नितीश कुमारांनी बाजू बदलल्यामुळे इंडिया आघाडीवर काय परिणाम होईल?- दृष्टिकोन

नितीश कुमार

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, नलिन वर्मा
    • Role, ज्येष्ठ पत्रकार

नितीश कुमार हे रविवारी ‘राजद’ आणि काँग्रेसची साथ सोडून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील झाले.

त्यांच्या या कृतीमुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लूसिव्ह अलायंस (इंडिया) ला मोठा धक्का बसला आहे.

मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष जनता दल युनायटेड (जदयू) च्या नेत्यांच्या मते नितीश कुमार हेच ‘इंडिया’ आघाडीचे शिल्पकार होते.

नितीश कुमार यांनी दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील त्यांचे सहयोगी अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी तसेच उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली आणि त्यांना काँग्रेससोबतच्या या आघाडीत सहभागी केलं.

नितीश कुमार यांचं बाजू बदलण्याचं टायमिंग

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' बंगालच्या सीमेला लागून असलेल्या किशनगंज मार्गे बिहारमध्ये दाखल होण्याच्या एक दिवस आधी नितीश कुमार यांनी हे पाऊल उचललं आहे.

कदाचित भाजपच्या धुरिणांनी एनडीएला अधिक लाभ मिळवून देण्यासाठी नितीश कुमार यांच्या प्रवेशासाठी या दिवसाची निवड केली असावी.

यामुळे अनेक राज्यांमध्ये जागावाटपाच्या मुद्यांवरून इंडिया आघाडीमध्ये सुरू असलेल्या चढाओढीवर मानसिकदृष्या विजय मिळेल.

अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी उत्तर भारतात पोषक वातावरण निर्मिती झाल्याचा भाजपचा अंदाज आहे.

नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत. त्यामुळे गायपट्टा म्हणून ओळखल्या जाणा-या हिंदी भाषिक राज्यांमध्ये त्यांची ताकद चांगलीच वाढली आहे.

ऑगस्ट 2022 मध्ये नितीश कुमार हे महाआघाडीत सामील झाल्यामुळे बिहारमध्ये भाजपला असुरक्षित वाटत होतं.

राष्ट्रीय जनता दल हा बिहारमध्ये विधानसभेच्या 79 जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे. पक्षाचे नेते लालू प्रसाद यादव हे सामाजिक न्यायाच्या लढाईतील सर्वात मोठे लढवय्ये आणि हिंदुत्वविरोधी राजकारणाचं सर्वात मोठं उदाहरण आहेत.

तथापि, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील युतीने बिहारमध्ये लोकसभेच्या 40 पैकी 39 जागा जिंकल्या होत्या.

परंतु, नितीश कुमार हे महाआघाडीत सहभागी झाल्यामुळे त्यांना 2019 च्या निवडणूक निकालांची पुनरावृत्ती करता येणार नाही, अशी भीती भाजपच्या धुरिणांना होती.

बिहारमध्ये भाजपची कामगिरी कशी असेल?

भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत नितीश कुमार

फोटो स्रोत, @JPNADDA/X

फोटो कॅप्शन, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत नितीश कुमार
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

भाजप 2024 मध्ये 2019 च्या निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती करू शकेल का? नितीश कुमार यांच्याशी युती झाल्याने भाजपचे धुरिण आता या शक्यतांबाबत आशावादी होऊ शकतात.

मात्र या प्रश्नाचं खरं उत्तर जाणून घेण्यासाठी निवडणुकीचे निकाल येण्याची वाट पाहावी लागणार आहे.

नितीश कुमार यांच्या ‘जदयू’ने 2014 ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवली होती. त्यांना सुमारे 15 टक्के मतं आणि दोन जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर ते ‘राजद’ आणि काँग्रेसच्या महाआघाडीत सामील झाले, ज्यांनी भाजपच्या 53 जागांच्या तुलनेत 178 जागा जिंकल्या होत्या.

2017 मध्ये महाआघाडीला सोडचिठ्ठी देऊन नितीश कुमार एनडीएमध्ये सामील झाले. 2019 च्या निवडणुकीत ‘जदयू’ने 17 जागा लढवून 16 जागा जिंकल्या आणि भाजपने 17 जागा जिंकल्या.

2020 च्या विधानसभा निवडणुकीत ‘जदयू’ला मोठा फटका बसला. त्यांना अवघ्या 42 जागा मिळाल्या. 76 जागा जिंकणाऱ्या भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्यात आलं.

मात्र निवडणूक निकालांवरून मतदारांमध्ये नितीश कुमार यांची लोकप्रियता कमी होत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत होतं.

विनोद तावडे, जेपी नड्डा, सम्राट चौधरी

फोटो स्रोत, @BJP4BIHAR/X

त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी भाजपवर रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान यांना पुढे करून ‘जदयू’च्या विजयाच्या शक्यता कमी केल्याचा आरोप केला.

चिराग यांच्या लोक जनशक्ती पक्षा (एलजेपी) ने ‘जदयू’च्या विरोधात उमेदवार उभे केल्याचाही आरोप त्यांनी केला होता.

‘जदयू’च्या म्हणण्यानुसार ‘एलजेपी’ने जरी जास्त जागा जिंकल्या नसल्या, तरी त्यांच्या उमेदवारांनी 32 जागांवर ‘जदयू’च्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी पुरेशी मतं खाल्ली.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हिंदुत्व आणि विरोधी पक्षांच्या तथाकथित सर्वसमावेशक राजकारणाच्या भाऊगर्दीत नितीश कुमार यांच्या आत-बाहेर जाण्याने त्यांच्या एक चांगला प्रशासक म्हणून असलेल्या प्रतिमेवर कोणताही परिणाम झाला नसण्याची शक्यता आहे. याशिवाय नितीश कुमार यांच्यावर भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचे आरोपदेखील झालेले नाहीत.

2024 च्या लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल?

परंतु वारंवार इकडून-तिकडे केल्यामुळे नितीश कुमार यांच्या वैचारिक बांधिलकीविषयी निश्चितच शंका उपस्थित झाल्या आहेत. भाजपचे धुरिणांना हे नक्कीच सांगता येईल की ‘इंडिया’ आघाडीच्या शिल्पकाराला आपल्याकडे खेचून आणून त्यांनी आघाडीला सुरूंग लावला आहे.

नितीश कुमार यांनी भाजपची साथ देण्याचा बिहार सोडून इतर राज्यांवर फारसा परिणाम होणार नाही.

सहा वेळा खासदार आणि दीर्घकाळ केंद्र सरकारमध्ये मंत्री असतानाही नितीश कुमार हे इतर राज्यांच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे राष्ट्रीय नेते म्हणून उदयास येऊ शकले नाहीत.

अखिलेश यादव यांना उत्तर प्रदेशात, बंगालमध्ये ममता बॅनर्जींना आणि राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात भाजपविरुद्धच्या लढाईमध्ये काँग्रेसला नितीश कुमार यांची फारशी गरज लागणार नाही.

राजद, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महाआघाडी सरकारने बिहारमध्ये जात सर्वेक्षण करून, अत्यंत मागास, इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती आणि जमातींचे आरक्षण 65 टक्क्यांपर्यंत वाढवून आणि तरूणांना सुमारे चार लाख नोकऱ्या देण्याच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी बाजू बदलली आहे.

नितीश कुमार

फोटो स्रोत, Getty Images

2020 च्या निवडणुकीत ‘राजद’ नेते आणि लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी 10 लाख नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं होतं.

त्यांचा पक्ष जातीवर आधारित जनगणनेसाठी आणि उपेक्षित समुदायांना लोकसंख्येनुसार वाटा देण्यासाठी दबाव टाकत होता. कमीत कमी तेजस्वी यादव यांनी नोकऱ्या देण्याचं जे आश्वासन दिलेलं, ते तरी महाआघाडी सरकारने पूर्ण केलंय.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या देण्याचं आणि तार्किकदृष्ट्या वंचित घटकांसाठीचे आरक्षण वाढवण्याचे श्रेय लालूप्रसाद यादव यांच्या ‘राजद’लाच जातं.

ईसीबी, ओबीसी आणि एससी-एसटी यांच्या आरक्षणाच्या वाढलेल्या मर्यादेमुळे भाजपच्या आक्रमक हिंदुत्वाच्या विरूद्ध वंचित समुदाय आणि अल्पसंख्यांक हे ‘राजद’च्या मागे ठामपणे उभे राहू शकतात.

‘राजद’सोबतच सीपीआय-एमएलची देखील बिहारच्या काही भागात गरीबांवर चांगली पकड आहे. तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून चांगली कामगिरी पार पाडली आहे. तरुणांमध्येही त्यांची चांगली प्रतिमा आहे.

नितीश कुमार यांनी बाजू का बदलली?

माजी निवडणूक धुरिण प्रशांत किशोर यांनी 2015 च्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्यासोबत काम केलं आहे.

ते म्हणतात, "नितीश कुमार यांनी बाजू बदलून 2022 मध्ये महाआघाडीत सामील होण्याचं कारण ‘जदयू’ होतं, 45 आमदार असलेल्या त्यांच्या पक्षाला भाजप खिंडार पाडून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचू शकतो याची त्यांना चांगलीच कल्पना होती.”

“आपलं मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी ते महाआघाडीत सहभागी झाले होते. आता ते मुख्यमंत्री राहण्यासाठी भाजपसोबत गेले आहेत. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर ते काय करणार हे कोणालाच माहीत नाही. ते काय करतील हे नितीश कुमार यांना स्वत:लाच ठाऊक नाही. त्यावेळी त्यांना जे योग्य वाटेल तीच गोष्ट ते करतील.

नितीश कुमार यांनी 'इंडिया' आघाडीपासून वेगळं होण्याचं खापर ‘जदयू’ने काँग्रेसवर फोडलं आहे.

‘जदयू’चे प्रवक्ते के सी त्यागी म्हणाले, "आमच्या नेत्याने (नितीश) ‘इंडिया’ आघाडीच्या स्थापनेसाठी कठोर परिश्रम घेतले. त्यांनी ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आणि अरविंद केजरीवाल यांना काँग्रेससोबत आणलं, पण काँग्रेस नेहमीच अहंकाराने वागत राहिला.

“ज्या प्रदेशांमध्ये प्रादेशिक पक्षांचं प्राबल्य आहे तिथे त्यांना स्थान देण्यात आलं नाही, उलट ज्या प्रदेशात त्यांचं अस्तित्व नाही त्या ठिकाणी त्यांना स्वत:चं स्थान निर्माण करायचं होतं. काँग्रेसच्या आडमुठेपणाने नितीश कुमार यांना इंडिया आघाडीला रामराम ठोकावा लागला.”

उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे, नितीश कुमार

फोटो स्रोत, GETTY IMAGES

मात्र, नितीश कुमार यांनी ‘इंडिया’ आघाडीचा समन्वयक किंवा पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्याच्या वृत्ताचा कायम इन्कार केला. परंतु ‘जदयू’च्या नेत्यांची अशी इच्छा होती की त्यांना ‘इंडिया’ आघाडीचा समन्वयक किंवा पंतप्रधानपदाचा उमेदवार बनवण्यात यावं.

मुंबईत झालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा पंतप्रधानपदाचा दावेदार म्हणून प्रस्ताव ठेवल्याची चर्चा होती आणि हे दोन्ही नेते नितीश कुमार यांना ‘इंडिया’ आघाडीचा समन्वयक बनवण्याच्या विरोधात होते.

'इंडिया' आघाडीच्या नुकत्याच झालेल्या ऑनलाइन बैठकीत सीपीआय(एम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी समन्वयक म्हणून नितीश कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता.

त्यांच्या प्रस्तावाला काँग्रेस आणि ‘राजद’सह इतर पक्षांनी पाठिंबा दिला होता. मात्र नितीश कुमार यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिलेला. या बैठकीला ममता बॅनर्जी उपस्थित नव्हत्या.

‘इंडिया आघाडीत अनेक पक्षांना सामील करून घेण्यासाठी प्रयत्न करूनही, बहुदा पक्षांतराच्या राजकारणामुळे नितीश कुमार हे आघाडीचे समन्वयक म्हणून राजकीय पक्षांचा विश्वास जिंकू शकले नाहीत. त्यांच्यावरील विश्वासाचा अभाव हेच यामागचं प्रमुख कारण होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)