बाळासाहेब थोरातांना पाडणारे 'जायंट किलर' अमोल खताळ कोण आहेत? थोरातांना त्यांनी कसं पाडलं?

फोटो स्रोत, Facebook/Amol.D.Khatal/BBThorat
- Author, प्रविण सिंधू
- Role, बीबीसी मराठी
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालात भाजपच्या नेतृत्वातील महायुतीचा मोठा विजय झाला आहे. या निकालाने सर्व एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवले. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. यात बाळासाहेब थोरात यांचाही समावेश आहे.
मागील 8 विधानसभा निवडणुकीत तब्बल 40 वर्षांपासून बाळासाहेब थोरात संगमनेर मतदारसंघातून निवडून येत होते. मात्र, या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या (शिंदे गट) अमोल खताळ यांनी थोरातांचा 10 हजार 560 मतांनी पराभव केला आणि ते राज्याच्या राजकारणातील जायंट किलर ठरले. अमोल खताळ यांना 1 लाख 12 हजार 386 मते मिळाली, तर बाळासाहेब थोरात यांना 1 लाख 1 हजार 826 मते मिळाली.
1962 पासून संगमनेर मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे. 1962, 1967 आणि 1972 च्या निवडणुकीत काँग्रेस नेते बी. जे. खताळ पाटील यांनी संगमनेरचे प्रतिनिधित्व केले.
यानंतर 1978 मध्ये बाळासाहेब थोरात यांचे वडील भाऊसाहेब थोरात हे संगमनेरमधून आमदार झाले. 1980 मध्ये पुन्हा काँग्रेस नेते बी. जे. खताळ निवडून आले. 1985 पासून बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
संगमनेर तालुक्यातील सहकार क्षेत्रावर बाळासाहेब थोरातांचं एकहाती नियंत्रण आहे. त्यांनी तालुक्यात सहकारी साखर कारखाना, दूध उत्पादक संघ, शाळा, महाविद्यालये, इंजिनियरिंग कॉलेज, डेंटल कॉलेज, फार्मसी कॉलेज असं संस्थांचं मोठं जाळं निर्माण केलं आहे. त्यामुळे थोरातांच्या प्रचारात या सर्वच संस्थांची यंत्रणा पूर्ण ताकदीने उतरलेली दिसते.
असं असतानाही बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने राजकीय विश्लेषकांकडून जायंट किलर ठरलेले अमोल खताळ कोण आहेत आणि बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाची कारणं काय आहेत हे जाणून घेतलं.
जायंट किलर अमोल खताळ कोण आहेत?

फोटो स्रोत, Facebook/Amol.D.Khatal
अगदी विधानसभा निवडणूक 2024 जाहीर झाल्यानंतरही भाजपमध्ये असलेले अमोल खताळ ऐनवेळी शिवसेनेच्या शिंदे गटात आले आणि त्यांना संगमनेर मतदारसंघाचे तिकीट मिळाले. भाजप नेते राधाकृष्ण विखे यांचे निकटवर्ती अशी अमोल खताळ यांची ओळख आहे.
अमोल खताळ यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात काँग्रेसमधून झाली. पुढे हा प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) असा झाला. विशेष म्हणजे अमोल खताळ यांची कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही.
अमोल खताळ यांच्या आडनावामुळे त्यांचा संबंध महाराष्ट्राचे माजी पाटबंधारे मंत्री बी. जे. खताळ पाटील यांच्याशीही जोडला जातो, पण ते अमोल खताळ आणि माजी मंत्री खताळ यांच्यात जवळचं नातं नाही.



फोटो स्रोत, Facebook/Amol.D.Khatal
अमोल खताळ त्यांच्या सुरुवातीच्या राजकीय कारकीर्दीत संगमनेर तालुका काँग्रेसचे पदाधिकारी होते. त्यांनी बाळासाहेब थोरातांचे कार्यकर्ते म्हणूनही काम केले. पुढे ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. तेथे त्यांचे संगमनेरमधील ठेकेदारीच्या मुद्द्यावर मतभेद झाले.
बाळासाहेब थोरात सामान्यांकडे दुर्लक्ष करून ठराविक ठेकेदारांना प्राधान्य देतात, असा अमोल खताळ यांचा आक्षेप होता. पुढे त्यांनी राष्ट्रादीतून बाहेर पडत राधाकृष्ण विखे पाटील यांचं काम सुरू केलं.
विखेंनी अमोल खताळ यांना संगमनेर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद दिलं. त्या काळात वर्षभरात त्यांनी सामान्य नागरिकांना या योजनेचा मोठा लाभ मिळवून देत प्रभावी काम केलं आणि त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची फळी उभी केली.
बाळासाहेब थोरातांच्या पराभवाची कारणं काय?

फोटो स्रोत, Facebook/BBThorat
बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर विधानसभा मतदारसंघावर प्रचंड प्रभाव होता, पकड होती. संगमनेरमधील सर्व सहकारी संस्था थोरातांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे एवढी मोठी प्रचार यंत्रणा असतानाही थोरातांचा पराभव का झाला यावर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक पद्मभूषण देशपांडे यांनी काही महत्त्वाची कारणं सांगितली.
पद्मभूषण देशपांडे म्हणाले, "बाळासाहेब थोरात सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालवतात. त्यामुळे थोरात यांचा हा पराभव महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आश्चर्याचा धक्का आहे. या निकालाकडे बघितलं, तर ज्या ज्या नेत्यांनी आपल्या नातेवाईकांमध्ये पदांचं वाटप केलं आहे, कुटुंबीयांना सत्तेचा मोठा वाटा दिला आहे, त्यातील अनेक दिग्गज पराभूत झाले आहेत. मतदारसंघावर एकहाती प्रभाव असला की, कधी कधी राजकीय नेत्यांमध्ये गाफिलपणाही येतो. त्या गाफिलपणाचा बाळासाहेब थोरातांना फटका बसला आहे."
"जवळपास 50 वर्षे या मतदारसंघाची सत्ता थोरात कुटुंबाकडे होती. संगमनेरचं नगराध्यक्षपद थोरातांकडे होतं, पदवीधर मतदारसंघाची आमदारकीही त्यांच्या घरात आहे. आता थोरातांची मुलगी जयश्री थोरातही राजकारणात उतरली आहे. त्यांचे जावई सहकारी संस्थांचे पदाधिकारी आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणजे सत्तेचं वर्तुळ आक्रसत जातं. संगमनेरमध्ये तेच घडलं," असं मत पद्मभूषण देशपांडे यांनी व्यक्त केलं.
"संगमनेरमध्ये राजकीय प्रतिनिधित्व हवं असलेली मोठी तरुणांची संख्या होती. त्यांनी अमोल खताळ यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला," असंही पद्मभूषण देशपांडे यांनी नमूद केलं.

फोटो स्रोत, Facebook/BBThorat
संगमनेरमधील स्थानिक ज्येष्ठ पत्रकार किसन हासे यांनी या पराभवाला बाळासाहेब थोरात यांच्या प्रचार यंत्रणेचा अतिआत्मविश्वास कारणीभूत असल्याचं म्हटलं. तसेच खताळांच्या विजयात आणि थोरातांच्या पराभवात महत्त्वाच्या ठरलेल्या मुद्द्यांवर लक्ष वेधलं.
किसन हासे म्हणाले, "बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची राज्याची जबाबदारी घेतली आणि मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालं. थोरातांच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही परिस्थितीत ते जिंकतील, त्यांना कुणीही पराभूत करू शकत नाही, असा अतिआत्मविश्वास होता. त्यामुळे थोरातांच्या यंत्रणेला बदलेल्या वातावरणाचा अंदाज आला नाही. त्यांना त्या वातावरणाचं गांभीर्य कळालं नाही."
"दुसरीकडे महायुतीचे उमेदवार असलेल्या अमोल खताळ यांच्या प्रचारासाठी राधाकृष्ण विखे यांनी संगमनेरमधील स्थानिक यंत्रणा तर कामाला लावलीच, शिवाय लोणीतूनही खताळांच्या प्रचाराला यंत्रणा पाठवली. महायुती म्हणून मुंबईतूनही खताळांना मदत मिळाली. विशेष म्हणजे संगमनेरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनीही प्रचारात महत्त्वाची भूमिका केली. सुजय विखेंनीही अनेक सभा घेत नियोजनबद्ध प्रचार केला," असंही किसन हासे यांनी नमूद केलं.
संगमनेरमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फार प्रभाव दिसला. याशिवाय हिंदुत्वाच्या मुद्द्याचाही परिणाम झालेला दिसला. "योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे घोषणा दिली आणि भाजपकडूनही एक हैं तो सेफ हैं असा प्रचार झाला. त्याचा मतदारांवर परिणाम झाला," असं मत हासे यांनी व्यक्त केलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
पराभवाचे पडसाद काय पडतील?
संगमनेर मतदारसंघात सहकारी संस्थांचे मोठे जाळे आहे. या संस्था स्थानिक सत्तेचं केंद्र आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्यानंतर या सहकारी संस्थांमध्येही महायुतीकडून थोरातांना आव्हान दिले जाईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











