महायुतीच्या बाजूने 'त्सुनामी'सारखा निकाल येईल याचा अंदाज राजकीय विश्लेषकांना का आला नाही?

राजकीय विश्लेषकांचं गणित फसलं
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठी

महाराष्ट्रात भाजप, शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पूर्णपणे कौल मिळाला आहे. भाजपला तर 132 जागा जिंकता आल्या. हा निकाल धक्कादायक असल्याचं विश्लेषण अनेकजण करत आहेत. तसेच ही लाट नव्हे तर एक 'त्सुनामी' असल्याचंही बोललं जातंय.

कारण, आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात असा कौल मिळाला नव्हता. पण, ही इतकी त्सुनामी येईल याचा अंदाज आधी का आला नाही? एकाही राजकीय विश्लेषकांना या त्सुनामीचा कानोसा का लागला नाही? यावरच आम्ही राजकीय विश्लेषकांसोबत चर्चा केली.

विधानसभा निवडणुकीच्या आधीच शिंदे सरकारनं लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि या योजनेची तत्काळ अंमलबजावणीही केली. महिलांच्या खात्यात थेट 1500 रुपये आले. या योजनेचा फायदा महायुतीला होईल अशा शक्यता दिसत होत्या. पण, ग्राऊंडवर महिला मतदारांसोबत बोलताना या योजनेचा इतका फायदा होईल का? याबद्दल शंका येत होती.

कारण, लाडकी बहीण योजनेचा फायदा झालेल्या महिला मतदार सोयाबीनच्या भावाबद्दल बोलत होत्या. त्या महिला वाढत्या महागाईबद्दल बोलत होत्या. त्यांच्या मुलांना काम मिळत नाही, ते बेरोजगार आहेत याबद्दल बोलत होत्या. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा सरसकट फायदा होईल का? हा प्रश्न होता.

पण, निकाल लागले तेव्हा सोयाबीन, महागाई सगळे मुद्दे बाजूला पडले आणि महायुतीला भरभरून मतं मिळाली. त्यांनी 230 जागांचा टप्पा गाठला. एकट्या शिंदे सेनेला जितक्या जागा आहेत त्यापेक्षा कमी जागा या पूर्ण महाविकास आघाडीला आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

मग ही महायुतीची त्सुनामी कोणाच्या लक्षात का आली नाही? राजकीय विश्लेषकांना काहीच कसा अंदाज आला नाही? याबद्दल लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगतात, “प्रामाणिकपणे सांगायचं तर विजयाचा आकार इतका मोठा असेल असं वाटलं नाही हे मान्य करायला हवं. युतीची सत्ता ही घासून पुसून अपक्षांचं सहाय्य घेऊन येईल असं वाटायचं. अगदी कसबसं सरकार येईल असंच वाटत होतं. विजयाचा आकार निश्चितच धक्कादायक आहे. पण, हे भाजपच्या नेत्यांना सुद्धा धक्कादायक वाटत आहे.

"विजयी होऊ, पण इतकं जनमत मिळेल असं त्यांनाही वाटलं नव्हतं. भाजपचा हा विजय 2014 पेक्षाही मोठा आहे," कुबेर सांगतात.

ही सुप्त लाट सर्वेक्षणात टिपता आली नाही, असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांना वाटतं.

ते बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात, "एक सुप्त लाट कोणाला दिसली नाही. सर्वेक्षणातही ती टिपता आली नाही. अशावेळी लोक अबोल असतात. कुठलीतरी एक गोष्ट त्यांच्या मनाला पटलेली असते आणि ती या निवडणुकीत घडली. महाराष्ट्रात आतापर्यंत असं घडलं नाही. त्यामुळे आपल्याला याचा थेट अनुभव नव्हता.”

“म्हणून या निवडणुकीत अचूक अंदाज व्यक्त करणं कठीण होतं,” असं पळशीकर सांगतात.

निवडणुकीतील विजयानंतर नितीन गडकरींचा आशीर्वाद घेताना देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, निवडणुकीतील विजयानंतर नितीन गडकरींचा आशीर्वाद घेताना देवेंद्र फडणवीस
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

महाराष्ट्रातल्या या राजकीय त्सुनामीचा अंदाज आला नाही हे राजकीय विश्लेषक हेमंत देसाई मान्य करतात. ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, “1977 साली आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव झाला आणि जनता पक्षाची लाट आली. त्यावेळी जनता पक्ष नवीन होता. त्यामुळे इंदिरा गांधींचा इतका दारुण पराभव होईल असा अंदाज कोणालाच आला नव्हता."

"त्यानंतर 1980 ला इंदिरा गांधी परत चांगल्या जागा घेऊन निवडून आल्या ते यशाचा अंदाजही कोणीच व्यक्त करू शकलं नाही. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी मैदानात उतरले. त्यांना निवडणुकीत यश मिळेल असे अंदाज वर्तवण्यात आले. पण, त्यांना एकदम 415 जागा मिळतील असं कोणालाच वाटलं नव्हतं.

"पण, ते झालं. तसंच यावेळीही महाराष्ट्रात झालं. महायुतीचं सरकार येईल असा अंदाज अनेकांना होता. पण, या निवडणुकीत अचूक अंदाज व्यक्त करणं फार कठीण होतं. कारण, मुख्य सहा पक्ष, इतर लहान पक्ष आणि अनेक बंडखोर यामुळे निवडणुकीत अचूक भाकीत करणं कठीण होतं. प्रत्येक मतदारसंघातली लढाई वेगळी झाली होती. त्यामुळे या त्सुनामीचा अंदाज आला नाही,” असं देसाई सांगतात.

विजयानंतर महायुतीचे नेते

पुढे देसाई म्हणतात, “या त्सुनामीचा अंदाज फक्त राजकीय विश्लेषकांनाच आला नाही असं नाहीये, तर भाजप, अजित पवारांच्या नेत्यांना सुद्धा हा विजय आश्चर्याचा धक्का देणारा आहे. कारण, जास्तीत जास्त 100 जागा मिळतील असं भाजप नेत्यांनी स्वतःच सांगितलं होतं. तसेच अजित पवारांचे नेतेही जास्तीत जास्त 20 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करत होते. त्यांच्या अपेक्षेपेक्षा त्यांना अधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांनाही तो धक्का बसला आहे.”

अजित पवार आणि शरद पवार
फोटो कॅप्शन, अजित पवार आणि शरद पवार

महायुतीला इतक्या जागा मिळतील किंवा ही निवडणूक अशी एकतर्फी होईल याचा अंदाज पत्रकारांना का आली? राजकीय विश्लेषकांना का आला नाही? याबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे मतदान कशा पद्धतीनं झालं? असा प्रश्न उपस्थित करतात.

ते बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात, "लाट येते तेव्हा ती कळते. हे लाटेपेक्षा वरचं आहे. त्सुनामी आली असे सगळेजण म्हणतात. त्याची कल्पना खुद्द जिंकणाऱ्यांना नव्हती. याचा अंदाज कोणालाच कसा आला नाही? मतदानाआधी एकाही पत्रकाराला याची कल्पना कशी आली नाही? काय पद्धतीनं मतदान झालं? 1960 पासून आजपर्यंत महाराष्ट्रात इतिहासात इतकं मोठा न्याय एका पक्षाला कोणी दिला नाही. 2014 ला मोदी लाटेत त्यांना हे मिळवता आलं नाही.

आधी जनता पक्ष, व्ही. पी. सिंग यांची लाट होती ती दिसत होती. मोदींचीही लाट दिसत होती. पण, ही सुप्त लाट गुप्त लाट जी कोणालाही दिसली नाही. ज्यांच्यासाठी ही लाट होती त्यांनाही दिसली नाही. ही कसली लाट आहे?”

सायलेंट व्होटर महत्त्वाचा फॅक्टर?

“सायलेंट व्होटर” ला समजण्यात पत्रकार यशस्वी झाले नाहीत असं ज्येष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांना वाटतं.

ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, “लोकसभेत भाजप मिशन 45 ची तयारी करत असताना महाविकास आघाडीच्या 31 जागा येतील असं कोणालाच वाटलं नव्हतं. पण, तसं घडलं. कारण, आपल्याकडे सायलेंट व्होटर नावाचा एक मोठा प्रकार आहे. त्याचा कल कुठल्या बाजूनं जाईल याचा अंदाज बांधणं हे सगळ्यांसाठी कठीण असतं. असाच प्रकार विधानसभा निवडणुकीत घडला.

"ज्या भाजपला इतक्या जागा मिळाल्या त्यांना सुद्धा विश्वास नव्हता की आपल्याला इतक्या जागा मिळतील. यावेळी ग्राऊंडवर वेगळं चित्र दिसलं. पण, या सायलेंट व्होटरमुळे निवडणूक कुठल्या बाजूनं झुकेल याचा अंदाज आला नाही. लाडकी बहीण योजना इतक्या मोठ्या प्रमाणात प्रभावी ठरेल हा अंदाज सुद्धा आला नाही,” सुर्यवंशी सांगतात.

सायलेंट व्होटर

फोटो स्रोत, DIBYANGSHU SARKAR / Getty Images

भाजपला इतक्या जागा मिळाल्यानंतर पक्षाच्या काही नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, तर विरोधी पक्षातील लोकांनी या निकालावर शंका उपस्थित केल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'दाल में कुछ काला हैं' असं म्हणत निकालावर आणि ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे.

दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील हा महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेला निकाल असू शकत नाही, असं म्हणाले होते. पण, लाडक्या बहीणींच्या आशीर्वादानं आम्हाला इतकं बहुमत मिळाल्याचं एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सांगतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.