नितीश कुमार आणि चंद्राबाबू पुन्हा चर्चेत, का आहेत त्यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा?

चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार

फोटो स्रोत, ANI

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

लोकसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. भाजपनं केलेल्या दाव्याप्रमाणं त्यांना स्वबळावर एकहाती सत्ता मिळवता आलेली नाही. एनडीए आघाडीला मात्र बहुमताचा आकडा गाठता येईल असं दिसत आहे.

पण या निकालांमध्ये दोन पक्षांच्या कामगिरीनं सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडं वळल्या आहेत. हे दोन पक्ष म्हणजे चंद्राबाबू नायडू यांना तेलुगू देसम पार्टी आणि नितिश कुमारांचा जनता दल युनायटेड.

चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाला (टीडीपी) लोकसभा निवडणुकीत 16 जागांवर आघाडी असल्याचं सायंकाळपर्यंत समोर आलेल्या आकड्यांवरून पाहायला मिळालं. विधानसभा निवडणुकीत तर त्यांनी जवळपास एकहाती सत्ता मिळवल्याचं स्पष्ट होत आहे.

तर दुसरा पक्ष म्हणजे नितीश कुमारांच्या जेडीयूला 12 जागा मिळणार असल्याचं सध्यातरी पाहायला मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निकालानंतर जी प्रतिक्रिया दिली त्यात चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा गौरव केला.

निवडणूक पूर्व आघाडीचा विचार करता हे दोन्ही पक्ष भाजपच्या नेतृत्वातील एनडी आघाडीबरोबर होते. पण भाजपला स्वबळावर बहुमत मिळत नसल्याचं दिसू लागल्यानं या दोन्ही पक्षांकडं सगळ्यांच्या नजरा वळल्या आहेत.

रमेश यांचे ट्विट आणि पवारांचे वक्तव्य

जयराम रमेश यांनी निकालांचं चित्र स्पष्ट होऊ लागल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास एक ट्वीट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत दिलेल्या एका आश्वासनाची आठवण करून दिली.

काँग्रेसनं 2014 मध्ये आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर भाजपनंही ते आश्वासन दिलं पण त्यांनी गेल्या 10 वर्षात आश्वासन पाळलं नाही, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

2024 च्या जाहीरनाम्यात काँग्रेसनं राज्याला विशेष दर्जा देण्याचं आश्वासन दिलं असून, ही काँग्रेसची गॅरंटी असल्याचं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

या ट्वीटच्या टायमिंगची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांनी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचं वृत्तही काही माध्यमांनी दिलं. शरद पवारांनी हे दावे फेटाळले आहेत. पण याबाबत चर्चा मात्र नक्कीच सुरू झाल्या आहेत.

चंद्राबाबूंची पुन्हा राष्ट्रीय स्तरावर चर्चा

बीबीसी तेलुगूचे संपादक जीएस राममोहन यांनी टीडीपीच्या या विजयाचं विश्लेषण केलं आहे.

त्यांच्या मते,"टीडीपीला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं आहे. राज्यात तर पक्षाला पुनरुज्जीवन मिळालेच आहे, पण राष्ट्रीय स्तरावरही त्यांना यामुळं एक स्थान मिळालं आहे. भाजपला स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा मिळाल्या नसल्यानं तेलुगू देसमचं महत्त्व वाढलं आहे. चंद्राबाबूंनाही हेच हवं असणार."

चंद्राबाबू नायडू आणि पंतप्रधान नरेद्र मोदी

फोटो स्रोत, ANI

ते अनुभवी राजकारणी आहेत.अशा प्रसंगांमध्ये यापूर्वीही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. 1984 च्या निवडणुकीनंतरतर तेलगू देसम लोकसभेत प्रमुख विरोधी पक्ष होता. पंतप्रधान आणि राष्ट्रपती कोण हे ठरवल्याचे दावेही त्यांनी केले होते. आताही त्यांना तेच स्थान हवं आहे, असंही राममोहन म्हणतात.

भाजपशी वैचारिक नाळ नाही

"चंद्राबाबू यांनी यापूर्वी राजकीय बाजू बदलण्यासाठी आंध्रला विशेष दर्जा न मिळणं हे कारण दिलं होतं. त्यासाठीच त्यांनी भाजप सोडून काँग्रेसची साथ दिली. पण परत ते भाजपकडे का गेले हे मात्र स्पष्ट केलेलं नाही. राज्यात एक टक्काही मतं नसलेल्या पक्षाला लोकसभेच्या सहा आणि विधानसभेच्या दहा जागा देण्याचा त्यांचा निर्णय धक्कादायक होता," असं राममोहन म्हणाले.

"चंद्राबाबूंचा तसा भाजपशी वैचारिक किंवा भावनिक संबंध नाही. त्यांची भूमिका परिस्थितीनुसार ठरते. त्यामुळं त्यांना एकत्र बांधून ठेवणारं असं काही नसल्यानं काहीही घडू शकतं. समीकरणं बदलू शकतात. निवडणुकीपूर्वी युती झाली असल्याने लगेचच काही बदलेल असं नाही, पण सरकार स्थापनेवेळी बरंच काही घडू शकतं.

"यापूर्वी एनडीएमध्ये असताना त्यांनी काही अटी घातलेल्या होत्या. आताही तशा अटी घालतील. कदाचित परिस्थितीनुसार आता अटी बदलल्याही जाऊ शकतील. भाजपला ते नको असेल. पण काय होईल, हे नक्की सांगता येणार नाही," असंही राममोहन यांनी सांगितलं.

नितीश कुमारांच्या सोयीस्कर भूमिका

नितीश कुमार दोन दशकांपासून बिहारच्या राजकारणाचे केंद्रबिंदू राहिले आहेत. पण त्यांनी दशकभरात अनेकदा बाजू बदलल्याचं पाहायला मिळालं आहे.

नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, ANI

भाजप, काँग्रेस, राजद अशा पक्षांबरोबर त्यांनी वेळोवेळी हात मिळवणी केली. तसंच ऐन वेळी त्यांनी पक्षांची साथ सोडल्याचंही पाहायला मिळालं. कोणत्याही प्रकारे सत्तेत राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला. "मरण आलं तरी तरी चालेल, पण त्यांच्यासोबत जाणं आम्हाला कधीही मान्य होणार नाही," असं म्हणणारे नितीश कुमार त्यांच्याबरोबर अगदी सहज सत्तेत जाऊन बसले.

देशात विरोधकांची आघाडी असावी यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला होता. पण नंतर तेच भाजबरोबर गेले. त्यामुळं नितीश कुमार एखादी भूमिका घेणार नाहीत, असं कोणीही ठामपणे सांगू शकत नाही.

याच कारणामुळं अशाप्रकारची गणितं समोर येऊ लागल्यानं माध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं.

राममोहन यांच्या मते, "आता सर्वांच्या नजरा चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार यांच्यावर आहेत. दोघेही वेळोवेळी बाजू आणि धोरणं बदलण्यासाठी ओळखले जातात. "

त्यामुळं आता पुढच्या काही दिवसांत या दोन नेत्यांच्या भूमिकांवर प्रामुख्यानं सगळ्यांच्या नजरा असणार आहेत.