प्रकाश आंबेडकर, पंजाबराव डख ते वसंत मोरे, 'वंचित'च्या 34 उमेदवारांना किती मतं मिळाली?

प्रकाश आंबेडकर

फोटो स्रोत, Facebook

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या कामगिरीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. ‘वंचित बहुजन आघाडी भाजपविरोधी मतांमध्ये फूट पाडेल का?’ अशी भीती काँग्रेससह विरोधी पक्षांना होती. मात्र, लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यास ही भीती फोल ठरली आहे.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात कुठेही उल्लेखनीय कामगिरी करता आली नाहीये. किंबहुना, लढवलेल्या अनेक मतदारसंघांमध्ये वंचितचे उमेदवार तिसऱ्या, चौथ्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर स्थिरावलेले दिसून येतात.

वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 34 जागांवर उमेदवार उभे केले होते, तर सात ठिकाणी इतरांना पाठिंबा दिला होता. पाठिंबा दिलेल्यांपैकी कोल्हापूर, नागपूर आणि बारामती अशा महाविकास आघाडीच्या उमेदवारांचाही समावेश होता.

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघातून निवडणूक लढत होते. प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानी राहिल्याचं दिसून येतं. अकोल्यात खरी लढत काँग्रेसचे अभय पाटील आणि भाजपचे अनुप धोत्रे यांच्यातच झाली.

वंचितच्या उमेदवारांना किती मतं मिळाली हे खालील तक्त्यातून तुम्हाला पाहता येईल :

वंचितनं पाठिंबा दिलेल्या 7 ठिकाणी काय झालं?

वंचित बहुजन आघाडीने राज्यातील सात जागांवर उमेदवार न देता, तिथे इतर उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यात काँग्रेसच्या दोन, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या एका उमेदवाराचाही समावेश होता

वंचितनं पाठिंबा दिलेले उमेदवार आणि त्यांचा निकाल :

  • कोल्हापूर - शाहू महाराज छत्रपती (काँग्रेस) - विजयी
  • बारामती - सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार) - विजयी
  • सांगली - विशाल पाटील (अपक्ष) - विजयी
  • नागपूर - विकास ठाकरे (काँग्रेस) - पराभूत
  • भिवंडी - निलेश सांबरे (अपक्ष) - पराभूत
  • अमरावती - आनंदराज आंबेडकर (रिपब्लिक सेना) - पराभूत
  • यवतमाळ-वाशिम - डॉ. अनिल राठोड (एसजेपी) - पराभूत

याचाच अर्थ, वंचितनं पाठिंबा दिलेल्या सातपैकी तीन जागा विजयी झाल्या आहेत.

तसंच, सोलापूरमधील वंचित बहुजन आघाडीचे घोषित उमेदवार राहुल गायकवाड यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानं, तिथं वंचितचा कुणीच उमेदवार नव्हता. सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या विजयी झाल्या आहेत.