटीवर आहे. भाजपसोबत वाटाघाटी करण्याची त्यांची ताकद घटू लागलेली आहे. त्यामुळे विनाशकाले विपरित बुद्धी या उक्तीनुसार त्यांचे विद्यमान वर्तन चालू आहे."

फेसबुक पोस्ट

फोटो स्रोत, facebook/pradnya.d.pawar

फोटो कॅप्शन, याच फेसबुक पोस्टनंतर डॉ. प्रज्ञा पवार यांना ट्रोल करण्यात आलं

प्रज्ञा पवार यांनी लिहिलं की, "पण ते हे विसरतात ही फुले आंबेडकरी विचारवंत हे प्रस्थापित विचारवंतांसारखे समाजापासून तुटलेले नसतात. ते जैव म्हणजेच समाजात पाय रोवून उभे असलेले विचारवंत योद्धे असतात. खरे तर लोकसभा निवडणुकीत या विचारवंतांची राजकीय ताकद दिसल्यानेच आज वंचितला असल्या लाजिरवाण्या बाबी करण्याची अपरिहार्यता वाटू लागलेली आहे. राजकारणात टिकून रहायचं म्हटल्यावर हे अटळ आहे. पण खंत याची वाटते की संघ परिवाराच्या टूलकिटचा वापर करुन वंचित त्यांची कार्यक्रम पत्रिका तयार करते आहे. हरकत नाही. सत्तरीच्या दशकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जळजळीत झोत टाकणाऱ्या माझ्या आजोबांचा डॉ. रावसाहेब कसबेंचा मला अभिमान आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली फॅसिझम विरोधातला आमचा लढा सुरुच राहील.”

ग्राफिक्स
ग्राफिक्स

ट्रोलींग आणि निषेध

ही पोस्ट लिहिल्यानंतर प्रज्ञा पवार यांना ट्रोल करायला सुरुवात झाली. याच पार्श्वभूमीवर प्रज्ञा पवार यांनी

बीबीसी मराठीला सविस्तर मुलाखत दिली. हे ट्रोलींग कशा पद्धतीने झालं हे पवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केलं.

त्या म्हणाल्या की, “अलिकडे वंचितच्या सम्यक विद्यार्थी आंदोलन जे वंचितचा हिस्सा आहे त्यांनी डॉ. यशवंत मनोहर, डॉ रावसाहेब कसबे आणि अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या घरासमोर निदर्शनं केली. यशवंत मनोहरांच्या घरासमोर होऊ शकली नाहीत कारण पोलिस बंदोबस्त होता. तर या अनुषंगाने मी समाजमाध्यमावर म्हणजे माझ्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट लिहिली की ही जी निदर्शन होत आहेत ती दुखद असली तरी अजिबात आश्चर्यकारक नाही. हे का होतं आहे ती तथ्य अधोरेखित करण्याचा माझा प्रयत्न होता."

प्रज्ञा पवार

प्रज्ञा पवार म्हणाल्या की, "पण त्यानंतर लगेचच एका रात्री मध्ये इतकी मंडळी वंचितचं नाव घेऊन माझ्या मेसेंजरवर तुटून पडली. कुठल्याही पद्धतीने विचारांचा प्रतिवाद विचारांनी करायला पाहिजे. कोणी प्रश्न उपस्थित करत असेल तर संसदीय भाषेने प्रतिवाद करायला हवा. ज्या प्रकारे ते सगळं घडलं आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या फेसबुकवर त्याचे स्क्रिनशॉट शेअर केले, ते असं अजिबातच नव्हतं. कोणीतरी अशी 100-125 मंडळी जागृत होतात आणि ती संबंध रात्रभर हे कर राहतात. हे कोणाच्या सांगण्यावरुन सुरू आहे, हे न कळण्याइतके आपण कोणीही अज्ञ नाही.”

सम्यक विद्यार्थी आंदोलन

फोटो स्रोत, facebook/SVANashik

याच बरोबर ज्यांनी ही पोस्ट शेअर केली आणि आपल्याच कार्यकर्त्यांचा निषेध केला त्या वंचितच्या कार्यकर्त्यांना देखील त्यांची भूमिका समाजमाध्यमांवरून डिलीट करायला सांगितलं गेल्याचं त्यांनी म्हणलं आहे.

या ट्रोलिंग नंतर प्रज्ञा पवार यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक लेखक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्रक काढलं.

त्यात त्यांनी म्हटलं की, 'आपल्या देशात पुरुषी मानसिकतेने कोणत्याही स्त्रीला किंवा तिच्या भुमिकेला विरोध करताना तिच्यासाठी वाईट शब्द वापरून तिचा उपमर्द करणे हे सातत्याने चालत आलेलं आहे. याच पद्धतीने गेल्या काही दिवसात कोणत्याही स्त्रीला किंवा तिच्या भुमिकेला विरोध करताना तिच्यासाठी वाईट शब्द वापरून तिचा उपमर्द करणे हे सातत्याने चालत आलेलं आहे.'

प्रकाश आंबेडकर
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या पत्रकात लिहिलं आहे की, 'याच पद्धतीने गेल्या काही दिवसात प्रख्यात मराठी कवयित्री लेखिका आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ती डॉ. प्रज्ञा दया पवार यांना लक्ष्य केले जात आहे. भुमिका मान्य नसलेल्यांनी संवैधानिक भाषेत वैचारिक विरोध करायला हवा होता. पण तसे न करता प्रज्ञा दया पवार यांना, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते म्हणणवणारे काही पुरुष आणि काही स्त्रिया देखील अर्वाच्य भाषेत ट्रोल करत आहेत.'

'पक्षाच्या काही कार्यकर्त्यांची भाषा तर इतकी खालच्या थरावर जाऊन पोहोचली आहे की,ते स्त्रीचं चारित्र्य, ही पारंपारिक संकल्पना घेऊन प्रज्ञा दया पवार यांच्यावर वैयक्तिकरित्या प्रहार करत आहेत. या देशातील कोणत्याही स्त्रिचा सन्मान अशा पद्धतीने पायदळी तुडवण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही संविधानप्रेमी स्त्रिया सामूहिकरीत्या विरोध प्रकट करत आहोत आणि या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करत आहोत.'

प्रज्ञा पवार यांच्याविरुद्ध झालेल्या ट्रोलिंगमध्ये वापरलेल्या भाषेबद्दल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "भाषा कदाचित चुकीची असू शकते, पण त्याचा आशय विसरता कामा नये. आम्ही त्या भाषेचा निषेध करतो, पण आपलं पोट भरलं की दुसऱ्याचं विसरून जावं या मानसिकतेच्या विरोधातला हा लढा आहे असं मी मानतो."

लाल रेष

इतर काही महत्त्वाच्या बातम्या :

लाल रेष

प्रज्ञा पवार यांची भूमिका काय?

याबाबत बीबीसी मराठीला दिलेल्या सविस्तर मुलाखतीमध्ये डॉ. पवार म्हणाल्या, “ मुळामध्ये असं आहे की बुद्धिजीवी वर्गावर ज्या पद्धतीने हल्ले होत आहेत, लोकसभा निवडणुकीनंतर हे सुरु झालं आहे. याबद्दल कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला निवडून द्यायचं नाही याबाबत 80 विचारवंतांनी जाहीर भुमिका घेतलेली आहे. आणि ती भुमिका घेताना आपल्या समोरचा जो सगळ्यात मोठा धोका आहे तो फॅसिझमचा आहे."

डॉ. पवार म्हणाल्या की, "आत्ता जे सत्तास्थानी बसलेले आहेत त्यांचा आहे यापद्धतीने ती भुमिका घेतलेली होती. आणि त्यांच्यावर हल्लाही झालेला आहे. मला असं म्हणावंसं वाटतं की हे अतिशय दुखद आहे. माझा आत्तापर्यंत असा विश्वास होता की आपण सगळे समविचारी आहोत. त्याला आता तडे गेलेले आहेत. आपला लढा एकच आहे, आपला शत्रू एकच आहे."

राहुल गांधींच्या वक्तव्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, "त्यांचं कसं होतं ना, निवडणूकीच्या आधी तीन महिने हे सगळे जागृत होतात. हे सगळं सुरु झालं ते राहुल गांधी यांना परदेशात असताना विचारलेल्या एका प्रश्नावर त्यांनी दिलेल्या उत्तरावरुन. ते असं म्हणाले की 'आपल्याकडे शोषणरहीत समाज आत्ता तरी नाही. मात्र, जेव्हा भारतामध्ये अशी सर्वंकष समानता येईल तेव्हा आरक्षणाची गरज राहणार नाही.'

"पण हे सगळे जर म्हणतात की तुम्ही बीजेपीची बी टीम आहात तर हे सगळे आता भाजपने जी खेळपट्टी आखून दिली आहे त्यावर तुम्ही खेळत आहात. तुमची स्वतःची कार्यक्रम पत्रिकाच नाहीये. राहुल गांधींनी जातीच्या आधारे जनगणना व्हायला पाहीजे असा आग्रह धरला आहे. त्याबद्दल तर तुम्ही बोलतच नाहीये. त्यामुळे मी तर आता म्हणते की तुम्ही भाजपची बी नव्हे तर ए टीम आहात.”

डॉ. प्रज्ञा दया पवार

फोटो स्रोत, facebook/pradnya.d.pawar

पुढे त्या म्हणतात, “डॉ. बाबासाहेब आंबेडकांचे आम्ही स्वतःला अनुयायी म्हणवतो. मुळात प्रकाश आंबेडकर सर हे अत्यंत विद्वान व्यक्ती आहेत. प्रकाश आंबेडकर सरांनी राजकीय आरक्षण असू नये अशी भुमिका घेतलेली आहे. ही भुमिका त्यांनी वारंवार घेतलेली आहे. आणि ती प्रसिद्ध झालेली आहे. त्या विधानाच्या संबंधाने जर कोणी असं म्हणलं ती तुम्हांला तर आरक्षण मान्य नाहीये."

"मुळामध्ये सत्तास्थानी आज काँग्रेस आहे का? मोदी राजवट आहे. जी मोदी राजवट ही आरक्षणाची पूर्ण संकल्पनाच उद्ध्वस्त करायला निघाली आहे. संविधानाच्या बाबत काय झालं आहे की काही वेगळं सांगायची गरज नाही. याविषयी वंचित काहीच बोलत नाही. म्हणजे वंचित काय म्हणतंय काँग्रेसला हे करा.. राष्ट्रवादीला हे करा, सत्तास्थानी कोण आहे याबद्दल तुम्ही बोलतच नाही. मग तुम्हाला बी टीम म्हणलं तर काय बिघडलं?”

प्रकाश आंबेडकरांची भुमिका काय?

याबाबत बीबीसी मराठीने प्रकाश आंबेडकर यांच्याशीही संवाद साधला.

पवार यांच्या भूमिकेबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, “एक लक्षात घ्यावं की ती (डॉ. प्रज्ञा पवार) आरक्षणाची लाभार्थी आहे. आरक्षणाचा लाभ घेतल्यानंतर तुम्ही पाठ फिरवली, तर ते चुकीचं आहे. माझं पोट भरलं की, मी हवं त्याला पाठिंबा देणार. याच्याकडे धाव त्याच्याकडे धाव. मग लोक मला शिव्या घालणारच आहेत. अन लाभार्थी झाल्यानंतर इतर ते जनरेशनला मिळावं असं तुम्हाला वाटलं नाही."

प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "स्वतःच्या फायद्यासाठी तुम्हाला जिथं बसवणार आहेत त्यांच्या मागे तुम्ही फिरताय. जे लाभार्थी आहेत आणि ज्यांना लाभ मिळायचा आहे ते तुम्हांला प्रसाद देणारच आहेत. तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात हा त्यातला वेगळा प्रश्न आहे. त्यातला लाभ हा महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे असणारा भाषाही चुकीची असेल ही मी त्याठिकाणी मानतो. पण त्याचा आशय...आपलं पोट भरलं की दुसऱ्यांनी उपाशी रहावं ही मानसिकता आहे त्या मानसिकतेच्या विरोधातला हा लढा आहे. 'मासेस' आमच्या बरोबर आहेत का नाही हा आमच्या समोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

आंदोलकांना कुत्र्याची उपमा दिली

24 सप्टेंबर 2024 रोजी वंचित बहुजन आघाडीने एक पत्रक काढून त्यांची या आंदोलनाबाबत असणारी भूमिका स्पष्ट केली आहे.

त्यात वंचित बहुजन आघाडीने म्हटलं आहे की, "राहुल गांधी आणि काँग्रेस यांची आरक्षणाच्या संदर्भातील भूमिका ही दुतोंडी आहे. त्यानंतर एससी एसटी पुनर्वगीकरणाच्या बाबतीत कोर्टाने दिलेल्या निकालाचे भाजपसोबतच काँग्रेसने देखील समर्थन केले. त्यामुळे अनुसूचित जाती जमातींच्या युवकांनी या निर्णयाला विरोध केला आणि लोकसभा निवडणुकीत आम्हाला ज्यांनी इंडिया आघाडीला मतदान करायला सांगितले त्याबद्दल आम्ही जाब विचारू अशी भूमिका घेतली. त्यामुळे आम्ही हे आंदोलन केलं आणि एकतर राहुल गांधींची भूमिका चुकीची आहे हे जाहीर करावं किंवा आंबेडकरी जनतेची माफी मागावी अशी मागणी आम्ही केली."

वंचित बहुजन आघाडीचे पत्र

फोटो स्रोत, facebook/vba

या पत्रकात पुढे लिहिलं आहे की, "आमच्या आंदोलनानंतर राज्यातील डाव्या पुरोगामी पक्षांनी आणि व्यक्तींनी रावसाहेब आम्ही तुमच्यासोबत आहोत असं आश्वासन दिलं. तर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना कुत्र्याची उपमा दिली. यात विद्यार्थ्यांची ही भूमिका आहे की प्रतिगामी शक्तींविरोधात आम्ही लढू पण लोकसभा निवडणुकीत ज्या साहित्यिकांनी आमची दिशाभूल केली, त्यांनी माफी मागावी."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.