महाराष्ट्रातल्या 'या' मतदारसंघात 72 वर्षे एकाच कुटुंबातील आमदार, दोन मुख्यमंत्रीही याच घराने दिले

पुसद, वसंतराव नाईक, इंद्रनील नाईक
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

यवतमाळमधील पुसद मतदारसंघाचे आमदार इंद्रनील नाईक यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेलं एकमेव राज्यमंत्रिपद इंद्रनील नाईक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलंय.

इंद्रनील नाईक हे राजकीय वारसा लाभलेल्या कुटुंबातून येतात. किंबहुना, घराणेशाहीचं टोक गाठलेलं हे कुटुंब आहे.

पुसदमध्ये गेली 72 वर्षे म्हणजे 1952 पासून एकाच कुटुंबातील व्यक्ती आमदार बनतोय. हे कुटुंब म्हणजे, नाईक कुटुंब!

या नाईक कुटुंबानं आतापर्यंत महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले. पहिले म्हणजे महाराष्ट्राचे 11 वर्षे मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक आणि दुसरे म्हणजे सुधाकरराव नाईक.

याच घराण्यातील इंद्रनील नाईक हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून यंदा पुन्हा एकदा विधानसभेत पोहोचले आहेत. यापूर्वी 2019 मध्येही ते आमदार म्हणून निवडून आले होते.

महाराष्ट्राची स्थापना होण्याच्या आधीपासून ते आतापर्यंत, एकाच घराण्यातला आमदार निवडून देणारा मतदारसंघ म्हणजे पुसद विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे आणि ती ओळख या निवडणुकीतही कायम राखलीय.

गेल्या 72 वर्षांपासून म्हणजे अगदी पहिल्या विधानसभा निवडणुकीपासूनच नाईक कुटुंबाने पुसद मतदारसंघावर आपला ताबा टिकवून ठेवला आहे.

1952 च्या पहिल्या निवडणुकीपासून ते 1957, 1962, 1967 आणि 1972 च्या निवडणुकीपर्यंत वसंतराव नाईक यांनी पुसद मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.

त्यांच्यानंतर सुधाकर नाईक यांनी 1978, 1980, 1985, 1990 आणि 1999 असे पाचवेळा मतदारसंघातून निवडून येत विधीमंडळात याच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.

1995 साली मनोहर नाईक यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर 2004, 2009 आणि 2014 सालीही तेच या मतदारसंघाचे आमदार होते.

2019 आणि आता 2024 च्या निवडणुकीत निवडून आलेले इंद्रनील नाईक हे या कुटुंबाच्या सहाव्या पिढीतील सदस्य आहेत. एकूणातच गेल्या 16 निवडणुकांमध्ये नाईक कुटुंबाचाच वरचष्मा या मतदारसंघावर राहिला आहे.

पुसद मतदारसंघाची रचना, इथली जातीय समीकरण आणि नाईक घराण्याचं राजकारण समजून घेऊयात.

पुसद मतदारसंघाची रचना आणि जातीय समीकरणं

पुसद मतदारसंघ हा यवतमाळ लोकसभा मतदारसंघात येतो. यामध्ये पुसद आणि महागाव तालुक्याच्या काही भागांचा समावेश आहे. हा मतदारसंघ विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर वसला आहे. हा मतदारसंघ बंजाराबहुल आहे.

त्यानंतर या मतदारसंघात आदिवासी समाजाचा प्रभाव दिसतो. तसेच ओबीसी आणि मुस्लीम समाजाची मतंदेखील या मतदारसंघात आहेत. पण, 'बंजारा समाज ज्याच्या पाठीशी तो इथला आमदार' हे गणित ठरलेलं आहे.

त्यामुळेच आतापर्यंत नाईक कुटुंबातल्या बंजारा नेत्याशिवाय इतर कोणीही या मतदारसंघाचं नेतृत्व करू शकलेलं नाही.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

नाईक घराण्याचं राजकारण

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पुसद विधानसभा मतदारसंघाचा विषय निघताच समोर येतं ते सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषवणारे दिवंगत वसंतराव नाईक यांचं नाव. वंसतराव नाईक यांनी सलग 11 वर्षं 2 महिने आणि 15 दिवस महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद भूषवलं.

वसंतराव नाईक वकिलीचं शिक्षण घेताना राजकारणात उतरले. त्यांनी महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्याच्या आधी पुसद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. 1952 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले आणि नागपूर राजधानी असलेल्या मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचं उपमंत्रिपदही त्यांनी मिळवलं. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा ते पहिले महसूल मंत्री होते.

1962 च्या निवडणुकीत मारोतराव कन्नमवार यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे महसूल खातं होतं. पण, कन्नमवारांचं निधन झालं आणि मुख्यमंत्रिपदाची धुरा ही वसंतराव नाईक यांच्याकडे आली. ते 1975 पर्यंत मुख्यमंत्रिपदी कायम होते. त्यांना पक्षातूनच आव्हान मिळालं आणि पुढे त्यांची मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द संपली. वसंतरावांच्या कारकिर्दीतच त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक हे राजकारणात सक्रिय झाले होते.

सुधाकरराव नाईक यांनी काकांचा वारसा सुरू ठेवला आणि 1978 पासून तर 1990 च्या निवडणुकीपर्यंत ते विधानसभेवर सलग निवडून गेले. पुढे हेच सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले. पण, त्यांना मुख्यमंत्रिपदासाठी कमी कार्यकाळ मिळाला. एकाच कुटुंबातून मुख्यमंत्री होणारी ही राज्यातली पहिली जोडी ठरली.

वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक

फोटो स्रोत, facebook/Indranil Naik

फोटो कॅप्शन, वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक

सुधाकरराव नाईक यांच्यानंतर त्यांचे भाऊ मनोहर नाईक यांनी 1995 ला पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपदही मिळालं होतं. त्यानंतर 1999 ला शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. यावेळी सुधाकरराव नाईक यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर सुधाकरराव नाईक यांनी या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडून लढवली होती. त्यातही त्यांचा विजय झाला. पुढे 2004 पासून तर 2014 पर्यंत मनोहरराव नाईक यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण, 2014 साली पुतणे निलय नाईक यांच्या बंडखोरीचा सामना मनोहरराव नाईक यांना करावा लागला. पुढे याच निलय नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

त्यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक मनोहर नाईक यांचा लहान मुलगा इंद्रनील नाईक यांच्याविरोधात लढवली. पण, त्यावेळीही बंजारा समाजानं निलय नाईक यांना साथ न देता मनोहर नाईक यांच्या मुलाला निवडून दिलं. त्यानंतर भाजपनं निलय नाईक यांना विधान परिषदेवर घेतलं. याच काळात या मतदारसंघात भाजपला विस्तार करता आला.

लाल रेष

या बातम्याही वाचा:

लाल रेष

राजकारणात नाईक घराण्याची तिसरी पिढी

फुलसिंग नाईक हे बंजारा समाजातील मोठं व्यक्तिमत्त्व होतं. त्यांना बाबासाहेब उर्फ राजूसिंग नाईक आणि वसंतराव नाईक अशी दोन मुलं होती.

वसंतराव नाईक राजकारणात उतरले. वसंतराव नाईक यांना दोन मुलं आहेत. अविनाश नाईक आणि निरंजन नाईक. पण, ही दोन्ही मुलं मुंबईत असल्यानं त्यांनी पुसदच्या राजकारणात फारसा रस दाखवला नाही.

वसंतरावांचे बंधू बाबासाहेब उर्फ राजूसिंग नाईक यांना सुधाकर, मधुकर आणि मनोहर अशी तीन मुलं आहेत. वसंतराव मुख्यमंत्रिपदी बसून राज्याचा कारभार हाकत होते, तेव्हा त्यांच्या मतदारसंघाचा सगळा कारभार त्याचे बंधू बाबासाहेब नाईक बघायचे.

त्यानंतर बाबासाहेबांचे सुपुत्र सुधाकरराव नाईक राजकारणात उतरले आणि त्यांनी काका वसंतरावांचा विश्वास संपादन केला.

वसंतरावांच्या मार्गदर्शनात सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास करता आला. सुधाकर नाईक मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांचे बंधू मनोहर नाईक पुसद विधानसभा मतदारसंघ सांभाळायचे. त्यानंतर मनोहर नाईक सुद्धा राजकारणात उतरले. ते राज्याचे कॅबिनेट मंत्री सुद्धा होते.

पुसद

फोटो स्रोत, Facebook/Indranil Naik

मनोहरराव नाईक यांना ययाती आणि इंद्रनील अशी दोन मुलं आहेत. इंद्रनील नाईक सध्या पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, तर ययाती नाईक हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत.

तसेच सुधाकरराव नाईक आणि मनोहर नाईक यांचे बंधू मधुकर नाईक यांचं कुटुंब गहुली गावात राहायचं. त्यांचा मुलगा निलय नाईक हे भाजपकडून विधान परिषदेचे आमदार होते. त्यांनी 2019 ला भाजपकडून इंद्रनील नाईक यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूकही लढवली होती. पण, त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला.

राष्ट्रवादीमधील फुटीसोबतच नाईक कुटुंबातही पडली फूट

अजित पवार आमदारांचा गट घेऊन भाजपसोबत सत्तेत गेले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी पक्षावरही दावा केला आणि पक्ष ताब्यात घेतला. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नाईक घराण्यातही फूट पडली.

आमदार इंद्रनील नाईक यांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं. त्यांचे वडील माजी मंत्री मनोहरराव नाईक यांनी आपण कोणत्या गटात आहोत याबद्दल कधीही जाहीर भाष्य केलं नाही. पण, त्यांची साथ इंद्रनील नाईक यांना असल्याचं बोललं जातं.

लोकसभा निवडणुकीतही त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला मदत करण्याच्या सूचना त्यांच्या कार्यकर्त्यांना फोनवरून दिल्याचं पुसदमधले पत्रकार आणि नाईक कुटुंबाशी जवळीक असणारे दिनकर गुल्हाने सांगतात.

नाईक घराण्यात कुठलाही निर्णय सर्वांनी बैठक घेऊन, सर्वांची मतं विचारात घेऊन घेतला जातो. पण, इंद्रनील नाईक यांनी अजित पवार गटात जाताना आपल्याला विश्वासात घेतलं नाही याबद्दल ययाती नाईक यांच्यामध्ये नाराजीची भावना होती.

शिवाय 2019 ला देखील ययाती हे यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. पण, त्यांना डावलून लहान भाऊ इंद्रनील नाईक यांना आमदारकीची संधी मिळाली. त्यामुळे ययाती नाईक हे संधीच्या शोधात होतेच.

इंद्रनील नाईक यांनी अजित पवार गटाची वाट धरल्यानंतर ययाती नाईक यांनी शरद पवार गटातच राहणं पसंत केलं. त्यांनी लोकसभेला महाविकास आघाडीच्या संजय देशमुख यांना मदतही केली.

त्यावेळीच त्यांनी आपण विधानसभेसाठी इच्छूक असल्याचं सांगितलं होतं. त्यांनी आता शरद पवारांकडे विधानसभेसाठी तिकीटही मागितलं आहे. तेच या मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी चर्चा रंगली आहे.

दोन सख्ख्या भावात लढत?

या मतदारसंघातील विद्यमान आमदार महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आहे. त्यामुळे महायुतीत ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळेल, अशी चर्चा आहे. महायुतीतील या मतदारसंघातील दुसरे दावेदार निलय नाईक यांना भाजपनं वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळाचं अध्यक्षपद दिलं. त्यामुळे ही जागा अजित पवारांना मिळून इंद्रनील नाईक हे इथले महायुतीचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे असेल. त्यामुळे या मतदारसंघात 'घड्याळ विरुद्ध तुतारी' अशी लढाई असणार आहे. शरद पवार गटाकडून ययाती नाईक यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ययाती स्वतःच्या सख्ख्या भावाविरोधात लढण्यासाठी तयार आहेत. त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली असून त्यांचीही उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची चर्चा मतदारसंघात आहे. आता दोन सख्ख्या भावांमध्ये लढत झाली तर ती नेमकी कशी असेल?

याबाबत नाईक कुटुंबाशी जवळीक असलेले आणि त्यांचं राजकारण जवळून पाहणारे पुसदचे पत्रकार दिनकर गुल्हाने सांगतात, “ययाती शरद पवार गटात असल्यानं मुस्लीम, दलित आणि कुणबी मतांचा फायदा त्यांना होईल. भाजपची जी मतं गेल्यावेळी निलय नाईक यांना मिळाली होती ती इंद्रनील नाईक यांच्याकडे जातील. पण, बंजारा मतांमध्ये फूट पडेल."

ययाती नाईक

फोटो स्रोत, Facebook/Yayati Naik

फोटो कॅप्शन, ययाती नाईक

गुल्हाने पुढे सांगतात, "यात मनोहरराव नाईक त्यांची सूत्र कशी फिरवतात त्यावर गणित अवलंबून असेल. मनोहरराव नाईक यांचं वय जास्त आहे. त्यामुळे ते सभा घेत नाहीत. पण, ते फोनवरून कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतात. लोकसभेलाही त्यांनी फोनवरून कार्यकर्त्यांना महायुतीच्या उमेदवारासाठी काम करण्याचे आदेश दिले होते. ते इंद्रनील नाईक यांना साथ देतील. त्याचा फायदाही इंद्रनील नाईक यांना होऊ शकतो. त्यामुळे ही लढत चुरशीची होईल.”

पुसदमधलेच ज्येष्ठ पत्रकार श्री. जी. चव्हाण यांनाही ही निवडणूक चुरशीची होईल, असंच वाटतं. ते म्हणतात, “मनोहरराव नाईक मंत्री होते. त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. ते थकलेले असले तरी त्यांच्या शब्दाला समाजात मान आहे. तेच मनोहरराव नाईक आणि इंद्रनील नाईक यांच्यासोबत आहेत. पण, त्यांना अजून आपला मोठा सुपूत्र ययाती नाईक यांची समजूत काढण्यात यश मिळालं नाही. आता मनोहर नाईक कशी स्ट्रॅटेजी ठेवतात त्यावर ही निवडणूक अवलंबून असेल. पूर्ण विरोधी पक्ष जर ययाती नाईकांच्या पाठिशी उभा राहिला तर ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल.”

"सोबतच ते या मतदारसंघातील विकासाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधतात. ते म्हणतात, सध्या पुसद विधानसभेला विकासाची गरज आहे. पुसद विधानसभा मतदारसंघात सुधाकरराव नाईक गेले तेव्हापासून विकास झालेला नाही. पुसद अत्यंत मागे पडला आहे. आता ज्याला विकासाचं व्हिजन असेल त्यालाच निवडून देण्याच्या मनःस्थितीत इथले लोक आहेत," चव्हाण सांगतात.

मतदारसंघात कोणत्या समस्या आहेत?

वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक या दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या काळात पुसदचा विकास झाला. शेती आणि त्यावर आधारित उद्योगाला चालना मिळाली. सहकार क्षेत्रात विकास होऊन साखर कारखाने आणि सूतगिरण्या उभ्या राहिल्या. दळणवळणासाठी रस्ते सुसज्ज झाले. पण, नंतरच्या काळात दुर्लक्ष झालं आणि इथले कारखाने, सूतगिरण्या बंद पडल्या.

आता तरुणांच्या हाताला काम नाही. इथं बेरोजगारीचा प्रश्न असून रोजगारासाठी पुणे-मुंबईत स्थलांतर होत आहे. तसेच या भागातील प्रमुख पीक आहे ते म्हणजे कापूस, सोयाबीन आणि तूर. यवतमाळला 'कॉटन सिटी' म्हणून ओळखलं जातं. पण, कापूस आणि सोयाबीनला भाव मिळत नाही. आताही सोयाबीनचे भाव पडलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्याचा फटका हा लोकसभा निवडणुकीतही बसला होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)