शरद पवारांचा 'करिष्मा' संपलाय का? पवार आणि त्यांच्या पक्षाचे भवितव्य आता काय असेल?

फोटो स्रोत, facebook
- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय...' या वाक्याने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. किमान शरद पवारांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला या वाक्याचा अर्थ नीट माहीत झाला होता.
शरद पवारांच्या उमेदवारांना त्यांच्या प्रमुख नेत्याची जादू चालून आम्ही विधानसभेत पोहोचू असं वाटत होतं. आणि म्हणूनच ज्या ज्या ठिकाणी शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत होते त्या त्या ठिकाणी पवारांच्या सभांची मागणी होत होती.
84 वर्षांच्या शरद पवारांनी देखील या मागणीला प्रतिसाद देत राज्यभर फिरून 69 जाहीर सभा घेतल्या. पत्रकार परिषदांमधून त्यांची राजकीय भूमिका वेळोवेळी सांगितली. लोकांना त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्नही केला.
प्रत्यक्ष निवडणूक निकालात मात्र शरद पवारांना 86 पैकी दहाच जागा मिळाल्या.
काही महिन्यांपूर्वी बारामती लोकसभेत विजय मिळवलेल्या शरद पवारांना बारामतीच्या विधानसभा निवडणुकीत मात्र अपेक्षित यश मिळालं नाही.


त्यामुळे शरद पवारांच्या एकूणच राजकीय प्रभावाबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.
शरद पवारांना पुन्हा एकदा राजकारणात प्रस्थापित होता येईल का? शरद पवार आणि त्यांचा पक्ष यांचं भविष्य नेमकं काय असेल? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला शरद पवारांचा करिष्मा आता संपला आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही विविध पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांशी चर्चा केली.
शरद पवारांना आता पुनरागमनाची संधी मिळणार नाही?
शरद पवारांच्या राजकीय प्रवासात अनेकदा त्यांच्यावर संकटं आलेली आहेत. मात्र मागच्या चार दशकांमध्ये शरद पवारांनी त्यांचा राजकीय अनुभव आणि कसब पणाला लावून राजकारणात पुनरागमन देखील केलं आहे.
लोकसभा निवडणुकीआधी त्यांचे पुतणे अजित पवार यांनी पक्षातील बहुतांश सगळ्याच मातब्बर नेत्यांना घेऊन पक्षावर दावा ठोकल्यानंतर, शरद पवारांनी नवीन पक्ष आणि नवीन चिन्ह घेऊन लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलं.
विधानसभा निवडणुकीत मात्र या यशाची पुनरावृत्ती करणं त्यांना जमलं नाही. त्यामुळे आता शरद पवार या वयात पुन्हा परत येऊ शकतील का? असा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे.
शरद पवारांच्या भविष्याबाबत बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "2014 पासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचं पुढचं भविष्य काय असेल असा प्रश्न सतत विचारला जातो आहे. त्याचं कारण असं की या पक्षाला आणि पक्षातल्या नेत्यांना वारंवार भाजपबरोबर जाण्याचा मोह पडत होता. आणि या न त्या कारणाने शरद पवारांनी दरवेळी राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपऐवजी काँग्रेससोबत जाण्याची गळ घातलेली आपल्याला दिसून येते. या सगळ्या कालखंडात शरद पवारांच्या राजकीय प्रवासातले दोन अत्यंत कठीण प्रसंग आले पहिला म्हणजे दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पक्षात पडलेली फूट आणि दुसरा प्रसंग म्हणजे आताच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मिळालेलं अपयश."

फोटो स्रोत, facebook
डॉ. सुहास पळशीकर पुढे म्हणाले की,"शरद पवारांनी यापूर्वी अशा कठीण प्रसंगांवर मात केली आहे हे जरी खरं असलं तरी अशा कठीण काळातून बाहेर पडायला एक अवसर लागतो. आणि ती संधी आताच्या या नव्या वर्चस्वशाली पक्षपद्धतीमध्ये शरद पवारांनी कितपत मिळेल हे सांगता येत नाही आणि शरद पवारांपुढे हे मोठं आव्हान असणार आहे."
शरद पवारांच्या आयुष्यात आलेल्या राजकीय संकटांच्या आठवणी सांगताना पळशीकर म्हणतात की, "1985 च्या सुमारास शरद पवारांनी पहिल्यांदा अशा राजकीय संकटावर मात केली. त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात एक पोकळी होती. जनता दल आणि जनता पक्षाच्या पडत्या काळामध्ये शरद पवारांना एक भूमिका घेता आली आणि स्वतःच स्थान राजकारणात पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यात त्यांना यश मिळालं.
"त्यानंतरचा दुसरा टप्पा म्हणजे 1999 मध्ये शरद पवारांचा काँग्रेसशी संघर्ष झाला तेव्हा त्या संघर्षानंतरही शरद पवारांनी पटकन काँग्रेसशी जुळवून घेतलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणातलं मध्यवर्ती स्थान कायम ठेवलं. आताच्या टप्प्यावरती शरद पवारांना मिळणाऱ्या मतांचा आकडा पुन्हा एकदा कमी झाला आहे. शरद पवारांना या निवडणुकीत 10 ते 11 टक्के मतं मिळाली आहेत. आणि त्यांच्या जागा देखील अगदी कमी निवडून आल्या आहेत," पळशीकर पुढे सांगतात.

डॉ. पळशीकर पुढे म्हणाले की, "आता या परिस्थितीमध्ये पुन्हा नव्याने पक्ष कसा उभा करायचा हे जर आव्हान असेल, तर मला असं वाटतं की एकट्या शरद पवारांपेक्षा त्यांच्या पक्षातले त्यांचे इतर सहकारी आणि नेत्यांच्या चिकाटीवर ते जास्त अवलंबून असेल. शरद पवारांबाबत वापरली जाणारी चमत्काराची भाषा आता बाजूला ठेवावी लागेल. इथून पुढे एकट्या शरद पवारांनी चमत्कार केले की त्यांनी इतरांची जुळवाजुळव करून असे चमत्कार घडवून आणले हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे."
शरद पवारांचं राजकीय भविष्य सांगणं कठीण, पण...
शरद पवारांचं भवितव्य काय असेल? असा प्रश्न आता विचारला जातोय. विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाचा झालेला पराभव आणि एकूणच राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता शरद पवारांसमोर मोठं आव्हान असणार आहे.
शरद पवारांच्या भवितव्याबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "महाराष्ट्रात एकेकाळी विचारसरणी, नेता, पक्षाची धोरणं महत्त्वाची होती. यंदाच्या निवडणुकीत यापैकी कशावरही चर्चा झाली नाही. शरद पवारांचं भविष्य सांगणं कठीण आहे पण शरद पवार हे लांब पल्ल्याचे धावपटू (लॉन्ग डिस्टन्स रनर) आहेत. शरद पवारांनी इतके चढउतार किंवा मुख्यतः उतार, गेल्या काही वर्षात पाहिलेले आहेत आणि कधीही त्या उतारांनी शरद पवार दबून गेलेले नाहीत. त्या उतारातून ते परत बाहेर आलेले आहेत. शरद पवारांनी लोकांमध्ये जाऊन अनेकवेळा संघर्ष केलेला आहे, त्यांनी अनेकदा पुन्हा उभारी घेतलेली आहे. त्यामुळे शरद पवार नेमकं काय करतील हे आत्ताच सांगता येणार नाही."

अजित पवारांबाबत बोलताना कुमार केतकर म्हणाले की, "1999मध्ये जेव्हा शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले त्यावेळी त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. पण अजित पवारांनी स्वतःचा पक्ष स्थापन न करता आपणच मूळ पक्ष आहोत असा अविर्भाव आणला. अजित पवारांचं चिन्हही बदललं नाही. त्यामुळे त्याचा राजकीय फायदा या निवडणुकीत झालेला दिसून येतो."

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंबाबत बोलताना लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर म्हणाले की, "मागच्या दोन वर्षांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट पाहता असं म्हणावं लागेल की शरद पवारांच्या पक्षाची शोकांतिका (ट्रॅजेडी) झाली आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं प्रहसन (फार्स) झाला. कारण वयाच्या 84व्या वर्षी शंभरपेक्षा जास्त सभा ज्यांनी घेतल्या, ज्यांनी खऱ्या अर्थाने जीवाचं रान केलं त्यांना आणि आणि त्यांच्या पक्षाला या निवडणुकीत फारसं काही हाताला लागलं नाही, किंबहुना असलेली ताकद सुद्धा कमी झाली. शरद पवारांना यापुढचं राजकारण त्यांचं असलेलं अस्तित्व टिकवण्यासाठीच करावं लागेल असं दिसतंय."

महाराष्ट्राच्या राजकारणातून शरद पवार संपलेत का?
सुमारे पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर मागच्या काही वर्षांमध्ये शरद पवारांनी अनेकदा निवृत्तीचे संकेत दिले आहेत. विधानसभेच्या प्रचारातसुद्धा शरद पवारांनी आता यापुढे निवडणुकीच्या राजकारणात असणार नाही अशा अर्थाचं विधान केलं होतं.
मात्र शरद पवारांचं राजकारण माहिती असणाऱ्या अनेकांनी शरद पवारांनी निवडणूक लढवली नाही तरी ते राजकारण सोडू शकत नाहीत असं अंदाज वर्तवला होता. आता विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांचं राजकारण खरोखर संपलं आहे का? असा प्रश्न विचारला जातोय.
याबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार राही भिडे म्हणाल्या की, "मी 1985 पासून शरद पवारांचं राजकारण अगदी जवळून बघितलं आहे. त्यामुळे शरद पवार हे हार मानणारे नाहीत हे तर मी ठामपणे सांगू शकते. शरद पवारांच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना एवढा मोठा पराभव स्वीकारावा लागणं त्यांच्यासाठी चांगलं नाही. शरद पवारांकडे आता असलेले काही लोक पुढच्या पाच वर्षांचा विचार करून पवारांना सोडून जाऊ शकतात."

फोटो स्रोत, facebook
राही भिडे म्हणाल्या की, "शरद पवारांचं जसजसं वय वाढत गेलं तसतशा त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांच्या राजकीय तक्रारी वाढत गेल्या. स्वतःच्या पुतण्याला देखील ते थोपवू शकले नाहीत. शरद पवारांना अजित पवारांच्या विरोधात त्यांच्याच कुटुंबातल्याच एका व्यक्तीला उभं करण्याची वेळ आली. अजित पवार भाजपकडे गेल्यानंतर सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांसारखे नेते कितपत हा पक्ष सांभाळू शकतील? असा प्रश्न आहे. येणाऱ्या काळात काही लोक निष्ठेने शरद पवारांसोबत राहतीलसुद्धा."
याबाबत बोलताना टाइम्स ऑफ इंडियाच्या पत्रकार अलका धुपकर यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं की, "शरद पवार संपले आहेत असं मी कधीही म्हणणार नाही कारण राजकारणात काहीही होऊ शकतं. शरद पवारांचा पक्ष, त्यांचं चिन्ह आणि राज्यातल्या सहकार, शिक्षण क्षेत्रावर वर्चस्व असलेले मोठमोठे राजकीय पक्ष अजित पवारांकडे गेले. त्यामुळे पुन्हा एकदा सुरुवात करून शरद पवारांनी किमान दहा आमदार तरी निवडून आणले आहेत."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











